Cincinnati OH, AUM Summer Camp — भारतीय संस्कृतीच्या मुळांशी जोडणारा एक सुंदर प्रवास
एकाच वयाची चार मुले… पण चार वेगवेगळी विश्वे!
कोणी गाणे गुणगुणत आपल्या भोवतालापासून अनभिज्ञ, आपल्याच विश्वात रमलेले…
कोणी गवताच्या पातीसारखे—लवचिक, वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकीसोबत डोलणारे, पण वादळातही न तुटणारे…
कोणी मातीच्या ढेकळासारखे—मनाविरुद्ध काही घडले की ठेचकाळून फुटणारे…
तर कोणी विलक्षण समंजस—परिस्थिती कोणतीही असो, स्वतःला तिच्यात अलगद सामावून घेणारे!
सुरुवातीला काही मुले लांबूनच सगळ्यांचे निरीक्षण करणारे; काही बंडखोर, पण एकदा शिक्षक आपलेसे वाटले की त्यांना बिलगणारे!
अशा या निरनिराळ्या स्वभावांच्या, निरागस आणि उत्साही मुलांना शिकवण्यासाठी आम्ही AUM Summer Camp मध्ये गेलो. वाटले होते, आपण त्यांना काही शिकवू. पण काही दिवसांनी जाणवले — शिकवण्यापेक्षा शिकण्याचा भाग आपलाच मोठा झाला आहे.
म्हणूनच हा Summer Camp केवळ एक कार्यक्रम राहिला नाही; तो आमच्या मनातला एक जिव्हाळ्याचा आणि कायम स्मरणात राहणारा कप्पा बनून राहिला.
एका विचारातून उभे राहिलेले सुंदर स्वप्न
या सुंदर उपक्रमामागे होता राजेंद्रजींचा (राजेंद्रजी केळकर - हिंदू स्वयंसेवक संघाच्या सिनसिनाटी शाखेचे जनक) एक विचार. त्या विचारात दडले होते भारतातून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या पहिल्या पिढीच्या मनातले एक हळवे स्वप्न.
परदेशात स्थायिक होताना मनात कुठेतरी एक प्रश्न कायम असतो—नवीन आकाशाकडे झेप घेताना, भारताशी नाळ तुटेल का? मनाच्या एखाद्या कोपऱ्यात काळजी असते—आपली मुले या नव्या वातावरणात वाढताना आपल्या मातीपासून, आपल्या मु ळांपासून दूर तर जाणार नाहीत ना? आपल्या संस्कृतीची ओळख त्यांच्या आयुष्यात कुठेतरी विरून तर जाणार नाही ना?
पण त्याच वेळी एक सुंदर ध्यासही असतो—आपल्या मुलांना दोन्ही जगांमधले उत्तम देता यावे.
आजच्या Hindu-American मुलांना करावी लागणारी कसरत ही सोपी नाही. आपल्या American peers मध्ये मिसळायचे, त्यांच्या जगाचा भाग व्हायचे आणि त्याच वेळी आपल्या घरामागची, आपल्या आई-बाबांच्या आणि आजी-आजोबांच्या जगाचीही ओळख करून घ्यायची.
मुलांच्या मनात प्रश्न असतात...आपले आई-बाबा कुठून आले? आजी-आजोबा ही भाषा का बोलतात? ते असे कपडे का घालतात? आपल्या घरात हे सण का साजरे केले जातात? या परंपरांमागे नेमके काय आहे? ह्याच प्रश्नांची बीजे AUM School ने हेरली.
आधी कुतूहल जागवायचे, त्या कुतूहलाला ज्ञानाची जोड द्यायची आणि मग त्या ज्ञानातून आपल्या संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करायचा—या हेतूने AUM School ने उचललेले हे पाऊल खरोखरच कौतुकास्पद होते.
एका कल्पनेपासून एका संघापर्यंत:
स्वप्न सुंदर होते; पण त्याला आकार देण्यासाठी अनेक हातांची गरज होती....Dedicated teachers, technology support, सल्लागारांचे मार्गदर्शन आणि उत्साहाने पुढे आलेले स्वयंसेवक. प्रत्येकाने आपापल्या परीने मनापासून हातभार लावला. माणसे जोडली गेली, कल्पना जोडल्या गेल्या. AUM school च्या national team कडून मार्गदर्शन मिळाले. Aum school अमेरिकेत काही ठिकाणी यशस्वी रित्या चालू आहेत, जी वर्षभर आणि पूर्णवेळ चालतात. तिथे integrated curriculum असते. ह्या सर्व अनुभवांच्या देवाण घेवाण मधून आकाराला आला AUM Summer Camp चा एक उत्साही, समर्पित संघ. “कर भला, तो हो भला” ही उक्ती जणू या संपूर्ण उपक्रमाचीच भावना बनली.
“Connect with the Roots”...AUM summer camp च्या ह्या संकल्पनेने सर्वांनाच अक्षरशः भारावून टाकले.
प्रत्यक्ष summer camp:
Batch 1: 15 जून ते 26 जून 2026 ( 27 मुले)
Batch 2: 6 जुलै ते 17 जुलै 2026 (34 मुले)
संस्कृती, ज्ञान, सृजन आणि खेळ यांचा सुंदर मेळ
या camp मध्ये भारतातील सर्व प्रांतांमधील, सर्व भाषिक, 6 ते 11 वयोगटातील मुले आली. इथे संस्कृती ही केवळ शिकवायची गोष्ट नव्हती; ती अनुभवायची होती, जगायची होती.
योग, प्राणायाम, भगवद्गीता, Vedic Maths, खो-खो सारखे खेळ, चित्रकला, हस्तकला, hands on activities.... अशा विविध उपक्रमांतून मुलांच्या शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक, सामाजिक विकासाचा सुंदर मेळ साधला गेला.
पौराणिक कथा आणि आजचे जीवन यांची सांगड घालत storytelling झाले. त्या केवळ कथा नव्हत्या; प्रत्येक कथेतून मूल्ये, व्यक्तिमत्त्व विकास आणि character building यांचे धडे अलगद दिले गेले.
संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, ही कथा आपण ऐकलेली. पण आजच्या या छोट्या मुलांकडून गीताश्लोक म्हणवून घेणे, हे ही आव्हानात्मकच होते!
सुरुवातीला संस्कृत श्लोक पाहून मुलांची भंबेरी उडाली. उच्चार जमत नव्हते, शब्द लक्षात राहत नव्हते. पण जिद्द मात्र कायम होती.
आणि मग हळूहळू चमत्कार घडू लागला.
काही दिवसांनी हीच मुले आई-बाबांना सांगू लागली — कैलास कुठे आहे, कृष्णा आणि कावेरी कुठून वाहतात. मुलांना जाणवले की रामायण ही फक्त मोठी गोष्ट नाही तर त्यात आहेत आदर्श, त्याग, शौर्य, भक्ती. वेदिक गणिता मधून कळले की आपले वंशज, ऋषी किती विद्वान होते. आपल्या भारतीय परंपरा आणि त्या मागचे शास्त्र किंवा विचार मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न झाला. हलके फुलके वातावरण रहावे, मैत्री वाढावी ह्या साठी भारतीय खेळ झाले, नारे घुमले.
भारतीय इतिहासाच्या व संस्कृतीच्या मु ळांशी जोडण्याचा प्रवास सुरू झाला होता. तो त्यांच्या प्रश्नांत दिसत होता, त्यांच्या कुतूहलात जाणवत होता आणि त्यांच्या डोळ्यांत चमकत होता.

शिकता शिकता निर्माण करण्याचा आनंद
ज्ञानाबरोबर कृती आणि सर्जनशीलतेलाही camp मध्ये तितकेच महत्त्व होते.
Art & Craft मध्ये त्यांच्या छोट्या हातांनी वारली कलेच्या सुंदर छटा उमटवल्या. भगवान रामाचा मुखवटा घडवला. मातीशी नाते जोडण्यासाठी झाडे लावली गेली. मुगाला मोड आणले गेले. आणि जलजीरा तर चक्क hit झाला! त्यांना कळले की कुठले ही end product आपण बघतो, त्या मागे बरेच कष्ट, प्रेम आणि वेळ असतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट किंवा अन्न वाया घालवू नये, ही शिकवण त्यांना मिळाली.
समारोपाचा दिवस: पालकांचा विश्वास सार्थ ठरल्याचा आनंद
आणि मग आला तो दिवस—समारोपाचा.
काही दिवसांत शिकलेले श्लोक, सूर्यनमस्कार, वेदिक गणित आणि रामायणाचे skit—हे सारे पालकांसमोर सादर करण्याची वेळ आली. या छोट्यांनी त्यासाठी अक्षरशः जीवाचे रान केले.
सराव सुरू झाला की कुणाच्या चेहऱ्यावर उत्साह, कुणाच्या चेहऱ्यावर ताण, कुणाच्या डोळ्यांत आत्मविश्वास… तर कुणी अजूनही शेवटच्या क्षणापर्यंत आपली भूमिका बदलण्याच्या विचारात!
पण रंगमंचावर पडदा उघडला आणि काही क्षणांतच सगळे बदलले.
त्या छोट्या पावलांनी आत्मविश्वासाने रंगमंच व्यापला. श्लोक घुमले.
सूर्यनमस्कार झाले. कला खुलली.
कथा जिवंत झाल्या. आणि रामायण रंगले.
मुलेच लेखक, मुलेच दिग्दर्शक, आणि मुलेच कलाकार! अशी रामायणाची कथा त्यांच्या निरागस कल्पनाशक्तीतून रंगमंचावर अवतरली.
या छोट्याशा प्रयोगातून त्यांना केवळ अभिनयाचा अनुभव मिळाला नाही. त्यांना मिळाले—संघभावना, जबाबदारी, सर्जनशीलता, निर्णयक्षमता आणि आत्मविश्वासाचे धडे.
कदाचित म्हणूनच हा skit पाहताना आम्हाला केवळ रामायण रंगमंचावर दिसत नव्हते; एकत्र काहीतरी घडवण्याची मुलांची क्षमता दिसत होती.
आपल्या या accent वाल्या मुलांच्या तोंडून भगवद गीतेमधील संस्कृत श्लोक ऐकून पालक अचंबित, हर्षभरीत झाले.
त्या क्षणी AUM Team च्या मनात एकच भावना होती—
“पालकांनी दाखवलेला विश्वास आपण सार्थ ठरवला.”
यापेक्षा मोठे समाधान शिक्षकासाठी आणखी काय असू शकते?
हा शेवट नव्हे… एका नव्या प्रवासाची सुरुवात!!
AUM Summer Camp हा केवळ काही दिवसांचा कार्यक्रम नव्हता.
तो होता एक प्रवास—
भारताशी नाळ जोडणारा,
संस्कृतीचे सौंदर्य अनुभवू देणारा,
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे—
या मुलांना स्वतःच्या मुळांशी जोडून स्वतःची ओळख करून देणारा.
कदाचित या काही दिवसांत मुलांना भारताबद्दल सगळे काही समजले नसेल.
पण त्यांच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील…
काही कुतूहल जागे झाले असेल…
काही नवीन आठवणी रुजल्या असतील…
आणि आपल्या मुळांविषयी अभिमानाची एखादी छोटीशी ज्योत पेटली असेल…
तर या प्रयत्नाचे सार्थक झाले.
AUM School च्या वाटेवरचे हे तर पहिलेच station.
उद्याच्या या छोट्यांसाठी संस्कृती, ज्ञान, मूल्ये आणि आपल्या मुळांशी जोडणारे उघडणार आहे एक नवे दालन.

Varsha Palande
AUM summer camp, Cincinnati, OH




Comments