गझलेच्या प्रवासातला हा पुढला मुक्काम..
- सचिन सोनटक्के

- Sep 30
- 2 min read
आतापर्यंत आपल्याला काही शायर आणि त्यांची लोकप्रिय शायरी याबद्दल थोडी माहिती मिळाली.
अनेक उत्तम शायर होऊन गेले आहेत... मीर, गालिब, दागपासून या काळाचे बशीर बद्र, निदा फाझली पर्यंत - असे अनेक. सगळेच कवी जरी उत्तम गझला करणारे असले तरीही त्यांच्या प्रतिभेत फरक नक्कीच आहे.
मीरचे काव्य मृदू आहे, तरल आहे. उदाहरणार्थ :पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने हैजाने न जाने गुल ही न जाने बाग़ तो सारा जाने हैआजच्या काळात बशीर बद्र आहेत किंवा निदा फाजली आहेत. त्यांचा भर साधारण माणसाला समजेल अशा भाषेत “साफ साफ” कविता करण्यावर आहे (म्हणजे असे शेर ज्यांचा एकच सोपा आणि साफ अर्थ निघतो). उदाहरणार्थ :हम लबों से कह न पाए उन से हाल-ए-दिल कभीऔर वो समझे नहीं ये खामोशी क्या चीज़ हैकिंवाअपनी मर्ज़ी से कहाँ अपने सफ़र के हम हैंरुख़ हवाओं का जिधर का है उधर के हम हैंपण केवळ गझल हेच परिमाण धरले - तर त्यात शब्दांचा खेळ करून शेवटी ऐकणाऱ्याला स्तिमित करणारे जे धक्का-तंत्र वापरले जाते त्यामध्ये गालिबचा हात धरणारा कोणी नाही. उदाहरणार्थ :जला है जिस्म जहाँ दिल भी जल गया होगाकुरेदते हो जो अब राख जुस्तुजू क्या है
तर आज या शब्दांच्या जादूगाराची अजून एक सुंदर गझल आपण पाहूया.शिर्षक : ये न थी हमारी क़िस्मत
ये न थी हमारी क़िस्मत की विसाल-ए-यार होता
अगर और जीते रहते यही इंतिज़ार होता
*विसाल - मिलन
इथे गालिब म्हणतो की प्रेयसीबरोबर (यार) मिलन होणे हे त्याच्या नशिबात नव्हते.
आणि पुढे तो सांगतो की जर तो अजून जगला असता तर त्याला अशीच वाट पाहावी लागली असती.
तेरे वादे पर जिए हम तो ये जान झूट जाना
कि ख़ुशी से मर न जाते अगर ऐतबार होता
*ऐतबार - विश्वास
या शेरामध्ये गालिब शब्दांचा सुंदर खेळ करतो.
तो म्हणतो (त्याच्या प्रेयसीला उद्देशून) की जर तुला असे वाटत असेल की तू केलेल्या (मिलनाच्या) वचनावर मी अजून जिवंत आहे - तर ते खोटे आहे असे समज.
कारण त्या वचनावर जर मला विश्वास असता तर आधीच त्या आनंदाने मी संपलो असतो.
कोई मेरे दिल से पूछे तेरे तीर-ए-नीम-कश को
ये ख़लिश कहाँ से होती जो जिगर के पार होता
*तीर-ए-नीम-कश - नजरेचा बाण जो अर्धाच ('नीम'- ज्यावरून मराठीमध्ये 'निम्मा' शब्द आला आहे) ओढलेला ('कश' म्हणजे ओढलेला – सिगारेटचा कश) आहे.
*ख़लिश - अस्वस्थता
या शेरामध्ये गालिब म्हणतो की कुणी माझ्या हृदयाची चौकशी करा. त्याचे हृदय अस्वस्थ आहे. कारण हा त्याच्या प्रेयसीच्या नजरेने अर्धवट मारलेला बाण आहे त्यामुळे तो अस्वस्थ झाला आहे.
तो पुढे म्हणतो की तिने संपूर्ण दुर्लक्ष केले असते तर तो 'तीर' आर पार गेला असता आणि मग गालिबची अस्वस्थतेपासून कायमची सुटका झाली असती.
ये कहाँ की दोस्ती है कि बने हैं दोस्त नासेह
कोई चारासाज़ होता कोई ग़म-गुसार होता
*नासेह - सल्लागार (नासेह वरून नसिहत हा शब्द बनलाय)
*चारासाज़ - ऊपाय सांगणारा/बरं करणारा (त्या उलट : बिचारा/बेचारा - ऊपाय नसलेला)
*ग़म-गुसार - सहानभूती बाळगणारा
इथे गालिब आपल्या मित्रांबद्दल तक्रार करतो आहे. तो म्हणतो हे कसले मित्र आहेत जे मला तऱ्हेतऱ्हेचे सल्ले देत आहेत.
काश माझ्या स्थितीवर कोणी ऊपाय करणारा मित्र असता किंवा माझ्याशी सहानभूती बाळगणारा मित्र असता.
कहूँ किस से मैं कि क्या है शब-ए-ग़म बुरी बला है
मुझे क्या बुरा था मरना अगर एक बार होता
*शब-ए-ग़म - दुःखाची रात्र (ताटातूटीमूळे आलेले दुःख)
या शेरामध्ये गालिब म्हणतो की मी कोणाला माझ्या त्रासाबद्दल सांगू? त्रास/दुःख जे एकटेपणाच्या रात्रींमुळे होत
आहे. त्यापेक्षा एकदाच काय ते मरणं बरं होतं. कारण या ताटातूटीमूळे तो रोज रात्री नव्याने मरत आहे.
ये मसाईल-ए-तसव्वुफ़ ये तेरा बयान 'ग़ालिब'
तुझे हम वली समझते जो न बादा-ख़्वार होता
*मसाईल-ए-तसव्वुफ़ - गूढ प्रश्न/अडचणी
*वली - पीर/संत
*बादा-ख़्वार - दारू पिणारा
हा शेवटचा शेर म्हणजे मक्ता आहे. (मराठीतला 'मक्ता घेणे' - याच शब्दावरून आलाय).
यात गालिब एका तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टीतून लिहितो की हे गालिब तुझी गूढ समस्यांवर बोलण्याची जी शैली
आहे ती पाहून आम्ही तुला संत समजलो असतो - जर तू दारू पिणारा नसतास.
इथे गालिब स्वतःची थोडी प्रौढी मिरवतो.
या गझलेमध्ये अजून काही शेर आहेत, पण मी मोजके आणि लोकप्रिय उचलले आहेत.
गझलांबद्दल मला वाटते की शक्यतो मूळ रचना वाचावी. काही कारणांमुळे संगीतकार किंवा गायक संपूर्ण रचना वापरत नाहीत. आणि मग त्यांनी सोडलेले शेर अथवा कडवी मूळ रचनेमध्ये सापडतात. म्हणतात ना - “ये खजाने तुम्हे मुमकीन है खराबो में मिले”. या बाबतीत एक मराठीतले परिचित उदाहरण पटकन आठवले. ग्रेस यांची कविता… “ती गेली तेव्हा..” या गीतामध्ये एक वगळलेले कडवे आहे, तेही नक्कीच वाचण्यासारखे आहे.तर ही सुंदर गझल तुम्ही वेळ मिळाला तर नक्की ऐका. जगजीतसिंग यांनी ती अजरामर केली आहे. पण इतरही अनेक गायकांनी आपआपल्या ढंगात गायली आहे. आबिदा परवीन यांच्या खड्या आवाजातही ही गझल छान वाटते.
कोणाला जुने सोने आवडत असेल तर अख्तरबाईनीसुद्धा ही गझल गायली आहे. आजच्या नव्या दमाच्या गायकांनीही उत्तमपणे सादर केली आहे.
अनेक शतकांआधी लिहिलेले तुकारामाचे अभंग म्हणा, कबिराचे दोहे म्हणा किंवा गालिबचे शेर घ्या –
आजही लोकांना ते भुरळ पाडतात यातच सारे आले.तर आता इथे थांबतो. पुढील कविता/गझल पुढल्या लेखात. धन्यवाद
Reference : rekhta.org




Comments