विभ्रम…. माझ्या मनाचे
- पराग कानविंदे

- Dec 31, 2025
- 1 min read
तक्रार
(गज़ल)
सुख दिले फसवे पुन्हां दुःखे कशाला?
जाळिसी दुनिये मना अख्खे कशाला?
नाही हा माझ्यावरी विश्वास माझा
भासती अदमास हे पक्के कशाला?
मी जरी तैय्यार होतो दोष सहण्या
मारिले मुख दाबुनी बुक्के कशाला?
सागरी तुम्हीच होता मी किनारा एकटा
हाय लाटांनी दिले धक्के कशाला?
झाकली तक्रार मी माझ्या वधाची
झोडिले श्राद्धां तुम्ही पुख्खे कशाला?
झेलला पाठीत मी खंजीर तुमचा
म्हणवितां सुहृदांतले सख्खे कशाला?
गांधारी
(चारोळी)
आसमंतातला अंधार
दिवाळी दूर सारते…
अंतरंगातल्याला ….
गांधारीचीच पट्टी लागते.....
श्रावण
(चारोळी)
“श्रावण” म्हणजे नुसती अल्लड कविताच नसतो
मानसी हर्ष आणि ऊनपावसाचा लपंडावच नसतो
श्रावण म्हणजे “कावडी”ची आठवण असावी लागते
हृदयातल्या बाणाच्या शल्यामागून डोकावणारी
आईबापाच्या वृद्ध तहानेची जाणीव असावी लागते





Comments