संपादकीय
Updated: Oct 2
नमस्कार मंडळी!
जुलै ते सप्टेंबर हे त्रैमासिक म्हणजे सणासुदीचा काळ.
त्रिवेणीने यावर्षी पहिल्यांदाच आषाढी एकादशी साजरी करण्याच्या निमित्ताने पंढरपूर वारीचा एक नवीन उपक्रम केला. 9 मे पासून 45 वारकरी रोज आपापल्या परीने चालण्याचा किंवा धावण्याचा संकल्प करून virtually पंढरपूरच्या वारीला निघाले. एकत्रितपणे 5,000 मैलांचा प्रवास करून 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी वारीची सांगता झाली. हिंदू मंदिरात ज्ञानेश्वर आणि तुकारामांची पालखी ढोल ताशाच्या गजरात निघाली. विठ्ठल पूजा आणि आरती बरोबरच प्राजक्ता मोहरीर यांचे कीर्तन आणि भजनांचा कार्यक्रम ही झाला. एकादशीचे निमित्त म्हणून उपस्थित भक्तगणांसाठी फराळाच्या खाद्यपदार्थांची सोय करण्यात आली होती. संस्कृती आणि स्वास्थ्य या दोन्हींना एकत्र आणण्याचा कमिटीचा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. माझ्यासारख्या अनेकांनी यापासून प्रेरणा घेऊन चालण्याचा किंवा धावण्याचा उपक्रम पुढे सुरू ठेवला असेल अशी खात्री आहे.
यावर्षीचा गणेशोत्सव 20 सप्टेंबर रोजी नेहमीच्याच उत्साहाने हिंदू मंदिरात साजरा करण्यात आला. आपल्या ढोल -ताशा पथकाच्या सादरीकरणाने आसमंत दुमदुमून गेला. मंदिर आणि मेक माय गणेशा टीमच्या सहयोगाने लहान मुलांसाठी गणपतीची सुबक मूर्ती बनवायास शिकवण्याचा उपक्रम एका वर्षाच्या खंडानंतर या वर्षी परत सुरू झाला. जवळजवळ 77 विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. प्राजक्ता मोहरीर आणि त्यांच्या चमूने भजने सादर केली. दरवर्षीप्रमाणेच त्रिवेणीच्या स्वयंसेवकांनी प्रसादाची व्यवस्था केली. यावर्षी 700 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला असा अंदाज आहे. अनुमानापेक्षा उपस्थिती कमी होती. त्रिवेणी कमिटीने उर्वरित अन्नाचे, आपले सभासद, मंदिराचे कार्यकर्ते आणि युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीचे विद्यार्थी यांमध्ये वाटप करून अन्न वाया जाणार नाही याची खात्री केली.
त्रिवेणीचे आगामी कार्यक्रम
यावर्षीचा आणखीन एक नवीन उपक्रम म्हणजे Triveni Sports Event! यामध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, कॅरम, corn hole , बुद्धिबळ, बॅडमिंटन तसेच मुलांसाठी soccer च्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेट मॅच चे थेट समालोचन सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. स्पर्धेतील विजेत्यांना त्रिवेणीचा लोगो असलेले एक खास कॉइन बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे.
स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आपण या संकेतस्थळावर जाऊन रजिस्टर करू शकता : https://www.zeffy.com/en-US/ticketing/triveni-sports-event
स्पर्धक आणि प्रेक्षकांसाठी लंच बॉक्स ची सोय करण्यात आली आहे. यासाठीच्या ऑर्डर्स आपण या संकेतस्थळावरून रजिस्टर करू शकता: https://www.zeffy.com/en-US/ticketing/triveni-sports-event-lunch-purchase
आपला वार्षिक सांगितिक कार्यक्रम "स्वरसंध्या" हा 17 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची तिकिटे लवकरच उपलब्ध केली जातील.
यावर्षीचा दिवाळीचा कार्यक्रम 21 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याबद्दलची माहिती आणि तिकिटे येत्या काही दिवसात उपलब्ध केली जातील.
ह्या त्रैमासिकात - इतिहासात
2026 हे प्रसिद्ध कवी नारायण सुर्वे (१५ ऑक्टोबर १९२६ – १६ ऑगस्ट २०१०) यांचे जन्मशताब्दी वर्ष. मराठी साहित्यातील कष्टकरी वर्गाचा आवाज मानले जाणारे ते कवी होते. शाळेत फक्त सातवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुर्वे यांनी गिरणीत मजुरी, झाडूकाम, शिपाईगिरी अशा नोकऱ्या करत स्वतःच वाचन-लेखन शिकले, आणि पुढे शिक्षक बनले. रस्त्यावरचे आयुष्य, कामगार चळवळ आणि मुंबईतील गिरणगाव हीच त्यांची खरी "विद्यापीठं" ठरली.
१९६२ साली त्यांचा पहिला कवितासंग्रह "ऐसा गा मी ब्रह्म" प्रकाशित झाला, तर १९६६ सालचा "माझे विद्यापीठ" हा त्यांचा सर्वाधिक गाजलेला संग्रह ठरला, ज्याला अकरा पुरस्कार मिळाले. सुर्वे यांच्या कवितेने रस्त्यावरची, कामगारांची बोलीभाषा साहित्यात आणली — गिरणी कामगार, स्त्री कामगार, गरीब-वंचित माणसे यांचे जगणे त्यांनी थेट आणि प्रामाणिकपणे मांडले. डाव्या चळवळीशी बांधिलकी असलेल्या सुर्वे यांना १९७३ साली सोविएत लँड नेहरू पुरस्कार आणि १९९८ साली भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाला; १९९५ मध्ये ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले.
ह्या झुंझार, लढवैय्या कवीला त्रिवेणीतर्फे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन!
मतदानाचा हक्क
"बालपणीचा काळ सुखाचा" याच तालावर म्हणावसं वाटतं - "निवडणुकीचा - काळ जबाबदारीचा". नोव्हेंबर महिन्यात देशभरात मध्यावधी निवडणुका होऊ घातल्या आहेत. सद्य परिस्थितीत या निवडणुकांना कधी नव्हे एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. एक नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावून आपल्याला हवे/नको असणारे बदल घडवून आणण्यात सहभागी होणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अमेरिकन नागरिक असलेले त्रिवेणीचे सर्व सभासद आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य बजावतील अशी खात्री आहे.
त्रिवेणी कमिटी ही आपलीच जबाबदारी
राष्ट्रीय निवडणुकांबरोबरच त्रिवेणीच्या 2027 च्या कमिटीची स्थापना ही सुद्धा आपल्या शेवटच्या त्रैमासिकातील एक महत्त्वाची घटना असते. त्रिवेणी चे कामकाज हे उत्साही कार्यकर्त्यांच्या सहभागामुळेच शक्य आहे. त्रिवेणीचे कार्यक्रम आणि उपक्रम कसे असावेत याबद्दल आपल्यातील बहुतेकांचे काही ना काही मत असते. ते साध्य करण्याची संधी म्हणजे त्रिवेणी कमिटीतला सहभाग. सभासदांनी मोठ्या संख्येने कमिटीचा भाग होऊन आपल्या कल्पना आणि योजना साकार करण्याची संधी साधावी ही विनंती .
त्रिवेणी 2027 कमिटी join करण्यासाठी ह्या संकेतस्थळावर अर्ज करू शकता:


Comments