भाषा
- 6 days ago
- 2 min read
बोलीभाषा ही मानवाच्या ठराविक समाजाच्या, ठराविक प्रदेशच्या व ठराविक काळातील अगदी नैसर्गिक अवस्थेतील स्त्री- पुरुषांच्या (नर - मादी) एकमेकांना भाव, भावना, देहबोली सह आवाजाच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी निर्माण होत असावी. भाषा ही स्त्री पुरुषांच्या नैसर्गिक आकर्षणातुन एकमेकांविषयी प्रेम, श्रद्धा, विश्वास, सहजीवन, वंशसातत्य आणि काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर व्यक्त करण्यासाठी होती.
वैखरीने (तोंडावाटे) ठराविक उच्चाराने भाव व्यक्त करता करता बोलीभाषा बनली असावी.
ह्या बोली भाषेचा पुढचा टप्पा म्हणजे "लेखी भाषा" अथवा "लिपी". त्या भाव-भावना अक्षरांच्या वा खुणांच्या माध्यमातुंन, एकमेकांसमोर नसताना कळविण्यासाठी लिपी च्या स्वरूपात होता होता हीच पुढे "मातृभाषा" बनली असावी..(जरी अंडे आधी की कोंबडी हे न सुटणारे कोडे असले तरी! ). मी मात्र आईच्या तोंडातुन जो पहिला शब्द ऐकला त्यालाच मातृभाषा म्हणणार. अगदी गर्भावस्थेतील वाढीच्या ऐकण्याच्या एका टप्प्यापासुन ते जगात प्रवेश करण्या नंतरच्या बाल्यावस्थेत जे जे मी आईच्या मुखातून ऐकतो, त्या शब्दांचा अर्थ ती व्यक्त करते व जे माझ्या स्मृतीत बिंबवीले जाते तीच माझी मातृभाषा होय.
ज्या भाषेत "मुळाक्षरे" जास्त ती भाषा जास्त समृद्ध. त्याच प्रमाणे ज्या भाषेत एका शब्दाला वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या देहबोलीतुन, वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात अथवा ज्या भाषे मधे इतर कोणत्याही भाषेतील उच्चार लिहुन दाखविता येतात ती भाषा माझ्या मते अधिक समृद्ध होय.
आणि म्हणुन माझ्या मते संस्कृत नंतर "मराठी" भाषाच सर्वात उत्तम असावी (जगाने देखील संस्कृत भाषा ही संगणकासाठी सर्व भाषांमध्ये उत्तम असल्याचे म्हटले आहे). ज्ञानेश्वर माऊली पासून ते समर्थ रामदास स्वामींपर्यंत जे जे वाङ्मय आपण वाचले ते ते त्यांच्या भाव भावनांनसह व त्यांच्या तळमळीतुन व्यक्त झालेले होते. त्यांचे म्हणणे आपल्या हृदया पर्यंत सहज पोहोचते.
म्हणून मला मराठीतुनच व्यक्त व्हावयास आवडते.
आपण नेहमी हृदयाचा दाखला देतो कारण ते एका दृश्य स्वरूपात आपल्या शरीरात धडधडत असताना जाणिवेत असते. खरे तर ह्या सर्व जाणिवांच्या क्रिया मुळात मनात प्रथम कल्पनेच्या स्वरूपात प्रगट होत असतात. "मनः षष्ठानि इन्द्रियाणि" असे म्हणले असले तरी पण ते "मन" दाखविता येत नसल्याने आणि आपण हृदया पर्यंतच पोहचु शकत असल्याने त्याचाच नेहमी दाखला देतो.
परमेश्वराशी/ भगवन्ताशी संवाद साधताना मात्र तो वैखरीच्या स्तरावर नसुन तो "मध्यमेच्या" स्तरावर असतो व त्यालाच समर्थ "आत्मनिवेदन" असे म्हणतात. नवविधा भक्तीतील सर्वात महत्वाचा भक्तीचा प्रकार तो हाच असे समर्थ ठासुन सांगतात.
यात भगवन्ताशी मानसिक स्तरावर प्रथम मध्येमेतुन, व नंतर क्रमाक्रमाने पश्यंती व परा वाणीच्या अलौकिक मातृभाषेतुनच संवाद साधला जातो, असे समर्थ म्हणतात (जसा नामदेवाचा विठ्ठलाशी वा कल्याण स्वामींचा हनुमंताशी). ह्या भक्तीचे परम विलीनीकरण साधते ते "आत्मानुभूतीतून " असे समर्थ म्हणतात.
तरीपण सामान्यतः बोलीभाषा ही दर 20 मैला वर बदलत असते. ज्या भाषेत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो त्या भाषेचे व्याकरण व शब्द संग्रह जेवढा म्हणुन वाढविता येईल तेवढ्या प्रमाणात त्याचा योग्य व सम्यक उपयोग प्रत्येक ठिकाणी करून आपल्याला आपल्या भावना उत्तम व समर्पक रितीने व्यक्त करता येतील.
सध्याच्या काळात आई वडील हें कदाचित भिन्न भाषेतील, भिन्न प्रदेशातील, भिन्न धर्म संस्कृतीतील असण्याची शक्यता नाकारता येत नही. त्यामुळे आईची ती मातृभाषा, पित्याची ती पितृभाषा, असे असले तरी ज्या भाषेतुंन आपल्याला समर्थ पणे व्यक्त होता येईल ती भाषा आपण वापरावी हे योग्य होय.





Comments