top of page

रील्स व शॉर्ट्सची सफर

  • Mar 31
  • 4 min read

मार्च ८ रोजी झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे स्त्रियांचे व स्त्रियांविषयीचे शॉर्ट्स आणि रील्स इथे आणले आहेत. 



संस्कृतमध्ये लावणी

हा कलात्मक प्रयोग म्हणून बघितलं तर स्तुत्य आहेच, शिवाय गाणं सुरेल म्हंटलं आहे. संस्कृत भाषांतराबाबतीत म्हणायचं तर गाण्यातल्या मुखड्यापेक्षा कडवी जरा बरी वाटली. ‘दिसला गं दिसला’ साठी ‘दृष्टः दृष्टः’ हे शब्द अगदीच कानाला खटकतात. हे असं एका गाण्याचं दुसऱ्या भाषेत भाषांतर करताना त्या त्या भाषेतल्या शब्दांच्या गोडव्याचा त्यांचा गेयतेचाही विचार करायला हवा, असं मला वाटतं.  

प्रत्येक गायन प्रकाराचे काही सांस्कृतिक संकेत असतात आणि त्याच्याशी जोडलेल्या सामाजिक स्मृती देखील असतात. लावणी फक्त एक गाणं नाहीये तर एक मोठा सामाजिक सांस्कृतिक राजकीय पट अवती भवती असलेला जटिल कला प्रकार आहे, त्यामुळे फक्त भाषा बदलून गाणे हे कधीतरी क्लुप्ती म्हणून ठीक आहे, पण बाकी “संस्कृत भाषा टिकावी” ह्या टॅगवर ह्या गाण्याचा पुरस्कार होत असेल तर हे विचित्र आहे.


पुरुषांना जेवण बनवता आलं पाहिजे - ऋजुता दिवेकर

हे खरंय. पुरुषांनी  स्वयंपाकघरातच नव्हे तर घरातल्या सर्व कामात हातभार करायलाच पाहिजे, ह्यात काहीच दुमत नाही. अनेक पुरुष तसं करण्याचा प्रयत्नही करतात, नवीन  शिकण्याचाही प्रयत्न करतात. लहान मुलाचे वडील घरी काम करत असतील तर मोठेपणी मुलगा आपोआप करू लागतो. 

स्वयंपाक करणं हे जीवन कौशल्य आहे, आणि ते gender agnostic आहे हे आपल्या समाजात पचायला अवघड आहे.  जे पुरुष घरात काम करतच नाहीत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी त्या घरातल्या स्त्रियांना ट्रेनिंग देणं जरुरी आहे, असं ऋजुता म्हणतेय. 


ज्या घरातले पुरुष पुढाकार घेऊन घरी किचनमध्ये मदत करतात त्या घरातल्या स्त्रियांनाही ट्रेनिंगची गरज आहे, असं मला अनेक स्त्रियांच्या अनुभवावरून प्रकर्षाने जाणवतं. माझं पुढचं बोलणं अनेक मैत्रिणींना कदाचित रुचणार नाही. दुर्दैवाने, अशा स्त्रियांना किचनची आणि घरची जबाबदारी घरातल्या पुरुषांवर सोपवून दूर जायचंच नसतं. पुरुष मदत करत असले कि ह्या बायकांची सतत लुडबुड, नाहीतर अविश्वास. न बोलता मदत करावी, तर नाही. 


अशा स्त्रिया, कुठे हळदी कुंकवाला गेल्या तरी घरचा स्वयंपाक करून येणार, घरची सोय करणार - म्हणे, नवरा लगेच विचारतो मग आमची सोय काय? - खाल्ला एक दिवस स्वतःच्या हाताने साधा वरण-भात तर काय उपासमार होत नाही घरच्यांची. “माझ्या नवऱ्याला चहासुद्धा येत नाही”, “आमच्याकडे पोळ्या तव्यावरच्याच लागतात”,  वगैरे सगळ्या गोष्टी लाडिक लाडिक सांगून बायका स्वतःचं महत्व अबाधित ठेवायला बघतात. नाहीतर आपण सुपरवुमन किंवा हेलिकॉप्टर वुमन होण्याचा अट्टाहास करून सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढत बसतात. 

आपल्याशिवाय घर चालतं, ही सुखाची गोष्ट आहे खरंतर! पण बायका या कल्पनेने असुरक्षित होतात, असं वाटतं. 


बिझी आजी

आजी आजोबा म्हंटलं कि वर्तमानपत्र किंवा पुस्तकं वाचणारे, नवीन गोष्टी सांगणारे किंवा गाणी गुणगुणारे नाहीतर देवाचे श्लोक म्हणणारे असं चित्र माझ्या पिढीने बघितलेलं आहे. पण आताच्या मुलांच्या आजीआजोबा बाबतीत फारच वेगळं होऊ लागलंय. आज कालचे आजीआजोबा टीव्हीला, किंवा फोन वर व्हाट्सअँपवर जखडलेले  दिसतात. काही अपवाद वगळता. जसा ह्या आजींचा. 


स्त्रियांच्या बाबतीत मुलं मोठी होईपर्यंत मुलांना वाढवणं आणि त्याबरोबर घर व नवरा हाच फोकस बाळगून जगणाऱ्या बायका स्वतःकडे बघणंच टाळतात. आणि मग घर रिकामं झालं, नोकरीही संपली की आता काय? हा प्रश्न त्यांना पडतो. 


खरंतर, वयाच्या कुठल्याही टप्यावर कुठल्याही व्यक्तीने ह्या आजींप्रमाणेच असावं. डोक्याला खाद्य मिळेल असं वाचन, लिखाण करत, स्वतःची आवड जपत किंवा कला जपत स्वतःला उद्योगी ठेवत -  रोजचा दिवस सुखाने घालवणे-असच असावं. मूळात स्वतःसाठी जगणं, स्वतःला आनंदी ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मला ही आजी आवडली. 


कोल्हापुरी साज

कुठल्याही मराठी स्त्रीकडे कोल्हापुरी साज हा दागिना असेलच. 

दागिन्यांच्या बाबतीत आता असं आहे की ह्यातले आता खरे कुठले व खोटे कुठले हेच कळणं मुश्किल आहे. कारण आपल्याला हे पिढ्यानपिढ्या बनत आलेल्या दागिन्यांविषयीची माहितीच कमी असल्याने होतंय. 


गीतांजली गोंधळे ही खूप अभ्यासपूर्ण दागिने बनवते. तिचा ‘मोह’ हा ब्रॅंड चांदीच्या दागिने बनवण्यात भरपूर नावाजलेला आहे. ती भारतीय संस्कृतीतल्या  वेगवेगळ्या दागिन्यांचा अभ्यास करुन त्याप्रमाणे दागिने बनवते.  गीतांजलीने वेगवेगळ्या देवळात जाऊन तिकडच्या मूर्त्यांचा वा देवळावरच्या कोरीव कामाचा अभ्यास करून स्वतः काही दागिने डिझाईन केले आहेत, हेच तिचं कौशल्य आहे. तिची हडीप्पा ही सिरीज मला विशेष आवडलेली आहे.


दागिने घडवणे ही कला आहे, त्याकडे जे कलापूर्ण नजरेने बघतात, त्यांना त्याचे मोल कळू शकते.



नर्तकीने चांगल्या सवयी लावाव्यात

कथक नर्तिका शांभवी दांडेकर हिने चाळीशी नंतरचा डान्स (Dance after 40) ह्या विषयावर पॉडकास्ट सिरीस चालू केली आहे. त्यात तिची आई  - पं.मनीषा साठे ह्यांच्या पासून सुरु करून आणि मग पं.शमा  भाटे, शर्वरी जमेनीस अशा वयाने चाळीशीपुढच्या आणि नावाजलेल्या नृत्यांगना येऊन गेल्यात. प्रत्येक व्हिडिओ बघण्यासारखाच आहे. मनीषाताई तर वयाने आता ७३ आणि शमा भाटेही ७५ तरीही कमालीच्या ताकदीचं नृत्य सादर करतात. शर्वरी आणि शमा ताईंच्या गुरु कै. पंडिता रोहिणी भाटे ह्या वयाच्या ८० व्या वर्षापर्यंत सुंदर नृत्य सादर करत असत. आता तर मनीषाताईंचे अनेक व्हिडीओस youtube वर आहेतच. पण रोहिणी भाटे त्यांच्या सत्तरीत असताना त्यांनी सादर केलेलं नृत्य प्रत्यक्ष बघितल्याचं भाग्य मला मिळालं आहे.  ह्या दोघींच्या मानसिक आणि शारीरिक दोन्हीही तयारी मला अचंबित करतात. ह्या शॉर्टमध्येही मनीषा ताई त्याचविषयी बोलल्या आहेत. 


नृत्य सरावातलं सातत्य हे तर महत्वाचं आहेच. पण शरीराचा धडधाकटपणा व त्याची तंदुरुस्ती ह्याकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केलं नाही. आपण स्टेजवर उभे राहून नाचताना प्रेक्षकांना सुसह्य वाटेल असें दिसतोय का? -  ह्याकडे प्रत्येक नर्तकीने बघावं, हा मनीषा ताईंचा मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो. माझ्यामते, स्त्रीचं वय जस जसं  वाढत जातं, तशी ही बाब अजून महत्वाची होत जाते. चार लोकांसमोर असो किंवा स्टेजवर ४०० लोकांसमोर सादर केलेलं नृत्य असो - नृत्य हे शेवटी visual art आहे.  प्रेग्नन्सी आणि मेनोपॉजमुळे  म्हणा किंवा नोकरी-घर-मूल करता करता वेगवेगळ्या स्तरावर येणाऱ्या ताणतणावामुळे म्हणा - शरीरात होणाऱ्या बदलांमुळे, आपण बेढब दिसत नाही आहोत ना, ह्याकडे नर्तकीने काटेकोरपणे लक्ष देणं जरूरी आहे. त्यासाठी नुसतं नृत्य पुरेसं नाही, रोजचा व्यायाम आणि नियमित योग्य आहार ह्या दोन्हीची जोड नृत्याला हवीच.


धनलक्ष्मी कुलकर्णी
धनलक्ष्मी कुलकर्णी

Comments


bottom of page