top of page

गझल , दुःख आणि बरेच काही...!

  • 6 days ago
  • 6 min read

ख़वातीन-ओ-हज़रात तुमचे परत एकदा स्वागत आणि तुम्हाला मनापासून नमस्कार!!

 

आत्तापर्यंत आपण गझलेच्या या प्रवासामध्ये 'गझल' या साहित्य प्रकाराबाबत थोडी जुजबी माहिती मिळवली. आपण गालिब आणि खुसरोच्या काही काव्यकृती बघितल्या. या नंतर माझा विचार होता की खुसरोनंतरचा मोठा कवी ‘मीर तकी मीर' याच्याबद्दल लिहावे. पण मी विचार बदलला. यावेळी “गझल म्हणजे नक्की काय? हे नाव म्हणजे काय?” याबद्दल काहीतरी लिहावेसे वाटले आणि कुठलिही कला मानवाच्या उत्क्रांतीशी कशी संबंधित आहे (आणि त्याला गझलही अपवाद नाही) - याबद्दलही थोडे मत मांडणार आहे. आणि, हो! अनेक सुंदर शेरही उदाहरणादाखल आपण वाचूच.

 

आपल्या सगळ्यांना मानवी उत्क्रांती माहीत आहे. आणि डार्विनचा ‘नैसर्गिक निवड' (Natural Selection) हा प्रसिद्ध सिद्धांतही माहीत आहे. त्यावरूनच पुढे - “survival of the fittest” - हा वाक्यांक्ष बनला आहे. असो…!

पण मग गझल आणि त्या सिद्धांताचा काय संबंध? - असा विचार आला असेल मनात, तर ते योग्यच आहे. मग त्यासाठी 'गझल' हा शब्द म्हणजे काय ते पाहूया!


तर गझल शब्दाचे ओळखीचे असे २ अर्थ आहेत.


पहिला आहे… स्त्रियांशी संवाद करण्याची खुबी.


आणि दुसरा आहे (जो मला जास्त योग्य वाटतो) तो असा की... एक मादी हरिण जंगलामध्ये हिंस्त्र जनावरांच्या टोळीने वेढली आहे. तिला कळून चुकले आहे की आता आपला अंत जवळ आलाय. त्यावेळी तिचे जे करुण रुदन आहे - त्या दुःखी स्वराला गझल म्हणतात. आणि कदाचित म्हणूनच दुःख,अश्रू आणि वेदना या गोष्टी गझलांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात.

जरी आपल्या सगळ्यांना हलके फुलके वाचायला आवडते; आनंदयात्री बनावेसे वाटते. तरीही जे सुदृढ साहित्य आहे ते आपण आपलेसे करतोच…नाही का? कधी भेदभाव नाही करत की अमुक कथा शोकांतिका आहे किंवा तमुक लेख विनोदी आहे म्हणून.

 

॥ जें जें उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते ॥

 

दुःख…ही भावना...जरी नकोशी असली तरी तीच आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. ती वैश्विक आहे आणि कालातीतही आहे.


कुठलही दर्जेदार साहित्य पहा...शेक्सपिअरचे हॅमलेट, मॅकबेथ...शिरवाडकरांचे नटसम्राट...तेंडुलकरांचे घाशीराम…अनेक उदाहरणे आहेत, जिथे दुःख लेखकाने अप्रतिमपणे मांडले आहे आणि रसिकांनी त्याला भरभरून प्रेम दिले आहे. इतकेच काय...मला वाटतं की महाभारतही एक शोकांतिकाच आहे. (धर्मयुध्द जिंकल्यावरही अर्जुनाच्या अथवा द्रौपदीच्या नजरेतून पाहिले की अंततः ते महाकाव्य शोकांतिकेसारखं भासतं) ...तर असो…!


तर डार्विन म्हणतो की प्राण्यांच्या २ अतिमूळ नितांत गरजा आहेत. एक आहे - ‘सुरक्षितपणे जिवंत राहणे (survival)’ आणि दुसरी आहे - ‘पुढली पिढी निर्माण करणे (reproduction)’.

आजच्या काळातील कुठलीही गोष्ट...कोणतीही वस्तू...आजचे महाग corporate प्रॉडक्ट्स…इतकेच काय…आपल्या भावना…आपली आकर्षणे...आपले सोबती…कुठे ना कुठे…या दोन मूळ गरजांशी बांधलेले आहे. एक गंमतशीर उदाहरण म्हणजे…आपल्याला स्निग्ध (चरबी असलेले) किंवा गोड पदार्थ खायला आवडतात. लाखो वर्षापूर्वी मानवाला आढळले की ते खाल्ल्याने जास्त एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीचा वापर टिकून राहायला (survival) होतो. त्याचा परिणाम पिढ्यांपिढ्यातून आपल्यावर झाला आणि हळू हळू आपली चव adjust झाली. तसेच विचार करून मानवी मेंदू आकाराने मोठा झाला. इतरही प्राण्यांमध्ये बदल घडला...जसे की जिराफाची मान लांब झाली...इत्यादी इत्यादी. अश्मयुग (stone age) काळापासून मानवाने अशा शेकडो सवयी घडवल्या आणि तो त्या पुढील पिढ्यांना देत राहिला.

जर एखादयाला भिती वाटते आहे कशाची, तर त्या भितीचाही मूळ संबंध आपल्या तग धरून राहण्याच्या (survival) तत्वाशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ - आपल्याला अग्नीची भीती वाटते (कारण कधीतरी हात पोळला असतो) - पण त्या भितीमुळे आपल्या अति-पूर्वजांनी काळजी घेतली, ते आगीपासून दूर राहिले आणि म्हणून मानवजात टिकली. हे एक उदाहरण. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

तर जसे भिती ही एक भावना आहे…दुःखही एक तशीच भावना आहे. उत्क्रांती मानशास्त्राप्रमाणे दुःखाचाही संबंध आपल्या तग धरून राहण्याशी आहे. म्हणूनच दुःख काही निरुपयोगी नाही (तसेही निसर्गाने दिलेली गोष्ट निरुपयोगी कशी असणार?). दुःख वाटल्यावर मनुष्य, काही काळानंतर, आपल्याला परत त्या स्थितीतून जावे लागणार नाही याची काळजी घेतो. शिवाय आजूबाजूचा समाजही त्या दुःखी व्यक्तीला सांभाळून घेतो - यामुळेही आपण टिकले गेलो आहोत.

उत्क्रांती (Evolution) मानवी जीवशास्त्राची रचना आनंदासाठी सर्वोत्तम बनवत नाही; तर ती जगणे (survival) आणि प्रजनन (reproduction) यांसाठी सर्वोत्तम बनवते. उत्क्रांतीवादी मानसशास्त्रानुसार - मानसिक वेदना, या शारीरिक वेदनांप्रमाणेच, एक प्रकारचा “इशारा देणाऱ्या" असतात. त्या आपल्याला सांगतात की काहीतरी बिघडले आहे आणि त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सुखाची मात्र एक गंमत आहे, माणूस सगळ्यांबरोबर सुख साजरे करू शकतो. पण दुःख मात्र तो स्वतःजवळ ठेवतो. जर त्याला सुरक्षित वाटले नाही, तर तो दुःख पटकन कोणाकडे जाहीर करत नाही. यामागेही लाखों वर्षांपासून जमलेली आपली मानसिकता आहे. जिथे मनुष्याला safe नाही वाटत, तिथे तो गोष्टी share न करता स्वतःकडेच ठेवतो. (इथे परत डार्विन सिद्धांताची पहिली मूळ गरज दिसून येते - 'सुरक्षितता').


आणि अशा मनःस्थितीमध्ये काव्य, शायरी, संगीत इत्यादी कला आपल्याला सहारा देतात. जर एखादया साहित्यिक कृतीमध्ये लोकांना स्वतःच्या दुःखाचे प्रतिबिंब जाणवले, तर ती नक्की लोकप्रिय होते.

जेंव्हा कोणी जगजित गातो - 'ये कागज की कश्ती, ये बारिश का पानी', ते ऐकून अचानक चार लोकांमध्येही हळूच कोणाचे डोळे पाणावतात. कारण ते गाणं कुठेतरी आत एक 'तार' छेडतं आणि जो protective guard आपण बनवलेला असतो (आपल्याच सुरक्षिततेसाठी), तो कुठेतरी निखळतो. कधी कुणाला आपले गाव आणि आपला देश आठवून अश्रू येतात, जेंव्हा 'चिठ्ठी आयी है' ऐकू येते. अर्थात प्रत्येकासाठी त्याचे 'ते' गाणं, 'ती' शायरी आणि 'तो' सूर वेगळा असू शकतो. जो सक्षम लेखक असतो, ज्याला उमदा लिहिता येते, जो 'ती' तार झंकारतो - त्याला मग रसिक आपलसं करतो. नाही का? काव्यशास्त्राचाही हाच निष्कर्ष आहे.


तर आता आपल्याला माहित असलेल्या काही शायरांनी त्यांच्या स्वानुभावातून जे दुःखावर लिहिले आहे आणि लोकांनाही जे भावले आहे ते पाहूया.



मिर्झा गालिब


रगों में दौड़ते फिरने के हम नहीं क़ाइल

जब आँख ही से न टपका तो फिर लहू क्या है


या शेरातून गालिब अश्रूंना (म्हणजेच दुःखी भावनांना) वरचे स्थान देतो. तो म्हणतो की, केवळ शरीराने जिवंत राहणे पुरेसे नाही तर आपल्या भावनांमध्ये तीव्रता असली पाहिजे. रक्त जिवंत माणसाच्या शरीरामध्ये वाहत असते, पण खरी संवेदना/भावना त्याच्या डोळ्यांमधून अश्रू बनून वाहते आणि त्या आसवांना (जिवंत भावना) नुसते इकडे तिकडे धावणाऱ्या रक्तापेक्षा (जिवंत शरीरापेक्षा) जास्त महत्व आहे.


इशरत-ए-क़तरा है दरिया में फ़ना हो जाना 

दर्द का हद से गुज़रना है दवा हो जाना


पहिल्या मिसऱ्यात गालिब म्हणतो की मोठ्या महासागरात पाण्याच्या एका थेंबाचे (कतरा) विलीन होणे, हिच त्या थेंबासाठी आनंदाची (इशरत) गोष्ट असते. आणि दुसऱ्या मिसऱ्यात तो सांगतो की - प्रेमी माणसाच्या भावना जसजशा तीव्र होत जातात (दुःख सीमा ओलांडू लागते) , तसतसे त्याचे दुःख केवळ असह्य वेदनेनेच संपते — आणि ती वेदनाच जणू त्याच्या दुःखावर अंतिम उपाय (दवा) बनते.


(माझी गालिबने लिहिलेली आवडती दुःखावरली गझल म्हणजे - "दिल ही तो है न संग-ओ-ख़िश्त दर्द से भर न आए क्यूँ")


मीर तकी मीर 


दिल की वीरानी का क्या मज़कूर है

ये नगर सौ मर्तबा लूटा गया


इथे मीरने त्याच्या हृदयाची तुलना एका शहराशी केली आहे; असे शहर जे वेदनांनी कित्येकदा उद्ध्वस्त झाले आहे. आता त्याला हृदयाच्या त्या उजाडपणाचा उल्लेख करणेही निरर्थक वाटते आहे; कारण ही लूट एक रोजचीच बाब बनली आहे.


मुझ को शायर न कहो 'मीर' कि साहब मैं ने

दर्द ओ ग़म कितने किए जमा तो दीवान किया


या शेरामध्ये मीर म्हणतो की मला कवी किंवा शायर काय म्हणता? खरं तर, माझ्या वेदना, माझ्या व्यथा, माझी दुःखे मी गोळा केली - तेंव्हा कुठे हा काव्य संग्रह बनला.


फैझ


और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा

राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

 

फैझ अहमद फैझ हा शायर कमी स्वप्नाळू आणि क्रांतिवादी जास्त होता. तो जमिनीवरचा व्यावहारिक कवी होता. वरचा शेर त्याच्या प्रसिद्ध नझ्ममधला आहे "मुझसे पहलीसी मुहब्बत मेरे मेहबूब ना मांग".

यामध्ये तो प्रेमाची प्रगल्भतेने मांडणी करतो. तो म्हणतो की या जगामध्ये केवळ प्रेम ही एकच दुःख देणारी गोष्ट नाही - तर इतरही मोठाली दुःखे आहेत. आणि ह्रिदयाला अनेक दिलासे आहेत, मिलनाच्या दिलाशाशिवाय.


फराझ


ग़म-ए-दुनिया भी ग़म-ए-यार में शामिल कर लो

नशा बढ़ता है शराबें जो शराबों में मिलें


अहमद फराझ - हा विसाव्या शतकामधला माझा खूप आवडता शायर. हो! तोच ज्याने - "रंजिश ही सही..." - लिहिली आहे. वरचा शेर त्याच्या अजून एका सुंदर गझलेतला आहे - "अब के हम बिछडे...".

फराझ या शेरामधून जणू फैझच्या वरील शेराला उत्तर देतो आहे असे वाटते.

फराझ म्हणतो की दुनिया जे दुःख देत आहे, ते प्रेमाच्या दुःखामध्ये समाविष्ट करा (ज्यांना cocktails आवडतात - त्यांना हे आवडेल :)) - नशा आणि झिंग वाढते, जेंव्हा अशा प्रकारे दोन प्रकारच्या दारू (दोन्ही दुःखे) मिसळल्या जातात.


साहिर लुधियानवी


तुम अपना रंज-ओ-ग़म अपनी परेशानी मुझे दे दो

तुम्हें ग़म की क़सम इस दिल की वीरानी मुझे दे दो


साहिरचा वरील शेर तसा सरळ साफ आहे. 

कुठल्याही साहित्यामध्ये text तर असतेच, पण sub-text सुद्धा असते, जे शब्दांनी मांडले नसते.

एक गोष्ट जी मला इथे sub-text म्हणून जाणवली की - व्यक्ती जर कोणाशी दुःख सांझा करत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ती दुसऱ्याला विश्वासाने आपल्या आयुष्यात जवळचं स्थान देत असते. म्हणूनच, येथे कवी आपल्या दुःखी प्रेमाला तिचे दुःख, तिची काळजी मागतो आहे - जेणेकरून तो तिच्या विश्वामध्ये प्रवेश करू शकतो.

 

सुरेश भट

 

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे,

अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !


एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले,

राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !


भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले,

एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !


केवळ अप्रतिम !! या गीताबद्दल काय बोलावे? भटांची सशक्त लेखणी पुरेशी आहे.


तर रसिकांनो आता इथे थांबतो. आशा आहे हा वेगळा प्रयत्न (a little pivot) थोडाफार जमला आहे आणि तुम्हाला आवडला असेल. पुढल्या अंकामध्ये मीरची गझल पाहूया. धन्यवाद !


“If I had my life to live over again, I would have made a rule to read some poetry and listen to some music at least once every week.” Charles Darwin, The Autobiography of Charles Darwin 



सचिन सोनटक्के
सचिन सोनटक्के


Comments


bottom of page