मनोगत
- Mar 31
- 1 min read
पुणं माझी जन्मभूमी, नाशिक माझी कर्मभूमी मग सिनसिनाटी माझी कोण? मी इथली कशी झाले?
२००३ पासून इथे येणं चालू झालं. मुलांचा संसार बघायला , मग वास्तुशांत ,मग नातवंडांचा जन्म आणि पुढे त्यांची ओढ. लहानपणी नातवंडांना फिरवून प्ले एरियात नेऊन परिसर माहीत झाला. पुढे जसे त्यांचे सॉकर चालू झाले तसे ती विस्तीर्ण मैदान बघितली. १४ वर्षाच्या मुलांना टर्फ ग्राउंड वर फ्लडलाईट मध्ये खेळताना बघून थक्क झाले. सॉकर गेम म्हणजे तर इंटरनॅशनल इव्हेंट वाटावा असे वातावरण. हजारो प्रेक्षकांचे काम करायला तिथे जमलेले पालकच पुरेसे होते. हा सनसनाटी अनुभव आपल्या सिनसिनाटीचा्
इथली हिरवाई आणि बर्फाई मनाला भुरळ पाडणारी होती .मला चालायची आवड असल्याने मी खूप भटकायची .त्यातच एक 'वॉकिंग ग्रुप' जॉईन केला ग्रुप मधील सर्वजणी फ्लाईंग पिग मॅरेथॉन मध्ये भाग घेणार होत्या. मलाही भाग घेतला का? म्हणून विचारत होत्या. जरा चॅलेंजिंग म्हणून हाफ मॅरेथॉन मध्ये भाग घ्यायचे ठरवले.१०० डॉलर भरून 13 मैल पळणे बुद्धीला पटत नसले तरी आकर्षण वाटले. भर पावसात थंडरमध्ये स्पर्धा पार पडली .हजारो स्पर्धक त्यांची उत्तम व्यवस्था ,हजारो प्रेक्षकांचा जल्लोष ,विविध रंगी वेशभूषा, बँड ,चिअरिंग स्कॉड या सर्वानी १३ मैल कसे संपले हे कळले नाही. नातेवाईकांनीही खूप कौतुक केले. हा सनसनाटी अनुभव आपल्या सिनसिनाटीचा.
आम्ही इथे असताना खग्रास सूर्यग्रहण इथून 100 मैल अंतरावर १००% होते .आम्ही ते बघायला एका शेकडो एकर च्या पार्क मध्ये गेलो .भर दिवसा पूर्ण अंधार, डायमंड रिंग, हे हजारो लोकांसमवेत बघितले. हा सनसनाटी अनुभव आपल्या सिनसिनाटीचा.
एरवी टेनिसचे दिग्गज खेळाडू माझ्यासारखीने टीव्हीवरच पाहिले असते .पण इथे सिनसिनाटीत ते आजूबाजूच्या हॉटेलमध्ये राहत होते मुला बाळांसमवेत आजूबाजूच्या पार्कमध्ये वावरत होते. जागतिक पार्श्वभूमीवर सिनसिनाटीच्या माझ्या घरातच त्यांचा वावर होता असे वाटले. हजारोंच्या बरोबर त्यांच्या मॅचेसचा माहोल अनुभवला पाच-दहा फुटांवर हे दिग्गज खेळाडू दिसले .त्यांची प्रॅक्टिस पण बघितली .हा सनसनाटी अनुभव आपल्या सिनसिनाटीचा.
खेळाच्या बाबतीतील अजून एक अनुभव म्हणजे २२ सालचा सुपर बोल .सिनसिनाटी बेंगल्स फायनल ला होते .आठवडाभर आधी जो काही जल्लोष होता तो अभूतपूर्व होता .सिनसिनाटी बँगल्सचे टी-शर्ट तर सर्वांच्याच अंगावर होते. पण बाजारात पेपर प्लेट्स, पेपर नॅपकिन्स, फुगे ,कुठलेही डेकोरेशन ऑरेंज व ब्लॅक कॉम्बिनेशनचेच. कडेलोट म्हणजे घरात पार्टीला स्वीट डिश ,सँडविच पण ऑरेंज ब्लॅक कॉम्बिनेशनचे.टीम जिंकली नाही ,पण हा सनसनाटी अनुभव सिनसिनाटीचा.
आता थोडं घरेलू ,इथली हळदी कुंकू, -त्याचे वर्णन काय करावे? यजमानीणबाई नटून थटून स्वागताला तयार असतात .सर्व कार्यक्रम आखीव रेखीव करण्यात झालेली दमछाक मुळीच चेहऱ्यावर नसते .(ही सर्व दमछाक कोण्या हक्काच्या मदतनीसाची झालेली असते की काय ?)प्रसन्न, आवरलेले घर, योग्य सजावट, हसतमुख स्वागत ,सुखावून जाते. सर्वत्र सुंदर दिसणाऱ्या मैत्रिणी एकमेकींचे कौतुक करत असतात. सगळीकडे हास्याचे फवारे नाचत असतात. अशा मैत्रिणींमध्ये आपली मुलगी आहे हे बघून माझ्यासारखी कोणतीही आई खुष होणार नाही का? या सर्वांवर कडी म्हणजे केलेले खाद्यपदार्थ .टेबल टॉप भरगच्च भरलेला. अजून मोठा असता तर अजून चार पदार्थ ठेवले असते असे वाटावे अशी रेलचेल असते .मी खूप ठिकाणी जाऊन आले व एक मजेशीर विचार मनात आला पूर्वी सासवा हळदीकुंकवाच्या निमित्ताने नवीन सुनेला दाखवायला घेऊन जायच्या. जमाना बदलला आहे .इथे मुली आया सासवांना दाखवायला नेतात. पण आमची पिढी खुश होऊन खूप खूप कौतुक करते व भरपूर शुभाशीर्वादांचा वर्षाव करते. हा सनसनाटी अनुभव सिनसिनाटीचा.
त्रिवेणीतील संक्रांत ,गुढीपाडवा, दिवाळी ,गणपती इत्यादी कार्यक्रमांची
मी वाट बघते .मुलांचे कार्यक्रम छानच असतात पण ते बसवणाऱ्यांचे खूपच कौतुक वाटते. त्रिवेणी मुळे इंडियातली नाटक व्याख्यान गाण्याचे कार्यक्रम बघून धन्यती कार्यकारिणीअसेच उद्गार येतात. अशा या सीनसिनाटीमध्ये कोणाचं मन रमणार नाही?
कालचक्र वेगाने फिरते आहे .आता नातवंडांचे ग्रॅज्युएशन, कॉलेजला जाणं, त्यांची युनिव्हर्सिटी बघणं, आणि पुढे काय काय....,.. स्वर्ग दोन बोटं उरला आहे .सिनसिनाटी माझी आनंदभूमी आहे.



Comments