#डोलचेफारनियंते
- अपर्णा पारसनीस

- Jun 30
- 5 min read
कधी कधी कोणामध्ये फार मिसळू नये असही वाटण्याचे दिवस असतात... घड्याळाच्या काट्यावरचं कुठलंच रुटीन नसावं, आपल्याच विचारांच्या कोषात गढून जावं... आपली एक शांत दुपार असावी... ना कसली पळापळ ना कसली गडबड घाई...ना कुठे जायचं असावं ना कुणी येणार असावं...मस्तपैकी T. V. पाहत किंवा किशोरदा आणि लता बाईंची गाणी ऐकत लोळत पडावं…काही सुचलं तर छानपैकी लिहावं…नाहीतर एखाद चित्र रेखाटावं….गायला आवडत असेल स्वतःसाठी गावं…वाटलं तर एखाद्या मैत्रिणीला फोन करावा…भेटावसं वाटलं तर तेही करावं…स्वतःसाठीच मस्त तयार व्हावं …पण ओढून ताणून काहीच नाही.. ना उदासी, ना एकटेपणा …बस्स एक समाधान असावं सोबत.... एक वेगळीच आंतरिक शांती अनुभवावी... सांजवेळी एखादा फेरफटका मारावा, सोबत केशरी उबदार सूर्य असावा.... एखाद्या निवांत झाडाखाली हिरवा श्वास घ्यावा आणि पुन्हा चालू पडावं... आपल्या सोबत घट्ट हात धरून आपणच... एखादा दिवस असाच आपला आपल्यातच घालवावा! इटालियन फ्रेज प्रमाणे #डोलचेफारनियंतेच म्हणा ना! अर्थात “The sweetness of doing nothing.”
तर आजच्या दिवसाचं रुटीन #डोलचेफारनियंतेच होतं. आळोखे पिळोखे देत मी उठले आणि फक्कड चहाचा कप हातात घेऊन निवांतपणे बाल्कनीमध्ये येऊन बसले. सूर्योदयाला अजून वेळ होता. दूरवर काळोखात टेकडी एकाकी पसरली होती. ती पण आज माझ्यासारखीच 'रिकामटेकडी' वाटत होती. अजून बाहेर म्हणावी तशी जाग नव्हती. काही कचरा काढणाऱ्या बायका आणि मोजक्या चहाच्या टपऱ्या सोडल्या तर अवतीभवती सुस्त कदम रसतेच पसरले होते. थंडीमुळे रस्त्यावर काही तुरळकच माणसं दिसत होती. मी गरमा गरम चहाचा आस्वाद थंड वाऱ्याच्या झुळकेसोबत अनुभवत होते.
चहा घेताना वाटलं, काय अजब आहे हे #डोलचेफारनियंते प्रकरण! चहा तोच...चवही तीच पण रोजच्या सकाळच्या घाईगडबडीत मी तो नुसता ढोसते. पण आज मात्र तीच चव जिभेवर रेंगाळते आहे. खरतर किती छोटी गोष्ट आहे ही, जी दिवसाची सुरुवात फक्कड करू शकते. पण तेवढाही निवांतपणा मला मिळू नये?
चहा संपवून परत मऊसूत दुलई लपेटून ‘घनशाम सुंदरा’ कानाला लावून अरूणोदयाची वाट पाहत पडून राहिले. लता बाईंचा मधुर स्वर अगदी आतपर्यंत झिरपत होता आणि गावाकडची पहाट डोळ्यांसमोर तरळून जात होती. तेवढ्यात ऑफिस Teams वर कॉल दणाणला आणि माझी तंद्री भंग पावली.
आज कधी नव्हतं सुट्टीवर असतानासुद्धा का बरं कॉल येत असावा? काही क्रिटिकल कस्टमर इशू असेल का? मागच्या आठवड्यात पॅचेस टाकले त्यात तर प्रॉब्लेम्स आले नसतील? कस्टमर टेस्टिंग वर तर सक्सेसफूल साइन ऑफ मिळाला होता. काय करू? घेऊ का कॉल? इकडे कानात घनश्याम सुंदरा मधल्या धेनु हंबरत होत्या तर दुसरीकडे ह्या कॉलमुळे माझं मन! तशीच चरफडत गादीतून उठले आणि कॉल घेणार तेवढ्यात समोरच्या आरशात #डोलचेफारनियंते माझ्याकडे टक लावून पाहत होतं. त्याच्या त्या रोखठोक नजरेनी माझे डोलचे पण चमकले आणि माझ्यातली बिझी बी जागी होणार, तेवढ्यात ती उडून गेली. मनाचा हिय्या करून अगदी M.P.K. मधल्या सलमान प्रमाणे, “एन्ड तक (फोन पे) नही बोला.” स्वतःवर एवढी व्हिक्टरी मिळवूनसुद्धा मनातल्या #डोलचेफारनियंतेची जागा आता गिल्टने घेतली होती.
मला नेहेमी असं वाटतं कि, बायकांच्या रिकामटेकडेपणाला 'सेल्फ गिल्ट' चा गंध चिकटलेला असतो. नुसतं रिकामं बसायचं ही कल्पनाच त्यांना सहन होत नाही. आपल्याला सकाळचं ऊन खात स्वस्थ बसलेले आजोबा दिसतील पण स्वस्थ बसलेल्या आज्जा दिसतात का? एक तर त्या वाती वळत बसतील नाहीतर निवडणं टिपणं. असं का?
एका कार्यक्रमात गिरीजा गोडबोलेनं सांगितलेला एक किस्सा आठवला. तिच्याकडे आधी गिअरची गाडी होती. तेव्हा डावा हात कायम गियर टाकण्यामध्ये बिझी असायचा. काही दिवसांनी तिनं विदाऊट गियर ची गाडी घेतली आणि डाव्या हाताचं काम कमी झालं. गाडी चालवताना या रिकाम्या डाव्या हाताचं काय करायचं हा प्रश्न तिला पडला. मग काय, डाव्या हातात गरम कॉफीच्या सिपचा छान आस्वाद घेत ती गाडी चालवायला लागली. स्वतःच्या मल्टीटास्किंग वर खुश झालेली ती बघून तिची आई म्हणाली, “डाव्या हाताला काम नाहीये म्हणून कशाला कॉफी पितेस? राहू दे की हात रिकामटेकडा! कुठे बिघडलं?“…आणि तिला जाणवलं की आपण ॲक्टिव राहायच्या नादात स्वतःला किती ड्रॅग करतोय.. खूप विचार करण्यासारखं आहे हे. नाही का?
ही “तुझ्याविना वैकुंठाचा कारभार चालना” वृत्ती कशासाठी? या मल्टि टास्किंग मधूनच ‘गृहित’ धरलं जाणं जन्माला येत हे मात्र नक्की! रोजची नाती निभावत असताना हा विचार नक्की करून पाहायला हवा कि, मी संयमी आहे म्हणून मला समोरचा गृहित धरतोय का? मी सुगृहिणी आहे म्हणून घरचे मला अष्टभुजा समजतायत का? माझ्या काम करण्याच्या वेगावर आणि भरभर उरकण्यावर त्यांची भिस्त आहे म्हणून मलाच न विसरता काम सांगितलं जातंय का? ऑफिस आणि घर दोन्हीकडे माझी हीच कथा आहे का? तसं असेल तर, #डोलचेफारनियंते रसायन मला अधून मधून प्राशन करण्याची विशेष गरज आहे यात काही वाद नाही!!
पत्त्याच्या डावात नाही का..एक हुकुमाच पान राखून ठेवतो आपण शेवटचा हात करण्यासाठी…अगदी तसच.. मला दुसर्यांचा हुकमी एक्का होण्यात आनंद आहे का, जिथे मला स्वतःमध्ये डोकावण्यासाठी वेळच नाही? का माझं गृहित धरलं जाणं हे मीचं गृहीत धरलय? ह्या आशा, अपेक्षा आणि जवाबदाऱ्यांमधून बाहेर पडून कधीतरी स्वतःमध्ये डोकावण्याचा रामबाण उपाय म्हणजे, #डोलचेफारनियंते!…अर्थात आनंद देणारा आळशीपणा! “Doing nothing is mindfulness.” असं म्हणतात. तर मग रिकामटेकडेपणा म्हणजे माइंड फुलनेसच झाला ना!
आनंद देणाऱ्या आळशीपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे पाण्यात तासनतास डुंबणाऱ्या म्हशी...मधेच शेपटी हलवून अंगावर बसलेल्या माशा आणि कावळे हकलावे.. तर कधीकधी तेवढे पण कष्ट घ्यायच्या भानगडीत त्या पडत नाहीत. मग मीचं मुंगीबाय का व्हावं? आत्तापर्यंतचं आयुष्य हे बिझी बी होतंचं कि आणि ते पुढेही तसंच असणार आहे! अधून मधून pause चं बटण क्लीक करून थोडेफार डुंबलो तर कुठे बिघडलं? अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य उडून गेलंय. आतातरी "मैं हूं हि नहीं इस दुनिया कि” म्हणत कधीतरी मनसोक्त #डोलचेफारनियंते करायला काय हरकत आहे?
माझ्या लहानपणी घराजवळ चाफ्याचं झाड होतं. आईकडनं तुळशीच्या मंजिऱ्या आणि आलं टाकून मी छान चहा करून घ्यायचे. मग तो चहाचा कप हातात घेऊन मी झाडाच्या पारावर मस्त टेकून बसायचे आणि 'चांदोबा' चं पुस्तक दोन तीन तास निवांतपणे रवंथ करत बसायचे. आहाहा काय दिवस होते ते! माइंड फुलनेस हा शब्द सुद्धा माझ्या डिक्शनरीत तेव्हा नव्हता. पण मी तो रोज जगत होते.
खरा आनंद असाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो. आपण आपल्या स्वप्नांमागे धावता धावता तोच हरवुन बसतो. आपण कशाच्या बदल्यात काय मिळवतोय हे पाहणं पण तितकंच गरजेचं आहे ना? हे सगळं माहिती असूनसुद्धा ह्याचं नव्यानं इंट्रोस्पेक्शन #डोलचेफारनियंतेचा एखादा शॉट देऊन जातो.
प्रत्येकाची #डोलचेफारनियंतेची कल्पना नक्कीच वेगळी असू शकते. रातकिड्यांची किरकिर, आजूबाजूला उडणारे काजवे, झाडाच्या पानांची सळसळ, वर चांदण्या पांघरलेलं आकाश, अंगाला मोरपिशी स्पर्श करून जाणारी सुखद वाऱ्याची झुळूक, वासराच्या गळ्यातील घंटेची किणकिण अनुभवणं म्हणजे #डोलचेफारनियंते!
पावसाळी वातावरणात वीज गेल्यावर मेणबत्तीच्या उजेडात मित्र मैत्रिणींसोबत मनमोकळ्या खुमासदार गप्पा माराव्यात,
कधीतरी सगळ्याला सुट्टी देऊन पिल्लुला कुशीत घेऊन दुपारी वामकुक्षी घ्यावी म्हणजे #डोलचेफारनियंते!
सगळ्या ताणतणावातून आणि कोलाहलातुन काही क्षणांपुरती मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे #डोलचेफारनियंते! जस बस मधल्या गर्दीत अचानक खिडकीची जागा बसायला मिळावी आणि बाहेरचे रिमझिम पावसाचे थंड तुषार चेहऱ्यावर शिंपडले जावेत. डोळ्या बाहेरचा हिरवागार निसर्ग डोळ्यात सामावुन घेतं एखादी मंद सुरेल गझल गुणगुणावी.
घरच्या सगळ्या व्यापातून आईच्या हातची गरमागरम डिश हातात यावी आणि त्याचा आस्वाद कणाकणात रेंगाळत जावा म्हणजे #डोलचेफारनियंते! आईकडे माहेरी गेल्यावर आपसूकच गादीवर पडल्या पडल्या डोळा लागावा आणि सगळा क्षीण आईच्या प्रेमळ स्पर्शानं नाहीसा व्हावा म्हणजे #डोलचेफारनियंते!
आजीची जुनी साडी अंगावर पांघरून तिच्याच मांडीवर डोकं ठेवत ती केसात तेल जिरवताना आपली आवडती गोष्ट तिच्या तोंडून परत परत ऐकणं म्हणजे #डोलचेफारनियंते!
आज या विचारांचं मंथन करून एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली ती म्हणजे, बहिणाबाईंच्या ओवींप्रमाणे,
"आला श्वास गेला श्वास
जिवा तुझं हे तंतर
अरे जगन मरन
एका श्वासाचं अंतर."
असं म्हणतात कि, परमेश्वरानी आपल्याला वर्ष नाहीत तर श्वास बहाल केलेले असतात. यातले किती श्वास आपण फक्त आपल्यासाठी गिल्ट फ्री जगतो? We live only once. याच्याशी मी तरी सहमत नाही कारण आपण प्रत्येक दिवस नव्यानी जगतो. मग येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं नवखेपण जपणं आपल्याच हातात आहे ना! परवाच एक पॉड कास्ट ऐकताना Ruskin Bond च्या स्टोरी मधलं हे वाक्य मनात चर्रर्रर्र करून गेलं, “It’s not the time that is passing by. It’s you and I.” मग असं जर आहे तर, "हो सके तो इसमे, जिंदगी बितादो…पल जो ये जानेवाला है.”
सायकल चालवत लव्ह यू जिंदगी म्हणणारी आलिया व्हायचं असेल तर #डोलचेफारनियंते तो बनताही हैं!! काय विचार करताय मग? तुम्ही कधी प्लॅन करताय तुमचा #डोलचेफारनियंते?





Comments