जाणीव
जाणीव….. जाणीव म्हणजे नक्की काय? कळत नकळत आपल्याला काहीतरी जाणवते तीच जाणीव. आधी मनाला जाणीव होते आणि त्याचे रूपांतर क्रियेत होते. जाणीव कुठेही, केंव्हा ही, कधीही होते. स्थळ-काळाचे बंधन नाही. समजा एखाद्या ठिकाणी हजारो लोक आहेत पण त्या प्रत्येकाच्या मनातली जाणीव निरनिराळी असेल. घटना एकच पण जाणीव मात्र व्यक्ती परत्वे भिन्न असू शकते.
झाडाला पालवी फुटण्याची, मातेला पोटातील गर्भाची, युवक युवतीना आपल्याकडे कोणी चोरून बघताय याची गोडशी जाणीव असते. दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखण्याची, नवजात बालकाला वात्सल्याची, ममतेची जाणीव, आजी आजोबांचे बोट धरून चालताना नातवंडांना होणारी निर्भयतेची जाणीव, हळूच झालेल्या पदरवाची अनाहुत जाणीव, प्रसव वेदनेवेळी आई होणार याची सुखद जाणीव वेदना विसरायला भाग पाडते. नवीन कपडे, कोरी करकरीत पुस्तकांची नविनतेची जाणीव आपण अनुभवली आहेच. काळोखाची भीतीयुक्त जाणीव, नवीन ठिकाणी गेल्यावर सगळे जमेल ना ही हुरहूर वजा जाणीव, स्ट्रेचरवर असताना शस्त्रक्रिया उत्तम पार पडेल ना याची हृदयात दाटलेली चिंतेची जाणीव, एखादी गोष्ट लपवून करताना कोणाला संशय येऊन पकडले तर जाणार नाहीना याची जाणीव आपली धांदल, झोप उडवते. प्रिय व्यक्ती शेवटच्या घटका मोजत असताना त्याचा मृत्यु अटळ आहे याची जीव घेणी जाणीव तर विचारूच नका. एकटे आलोत एकटेच जायचे आहे हे सत्य माहित असून आपले कसे होईल याची मनाला कुरतडणारी जाणीव, घराला, बॅगेला कुलूप लावले आहे ते सुरक्षित याची जाणीव तर सुखावह व भरवशाची वाटते. अहो एखादा वेडा असला तरी त्याला कसली ना कसली तरी जाणीव निश्चित असते. आणि गमतीची गोष्ट आपण दुसऱ्याला एखाद्या गोष्टीची जाणीव जाणीव पूर्वक करून देतो. वरून ‘सहजच बोलले ग’ असे काहीच नाही अशी मखलाशी करतो. कसे गंडवले याचा आनंद घेतो. जाणीवांचे अनंत प्रकार आहेत. याची यादी वाढतच जाईल.
जगातील सगळ्या देशांचे करार, आपापसातील व्यवहार विश्वासाच्या जाणीवेवरच चालतात. खरंतर आपल्या मनात कोणतीना कोणती जाणीव पिंगा घालत असतेच. जाणीव असणे हे उत्तम विचारांचे द्योतक आहे. आपणा सगळ्यांच्या आयुष्यात अनेक सुख दुःखांचे प्रसंग आलेले असतात. कालांतराने तेच प्रसंग आपणास परत एकदा सुखा दुःखाची जाणीव करुन देतात. अशा अनेक जाणीवा आपल्या मनात खचून भरलेल्या असतात. दिवसेंदिवस पोतडीत भरच पडते याची जाणीव आपणास होत असतेच. एखादी जाणीव विसरू या असे ठरवले तरी तें शक्य होईलच असे नाही, आणि कधीतरी जाणीव आपलं डोकं वर काढतेच. आपल्याला आपल्याच जाणीवेची कधी कधी गंमत वाटते. तर कधी निखळ वेडेपणा वाटतो.
जाणीवेची ही कथा वाचता वाचता आपणा सर्वाना अनेक जाणीवांची जाणीव जाणवावयास लागली असेल हे तर नक्कीच. म्हणून होत असलेल्या जाणीवांचा जाणीव पूर्वक विचार कराच. जाणीव ही आपल्या अस्तित्वाची साक्ष आहे. जाऊन दे. हे जाणीव पुराण जाणीवपूर्वक थांबवते. कारण तुम्ही कंटाळून जाल याची मला जाणीव आहेच. पण घे घडायला नको याच जाणीवेने मी आपली जाणीवपूर्वक रजा घेते. अरे हो, पण या जाणीवेची तीव्रता इतकी असते की त्याचा स्फोट होऊन त्यातून राग, लोभ, आपुलकी, माया, प्रेम, जिव्हाळा अशा अनेक गोष्टी बाहेर पडतात. त्याचा इष्ट.. अनिष्ट परिणाम दिसून येतो. म्हणून फक्त छान छान जाणीवांचे जतन करा, आणि कधी तरी त्याची परत लज्जत चाखा.





Comments