top of page

सूर निरागस हो...

हर हर शंभोss ...

आंघोळून झालं आणि पिल्लू झालं खुश. 

इवल्याश्या केसातून पडणाऱ्या मोत्यांनी बदलली होती कूस. 

आनंदाच्या त्या धबधब्याखाली पिल्लू मनसोक्त भिजलं आणि मग मस्त टॉवेलच्या गुंडाळीत गादीवर लोळ लोळ लोळलं.

टिपकागद होऊन अगदी टिपून घेतले त्या माउलीने हे क्षण! 

ह्या सोहळ्याचे आजी आजोबांनापण होते खूप आकर्षण. 


बोलके टपोरे डोळे टॉवेलमागून करत होते लुक लुक आणि त्या मागून पिल्लू करत होतं कूssक! 

हा सगळा सोहळा संपेपर्यंत पिल्लाला लागायची भूक.


एक छोटंसं ताट ... 

त्यात पिवळाधमक गरमागरम वरण भात वाट पाहत असे मूक.. कि कधी पडतंय त्यावर मस्त साजूक तूप!

मग "इथं इथं बैस रे मोरा" करत पिल्लू करी धिंगाणा ... हा असाच असे त्याचा नेहेमीचा बाणा.

गुरगुट्या भात कसा मटामटा जाई आणि ह्यातच लागे त्याला चिऊच्या गोष्टीची घाई.  


वय होतं खरतर पाच ...  पण तरी लागायचा त्याला मऊ गुरगुट्या भात.

पिल्लू होतं एकदम हट्टी आणि करायचं सारखं कट्टी बट्टी!

हर हर शंभो शिवाय त्याचं पान हलत नसे आणि "चार ससे पिटुकले" शिवाय गाडी पुढे जातंच नसे. 

काही बोबडे बोल वाटत होते गोड आणि म्हणूनच कि काय त्याला जपण्याची सगळ्यांना ओढ!

बालपण त्याचं काही केल्या सरेना... त्याला मोठं करायला घरच्यांचा जीव धजावेना! 


टेचात स्वारी तयार व्हायची शाळेत जाण्यासाठी ... 

पण बोबडे बोल आळवायचे "नुलवी पूलवी प्लेम क्लूपा जयाची" त्या आधी!


एक दिवस असंच पिल्लू शाळेमध्ये गेलं ...

एक दिवस असंच पिल्लू शाळेमध्ये गेलं ... अन गारेगाराची गाडी पाहून हरखूनच गेलं!

इटुकल्या पिटुकल्याच्या तोंडात आलं पाणी आणि धिटुकल्यानी केली बाप्पाशी चक्क हातमिळवणी!

शाळेतल्या आवारातला बाप्पा पण दोन मिनिटं बावरला, जेव्हा पिल्लानं त्याच्या समोरचा रुपया उचलला!

पिल्लू नक्की काय करतंय हे त्याला उमगेना ...

पिल्लू नक्की काय करतंय हे त्याला उमगेना ... कसं आवरू ह्या पाखराला तेच त्याला सुचेना

शेवटी बाप्पा तो बाप्पा आहे ... आपल्यासारखा क्षुद्र जीव नाही ... म्हणूनच दुसऱ्यांच्या चुका दाखवण्याची त्याच्या जीवाची घालमेल नाही.  


वार प्यायल्यासारखं पिल्लू धाव धाव धावलं ...

वार प्यायल्यासारखं पिल्लू धाव धाव धावलं आणि सरतेशेवटी गारेगारवाल्या काकांना गाठलं.

लाल चुटूक गारेगार अंगाअंगात झिरपलं आणि पिल्लुचं तापमान काहीसं खालीच सरकलं!

गब्बू गब्बू गोबरे गाल आता झाले आणखीनच लाल ... 

गब्बू गब्बू गोबरे गाल आता झाले आणखीनच लाल आणि त्यात लागली नकट्या नाकाला संततधार! 

नाक पुसेपर्यंत गारेगार गळे आणि काय खाऊ कसे खाऊ म्हणून पिल्लू तळमळे!


ही अशी शिक्षा का व्हावी हे त्याला कळेना आणि आपलं काही चुकलं का तेही आठवेना!

काहीतरी चुकलं होतं खरं ...

काहीतरी चुकलं होतं खरं ... पण मन मानायला धजत नव्हतं बरं!

पिल्लू होतं चाणाक्ष ...

पिल्लू होतं चाणाक्ष ... त्यानी बाप्पाच्या मंदिरावर टाकला कटाक्ष!

बाप्पा त्याच्याकडे पाहून खुद्कन हसला आणि माझा रुपया दे म्हणून मागणं धरून बसला.

रुपया उचलताना मोह सुटला नाही आणि आता बाप्पाची नाराजी देतीये ग्वाही!


सॉरी बाप्पा ... चुकलं बाप्पा म्हणून पिल्लू गहिवरलं आणि बाप्पाचंही काळीज दोन मिनिटं कळवळलं!

परत असं करणार नाही मी देतो खात्री ... पण तू माझ्याशी तोडणार नाही ना मैत्री?

असं काय रे "नुलवी पूलवी" काहीतरी बोल ना ... आपल्यातला अबोला आतातरी सोड ना! 

तू मला का बोलला नाहीस जेव्हा मी रुपया उचलला? तू तेव्हाच माझा हात का नाही पकडला?

तुझं पण चुकलं आहे तू मला फसवलंस आणि माझ्याकडून तूच गारेगार गटवलंस!

मला वाटलं आपली झालीये हातमिळवणी ...

मला वाटलं आपली झालीये हातमिळवणी ... पण तू तर माझ्याचं तोंडच पळवलंस पाणी!

तरीपण अशी चूक परत कधी होणार नाही ... माफ कर एकदा मला नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही!  

निष्पाप मन झालं होतं अनावर आणि त्यावर,  त्यात बाप्पाचा वावर!

काय बोलू कसं बोलू कशाचीच भीड नाही ... आतून बाहेरून लख्ख सारं त्यामुळे कसलाच पेच नाही!   


त्या भाबड्या जीवाचे बाप्पालापण पडे कोडे ... कित्ती सुंदर भावविश्व त्यात काहीच नाही तोकडे! 

क्षणात हसणे क्षणात रुसणे ...  

अन क्षणात डोळे ओले ... आणि छोट्याश्या गालावरच्या पापीने एका मिनिटात कळी खुले! 

स्वतःलाच पुसे बाप्पा, "का रे करतोस हेवा?" ...  तूच तर बनवलास ना हा आनंदाचा ठेवा!


पिटुकल्याची धिटाई पाहून बाप्पा मनोमन आनंदला.

जास्वदांचे फूल त्याच्या ओंजळीत टाकून जागीच थबकला. 

बाप्पाच्या आशीर्वादानं पिल्लुची कळी खुलली आणि गारेगारची घंटा त्याच्या मनात घुमू लागली.

"मुलं ही देवाघरची फुलं" असतात उगाच म्हणत नाहीत ... त्यांच्याइतकं निरागस पावित्र्य कशातच असत नाही.  


लाल चुटुक गारेगार तात्काळलं होतं ... कसबसं पाणी होता होता वाचलं होतं. 

गारेगार स्वाहा झालं आणि लाली पसरली ओठांवर ... अन तृप्तीचा ढेकर उमटला बाप्पाच्या उदरावर. 

गारेगारचा प्रत्येक भुरका बाप्पाला भोग चढवत होता जेव्हा पिल्लाच्या चेहेऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता!

कुठले मोदक कुठल्या दुर्वा ... सारेच वाटे परके जेव्हा,  सूर निरागस बाप्पाच्या आतपर्यंत झिरपे ... सूर निरागस बाप्पाच्या आतपर्यंत झिरपे!!


अपर्णा पारसनीस
अपर्णा पारसनीस

Comments


bottom of page