रसायन… एक अजबच!
- अर्चना मुकादम

- Sep 30
- 2 min read
जत्रेतील रंगीबेरंगी रंगाच्या सरबताच्या बाटल्या, बर्फाचे गोळे बच्चे कंपनीला आपल्याकडे वेधून घेत होते. गोड-आंबट -थंडगार सरबताच्या, गोळ्यांच्या दृष्टीसुखाने सुद्धा चेहऱ्यावर सुखद भावना उमटत होत्या. सूर्यप्रकाशात तर सरबत सोनसळी, पिवळसर, लालसर, गुलबट रंगात अजूनच लोभसवाणे दिसत होते. साखर, इसेन्स, लिंबू, केशर सिरप या घटकांमुळे सरबत तयार होते. अरे हे तर एक प्रकारचे रसायनच की. शाळा, कॉलेजात रसायन शात्र शिकताना धडकी भरते. भल्याभल्यांच्या चारी मुंड्या चित होतात. मग रसायनाचा (रसायन शास्त्राचा नाही ) उदगाता कोण? पहिले रसायन कोणी.. कधी अस्तित्वात आणले. वारूळातून मुंग्या भराभर बाहेर पडतात तशी मनात प्रश्नांची भेंडोळी सुरु झाली.
रसायन म्हणजे काय याचे जुजबी उत्तर आपल्याना माहित आहे. पण अनेक रसायनं एकत्र आली तर एखादे अजबच रसायन निर्माण होईल.
क्वचित प्रसंगी आपणसुद्धा एकमेकांना म्हणतो, “तो आमका तमका म्हणजे अजबच रसायन आहे. इतकी वर्ष जवळ राहतो, बोलतो पण मनाचा, वागण्याचा, बोलण्याचा थांगपत्ताच लागत नाही.” सर्व सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली. कोट्यावधी माणसे, समुद्र, झाडं, पर्वत, पाणी, जमीन त्याने कशी निर्माण केली असतील? कारण प्रत्येकाचे रंग, रुप, आकार, स्पर्श, गंध, गुणधर्म वेगळे. भिन्न देहयष्टी वरून माणूस कोणत्या देशातला आहे याचा अंदाज बांधता येतो. ईश्वराने कोणते अजब रसायन वापरून या सगळयांची निर्मिती केली असेल ते तोच जाणो. कारण साम्य कोणताच नाही! अगदी माणूस,नदी, फळ, फुलं, डोंगर सुद्धा याला अपवाद नाहीत.
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी आपण जवळ जवळ रहातो. एक मेकांना ओळखतो. पण मनाने कोसो मैल दूर असतो. कोणाला कोणाचा मनाचा थांगपत्ता लागत नाही. आपण एखाद्या मैत्रिणीला किंवा पतीला एखाद्या क्षणी, एखाद्या प्रसंगी विचारले आत्ता या प्रसंगी तुमची पत्नी किंवा मैत्रीण इथे असती तर काय
म्हणाली असती? उत्तर मिळते, नाही बाबा मी काय सांगणार. कारण प्रत्येकाचे प्रत्येकाशी असलेले मतांचे रसायन निराळेच असणार.
बुद्धिबळातील हत्ती, घोडा,वजीर घराघरात उडया मारून एकमेकांवर मात करतात तसेच आपण माणसं सुद्धा एकमेकांवर कुरघोडया करीत असतो. याचा शोध एखाद्या रसायन शास्त्रद्याला लागला असेलका! व्यक्ती तितक्या प्रकृती. कोणाच्या अंतरंगात डोकावता येत नाही. यावर हमखास उपाय सापडेल का? अगदी
सरणावर जायची वेळ आली तरी स्वभाव बदलत नाही. कारण असे कोणते महाभयानक रसायन सगळ्या मधे असेल? पशु, पक्षी, प्राण्यांमध्ये सुद्धा. कारण सापाला दूध पाजले तरी तो गरळ ओकतोच. ते कितीही माणसाळले तरी मुळस्वभाव येळकोट जात नाही. ते ज्या रसायनाने बनले असतील त्याचाच गुणधर्म.
कधी तरी हे खदखदणारे रसायन उफाळून येते. त्याचे रूपांतर राग, लोभ, प्रेम, मत्सर, क्रोधात होते. स्फोट होतो. जरा सबुरीने घायला हवे होते. पण एकमेकांचे विचार एकमेकांना पटतच नाहीत. कारण प्रत्येकातील रसायन निराळेच असते. एकाचे बघून दुसरा शहाणा होतोच असे नाही. अनेक जाहिराती वाचतो. लठ्ठपणा
कमी करायचा हमखास उपाय. फाडफाड इंग्रजी बोलता येईल. आमचे औषधं घ्या बुद्धी वाढेल. तदवत सत्व, रज, तम, मोह माया, द्वेष, अहंकार या सर्व सजीवांच्या रसायनावर हमखास एखाद्या अजब रसायनाची जाहिरात यावी आणि ठोस उपायाची संजीवनी मिळावी. तो असा असेल का की अंतर्मुख व्हा. विश्वेशराला
शरण जा. त्याला आपल्या अंतरंगात शोधा. मग दशदिशांनी आत्म्याला बल देणाऱ्या शीतल लहरींनी अवघे आयुष्यच बदलून जाईल. खऱ्या अर्थाने एकमेकांना समजून घेऊ. ज्योतीने मंगलमय ज्योत चेतविली जाईल. पुरुषोतमाच्या बासरीचा मंजुळ स्वर, ज्ञानेश्वरांचे पसायदान, ओंकार, बुद्धवाणी, आंबेडकरांचे तत्वज्ञान सहजच स्त्रवेल. अवघा रंग एक होईल. आनंद लुटता येईल. आणि निराळ्याच रसायनाची निर्मिती
होईल. जगात शांतता, आनंद, सुख, प्रेम ओथप्रोत भरलेले असेल.




Comments