महाराष्ट्र गौरव गीत
- Mar 31
- 1 min read
धन्य हा महाराष्ट्र माझा
संत शूरवीरांचा कलाकारांचा
परंपरा जपवू ही नवयुग घडविता
भक्ती शौर्य त्यागाची हो गाऊया ही गाथा॥धृ॥
संतांच्या वाणीत गुंजे भक्तीचाच भाव
ज्ञानोबा तुकाराम घेती विठ्ठलाचे नाव
पंढरीत दिंडी येता अखंड जल्लोष
चिरंतन प्रेमाचा हा सुंदर संदेश ॥१॥
सह्याद्रीच्या गडांवर उंच ध्वज फडकती
पराक्रमे शिवराय इतिहास घडविती
अटकेपार झेंडा नेती पेशवे बाजीराव
शूरवीरांच्या कथांनी गुंजे गाव गाव॥२॥
झाशीच्या राणीने दिला अनोखा संघर्ष
शिक्षणात सावित्रीने साधला उत्कर्ष
सावरकर टिळक लावी स्वराज्याचा दीप
त्याग बलिदानाचे हे अद्वितीय माप ॥३॥
सचिनच्या खेळाने मान भारताची उंचावते
लताच्या सुरांनी सारे जग कसे मोहरते
पुलंचे साहित्य साऱ्या जगताला हसवी
असामान्य कलावंत महाराष्ट्र घडवी ॥४॥
धन्य हा महाराष्ट्र माझा
संत शूरवीरांचा कलाकारांचा
परंपरा जपवू ही नवयुग घडविता
भक्ती शौर्य त्यागाची हो गाऊया ही गाथा॥धृ॥




Comments