पाट्या
- 6 days ago
- 2 min read
मॉर्निग वॉक करुन येत असताना येथे सुंदर पाट्या करुन मिळतील अशी पाटी दिसली. नमुन्या दाखल अनेक पाट्या ठेवल्या होत्या. ’पाट्या ‘ शब्द वाचताच माझ मन पोहचलं पुण्याला. पुणेरी पाट्या फारच मजेशीर असतात. अख्या जगात कोणीच ह्या बाबतीत त्यांचा हात धरू शकत नाही. अहो, एखादा त्यावर पी एच डी सुद्धा करू शकतो. शू s s शू रागावू नका हो थोडीशी गंम्मत जम्मत हो. आपल्याला पाट्या लावणे, पाट्या रंगवणे, पाट्या टाकणे हे शब्द अगदी जवळचे आहेत. पाट्या कधी विचार प्रवर्तक, कधी मनोरंजनात्मक, तर कधी हसे करणाऱ्या असतात. पाटी म्हटले म्हणजे त्यावर लिहिलेले असणारच. रस्त्याच्या, घराच्या, ऑफिसच्या नावाच्या पाट्या आपल्या वाचनात येतात. एवढंच नाही तर देवळावर देवाच्या नावाची पाटी असते. तेंव्हा कुठे आपल्याला त्याची ओळख पटते.
एक मजेदार किस्सा.. एकदा एक व्यक्ती एका ‘क्ष ‘ व्यक्तीच्या घरी गेली. वेळ दुपारी 2-2.30 ची. चला बरोबर आलो! मागचा पुढचा विचार न करता त्याने बेल वाजवली. झालं, राव आंधळे आहात का? वाचता येत नाही वाटत? आणि बोट पाटीकडे. त्या व्यक्तीला कळेच ना की काय झाल तें. तो म्हणाला तुमच्या दिल्लीला राहणाऱ्या मुलाने पार्सल दिले आहे. असं म्हणून तो बाहेर पडताना त्याच लक्ष सहज पाटी कडे गेले आणि तो खो खो हसू लागला. पाटीवर लिहिले होते 2-4 यावेळी बेल वाजवू नये.
पाट्या विचार पूर्वक केल्या जातात. सुंदर, आकर्षक पाट्या लक्ष वेधून घेतात. जाता येता आपण अनेक पाट्या वाचतो. तें सरावाचे होते. कधी कुणी एखाद्यानी विचारले तर थोडासा विचार करायला लागतो. अरे आपल्या घरा जवळच आहे की. नेते, आडनाव, चौक, रस्ते, देव तर कधी स्मृती प्रित्यर्थ पाट्या लावतात. जसं की कबुतर खाना, सावरकर चौक, दगडूशेठ हलवाई गणपती पाट्या जाग्यावरच असतात, खरंतर आपणास काही फरक पडत नाही. आता त्या वेळच्या परिस्तिथी नुसार नावं ठेवतात पण कालांतराने त्याला अर्थच राहत नाही. खूप मोठे कुटुंब, बंगल्याचे नाव गोकुळ, पण आता फक्त आजी.. आजोबा राहतात. नाव समाधान पण राहणारी माणसे मात्र त्रासलेली. नवीन असताना केवढे अप्रूप वाटते. मग काळाच्या ओघात कमी होते. दिवसभरात अनेक वेळा आत बाहेर जातो पण चुकून सुद्धा पाटीकडे बघत नाही, की रेंगाळत नाही. कारण सहवास, वास्तव्य या मुळे नवलाई कमी होते. मग पाट्या आवश्यक आहेत का? 100 पैकी 98 हात वरती होतील. कारण पाट्यांना आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. तीच खरी आपली ओळख, तिथेच आपली पाळंमुळं, कडू -गोड आठवणी, गुपितं, अविस्मरणीय घटनांची गुंफण झालेली असते. कितीही बदल झाला, काळ लोटला तरी आपण तें विसरू शकत नाही. अगदी मनाच्या आंतर कोपऱ्यात स्थान आढळ असतें.
आपल्या मनाच्या पाटीवर असंख्य गोष्टी कोरलेल्या असतात. त्यामुळे आपण कधी हळुवार होतो तर कधी चक्क हसतो सुद्धा. कालांतराने काही कारणामुळे पाट्या बदलल्या जातात. आपण कधी पाट्यांचा विचारच करत नाही. त्यांचे आपले ऋणानुबंध जुळलेले असतात हे लक्षातच येत नाही. निर्जीव असल्या म्हणून काय झाले. त्यांना पण अंतरंग, मन असतेच ना. स्वतःचे भावविश्व असेलच ना. त्या आपल्या साक्षीदार तर नक्कीच असतात. पाट्यांमुळे आपल्या ओळखीला अर्थ येतो. कसा? कुरिअर, पत्रं, पार्सल त्याच्याच नावाने येतात. आपलं नाव असतं पण आधी पाटी वाचली जाते. बरोबर पटलं ना! अर्धवट तुटलेल्या, मोडलेल्या तर कधी जळलेल्या पाट्याचं कन्हण, दुःख आपल्याला जाणवतच नाही.
खरंतर आपली ओळख पाटीवर गिरवलेल्या ग म भ न ने होते. आपल्या जीवनाची शिल्पकार पाटीच आहे.





Comments