top of page

योग, ध्यान आणि आरोग्य

  • Mar 31
  • 3 min read

हा लेख लिहिण्यामागे एकच हेतू आहे. योगाचे महत्व, आपल्या आयुष्यात त्याचा कसा उपयोग होऊ शकतो ते सांगणे आणि आपले पूर्ण आयुष्य बदलून टाकण्याची ताकद योगात आहे याचे एक उदाहरण तुमच्या समोर मांडणे. 


आपल्यातील प्रत्येकाला अशी इच्छा असते की आपली तब्येत उत्तम असावी. आपली  सर्व शारीरिक आणि मानसिक दुःखं पळून जावीत. अशी एखादी जादूची कांडी मिळावी की ती फिरवली की आपले सर्व क्लेश नष्ट होतील. आपण सतत शारीरिक आणि मानसिक सुखाच्या शोधात फिरत असतो. त्यासाठी भरपूर पैसे खर्च करतो. पण कधी कधी त्यात यश येत नाही. आपले सर्व विकार आपल्याला पूर्ण हैराण करून सोडतात. अशा वेळी बरीच माणसे योगाकडे वळतात. ‘बघूया काही फरक पडतोय का’ असा विचार करतात. अशा लोकांना मी अनेक वर्षे पहात आले आहे. त्यांना मदतही केली आहे. काही जणांमध्ये असा फरक बघितला आला आहे की आपण आश्चर्यचकीत होऊन जातो. 


पण हा बदल रातोरात होत नाही. त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. औषध घेऊन डोकेदुखी थांबावी तसे लवकर परीणाम दिसत नाहीत. पण जे बदल होतात ते कायमस्वरूपी होतात. नुसते शारीरिक आरोग्य सुधारत नाही तर मानसिक आरोग्यातही खूप फरक दिसून येतो. 


योगामुळे तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही एक नवीन व्यक्ती बनून जाल असं सांगितलं तर विश्वास बसेल? नाही ना? मी तुम्हाला माझ्या एका क्लायंट ची गोष्ट सांगते. माझ्या क्लास ला एक तरुण मुलगी यायची. पंचविशीच्या घरात तिचे वय असेल. ती तिच्या आई बरोबर यायची कारण तिला अगोराफोबिया होता. तिला घराबाहेर एकटं पडण्याची भीती वाटायची. तिच्या आईबरोबर तिला सुरक्षित वाटायचं. त्यामुळे ती फक्त आई बरोबर घराबाहेर जायची. नाहीतर पूर्ण वेळ घरीच असायची. ती नोकरी किंवा शिक्षण असं बाहेर जाऊन काहीच करू शकत नव्हती. घरात राहून जे जमेल ते ती करायची.  मैत्रिणींबरोबर फिरायला जाणे, प्रवासाला जाणे हे तर अगदी अशक्य. 


ती माझ्या क्लास ला ३ ते ४ महिने आली. आठवड्यातून २ वेळा यायची. बरेच क्लासेस झाल्यावर एक दिवस मला म्हणाली, “योगामुळे माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं आहे. मी आता एकटी घराबाहेर जाते. पार्ट टाइम जॉब करते. माझ्यामध्ये खूप फरक पडला आहे. After a long time, I am happy. सर्व लोकांना खूप आश्चर्य वाटतं. ते मला विचारतात की मी काय ट्रीटमेंट केली त्यामुळे असा फरक पडला. मी आता योगमार्ग निवडला आहे आणि त्यात मी पुढे शिकणार आहे”.


कमाल आहे की नाही? अशा अनेक व्यक्तींना मी ओळखते. योगाने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलले आहे. योग ही आपली परंपरा आहे. हजारो वर्षांचा इतिहास आहे. वैदिक काळात लिहिलेल्या ग्रंथात आणि योग सूत्रात मांडलेल्या संकल्पना अजूनही लागू पडतात. तुम्ही सुद्धा असा परिणाम बघू शकाल. तुम्हाला जर तुमच्यामध्ये काही बदल घडवून आणायचे असतील पण मार्ग दिसत नसेल तर योगमार्गावर चालून बघा. स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. 


पण आजकाल आपल्याकडे वेळ नाही, योगसाधना करायला. ध्यानधारणा करायला. आपला दिवस कधी सुरु होतो आणि कधी संपतो तेच कळत नाही. तिथे रोज योगसाठी वेळ काढणे मुश्किल आहे. ते मला माहित आहे. पण आपल्याला काही मिळवायचे असेल तर मेहनत तर लागतेच. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. सुरवातीला थोडा त्रास झाला तरी एकदा सवय झाली की  खूप चांगले बदल दिसू लागतात. 


त्यासाठी रोज तासभर योगासने करावी लागत नाहीत किंवा दिवसभर ध्यान लावून बसावे लागत नाही. छोटी पावले उचलली तरी एक दिवस मैलभर रस्ता आपण पायाखाली घालू शकतो. गरज आहे ती फक्त समर्पणाची. आजकाल सगळीकडे ‘योग’ आहे. Online आहे, प्रत्यक्ष क्लासेस आहेत, private sessions  आहेत, group  sessions  आहेत. Free योग सुद्धा आहे YouTube वर. एक योग्य शिक्षक शोधा आणि सुरु करा. आठवड्यातून एक दिवस नाही तर महिन्यातून एक दिवस साधनेसाठी देऊन बघा. मला आपल्या योगपरंपरेवर पूर्ण विश्वास आहे. योगाची व्याप्ती किती अथांग आहे ह्याचा अनुभव तुम्हाला यावा आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अशी कामना करते. 


ओम शांती! 


अंजली गद्रे
अंजली गद्रे

Comments


bottom of page