top of page

संपादकीय

नमस्कार मंडळी, 

संवादचा यावर्षीचा शेवटचा आणि एकूण आठवा अंक सादर करताना आनंद होतोय. 2023 च्या शेवटी conceive केलेलं हे बाळ तग धरून आहे आणि हळूहळू बाळसं धरतय असं म्हणायला हरकत नाही.

2025 हे वर्ष त्रिवेणीसाठी eventful ठरलं. वर्षाच्या शेवटच्या अंकाच्या निमित्ताने 2025 चा आढावा घेण्याचा प्रयत्न करतोय. याव्यतिरिक्त, 2024 आणि 2025 ही दोन वर्ष वैयक्तिकरित्या माझ्यासाठी अतिशय समाधानाची राहिली. काही बदल घडवून आणता आले. ते पुढे चालू राहतील, वाढतील आणि आपल्या परंपरेप्रमाणे त्रिवेणी नवीन कल्पनांना प्रोत्साहन देत राहील अशी खात्री वाटते. 

2024 च्या कमिटीने आपल्या संस्कृती संस्कार आणि सुविचार या पायाभूत मूल्यांच्या बरोबरीने दायित्व, सहभाग आणि स्वास्थ्य या तत्वांचा समावेश आपल्या कामकाजात करण्याचा संकल्प केला. 2025 च्या कमिटीने हे पुढे चालवण्याचा निर्णय घेतला. या तीन तत्त्वांना अनुसरून काही उपक्रम आणि कार्यक्रम आपण राबवले. 

गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या स्थानीय ‘कलासन्मान’ या संस्थेबरोबर आपण पहिल्यांदाच एक संयुक्त कार्यक्रम सादर केला. कलासन्मानच्या अफाट कलाकारांनी 'शांतेचं कार्ट चालू आहे' या अतिशय गाजलेल्या नाटकाचा एक अविस्मरणीय असा प्रयोग आपल्यासाठी केला. 

या बरोबरीनेच पाडव्याच्या कार्यक्रमाचे संपूर्ण भोजनाचे आयोजन आपल्या स्वयंसेवकांनी केले. 

2024 च्या दिवाळीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण Rachana Society for Social Reconstruction या पुण्यातल्या संस्थेसाठी fundraising केले होते. हे फंड्स रचना सोसायटीकडे पाठवणे हा एक छोटासा प्रोजेक्टच ठरला. परंतु यातून बरच काही शिकायलाही मिळालं. Finally, 2025 च्या जून मध्ये आपण हे फंड्स रचना सोसायटीला पाठवले. 2025 च्या दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्ताने केलेल्या fundraiser ला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. 2024 प्रमाणेच यावर्षी सुद्धा हे फंड्स आपण रचना सोसायटीला Association for Indias Development (AID) या संस्थेमार्फत पाठवणार आहोत. सांगायला आनंद होतो की त्रिवेणीच्या फंडिंगमुळे रचना सोसायटी तिथल्या विद्यार्थिनींसाठी कम्प्युटर शिक्षणाचे उपक्रम राबवू शकत आहे.

जून महिन्यात Cleveland येथे झालेल्या BMM मैत्र मेळाव्यात (Regional) त्रिवेणीच्या अतिशय उत्साही सहभागाचे खूपच कौतुक झाले. आपण सादर केलेल्या कार्यक्रमाचा दर्जा ही अतिशय उच्च होता. तिथे सादर केलेल्या द. मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित 'निरोप' या एकांकिकेचे दोन प्रयोग आपण सिनसिनाटीत केले. या दोन्ही shows ना भरघोस प्रतिसाद मिळाला. 

वर्षातील इतर महत्वाचे सांस्कृतिक कार्यक्रम - संक्रांत, गणेश उत्सव, स्वरसंध्या आणि दिवाळी हे सुद्धा अतिशय दर्जेदार होते आणि ह्या सगळ्याच कार्यक्रसमांना मोठ्या संख्येनी उपस्थिती राहिली.

कलासन्मान, AID ह्या संस्थांच्या बरोबरीनेच आपण Red Sarees या संस्थेबरोबर सुद्धा सहयोग केला. Red Sarees च्या मदतीने आपण 'Heart Health for South Asians' या विषयावर सेमिनार आयोजित केला. ही partnership 2026 मध्ये सुरु ठेवून स्वास्थ्याशी संबंधित विषयांवर seminars आयोजित करण्याचा प्रयत्न राहील.

मराठी शाळॆत High School मधील विद्यार्थ्यांना कसे समाविष्ट करून घेता येईल आणि त्याचा विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीमध्ये कसा लाभ होईल ह्या वर शाळा आणि कार्यकारी तसेच सल्लागार समिती मध्ये विचार विनिमय झाला. त्याची पुढची पायरी म्हणून Mason High School च्या पदाधिकाऱ्यांना भेटलो. मराठी हा विषय घेऊन foreign language क्रेडिट मिळण्यासाठी काय करता येईल ह्या वर उपयुक्त सल्ला मिळाला आहे. शाळा टीम ह्यावर काम करत आहे आणि आशा आहे की पुढील 1-2 वर्षात आपल्या विद्यार्थ्यांना ह्याचा लाभ होऊ शकेल. 

आपल्या मराठी शाळेच्या 15 विद्यार्थ्यांनी BMM च्या 2री आणि 3री च्या परीक्षा उत्तीर्ण होऊन BMM certificates मिळवली. हे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!

योजलेल्या सगळ्याच कल्पना किंवा कार्यक्रम राबवता आले असं नाही. मागील 2 वर्षे आपण सादर केलेला अतिशय मनोरंजक असा Home Minister, तसेच खास महिलांसाठी असणारा कोजागिरीचा कार्यक्रम हे ह्या वर्षी होऊ शकले नाहीत. वर्षभर योजलेल्या भरगच्च कार्यक्रमांच्या मध्ये सोयीस्कर तारखांचा अभाव हे मुख्य कारण राहिले. 

सुरुवात होऊनही फार प्रगती न होऊ शकलेला एक उपक्रम म्हणजे PVSA volunteering program. त्रिवेणीतल्या तरुण शाळकरी सभासदांना आपल्या कामकाजात सहभागी करून घेणं आणि त्यांना volunteering ची संधी उपलब्ध करून देणं हा ह्या मागचा मुख्य उद्देश होता. परंतु PVSA हा मूळ उपक्रमच बंद पडल्यामुळे आपली ही संकल्पना पुढे नेण्यात अडचणी आल्या.

आता थोडेसे वैयक्तिक...

2023 पूर्वी त्रिवेणीशी माझा वैयक्तिक संबंध तसा दुरूनच राहिला. नयना (सहस्रबुद्धे) अनेक भूमिकांमध्ये त्रिवेणीत कार्यरत होती - कमिटी सभासद, अध्यक्ष, BMM representative आणि बरेच वेळा फक्त स्वयंसेवक म्हणून. माझा संबंध त्या अनुषंगानेच. अपघातानेच 2024 च्या कमिटीवर आलो आणि गेली 2 वर्ष मनात असलेल्या काही कल्पना साकार करण्याची संधी मिळाली. संवाद त्रैमासिक, स्वास्थ्याशी संबंधित कार्यक्रम, सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम राबवता आले. काही कल्पना त्रिवेणी साठी नवीन होत्या आणि कार्यकारी, सल्लागार समिती तसेच सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागामुळेच शक्य होऊ शकल्या. ही 2 वर्ष धकाधकीची होती पण अतिशय समाधानाची सुद्धा होती. अनेकांशी जवळून काम करण्याची संधी मिळाली आणि खूप शिकायला सुद्धा. 

भोवतालच्या बदलत्या परिस्थितीची जाणीव, सामाजिक संवेदना, सांस्कृतिक वारसा जोपासत त्रिवेणी ची उत्तरोत्तर प्रगती होईल आणि मराठी समाजाला जवळ आणण्याचे उद्दिष्ट अधिकाधिक साध्य करत राहील अशी सदिच्छा !

करायला खूप काही आहे आणि आगामी वर्षात नवीन कमिटी त्या दिशेनी काम पुढे नेईल ह्याची खात्री वाटते. 2026 च्या कमिटीला शुभेच्छा!

आपल्या सर्व सभासदांना नव-वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

राजेश सहस्रबुद्धे


राजेश सहस्रबुद्धे
राजेश सहस्रबुद्धे


Comments


bottom of page