top of page

हिंदू स्वयंसेवक संघ, युएसए

मी भारतात राहत असताना, माझा कधीही संघ किंवा त्याच्या शाखांशी फारसा थेट संबंध कधी आला नाही. पण काही वर्षांपूर्वी सिनसिनाटीमध्ये आल्यावर, नियमित शाखेत जाणाऱ्या काही मित्रांशी संबंध आला. मग शाखा हा प्रकार काय असतो हे पाहण्यासाठी आम्ही एका साप्ताहिक सत्राला गेलो. आणि यानंतरचा शाखेबरोबरचा प्रवास हा आमच्यासाठी समृद्ध करणारा ठरला आहे. खरंतर संघाच्या कार्याची व्याप्ती हि इतकी मोठी आहे, कि ती अशा लेखात समाविष्ट होण्यासारखी नाही पण मी ती थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा लेख वाचून एक-दोन व्यक्तींनाही शाखेत जाण्याची प्रेरणा मिळाली, तरी ते खूप मोठं यश आहे! 


एचएसएस काय आहे?

गेल्या काही दशकात, अमेरिकेत भारतीय - मुख्यत्वे हिंदू नागरिक बऱ्याच संख्येने स्थलांतरित झाले. उद्योग, नोकरी, उच्चशिक्षण आदी उद्देशाने हिंदू समाज अमेरिकेत स्थलांतरित झाला. भारतीय संस्कृतीचा संपन्न वारसा असलेला समाज अमेरिकेत वास्तव्याला आला आणि साहजिकच आपली संस्कृती त्याने बरोबर नेली. आपल्या संस्कृतीची ओळख आपल्या मुलांना व्हावी, इथल्या जनतेला कळावी हि भावना बळावू लागली. यातूनच १९८९ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर हिंदू स्वयंसेवक संघ या संघटनेची स्थापना झाली.


हिंदू स्वयंसेवक संघ यूएसए (एचएसएस किंवा एचएसएस यूएसए) ही एक ५०१(सी)(३), स्वयंसेवी, non-profit, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटना आहे. संघ, ज्याला संघटना म्हणून ओळखले जाते, हि हिंदू अमेरिकन समुदायाला, हिंदू धर्माचे आदर्श आणि मूल्ये आचरणात आणण्यासाठी, जतन करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी समन्वय साधण्याचे उद्दिष्ट ठेवते. संघाचं कामकाज हे प्रामुख्यतः खालील तत्वांवर चालतं -


१. सामाजिक सेवा

२. मानवी आरोग्य

३. नागरी सहभाग

४. बालसंगोपन

५. समुदाय उभारणी आणि समृद्धी

६. युवा विकास


एचएसएस अमेरिकेतील अनेक शाखांद्वारे या तत्वांवर आधारित कार्यरत आहे. एचएसएसचा भारतीय किंवा जागतिक राजकारणाशी काहीही संबंध नाही अथवा एचएसएस कोणतेही राजकीय विचार व्यक्त करत नाही.


एचएसएसचं ध्येय काय आहे?

एक वैविध्यपूर्ण आणि आशावादी हिंदू अमेरिकन समाजाचे आयोजन करणे जे एकत्रितपणे त्यांच्या आव्हानांना तोंड देऊ शकेल आणि जगाच्या कल्याणासाठी योगदान देऊ शकेल.


शाखा म्हणजे काय?

शाखा ही हिंदू स्वयंसेवक संघाचा साप्ताहिक स्थानिक मेळावा असतो जिथे सर्व वयोगटातील सदस्य /कुटुंबे एकत्र येतात. एचएसएस अमेरिकेतील ३३ राज्यांमधील २६६ शाखांद्वारे, हिंदू धर्मावर आधारित, साप्ताहिक शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे - शिस्त, आत्मविश्वास, संघटन आणि निःस्वार्थ सेवेची भावना निर्माण करण्याच्या आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. तसेच सेवा उपक्रमांद्वारे, नागरी कर्तव्य, जबाबदारी आणि स्वयंसेवेची भावना वाढवण्याचा प्रयत्न करते. शाखेमध्ये सहभाग घेण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जात नाही.



सिनसिनाटीमधील शाखा

सिनसिनाटीमध्ये पहिली शाखा साधारण १३ वर्षांपूर्वी सुरु झाली. मोजक्याच लोकांनी सुरु केलेली ‘गजानन शाखा’ बघता बघता इतकी मोठी झाली कि अलीकडेच दुसरी शाखा - ‘कार्तिकेय शाखा’ सुरु करण्यात आली. आपल्या दोन्ही शाखा अतिशय सक्रिय असून आपल्या शाखांमध्ये सर्व वयोगटातील कार्यकर्त्यांचा (बाल, किशोर, तरुण, महिला) सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. अमेरिकेत शाखेचे स्वरुप, कौटुंबिक आहे. दर रविवारी, कार्यक्रम एका संरचित परंतु आकर्षक स्वरूपात असतो. 


शाखेची सुरुवात, गुरु मानल्या जाणाऱ्या भगव्या ध्वजासमोर एकात्मता मंत्र म्हणून होते. प्रार्थनेनंतर शारीरिक प्रमुखाद्वारे warm up exercises आणि सूर्यनमस्कार घेतले जातात. यानंतर साधारण ३० मिनिटं वेगवेगळे शारीरिक आणि मानसिक शक्ती सक्रिय करणारे गेम्स खेळले जातात. गेम्स हे मुलं शाखेत येण्यास उत्सुक का असतात याचे हे एक मुख्य कारण आहे! गेम्स खेळून झाल्यावर थोडी श्वासावर नियंत्रण ठेवणारी योगासनं केली जातात.


यानंतर सांघिक गीत गायलं जातं आणि मुलांना अमृतवचन, ईश चिंतन आणि सुभाषित म्हणण्याची संधी दिली जाते. या सर्वांमुळे मुलांचा सांस्कृतिक गोष्टींशी संबंध तर येतोच पण त्याचबरोबर याचा उपयोग त्यांची stage किंवा public speaking ची भीती कमी करण्यासाठीही होतो. 


यानंतर प्रत्येकाची त्यांच्या वयोगटानुसार विभागणी केली जाते - बाला (वय वर्ष ८ पर्यंत), बाला-किशोर (९ ते १२), किशोर (१२ ते १७) आणि तरुण (वय वर्ष १८ आणि अधिक). प्रत्येक वयोगटाच्या बौद्धिक प्रमुखाद्वारे त्या त्या वयोगटासाठी योग्य अशा हिंदू धर्म, संस्कृती आणि सामाजिक जबाबदारीबद्दलच्या चर्चा किंवा प्रात्यक्षिके घेतली जातात. किशोर वयोगटासाठी career मार्गदर्शन केले जाते. सर्व वयोगटांमध्ये, सर्व कार्यकर्त्यांना / सदस्यांनाही विविध विषयांवर बोलण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. अशा चर्चांचा उपयोग public speaking, leadership skills विकसित करण्यासाठी होतो ज्यासाठी बरेच जण पैसे भरून Toastmaster सारख्या उपक्रमांमध्ये भाग घेतात. 


या ९० मिनिटांच्या नियमित कार्यक्रमानंतर शाखेची सांगता पुन्हा भगव्या ध्वजासमोर प्रार्थना करून होते.


आपल्या शाखांकडून केल्या जाणाऱ्या सामाजिक कार्याबद्दल थोडंसं

"मानवतेची सेवा हीच देवाची सेवा आहे" या भावनेशी प्रामाणिक राहून आपल्या शाखांच्या स्वयंसेवकांकडून विविध प्रकारचं समाजकार्यही केलं जातं. सामुदायिक संपर्कात सहभागी होऊन, सदस्य नागरी कर्तव्य आणि जबाबदारीची भावना विकसित करतात. हा दृष्टिकोन व्यक्तींना सक्षम बनवण्याचा आणि समुदायात परस्पर सहाय्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. आपल्या शाखांकडून अलीकडे केली गेलेली काही सामाजिक कार्यं पुढीलप्रमाणे:


A Child's Hope Int'l द्वारा अन्न वितरण - या उपक्रमात ४ ते ७५ वयोगटातील ७० शाखेच्या स्वयंसेवकांनी भाग घेतला आणि क्युबामध्ये वितरित होणाऱ्या सुमारे १०४,००० फूड पॅकेट्स तयार करण्यामध्ये हातभार लावला.


Earth Day Festival - या उपक्रमाअंतर्गत, सस्टेनेबल एनर्जी, रिसायकलिंग, कमी प्लास्टीकचा वापर आणि सौरऊर्जा याबाबत जनमाणसात जागृती निर्माण केली जाते. बरेच विक्रेते यावर आधारित उत्पादने विकतात किंवा प्रात्यक्षिके दाखवतात. शाखेच्या स्वयंसेवकांनी विक्रेत्यांना विविध प्रकारे मदत केली आणि या उपक्रमाला मोठा हातभार लावला.


सेवा दिवाळी - या उपक्रमाअंतर्गत अन्नाची कमतरता, टंचाई असणाऱ्या कुटुंबाना पॅकेज्ड फूड चा पुरवठा केला जातो. दरवर्षी मेसन आणि जवळच्या उपनगरीय भागातल्या कुटुंबाकडून, स्वयंसेवक पॅकेज्ड फूड गोळा करतात आणि ग्रेटर सिनसिनाटीतील विविध  फूड पॅन्ट्रीसला दान करतात. 


Flying  Pig - यावर्षीच्या Flying Pig Marathon मध्ये शाखेच्या स्वयंसेवकांनी, वीस हजारहून अधिक धावपटूंना सेवा दिली, प्रोत्साहन दिले आणि पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन केले. या सेवेसाठी, आपल्या शाखांना सर्वोत्तम गटाचं तिसरं पारितोषिक आणि $१,०५० चे बक्षीस मिळाले, जे त्यांनी मेसन कॉमेट पॅन्ट्रीला दान केले.


My Ganesha - या उपक्रमाअंतर्गत शाखेचे स्वयंसेवक लहान मुलांना दरवर्षी गणेशोत्सवात मातीचा गणपती कसा बनवतात, त्याची पूजा कशी करतात, आरती कशी करतात हे मोफत कार्यशाळेद्वारे शिकवतात. 


Taste Of India Festival - हिंदू टेम्पल ऑफ सिनसिनाटीतर्फे आयोजित केलेल्या या उपक्रमात, तीन हजारहून अधिक लोकांनी हजेरी लावली. शाखेच्या स्वयंसेवकांनी फूड काउंटर सांभाळण्यात, तिकिटे गोळा करण्यात, जेवण वाढण्यात मदत केली.


शाखेचे वार्षिक उत्सव

प्रत्येक शाखा सहा प्राथमिक उत्सव साजरे करते. या उत्सवांचं उद्दिष्ट हे सर्व समुदायाला एकत्र आणून, त्यांना हिंदू इतिहास आणि वारसा जाणून घेण्याची संधी उपलब्ध करून देणं हे आहे. आपल्या सिनसिनाटीच्या शाखाही हे उत्सव साजरे करतात आणि या उत्सवांना लोक मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. 


सगळे उत्सव हे शाखेच्या वेळात साजरे केले जातात. प्रत्येक उत्सवाला एका ज्येष्ठ एचएसएस च्या कार्यकर्त्याला आणि प्रभावशाली काम केलेल्या स्थानिक व्यक्तीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलं जात. प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणं होतात आणि उत्सवाची सांगता हि त्या उत्सवाला साजेश्या अशा मिठाई वाटपाने  होते. या उत्सवांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे:


मकर संक्रांति हा उत्सव जानेवारीमध्ये साजरा केला जातो. मकरसंक्रांतीला सूर्याचं उत्तरायण सुरु होतं. याच अनुषंगाने, ‘मानवतेसाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी योग’ या तत्वाखाली या काळात आयोजित केला जाणारा एक उपक्रम म्हणजे सूर्यनमस्कार यज्ञ. सोळा दिवसांच्या या उपक्रमामध्ये अमेरिकेतल्या चाळीसहून अधिक राज्यांमधले सदस्य स्वतःच्या घरातून, योगा स्टुडिओजमधून, शाळातून जास्तीत जास्त सामुदायिक सूर्यनमस्कार करण्याचा प्रयत्न करतात. या उमक्रमाचा उद्देश लोकांमध्ये योगासनांबद्दल जागृती करणं आहे.


वर्ष प्रतिपदा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि मागील वर्षाचा शेवट. या सणाच्या निमित्ताने गेल्या वर्षाच्या कामाचा आढावा घेतला जात आणि येणाऱ्या वर्षाची योजना करण्यात येते.


हिंदू संघटन दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू राजा म्हणून राज्याभिषेक झाल्याच्या स्मरणार्थ एचएसएस हा दिवस साजरा करते. अनेक शाखा जैन, बुद्ध, शीख, बीएपीएस, उमिया माता मंदिर इत्यादी धार्मिक परंपरेतील विविध संप्रदायांना आमंत्रित करून हा उत्सव साजरा करतात. हिंदू समाजात मोठ्या चर्चा आणि मैत्री संवाद निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबवला जातो.


गुरु पौर्णिमा एचएसएसमध्ये, भगव्या ध्वजाला गुरु मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी स्वयंसेवक या ध्वजाची पूजा करतात. या उत्सवाद्वारे दिलेला संदेश सूक्ष्म आहे परंतु अर्थपूर्ण आहे की विचारसरणी कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठी आहे आणि एचएसएस ही व्यक्ती-केंद्रित संघटना नाही तर एक विचारसरणी-चालित संघटना आहे.


रक्षा बंधन देशभरातील एचएसएस शाखा दरवर्षी हा उत्सव ‘सार्वत्रिक एकता दिन’ म्हणून साजरा करतात, जो एकमेकांचे रक्षण करण्याच्या बंधनांचे आणि सामायिक जबाबदाऱ्यांचे प्रतीक आहे. "राखी" या धाग्याची देवाणघेवाण करून हा उपक्रम राबवला जातो. अग्निशमन दलाचे जवान, शाळा अधिकारी, शहर अधिकारी, पोलिस - अशा समाजाला सेवा देणाऱ्या लोकांसोबत सामायिक केलेल्या बंधाचा उत्सव साजरा केला जातो आणि त्यांचा आदर केला जातो. स्वयंसेवक त्यांना भेटतात, रक्षाबंधन म्हणजे काय ते समजावून सांगतात, राखी बांधतात आणि मिठाई वाटतात.


विजया दशमी हा एचएसएसचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. संघाची स्थापना / जन्म विजयादशमीला झाली. स्वयंसेवक या दिवशी शस्त्र-पूजनाचा प्रतीकात्मक समारंभ करतात. हा उत्सव डेटन, कोलंबस, क्लीव्हलँड आणि आपल्या इथल्या शाखा एकत्र साजरा करतात. प्रत्येक शाखा एक प्रत्यक्षिक सादर करते - जी त्यांच्या शारीरिक कौशल्यांचे प्रदर्शन करते - योगा, पदविन्यास, दंड इत्यादी आणि शक्य असल्यास घोष वाद्यांसह.


एकंदरीत बऱ्याचजणांना संघ किंवा शाखा म्हटलं कि राजकारण, कट्टरपंथी विचारसरणी अशा काही गोष्टी मनात येतात. पण संघाची विचारसरणी, त्यांचं कार्य हे खूप वेगळं, मोठं आणि केवळ मानवी हिताचं आहे. हे सर्व वाचल्यावर तुम्हालाही हे नक्की पटलं असेल अशी अशा करतो. एचएसएसचं उद्दिष्ट हे अमेरिकेतील आजच्या आणि भावी पिढ्यात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे जतन करणे आणि त्यातून स्थानिक समाजात सामाजिक कार्याचे योगदान करतील अशा प्रभावी व्यक्ती निर्माण करणे हे आहे. आपल्याला जर आपल्या हिंदू धर्माचे आदर्श आणि मूल्य जर इथं राहून जतन करायची असतील, पुढे न्यायची असतील तर आपण आपल्या मुलांना किमान हे सर्व जाणून घ्यायची संधी तरी द्यायला हवी. आणि हि संधी देण्यासाठी शाखेसारखा एक सोपा मार्ग आपल्या सिनीसिनाटीमध्ये उपलब्ध आहे. एकदा येऊन तरी बघा! कोणतीही नोंदणी आवश्यक नाही. फक्त या आणि जर तुम्हाला आवडले तर येत राहा!


अधिक माहितीसाठी खालील स्वयंसेवकांशी संपर्क साधा:

रोहित येवलेकर - imry07@gmail.com 

माधवी केळकर - madhavi.kelkar@gmail.com

लक्ष्मी कोटरा   - nagalaxmi.kotra@gmail.com


फेसबुक पेज - https://www.facebook.com/HSSCincy/


गजानन शाखेची अधिक माहिती 

पत्ता- 9137 Cincinnati Columbus Rd (Near Domino's)

दिवस - रविवार

वेळ - सायंकाळी ५ ते ६:३०

कार्तिकेय शाखेची अधिक माहिती 

पत्ता - 6752 Cincinnati Dayton rd, West Chester, OH,45044

दिवस - शुक्रवार

वेळ - सायंकाळी ६:३० ते ८


-निलज रुकडीकर



Related Posts

See All
Culture of ‘Giving’

One of the core values of Triveni is to contribute for betterment of society. Triveni engages in multiple activities through which we try...

 
 
 

Comments


bottom of page