रील्स व शॉर्ट्सची सफर
- 5 days ago
- 3 min read

गोडखाऊ आजोबा
जून २१ ला फादर्स डे झाला म्ह्णून ही रील. ह्या आजोबांविषयी त्यांच्या डॉक्टर नातवाने टाकलेली पोस्ट. आपल्या प्रत्येकाच्या घरात “असे” गोडखाऊ वडीलमंडळी नक्कीच असतीलच. आजोबा तर होच. माझ्याही घरात होते आणि आहेत. ह्या आजोबांना बघून प्रचंड प्रमाणात आणि अतिशय आवडीने गोड पदार्थ खाणारे माझे बाबा आणि आजोबा आठवले.
ही आजोबा मंडळी ह्या वयात अगदी लहान मुलासारखे वागतात म्हणूनच ती इतकी क्यूट वाटतात. अति-गोड खाणं कितीही चुकीचं असलं तरी, आता ह्या वयात त्यांना “नका खाऊ” म्हणून काय मिळणार? उरलेल्या जीवनात त्यांना त्यांचं आणि त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यावं आणि आनंदी ठेवावं.
नकळत पोटावरून हात फिरवून “दे ना” असं मागणारे आजोबा आणि प्रत्येक वेळी हातात गोड आईस्क्रिम किंवा चॉकलेट मिळाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद त्यांच्या नातवाने छान टिपलाय.
सातारचे मान्याची वाडी - स्वच्छ व स्वावलंबी गाव
https://www.instagram.com/reel/DYb1JxHx0hH/?igsh=MWpzd2VsdHoyNXRlYQ==

Sidiously ह्या नावाने इन्स्टा अकाउंट चालवणारा मुलगा - सिद्धेश लोकरे हा आपल्याला महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावोगावी घेऊन जातो, तिकडच्या शाळा आणि शिक्षण पद्धती दाखवतो. त्याच्या शाळांच्या रीलबद्दल नंतर कधीतरी लिहीन, तो एक वेगळा मोठा रोचक विषय आहे.
आपल्या आजूबाजूचे स्वच्छतेचे म्हणा किंवा इतर विकासाविषयी अनेक प्रश्न सगळ्यांना पडत असतात, सगळ्यांना त्यावर काहीतरी केलं पाहिजे असंही वाटत असतं. पण जबाबदारी कुणी घ्यायची, किंवा मीच का घ्यावी हा ठरलेला प्रश्न. आणि जबाबदारी घ्यायची वेळ आलीच तर दुसरी कारणं देऊन पळ काढणे ही सामान्य माणसाची मनोवृत्ती दिसून येते. प्रत्येक प्रश्नाचे सरकारने उत्तर द्यावं आणि त्यावर उपाययोजना करावी, असाही कायम विचार व्यक्त होतो. पण सरकार म्हणजे शेवटी कोण? आपणच आपल्यातले निवडून दिलेले काही निवडक. ह्याचा अर्थ आपली जबाबदारी संपली असं होत नाही.
त्याच्या रिल्समार्फत मिळालेल्या माहितीतून महाराष्ट्रातल्या गावांमधले अनेक वास्तव प्रश्न समोर दिसतात, पण त्याच बरोबर गावकर्यांनी त्यावर काढलेले तोडगेही (solutions) दिसतात. सातारच्या मान्याची वाडी हे ह्याचं उत्तम उदाहरण. ह्याबरोबर फिफा मधल्या जपानी प्रेक्षकांचे एक रील मी मुद्दाम इथे देत आहे. कारण विषय तोच - स्व-जबाबदारी. ह्या रिलमध्ये फुटबाँल गेम बघून झाल्यावर जपानी प्रेक्षक स्वतःहून स्टेडियम मधला कचरा गोळा करत आहेत. जपानी संस्कृतीचे आपण सर्वजण कौतुक करतो, पण आपण ते आचरणात आणतो का?

सासुरवास
शिक्षण-नोकरीकामाच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याऱ्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे नवऱ्याचे आईवडील किंवा इतर नातेसंबंधातले आढेवेढे हे सध्या दूरच. शिवाय शहरात वाढलेल्या मुला -मुलींना तर मुलगी सासरी जाणे आणि सासुरवास भोगायला लागणे हे अगम्यच वाटू शकतं. जरी सीरिअल्स आणि सिनेमे ह्याचं थोड्याफार प्रमाणात प्रदर्शन करत असले तरी. ह्या रील मधली आजी वयाने ७५-८० वयाची असावी. मुलगी लग्न करून सासरी आली म्हणून घरकामाला एक फुकट बाई मिळाली, अशा विचारांच्या कुटुंबातल्या खेडेगावात ती आजी लग्न करून संसार केलेली असावी. तिला तिची सासू कशी वागवायची, हे विचारल्यावरचं तिचं उत्तर खूप मनाला त्रास करणार आहे. तुझी सासू अशी का वागायची? असा प्रश्न तिला विचारल्यावर त्यावरचं आजीचे एकदम गंमतशीर उत्तर होतं “ काही नाही - मस्त्या”!! मला तो शब्द आणि त्या आजीचा तिच्या बोलीभाषेतील लहेजा खूप भावला.
मात्र, तिला जे भोगायला लागलं ते तिने तिच्या सुनेला भोगू दिलं नसावं, अशी उगीच आशा मनाला लागून राहिली.
Good Enough Parent
डॉ. भूषण शुक्ल हे Child and Adolescent Psychiatrist and parenting coach आहेत. २०१० च्या सुमारास त्यांचा मुलांसाठीचा “गुड टच बॅड टच” हा व्हिडीओ प्रसिद्ध झाला होता. तोच तसाच्या तसा आमिर खानने त्याच्या “सत्यमेव जयते” ह्या कार्यक्रमातील sexual abuse ह्या विषयावरच्या भागात स्वतः सादर केला होता. तिथून डॉ. शुक्ल ह्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. तेंव्हाचा त्यांचा ब्लॉग वाचनीय होताच आणि आत्ताच्या फेसबुकवरच्या पोस्ट्स व त्यातील अनुभव खूप इंटरेस्टिंग असतात. गेल्या २-३ वर्षात अमूक-तमूक ह्या youtube चॅनेल वरच्या त्यांच्या मुलाखतीमुळे आपल्यापैकी बहुतेकांना ते ठाऊक असावेत. त्यांच्या Parent Academy ह्या संस्थेद्वारे अनेक workshops होत असतात. तसंच २ एक वर्षांपूर्वी त्यांनी व आणि प्रसाद शिरगावकर ह्यांनी Parent Academy नावाचं youtube चॅनेल तयार केलं आणि त्यावरचे प्रत्येक व्हिडीओ हे पालकांसाठी उत्तम माहितीचा स्रोत आहेत. Advanced Technology च्या काळात मुलांच्या भावविश्वात डोकावून मुलांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं आणि त्यात विभक्त कुटुंब असल्याने पूर्वी असणारी सपोर्ट सिस्टम आता बदलली जात असताना सर्व अडचणीतून पालकत्व निभावणं हे सोप्पं काम नाही खरतर. त्यात डॉ. शुक्ल ह्यासारखे डॉक्टर ज्या पद्धतीने पालकांचे आणि मुलांचे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सांगतात ते मोलाची देणगी आहेत. आणि हे फक्त आईसाठी नसून आई, वडील आणि त्यांचे आईवडील सर्वांसाठी आहेत.
तर ह्या व्हिडिओमध्ये त्यांनी डॉ. डोनाल्ड विंनीकॉट बद्दल सांगून त्याच्या good enough parent ह्या थिअरीबद्दल सांगितलं आहे. आपण सर्वच पालक कायमच खूप बिझी असतो, पण त्यात वेळात वेळ काढून हे व्हिडीओ जरूर बघा, ह्यातून तुम्हाला फायदा जरूर होईल.




Comments