रील्स व शॉर्ट्सची सफर
- धनलक्ष्मी कुलकर्णी

- Jun 30
- 2 min read

देशपांडे ह्यांचे पंढरपुरी पेढे
फेसबुक वरच्या 'मुंबई स्वयंपाकघर' या ग्रुप मधल्या काही मैत्रिणींनी पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने पंढरपूरची माहिती देण्याचा एक उपक्रम चालू केलाय. त्यातल्या शुभांगी जोशी ह्यांची ह्या विषयावरची काही रील्स आहेत, वेळ मिळाल्यास जरूर बघा.
तर पंढरपुरी चुडा, पंढरपुरी विडा आणि देशपांडे ह्यांच्या पंढरपुरी पेढ्यांबद्दल ह्यात माहिती सांगितली आहे. थोडक्यात व उत्तम माहितीचं सादरीकरण.
माझ्या लहानपणी मी पंढरपूरची वारी एकदा केली होती आणि पंढरपुरला भेट दिली होती. त्यानंतर पंढरपूरला जायचा कधीच योग आला नाही. माझ्यासारख्या मुंबई-पुणेत राहणाऱ्या किंवा पंढरपूर पासून दूर राहणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.
शुभांगी जोशी ह्या स्वतः पंढरपूरच्या स्थानिक आहेत. अगदी पेढ्यांप्रमाणेच शुभांगी जोशी यांचा गोड आवाज आणि उत्तम मराठी ऐकल्यानंतर ताबडतोब उठून पंढरपूरला जावसं वाटलं.

चुलीवरच्या स्वयंपाकाला चव नसते
तुमच्या रिलला भरपूर व्युज मिळवायचे असतील तर त्याला तसंच खुसखुशीत व आकर्षित टायटल असावं लागतं, जे ह्या रिलला आहे. "चुलीवरच्या स्वयंपाकाला चव नसते". ह्या टायटलमुळे व्युज भरपूर मिळालेच शिवाय चर्चाही भरपूर झाली. अनेकांनी सायली राजाध्यक्ष यांना ट्रोल केलेलं आहे. प्रत्यक्षात सायली राजाध्यक्ष ह्यांचं म्हणणं असं आहे की चुलीवर भांडे ठेवून त्यात शिजवलेल्या पदार्थाला वेगळी चव नसते आणि ह्यात तथ्य आहे. त्याच व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटल्याप्रमाणे, जर चुलीवर एखादी भाजी/फळ भाजत असेल उदा : कैरी किंवा वांगी किंवा भाकरी तर त्याची चव त्या पदार्थांना येणार आहे, पण चुलीवर भांडे ठेवून शिजवलेल्या पदार्थांमध्ये चुलीचा वास शिरणार नाहीये.
मला चुलीवरच्या स्वयंपाकाकडे एक अनुभव म्हणून बघावसं वाटतं. त्यात नॉस्टॅल्जिया हा भाग जास्त आहे लहानपणीच्या गावाकडची आठवण करून देणारा हा अनुभव. कधीतरी करायला तसा सोपा प्रकार, पण रोज रोज करायला सहाजिकच अवघड. अमेरिकेत बार्बीक्यू करतात तसलाच हा प्रकार. वेदर छान असताना सगळे जमलेले असताना, एकत्र खाण्याची मजा घेताना चुलीवर स्वयंपाक केला की नॉस्टॅल्जिया अनुभवता येतो.

मला लोक घाबरून असतात
मला अनिता दाते कलाकार म्हणून आवडते, तिचं काम आवडतं. मी तिला पर्सनली ओळखत नाही. आणि मी पूर्ण interview बघितलेला नाही. हे निरीक्षण तिने व्हिडिओत जे म्हटलंय त्या स्वभावाविषयी.
तर ह्या रीलमध्ये तिने स्वतःबद्दल असं म्हटलं आहे की "मी मूहफट आहे, मी कुणाला काहीही बोलू शकते, मी अशीच आहे. मला त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरून असतात आणि जे मला आवडतं".
अशा व्यक्तींच्या बाबतीतला माझा अनुभवावरून अशा व्यक्तींच्या बाबतचं माझा निरीक्षण असं की स्वतःची अशी लख्ख ओळख जपत ठेवण्यामागे कदाचित "माझं आत्तापर्यंत काही अडलं नाही, ह्यापुढेही काही अडत नाही" ही विचारधारणा असते. शिवाय अशा व्यक्तींमध्ये त्यांच्या नशीबाने काहीतरी अंगभूत चांगले गूण असतातच, तिथून हा आत्मविश्वास येत असावा. पण त्यांच्या जवळची व आजूबाजूची माणसं बऱ्याचदा नाईलाजास्तव किंवा क्वचित स्वार्थीपणे ह्या अशा व्यक्तींना एकतर स्वीकारतात किंवा सोडून देतात, म्हणून ह्या स्वभावाला खाद्य मिळतं आणि अशा व्यक्तींचं फावतं.
स्वतःच्या अशा तुसड्या स्वभावात जराही बदल न करता स्व-आनंदात वावरणारी माणसं दिसतात, तेंव्हा प्रश्न पडतो - दुसर्यांना धाकात ठेवणे, कुणाला काहीही बोलून त्रास देणे, विचार न करता बोलून जवळच्यांच्या भावना दुखावणे ह्यात कसला आनंद?
आणि आपल्या आजूबाजूचे लोक घाबरून असतात हा गैरसमज आहे. शब्दाला शब्द न वाढवता सबुरीने व शांततेने घेणारी माणसं कमकुवत निश्चितच नसतात.





Comments