top of page

शोधावे ते सुख

गाडीच्या  खिडकीतून  बाहेर बघत  लतिका बाईंनी  एक दीर्घ सुस्कारा  सोडला. वेगाने जाणाऱ्या  त्या गाडीतून  पळणारी झाडे बघताना  त्यांना बालपण आठवले.  खरंतर  आज इतक्या वर्षांनी  अशा आठवणी  म्हणजे  जरा विचित्रच. जळलं मेलं हे उतार वय. कालची गोष्ट आठवायला  त्रास होतो  पण 60-70 वर्षांपूर्वीच्या  सर्व गोष्टी  अगदी  पाण्यासारख्या  पारदर्शकपणे  आठवतात.  अशा कडू गोड आठवणी  मनात अगदी  जाळं विणून  टाकतात  म्हणून  तर  लतिका बाईंना  सतत  काही ना काही  कामात  गुंतून  राहायला आवडते.

त्यांची  सून  परवाच म्हणत होती  ' आई ,  आता तुम्हाला होत नाही  तर  जरा बसून  विश्रांती  घ्या,  उगाचच  स्वयंपाक घरात  कशाला सारखं  काम करत राहता ?'  तिला  काय  कपाळ सांगणार , 'अगं  नुसती बसले  तर गत आयुष्य  आठवून आठवून  वेड  लागेल मला.'    शिवण टिपण करावं तर  हल्ली  डोळ्यांनी    ठीक  दिसत नाही  आणि वर्तमानपत्र  मासिकातून  आहे तरी काय वाचायला? तेच ते राजकारण, खेळ,  सिनेमा.  टीव्हीवर  मेलं  मला हवं ते  बघायला पण  देत नाही  तुझी मुलगी .  तिला  तिचे  कार्यक्रम  बघायचे असतात  ना?  ती गाणी  तो वेडावाकडां नाच. असो.  बोलायचे पुष्कळ होते  पण  त्यांनी  फक्त  एक  सुस्कारा  सोडला  आणि हात धुवून  सांडलेल्या गोष्टी  गोळा करायला लागल्या.  तो डबा  इतका जड असेल  याची त्यांना  कल्पनाच नव्हती  म्हणून तर  उचलताना  हातातून  पडला  आणि उगाचच  सुनेचे  ऐकून  घ्यावे  लागले.

आता गाडीत बसलेले असताना  हे  व असेच अनेक प्रसंग  त्यांच्या  डोळ्यासमोर तळत होते.  दूरची घर दिसत नव्हती  पण  बालपणीचे  गाव  मात्र  डोळ्यापुढे  लक्ख  दिसत होतं. किती छान होते ते दिवस.  भविष्याची काळजी नाही,  भूतकाळाबद्दल पाश्चात्ताप  नाही,   की  वर्तमानाची  भीती नाही.  कमळाच्या  पाकळ्यांसारखे  एक एक दिवस  अलगद उमलत होते.  छान बागडायचे  खेळायचे  बाबाजवळ हट्ट करून  हवे ते मिळवायचे  आणि  मिळाले  की जग जिंकल्याच्या थाटात  नाचायचे.  उगीचच नाही, लहान पण देगा  देवा  म्हटलय.  हो पण स्वतःच्या  बालपणापासून  जेव्हा त्यांना  आपल्या  मुलांचे  बालपण  आठवले  तेव्हा  अचानक  त्यांचे  अंग  शहारले. खरंच  आपापले  आयुष्याचे  भोग असतात.  काहींना  बालपणी  काहींना  तरुणपणी  तर काहींना  म्हातारपणी.

लतिका बाईंच्या  मुलांना  कधी  बालपण  उपभोगताच  आले नाही.  आयुष्यात  वेड्यावाकड्या  कल  देणाऱ्या घटना घडत होत्या. पण लतिका बाईंचे  बालपण मात्र,  'कदाचित  आपलीच  दृष्ट लागली असेल'  स्वतःच्याच  मनाशी  त्या बोलल्या.   स्वातंत्र्या  पूर्वीचा तो काळ.  दररोज नवनवीन  गोष्टी ऐकायला  मिळायच्या. स्वातंत्र्यसंग्रामाने  विलक्षण  वेग  घेतला होता.  निदान  काहीतरी  दिशा तरी दिसत होती.  सर्व माणसे  काहीशा निर्धाराने  जीवन जगत होती. सर्वांच्या  आयुष्याला  गहन अर्थ मिळाला होता.  आयुष्याच्या  मशाली पेटल्या होत्या.

भाऊसाहेब  तेव्हा रेल्वेमध्ये  नोकरी  करत होते.  त्यांच्याबरोबर  जिथे बदली  होईल  तिथे मुलांना घेऊन  जायचे  नवीन घर थाटायचे  व बदली झाली  की पुन्हा  दुसऱ्या ठिकाणी.  एक एक वर्ष  अशीच जात होती.  त्यातून  भाऊसाहेबांचा  वेग असा  की प्रत्येक घरी  लतिका बाईंचं  एक  बाळंतपण  तरी होत होतं.  काही गेली,  काही उरली.  पण   मुकाट्याने  सर्व कष्ट  सहन करून  त्या  दिवस  काढत होत्या.  आता नात  कधी कधी म्हणते 'आजी  तू आजोबांना  काही बोलली का नाहीस ? एकटीने  सगळे  कसे सहन केलेस?'  बोलणार काय कपाळ! चावायचे दात आपलेच  आणि खायचं दातही आपलेच. बोलून कोणी ऐकणार होतं का?  ऐकायला येत असून  आलेला बहिरेपणा.  त्यातून  'तुम्हा बायकांना  काही अक्कलच नाही' असं म्हटलं  की सर्व गोष्टींचा  कसा  एका वाक्यात  समारोप होई.

बापूजींची  चले जाव  चळवळ, स्वदेशीचा प्रभाव  सगळे कसे  अगदी काल घडल्यासारखे. पुढचा मागचा विचार न करता  रेल्वे कामगारांनी  केलेला तो संप! भाऊसाहेबांनी  जेव्हा  त्या संपात  सक्रिय भाग घेतला  तेव्हा  लतिका बाईंना  अगदी  भरून आले  किती अभिमान वाटला  तेव्हा! कदाचित  पहिल्यांदाच असेल  असे  त्यांच्या  वैवाहिक आयुष्यात.  पुढे काय होणार  याची जाणीवच तेव्हा नव्हती.  देश स्वतंत्र झाला  मात्र  आपल्याला स्वातंत्र्य  काही लाभले नाही.  लतिका बाईंचे  सिंहावलोकन सुरूच होते. घरी  कधी  पोचलो  हे  त्यांच्या  लक्षातच  आले नाही.

'आजी  भूक लागली आहे,  काही  तरी खायला दे ' नातीच्या हाकेने  त्या  एकदम  भानावर आल्या .  'अग अश्विनी,  आधी कपडे तरी बदल, फ्रेश हो,  आणि मग  त्या टीव्हीसमोर  बस.  मसाला  पुऱ्यांचे  भिजवून ठेवले आहे. मस्त गरम गरम  तळून देते बघ.' 'शी तेलकट .., नको  ग  आजी,  माझे डायट  बिघडेल. खास अश्विनी ला  आवडतात  म्हणून  लतिका बाईंनी  तो  तळण्याचा  घाट  घातलेला.  पण ही हल्लीची  मुलं  उगाचच  काहीबाही बघतात, ऐकतात  आणि  कशा कशाला जुमानत नाहीत. 'ते मेल  चीज सॅंडविच  खाताना  नाही तिला तिचे डायट आठवत', सगळं मनातच. 'अगं अश्विनी  तुला आवडतात ना त्या, दोनच खा  मग हवं तर  एखाद फळ खा.' आज जरा  कमीच बोललेले बरे.   कारण  इतर वेळी  एकमेकांशी भांडतील , पण आपल्या विरुद्ध मात्र  सून आणि नात  एकत्र होऊन  काय काय ऐकायला लावतील  कोण जाणे.  

आपण अश्विनीच्या  वयाचे असताना  असे नानाविध प्रकार  कधी खायला पण मिळाले नव्हते.  पण तो सकाळचा मऊ भात,  दुपारचा वरण भात,  आणि रात्रीची खिचडी  एवढी चविष्ट लागे  की स्वर्ग गाठल्याचा आनंद होई. आणि माधवराव  त्या वयाचे असताना ...लतिका बाई  आपल्या  मुलाला 'राव' म्हणूनच संबोधत. सर्वांचा  साहेब  झाला  आहे ना तो आता. शिवाय  त्या हालाखीच्या बालपणीतून  बाहेर पडून  इतक्या मोठ्या  पदस्थानावरती  तो पोचेल असे स्वप्नात सुद्धा  कधी वाटले नव्हते.  लतिका  बाईंनी एका  डिशमध्ये  अश्विनी साठी  पुऱ्या  व आत्ताच कापलेला  आंबा  ठेवला  शिवाय  तिच्या आवडीची  केचपची बाटली. 

 'आई,  मी  ज्ञानेश्वरी  ऐकायला  जात आहे. सहा  वाजेपर्यंत नाही आले  तर  तेवढी  मेथी  चिरून  ठेवाल का  म्हणजे  आल्या आल्या  मला  भाजी  टाकता येईल. 'ठीक आहे कल्पना,  जरा येताना  माझे औषध घेऊन येशील का ?  माधवराव  विसरले काल.' लतिका बाई बोलून गेल्या. 'नको , ह्यांनाच  आणू देत.  काहीतरी चूक झाली  तर उगाचच  मला   खसाखसा   यांचे  बोलणे  ऐकून  घ्यावे लागेल.'  कल्पनाचे  उत्तर  ठरलेले.  आपण काही काम सांगितलं  तर  कल्पनाचा  अगदी तिळपापड होतो. उगाचच आपले  शब्द  वाया गेले.  ज्ञानेश्वरी  ऐकायला  आपली ही सून  दररोज दुपारी  दोन तास जाते  पण ज्ञानेश्वरी  ऐकायची वाचायची नाही  तर अनुभवायची असते. त्या पद्धतीने वागायचे असते  हे हिला  कधी कळणार कोण जाणे ? राहू दे ,  अजून  दोन  दिवस पुरेल  इतके औषध  होते  त्यांच्याकडे .  एका अर्थी   कल्पनाचे  पण बरोबर होते.  माधवराव  कधी आणि काय करण्यासाठी  एकदम चिडतील  याचा काही नेम नाही. कल्पनाने  त्यांचे  बालपण पाहिले नव्हते  नाहीतर  तिलाही  माधवरावांचा  हा विक्षिप्त स्वभाव समजला असता.  उगाचच  नाही  सर्व  धाकटी भावंड  व  लतिका  बाई   स्वतः  माधवरावांच्या  कलेने  घेत असतात.  ह्या आपल्या सुनेचे बरे आहे,  एवढा आराम  तिला मिळतोय. घरात  सर्व कामांना  माणसं  आहेत, फक्त  स्वयंपाकाला  दुसरे कोणी नकोच हा  माधवरावांचा हट्ट.  आणि त्याचाच  हिच्या नाकावर राग. जरा  स्वयंपाक घरात दोन वेळचे  जेवण  बनवायला लागले  तर काय बिघडले ? शिवाय आपण आहोतच मदतीला. मदतीला कसलं  कधीकधी  सगळं काही  आपल्यालाच करायला लागतं.  आत्ता सुद्धा  भाजी चिरून ठेवा  म्हणजे करून ठेवा, हा अर्थ  25 वर्षांनी  लतिका बाईंना  काही नवीन नव्हता. आणि  जेव्हा जेव्हा मेथी असते  तेव्हा तेव्हा  कल्पना  कधीच  सहाच्या आत घरी येत नाही.  मेथी   निवडायची  चिरायची याचा त्रास नको ना तिला.  अशाच  दिवशी  बरोबर  'ज्ञानेश्वरीच्या अमुक तमुक  पाठावरती  मृणाल बाईंबरोबर   जरा  बोलायला  थांबले आणि वाजले किती  हे लक्षातच आलं  नाही' असे साच्यातले उत्तर कल्पनाचे. मृणाल बाई नाहीत  तर  जोशी वाड्यातील  भट बाईंशी, 'माझे हे  केवढ्या मोठ्या हुद्द्यावर  आहेत ' वगैरे सांगण्यात   तिचा  वेळ  गेलेला असतो हे लतिका बाईंना  कोणी  सांगण्याची गरज नाही. अशा  कमी दिसत असलेल्या डोळ्यांना  आणि कमी ऐकू येत असलेल्या कानांना याची सवय झाली आहे. अनेक पावसाळे पाहिलेत  लतिका  बाईंनी. सासु सुनेचे  नाते  काही नवीन नाही. 

लतिका  बाईंचे  एवढेच म्हणणे की आपली मदत होते  एवढे तरी आपल्या सुनेने  जरा तोंड भरून म्हणावे, पण ह्यासाठी  सुद्धा  चांगले नशीब लागते. कधीतरी  मनुस्मृतित वाचलेले  लतिका बाईंना  उगाचच आठवले.  स्त्री  ही सदैव परावलंबी असते  बालपणी पित्यावर  नंतर बंधू  व नवऱ्यावर  व पुढे पुत्रावर! 'अग अश्विनी  तुला भूक लागली होती ना,   पुऱ्या नकोत  तर  आंबा तरी खायचा ' 'आजी किती वेळा सांगितलं तुला,  मला आंबा उष्ण पडतो . शिवाय जेवताना असेलच पुन्हा आमरस ! इतक्या वेळा खाल्लं दिवसातून  तर  माझ्या चेहऱ्यावर उठेल ना! मी ना  जरा वृषालीकडे जाऊन येते. तिच्याकडून  मला काही पुस्तकं हवी आहेत.' बोलत बोलत  अश्विनी  तिच्या स्कुटीची चावी घेऊन  झरझर निघून पण गेली. जरा पाय टिकत नाही हिचा घरात.  हिची स्कुटी  म्हणजे  पायाला लावलेली  चाकं  जणू.  तिच्या सोळा वर्षाच्या वाढदिवसाला माधवरावांनी घेऊन दिलेली. आजच्या या मुलांचे  किती बरे आहे  आई वडील त्यांना  सर्व काही देतात.  माधव रावांना   लहानपणी  एकेकाळी एक वेळ चे जेवण पण कधी कधी मिळणे  कठीण  व्हायचे. भाऊसाहेब  तुरुंगात असताना  काही  रात्री  फक्त  भाताच्या  पेजेवर निभावल्या होत्या. आपल्या नातीला मात्र  लहानपणापासून  अगदी  दिल्लीचा  बासमती  तांदुळाचा  भात मिळालेला. 'अरे  बंदिनी ची वेळ झाली वाटते,  टीव्ही  लावायला हवा .' स्वतःशीच बोलत लतिका बाईंनी  अश्विनीची  डिश  भरकन  मोरीत ठेवली. खरंतर  हातासरशी  पटकन   विसळून  टाकण्याची  सवय त्यांची . आज मात्र त्यांनी ठरवलं  की त्या घरातल्या  सुलोचना बाईसाठी ठेवावी. 'त्या सुलोचनाबाईंना  तुम्ही  उगीचच  डोक्यावर चढवून ठेवले आहे.  त्यांचे काम  तुम्ही का करत बसता' आपल्या सुनेचे  शब्द  त्यांना  आठवले . 

आपल्या  नेटक्या साडीच्या  पदराला हात पुसत   लतिका बाई  टीव्हीच्या खोलीत गेल्या.  सुरुवातीच्या जाहिराती  व पूर्वार्ध  दाखवून झालेला होता. 'बरं झालं  अगदी वेळेवर आले' बंदिनी बघता बघता  संध्याकाळचे  पाच कधी वाजले  त्यांना कळलेच नाही.  वृषालीकडे  थोड्या वेळासाठी  गेलेली अश्विनी  अजून आली नव्हती.   सुनेला  यायला  पण  कमीत कमी  एक तास तरी होता. आणि सुने पाठोपाठ  माधव राव   येतील.  त्यांना  आल्या आल्या  तासाभरात  जेवण लागे.  मधुमेहामुळे  त्यांना अधे मध्ये  काही  खाता  येत नसे. सकाळी  एक पोळी भाजी खाल्ल्यावर  डब्यात पण  तीच भाजी  ते घेऊन जायचे. पुष्कळ वेळा  खाण्यासाठी पण  त्यांना  वेळ  नसायचा.  एकदा कामात गुंतले  की तहानभूकच  हरवून बसायचे जणू. 'चला मेथी चिरायला घ्यावी' असे स्वतःशीच म्हणत  लतिका बाई  स्वयंपाक घरात  आल्या.  मगासच्या  पुर्‍यांची कढई  आणि  भिजलेला तो कणकेचा गोळा  तिथे तसाच होता. 

त्यांच्या मनात  आले,  कल्पना तर  इतक्यात येणार नाही. म्हणजे  मेथी  नुसती  चिरून नव्हे  तर  तिची भाजी करणे  तर आलेच, आणखी उशीर होणार असेल  तर कणीक पण भिजवून ठेवायला लागणार मग या आपल्या सुनबाई  घरी आल्यावर  जोरजोरात  पोळपाट लाटणे   आपटत पोळ्या  लाटणार . आता  भविष्यातले चित्र  लतिका बाईंच्या  डोळ्यासमोर आले. त्यांना माहित होते  की माधवरावांना  हे अजिबात  आवडत नाही  पण  कल्पनाला काही बोलू शकत नसल्यामुळे ते ऑफिसमधचा  राग त्या नुकत्याच आलेल्या  अश्विनीवर काढणार,   उगाचच  शब्दांशी  शब्द   वाढणार,  मग  काय  आपलीच आतून घुसमट. कोणाला  आणि काय बोलायचं प्रत्येक जण  आपापल्या मतांवर  एकदम पक्के. त्या ऐवजी  आपण जर  मेथीची आमटी  बनवली तर ... अगदी माधव रावांना  लहानपणी आवडायची तशीच. सोबत मसाला पुरी  आणि कैरीचे लोणचे! आंबा आहेच  आणि कल्पनाने  ताक ठेवलेले असेलच फ्रीजमध्ये. एकदम  फक्कड  बेत .  लतिका बाई  स्वतःशीच खुश होऊन कामात  मग्न  झाल्या . 

आज  सर्वांच्या आधी  माधवरावच  आले. मुलाच्या गाडीचा,  वॉचमनने  बंगल्याचा  दरवाजा उघडल्याचा  आवाज काही  लतिका बाईंना  कामाच्या नादात  नाही आला. पण खालती  खणखणीत आवाजात  माधवरावांनी  जेव्हा  वॉचमनला  काही सूचना दिल्या तेव्हा  त्यांच्या पटकन लक्षात आले. घरात येताच,  मेथीच्या आमटीच्या वासाने  माधवरावांचे पाय  आपसूक स्वयंपाक घराकडे  वळले. 'हे काय  तू एकटीच? कल्पना, अश्विनी  कुठे गेले सगळे ? आहोत  का  आपण एकटेच?  घरात एवढी माणसं असताना,  नोकरचाकर असताना, आपण एकटेच ? छे छे  शक्यच नाही! आहेतकी माझ्याबरोबर,  माझ्या भूतकाळातल्या आठवणी, भविष्यातले कल्पनाविष्कार! आणि तो आपला टीव्ही. हे स्वयंपाक घरातले सामान,  बाहेरची  फुलं झाड,  सगळे गप्पा मारतात की माझ्याशी. असं सगळं सांगावसं वाटलं त्यांना माधवरावांना.

पण शब्द  मनातच राहिले.  कारण माधवराव  जेवणाच्या उद्दिष्टाने  खुर्चीवर बसले देखील.  मग काय  गरम गरम पुऱ्या आणि  आमटी घेऊन  त्यांनी दोघांची  पाने वाढली . माधवरावांबरोबर  आपले पण ताट घेतले. अशा क्षणांसाठी तर आहे हे उत्तर जीवन.  समजायचं ते सगळं समजल्या  लतिका बाई.  आपल्या मुलाने  जरी शब्दात व्यक्त केले नसले  तरी  आपल्या आजच्या जेवणाचा बेत  त्याला अतिशय आवडलाय  हे कळलं त्यांना.  एकमेकांच्या कष्टांची  जाणीव  न बोलताच  उमगली दोघांना.

Manisha Godbole
Manisha Godbole

Comments


bottom of page