त्रिवेणी मराठी शाळा
- पूर्णिमा गलगली & निवेदिता बक्षी
- Sep 30
- 7 min read
त्रिवेणी मराठी शाळा हा आपल्या साठी एक अभिमानाचा विषय आहे . ज्यांची मुलं या मराठी शाळेत शिकून बाहेर पडली, किंवा आत्ता शिकत आहेत ते पालक तर भरभरून शाळे बद्दल, तिथे होणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमां बद्दल बोलू शकतीलच. पण आज आम्ही प्रयत्न करणार आहोत सर्वाना माहित नसलेल्या काही बाजू प्रकाशात आणण्याचा आणि शाळेचा 17 वर्षांचा प्रवास समजून घेण्याचा.
त्या साठी मृणाल आणि सुजित उपाध्ये यांच्या बरोबर केलेल्या मनमोकळ्या गप्पांचा हा गोषवारा.
तर सुरवात करताना तुमची दोघांची थोडी ओळख आम्हाला करून द्याल का?
मी आणि मृणाल पक्के पुणेकर आहोत. पुण्यातच मुख्यतः सर्व शिक्षण झालं. मृणाल नूमवि आणि अहिल्यादेवी प्रशालेची विद्यार्थिनी. तिनी नंतर स. प. महाविद्यालयातून Psychology मध्ये BA आणि मग MA केलं आहे. ती पुण्यात असताना कसलेली जलतरणपटू आणि प्रशिक्षक होती. मी (सुजित) स्वतः ज्ञानप्रबोधिनी प्रशाले चा विद्यार्थी. आणि मग चार वर्ष पुढचे शिक्षण घेऊन नंतर IIT मुंबई मध्ये Control Systems या विषयात MTech पूर्ण केलं आणि 2000 साली नोकरी निमित्त अमेरिकेत दाखल झालो. त्यावेळी आमची मोठी मुलगी साधारण 2 वर्षाची होती.
आपण ज्या समाजात राहतो त्याचे आपणही काही देणं लागतो आणि आपण काहीतरी करायला हवं, असं आपल्यापैकी बऱ्याच जणांना अगदी मनापासून वाटत असतं. परंतु शिक्षण मग नोकरी, मुलं, जबाबदाऱ्या या सगळ्यात आपण नकळत गुरफटून जातो. पण आपल्यातलीच काही लोकं स्वतःचा विचार, वेळ आणि मेहेनत घालून जेव्हा हे वाटणं प्रत्यक्षात उतरवताना दिसतात तेव्हा त्यांच्या कौटुंबिक पार्श्व भूमीत त्याची मुळं सापडतात. तसं तुमच्या बाबतीत काही घडलय का?
सुजित: मी मोठा होत असताना ज्ञान प्रबोधिनीत होतो आणि प्रबोधिनीच्या संस्कारांचा यात नक्कीच प्रभाव आहे. समाज सेवेचं बाळकडू हे नकळत तिथे मिळत गेलं. अविनाश धर्माधिकारीं सारखे लोक आम्हाला शाळेत शिकवायला होते. त्यांनी आम्हाला इतिहास शिकवला आणि त्यांचं एक वाक्य मला अजूनही आठवतं की, "आपल्याला जर असं वाटत असेल की आपण शिकलो, आपल्या मेहेनतीने नोकरीला लागलो, स्थिरावलो - म्हणजे मी कुणाचं काही देणं लागत नाही, तर ते तसं नसतं. तुम्ही शाळेत चालत आलात तर रस्त्यात दिसणाऱ्या प्रत्येक माणसाच तुम्ही काहीतरी देणं लागता". हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा ते देणं देण्याचा प्रयत्न आपोआप तुमच्या हातून व्हायला लागतो. आणि या पद्धतीच्या संस्कारानी तो स्वभाव तसा घडत जातो. तेव्हा मग इथे कोणीतरी या मुलांना मराठी शिकवायला हवं नाहीतर त्यांची नाळ जोडलेली राहणार नाही, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कोणीतरी करायच असेल तर आपणच करूया, हे सहजच मनात आलं आल.
अजून एक सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे भाषेचं प्रेम, व्यासंग आणि भाषा शिकवण्याची घरी बरीच उदाहरणे होती. माझी आई स्वतः राज्य पुरस्कार प्राप्त लेखिका आहे, चंद्रकला प्रकाशन हे घरचं मराठी प्रकाशन आहे, माझे आजोबा, मामा, मामी, आई असे कितीतरी लोक मराठी, इंग्लिश आणि संस्कृत भाषा शिकवणारे होते. त्यामुळे शिक्षण देणं/ शिकवणं या बाबत मलाही नैसर्गिकच आत्मीयता होती.
मृणाल: यात मराठी शाळा आणि मुलांबरोबर काम करण्याचा विचार येण्यामागे अजूनही कारणं होती. आम्ही दोघंही खुद्द पुण्यात, ग्रामदैवत कसबा गणपती च्या जवळपास वाढलो. मराठी माध्यमात शिकलो. मंदिरात कीर्तनं, प्रवचनं, पुराणातल्या कथा, अभंग हे खेळत खेळत कानावर पडत गेलं. पुढे मी Psychology मध्ये शिक्षण करताना पुण्यात ज्ञान प्रबोधिनी बरोबर पुष्कळ काम केलं. त्यात पुण्यात आणि खेडोपाडी लहान मुलांचे संस्कार वर्ग घेणं, शिकवणं याचा खूप अनुभव मिळाला आणि मुलांबरोबर काम करण्याचा आत्मविश्वासही आला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असावा की मराठी शाळा सुरु करण्याच्या विचारावर आमचं लगेचच एकमत झालं.
आपण सगळेच अमेरिकेत आलो ते उच्च शिक्षण आणि नोकरी निमित्त. घर संसार उभा केला. तसं सगळं सुरळीत करिअर आणि आयुष्य चालू असताना मराठी शाळा हा विचार कसा आला? आपल्या मुलांना मराठी का यायला हवी, ती नाही आली तर त्यांचं काय नुकसान होईल असा तुमचा विचार होता? इथल्या मुलांना मराठी शिकवताना कुठलं उद्दिष्ट तुमच्या मनात होतं?
आपण जेव्हा मराठी वातावरणात राहत होतो तो पर्यंत हे कधी जाणवलं नव्हतं. पण इकडे आल्यावर काहीतरी miss होतय असं वाटत होते, पण काय राहून जातंय ते कळायला थोडा वेळ गेला. गृहीत धरलेली, अवतीभवती असणारी एखादी गोष्ट जेव्हा काढून घेतली जाते तेव्हा तिचं महत्व कळतं. ज्या गोष्टी आपल्याला सहजपणे उपलब्ध होत्या आणि इथे मुलांना मिळत नाहीत त्या गोष्टी कुठल्या, ह्याचा जेव्हा विचार केला तेव्हा लक्षात आलं की आमच्या दोघांचा आवडीचा विषय म्हणजे संत वाङ्मय, अभंग, परंपरा (वारी, भोंडला) वगैरे. आणि हे मराठी शिवाय दुसऱ्या भाषेतून मुलांपर्यंत पर्यंत पोहोचवता येणार नाही हे ही लक्षात आलं. तेव्हा असं वाटले कि ही भाषा पुढे न्यायला हवी.
अगदी मोठं उद्दिष्ट म्हणजे मुलांना ज्ञानेश्वरी वाचता यावी, त्याची गोडी लागावी असं मनापासून वाटते. पण हा खूप मोठा goal झाला. पण त्याचंच अगदी सोपं स्वरूप म्हणजे मनाचे श्लोक, शुभंकरोती वगैरे पाठ असणे, आज्जी आजोबांशी मराठीतून संवाद साधता येणं - अश्या सध्या आपेक्षा. इथली मुलं इंग्लिश भाषेच्या वातावरणातच वाढत असतात. पाळणाघर व शाळेपासून सर्वत्र तेच मध्यम असतं. त्यामुळे इंग्लिश वेगळी बोलायला शिकवावी लागत नाही. पण मराठी ही एक प्रादेशिक भाषा आहे. इंग्लिश सारखी वैश्विक नाहीये. कुठलीही प्रादेशिक संस्कृती त्या प्रादेशिक भाषे वर अवलंबून असते. त्यामुळे मराठी संस्कृती जर जिवंत ठेवायची असेल तर मराठी भाषा जागी ठेवायला लागेल. मुलांची नाळ आपल्या मराठीपणाशी जुळलेली राहावी हे नक्कीच महत्त्वाचं उद्दिष्ट होतं.
अजून एक म्हणजे अनेक पालक मुलांना घरी आपापल्या पातळी वर मराठी शिकवतच असतात. पण शाळेत ज्यावेळी ते इतर समवयस्क मुलांबरोबर शिकतात तेव्हा त्यांना आपल्या सारखी इतर मुलेही मराठी शिकताना दिसतात. तेव्हा त्यांचा विरोध कमी होतो आणि गोडी लागणं सोपं होतं.
गेले १७ वर्ष अखंड हा उपक्रम चालवताना आलेले कडू गोड अनुभव आम्हाला सांगाल का? काय अडचणी आल्या? काय चांगले अनुभव आले? Covid च्या काळात काय अनुभव आले?
सर्व प्रथम ह्या पूर्ण अनुभवात कुठलाही त्रास झाला नाही, उलट खूप आनंदच मिळाला. शाळा सुटल्या नंतर आमच्या सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक समाधान आणि आनंद असतो. आणि महत्वाचे म्हणजे हे आम्ही एकटे करत नाही आहोत. ही शाळा त्रिवेणीची आहे आणि अनेक त्रिवेणीच्या सदस्यांची आम्हाला मदत होते. आम्हाला त्रिवेणीचा नेहमीच भरघोस पाठिंबा मिळाला आहे. आपल्याला नेहमीच्या आयुष्यात बाकीच्याही जबाबदाऱ्या असतात आणि कधीतरी वेळ काढणे अवघड होते, पण शाळेतून परत येताना एक वेगळाच आनंद मनात असतो. मुलांना शिकवून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते.
जेंव्हा शाळा सुरु केली तेव्हा पहिल्या दिवशी बसेमेन्ट मध्ये शाळा झाली. 10-15 मुलांची अपेक्षा होती पण प्रत्यक्षात 40-45 मुले आली आणि दुसऱ्या वेळेपासून मोठी जागा शोधावी लागली. हे त्रिवेणी परिवारामुळेच शक्य झाले. Covid च्या काळात शाळा बंद ठेवावी लागली त्याचा थोडा त्रास झाला. पण त्यातून पुढे सगळे सुरळीत झालेच.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, ह्या आधी गोगवेकर मावशींनी शाळा सुरु केली होती, त्यामुळे परत शाळा सुरु झाल्यावर त्यांचाही आम्हाला पाठिंबा मिळाला.
आता थोडा एक technical प्रश्न - शाळा सुरु केली तेव्हा काहीतरी अभ्यासक्रम ठरवायला लागला असेल. तेव्हा पासून ते आता पर्यंत तो अभ्यासक्रम कसा विकसित होत गेला? काय काय गोष्टी विचारात घेत किंवा कसे बदल करत हा प्रवास घडला. मला वाटतं त्या अभ्रासक्रमाच्या प्रवासाची गोष्ट आमच्या वाचकांना वाचायला नक्की आवडेल.
शाळा सुरु केली, शिक्षक मिळाले, मग आता नक्की काय शिकवायचं याचा विचार केल्यावर लक्षात आलं की हे तितकसं सोपं नाहीये. याला अनेक कारणं आहेत. शाळेत येणाऱ्या एका वयोगटातल्या मुलांची मराठीची पातळी अगदीच वेगवेगळी असणे हा एक अडचणीचा मुद्दा. काही घरात व्यवस्थित मराठी बोलला जातं, काही घरात जात नाही. त्यामुळे एका वयाच्या मुलांची मराठीची पातळी खूप वेगवेगळी असते. त्याचबरोबर या मुलांना TV वर, समाजात, शाळेत कुठेच मराठी कानावर पडत नाही त्यामुळे त्यांचा शब्द संग्रह अगदीच मर्यादित असतो. या परदेशात वाढणाऱ्या मुलांचं वय, मराठीची पातळी, आणि समोर दिसणारं अनुभव विश्व यांची सांगड घालून, त्यांना रोचक वाटतील असे धडे, कुठेच तयार उपलब्ध नव्हते.
पहिल्यांदा आम्ही भारतातील २००८ सालची तत्कालीन मराठी क्रमिक पुस्तकं पाहिली. पण त्यांचा दर्जा पाहता, जुनी, १९८० च्या काळातली पुस्तकं बालभारती संस्थेच्या मदतीने मिळवली. पहिली साठी ही पुस्तकं छान कामी आली पण दुसरी पासून ती फार झपाट्याने अवघड होत गेली. त्यामुळे आपल्या मुलांना ती झेपेनाशी झाली. त्यातले प्रादेशिक संदर्भ इथल्या मुलांना कळण्या सारखेही नव्हते. उदा. "दिवस सुगीचे सुरू जाहले, ओला चारा, बैल माजले" - यातले कुठलेच संदर्भ इथे वाढलेल्या मुलांना कळणारे नव्हते; मग ह्या मुलांना कसं शिकवायचं याचं उत्तर कोणाकडेच तयार नव्हतं. तेव्हा पुन्हा एकदा, कोणीतरी करायला पाहिजे तर आपणच धडे तयार करायला हवे, असा विचार झाला. तेव्हा सोप्या पण सकस मराठीतून काही धडे आम्ही तयार करायला घेतले. आणि सगळं एकदम जमलं असंही नाही, पण गेल्या १७ वर्षात मुलांच्या प्रतिसादातून शिकत, सुधारणा करत, आजचा अभ्याक्रम बनला आहे. एक मात्र निश्चित आहे की, अभ्यासक्रम हा मुलांना गुंतवून ठेवणारा, मन रमवणारा, आनंद देणारा नसेल तर मुलांना मराठी शिकण्याचा जाच वाटू शकतो. जर मुलं कथानकात रमली तर मराठी आपसूक शिकली जाईल. हा गाभा लक्षात ठेवूनच अभ्यासक्रमाची पातळी दर इयत्तेला वाढवत नेणे हे फार महत्वाचं आहे.
आपण शाळेत मराठी शिकवतोच. पण आज शाळेत येणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांकडून अजून काय मदत मिळू शकते? मुलांना मराठी शिकण्याची गोडी टिकून राहण्यासाठी पालकांना अजून काय करता येऊ शकेल?
हल्लीचे पालक खूप उत्साही आहेत. त्यामुळे मराठी शाळेमध्ये पालकांचा बऱ्यापैकी सहभाग आहे. परंतु मुलांचा शब्द संग्रह वाढविण्यासाठी त्यांच्याशी सतत मराठीतच बोलायला हवे. मुलांना सतत मराठीत बोलायला सांगण्यापेक्षा पालकांनी स्वतः त्या भाषेत बोलले पाहिजे. कारण मुलांकडून वारंवार आग्रहाने मराठीत बोलण्याची अपेक्षा केल्यास त्यांच्याकडून विरोध होऊ शकतो. आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो याला मुले जास्त प्रतिसाद देतात.
मुलांना मराठीची जास्तीत जास्त गोडी निर्माण होईल असा प्रयत्न सातत्याने करायला हवा. मुले मराठी शाळेत आठवड्यातून फक्त एकदाच येतात. त्यामुळे घरी पालकांनी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये मुलांशी मराठीत जाणीवपूर्वक बोलण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक प्रसंगासाठी वेगळा शब्दसंग्रह असतो. उदाहरणार्थ, किराणा दुकान, वाहतुकीची कोंडी आणि प्राणीसंग्रहालय - प्रत्येक ठिकाणी वेगळे शब्द लागू पडतात. मुलांच्या आवडीच्या विषयांवरती मुद्दाम मराठीत बोलायला हवे. आपल्या आजूबाजूला जेवढे मराठी काका, मावशी, मित्र मैत्रिणी आहेत, त्यांच्याशी पण मराठीत बोलले तर वेगवेगळ्या संदर्भांमध्ये शब्दसंग्रह वाढत राहील.
इंग्लिश मध्ये शिकणाऱ्या मुलांना मराठी भाषेतील सगळे उच्चार येत नाहीत, तेव्हा सगळी व्यंजने जेवढी कानावर पडतील तेवढा त्यांना त्याचा उच्चारासाठी उपयोग होईल. उदा. थ, ठ, ध, घ ह्यांचे उच्चार मुलांना खूप कठीण वाटतात. ते येण्यासाठी जास्तीत जास्त मराठीत बोलणे हाच पर्याय आहे.
पुढच्या 10 वर्षांसाठी मराठी शाळेचे काय उद्दिष्ट आहे?
सध्या मराठी शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या साधारण ७० च्या आसपास आहे. ज्या प्रमाणात मराठी कुटुंबं आपल्या भागात आहेत त्यामानाने ही पटसंख्या कमी आहे. वय वर्ष पाच ते बारा या वयोगटातली साधारण शंभर मुलं शाळेत यायला हरकत नाही. त्यासाठी मराठी शिकण्याचं महत्त्व पटवून अजून जास्त मुलं शाळेत येण्यासाठी प्रयत्न करायला लागतील.
दुसरा भाग असा की, ही मुलं मराठी बालवर्गापासून सुरू करून चौथी पाचवी पर्यंत जातात. त्यानंतर मात्र ती हायस्कूलला गेल्यामुळे किंवा त्यांच्या इतर कमिटमेंट्स वाढल्यामुळे शाळा सोडतात. हायस्कूलला गेलेल्या मुलांना त्यांच्या प्राधान्यक्रमात मराठी शिक्षण ठेवणं अवघड होतं. पण जसं Spanish/ French या भाषांसाठी AP Credit मिळतं त्या धर्तीवर जर असा काही फायदा मुलांना मिळवून देता आला तर त्या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे आत्ता जी प्रगती मराठी चौथी पाचवी पर्यंतच होते ती नेता येईल. मुलांना रामायण महाभारत या सारखं वाड्मय, संत साहित्य याची ओळखही करून देता येईल. या साठी बृहन् महाराष्ट्र मंडळ (BMM) देखील प्रयत्न करत आहे. आम्हीही त्या प्रयत्नात अर्थपूर्ण योगदान देत आहोत.
तिसरं आणि महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे अनुभवी शिक्षकांची पुढची फळी तयार करत राहणं. मागील १७ वर्षात अनेक लोकांनी निरनिराळ्या प्रकारे शाळेच्या उपक्रमात हातभार लावला आहे. त्या सर्वांची नावं घेणंही अवघड आहे. तसेच गेल्या काही वर्षात खूप नव्या जोमाचे शिक्षक आणि शिक्षिका शाळेच्या उपक्रमात सामील झालेले आहेत. सध्या प्रज्ञा, मोहिनी, मधुरा, अश्विनी, अभिजीत, सीमा, शैलवी अभ्यासक्रमात आणि इतर रचनात्मक सुधारणांत योगदानही देत आहेत. अनिल, अपर्णा, जान्हवी असे अनेक जण administrative कामात मदत करत आहेत. अश्याच अजून उत्साही तरुण सभासदांचा सहभाग मिळत गेला तर शाळा नक्कीच उत्तरोत्तर प्रगती करत राहील.
धन्यवाद मृणाल आणि सुजित आज तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर शाळा चालवण्यामागचे विचार, येणाऱ्या व्यावहारिक अडचणी, परंतु त्यातून मिळणारा निखळ आनंद या सगळ्याची एक वेगळी बाजू आम्हाला कळली. आमची आशा आहे की हे वाचून अजून मराठी प्रेमी या उपक्रमात वेगवेगळ्या पद्धतीने योगदान द्यायला पुढे सरसावतील आणि त्यातून मराठी शाळेच्या प्रगतीला हातभार लागेल.





Comments