top of page

"खुदा-ए-सुखन"

Oct 1
6 min read

मीर तक़ी मीरचा जन्म आग्र्याचा. परंतु बहुतेक आयुष्य दिल्लीमध्ये आणि नंतर लखनौ मध्ये काढले. लखनौमध्येच तो वारला.

त्याचे खरे नाव होते मीर मुहम्मद तकी. तसे पाहिले तर लंबी उमर मिळाली होती त्याला - १७२२ ते १८१०, म्हणजे जवळपास ८८ वर्षे. त्याकाळीच काय तर आजकालही याला उदंड आयुष्य म्हणता येईल. मीरने उर्दू साहित्यात प्रचंड काम करून ठेवलंय - हजारो गज़ला तर लिहिल्याच, पण कसीदे, मसनव्या, सुफी कथा आणि आत्मचरित्रही लिहिलं आहे. मीर निव्वळ कवी नव्हता, तर तो उर्दू भाषेचा शिल्पकार म्हणूनही मानला जातो. त्याकाळी जेंव्हा उर्दू भाषा विकसित होत होती, तेंव्हा मीरने सामान्य माणसाची 'हिंदुस्तानी' बोली आणि फारसी भाषेतील सौंदर्य यांचा संगम साधून एक सोपी आणि प्रभावी काव्यशैली निर्माण केली. 

मिर्झा गालिब काय, ज़ौक़ काय सगळेच त्याच्या लेखणीवर फ़िदा होते. अगदी कालचे नासिर काज़मी, जॉन एलिया इत्यादी सुद्धा.


मिर्झाने तर म्हंटले पण आहे की -


रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'

कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था


और ज़ौक़ फ़र्माते है -


न हुआ पर न हुआ 'मीर' का अंदाज़ नसीब

'ज़ौक़' यारों ने बहुत ज़ोर ग़ज़ल में मारा


मीरच्या या बुलंद साहित्यिक प्रतिभेमुळेच त्याला उर्दू अदबमध्ये 'खुदा-ए-सुखन' (कवितेचा देव) म्हटले जाते.

सुखन म्हणजे 'जे ओले नाही' असा अर्थ नाही - (शाब्दिक खेळ!!), तर उत्कृष्ट सजवलेल्या भाषेतला संवाद/काव्य.


मीरच्या लोकप्रिय गझला म्हणजे -


पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है

जाने न जाने गुल ही न जाने बाग़ तो सारा जाने है


उल्टी हो गईं सब तदबीरें कुछ न दवा ने काम किया

देखा इस बीमार-ए-दिल ने आख़िर काम तमाम किया


हस्ती अपनी हबाब की सी है

ये नुमाइश सराब की सी है


देख तो दिल कि जाँ से उठता है

ये धुआँ सा कहाँ से उठता है


शहरों मुल्कों में जो ये 'मीर' कहाता है मियाँ

दीदनी है पा बहुत कम नज़र आता है मियाँ


क्या कहूँ तुम से मैं कि क्या है इश्क़

जान का रोग है बला है इश्क़


यारो मुझे मुआफ़ रखो, मैं नशे में हूँ

अब दो तो जाम ख़ाली ही दो, मैं नशे में हूँ


राह-ए-दूर-ए-इश्क़ में रोता है क्या (इबतिदा-ए-इश्क़ है रोता है क्या) 

आगे आगे देखिए होता है क्या


आणि अशाच अनेक अतिसुंदर गझला आहेत मीर लिखित. 


जवळपास सगळ्याच महान गझल गायकांनी - बेगमजी, मेहदी साहेब, जगजीत जी, गुलाम अली, लता दीदी, आशा जी - सगळ्यांनी मीरच्या गझला गायल्या आहेत. आणि अजून एक विशेष - त्याच्या बहुतेक लोकप्रिय गझला हिंदी सिनेमांमध्ये संगीतबद्ध झाल्या आहेत. उदाहरणार्थ - "पत्ता पत्ता" 'एक नजर' या चित्रपटात आहे, शिवाय 'पाकिझा' या चित्रपटात "देख तो दिल कि जाँ से" हे गाणे गूढ संगीतासह background मध्ये ऐकू येते (ते haunting वाटते).


तर आज आपण या अनोख्या मीर तक़ी मीरची अशीच एक छान गझल पाहूया, जी २ संपूर्ण वेगळ्या पद्धतीने २ चित्रपटांमध्ये आली आहे.


शीर्षक आहे - फ़क़ीराना आए सदा कर चले

[रूपकुमार राठोड यांनी हे गाणे २००५ मधील 'विरुद्ध' या चित्रपटात गायले आहे आणि या गझलेतले चार शेर (highlighted in bold) सिनेमा 'बाज़ार' मध्येही आले आहे, जे लतादीदींनी अप्रतिमपणे गायले आहेत त्याला खैय्याम यांचे संगीत आहे. लतादीदींचे version सुपरिचित आहे.]


नोंद : पुर्वी अमीर खुसरोवरल्या लेखामध्ये मी एक गोष्ट नमूद केली होती, ती म्हणजे — सूफी मतानुसार इश्क दोन प्रकारांत विभागला जाते — इश्क-ए-हकीकी आणि इश्क-ए-मजाजी. इश्क-ए-मजाजी म्हणजे या भौतिक जगापुरते मर्यादित प्रेम. एखाद्या व्यक्तीशी आसक्ती निर्माण झाली तर त्याला इश्क-ए-मजाजी म्हणतात. याउलट इश्क-ए-हकीकी म्हणजे परमेश्वरावरील दैवी प्रेम. ('हक' चा दुसरा अर्थ आहे सत्य/ईश्वर). कसलेले शायर हे दोन्ही प्रकार खुबीने त्यांच्या काव्यात गुंफतात. मीरची खाली दिलेली गझल याचे उत्तम उदाहरण आहे. यात विरक्तीही आहे आणि आध्यत्मही दिसते.


फ़क़ीराना आए सदा कर चले

कि मियाँ खुश रहो हम दुआ कर चले


मी या जगात एका फकिरासारखा आलो आणि एक हाक (सदा) देऊन जात आहे.

जाताना एवढेच सांगून जात आहे की तुम्ही (इथे 'मियाँ') नेहमी आनंदी राहा. हीच तुमच्यासाठी प्रार्थना (दुआ) करत आहे.


जो तुझ बिन न जीने को कहते थे हम

सो इस अहद को अब वफ़ा कर चले


मी प्रेमात प्रेयसीशिवाय जगू शकत नाही. त्या विरहात आता माझा प्राण जात आहे; म्हणजेच दुसऱ्या शब्दांत, प्रेयसीशिवाय न जगण्याचे मी केलेले माझे वचन (अहद) आज खरे ठरवत आहे. ते वचन मी पूर्ण (वफ़ा) करून जात आहे.


शिफ़ा अपनी तक़दीर ही में न थी

कि मक़्दूर तक तो दवा कर चले


उपचार करून बरं होऊन (शिफ़ा) दुःखातून बाहेर पडणे - हे माझ्या नशिबात नव्हते (म्हणजेच आयुष्यात सुखी होणे नशिबात नव्हते). परंतु तरिही माझ्या क्षमतेनुसार (मक़्दूर) जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे सर्व उपचार/प्रयत्न (दवा) करून आता हार मानून मी जात आहे. हा शेर मानवाच्या मामुली मर्यादांची जाणीव करून देतो.


कोई ना-उमीदाना करते निगाह

सो तुम हम से मुँह भी छुपा कर चले


इथे मीर आपली एक कैफियत मांडतो. तो म्हणतो की माझी माझ्या माशुकेकडून इतकीच अपेक्षा होती की ती माझ्यावर किमान एखादातरी नैराश्यपूर्ण (ना-उमीदाना) कटाक्ष टाकेल. पण ती तर स्वतःचा चेहरासुद्धा लपवून निघून गेली.


बहुत आरज़ू थी गली की तेरी 

सो याँ से लहू में नहा कर चले


इथे गली (म्हणजे प्रेयसीच्या ठिकाणाजवळचा रस्ता) हे एक metaphor आहे. कवी मीरला त्याच्या प्रेयसीच्याजवळ जाण्याची अत्यंत तीव्र अशी इच्छा (आरज़ू) होती; पण जेव्हा त्याने तसा प्रयत्न केला तेव्हा त्याला केवळ निराशा मिळाली आणि त्या नैराश्याने मीरला जखमी (लहूलुहान केले). याचा असाही अर्थ काढता येऊ शकतो की जीवनामध्ये आपण ज्या स्वप्नाची अती-तीव्रतेने इच्छा धरतो, अनेकदा तीच गोष्ट आपल्याला सर्वात जास्त वेदना (जखमा) देऊन जाते.


दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया

हमें आप से भी जुदा कर चले


इथे मीर म्हणतो की आपली एक झलक मला दिसली आहे की आता मला स्वतःचे भानही उरले नाही (बे-खुद :- स्वतःपासून दूर होणे) आणि यामुळे मला माझ्या अस्तित्वापासूनच स्वतःला वेगळे (जुदा) करून टाकले आहे.

हा शेर एखाद्या प्रेयसी/प्रियकराबद्दलही बोलला जाऊ शकतो आणि तो ईश्वरालाही संबोधित करता येऊ शकतो. कारण मीर एका दृश्याबद्दल - एका दर्शनाबद्दल बोलत आहे, असे दर्शन जे एखाद्या अलौकिक (ईश्वरी) अनुभवासारखेही असू शकते. जेव्हा मनुष्याला असे सत्याचे दर्शन होते, तेव्हा त्याचे स्वतःचे अस्तित्व (अहंकार) गळून पडते आणि तो पूर्णपणे त्यात तल्लीन होऊन जातो.


जबीं सजदा करते ही करते गई

हक़-ए-बंदगी हम अदा कर चले


इथे शायर म्हणतोय की माझे कपाळ (जबीं) तुझ्यासमोर नतमस्तक (सजदा) होतंच गेले आणि अशा रितीने मी माझ्या या प्रेमाचे किंवा भक्तीचे (बंदगी) कर्तव्य पूर्ण करत गेलो. (इस्लाममध्ये नमाज पढताना कपाळ भूमीवर टेकवण्याची जी कृती आहे - तिला सजदा म्हंटले जाते). इथे कवी आपल्या प्रेयसीबद्दलही व्यक्त होत असावा अथवा ईश्वराबद्दल. हा शेरही दोन्ही इश्क मध्ये लागू होऊ शकतो.


परस्तिश की याँ तक कि ऐ बुत तुझे

नज़र में सभों की ख़ुदा कर चले


परस्तिश : पूजा, उपासना.बुत : मूर्ती किंवा प्रियकर/प्रेयसी (उर्दू साहित्यात प्रियकर/प्रेयसीला 'बुत' म्हणजेच मूर्ती म्हटले जाते - रूपक म्हणून). 


इथे मीर बोलतो की, मी तुझी (प्रियकर/प्रेयसीची म्हणजे बुतची) इतकी निस्सीम पूजा केली की, त्या माझ्या प्रेमाच्या तीव्रतेने - तुला म्हणजे एका सामान्य व्यक्तीला (एका बुतला) - मी चक्क देवाच्या स्थानी नेऊन ठेवले आहे. आणि केवळ माझ्याच नाही तर इतरही अनेक जणांच्या दृष्टीत तुला देव बनवले आहे.

इथे 'सभों' हा शब्द आला आहे. 'सभी लोगों' लिहायच्या ऐवजी मीरने हा शब्दप्रयोग केला आहे. मीर असे प्रयोग करून नवीन शब्द निर्माण करायचा.


झड़े फूल जिस रंग गुलबुन से यूँ

चमन में जहाँ के हम आ कर चले


गुलबुन (गुलाबाचं रोप) मधून, ज्याप्रमाणे सुकलेली फुले गळून पडतात; तसेच आम्हीही या दुनिया- नामक बागेत (चमन) आलो आणि आता गळून पडलो (निघून जात आहे). इथे मीर मानवी जीवनाच्या नश्वरतेचे वर्णन करतो.


न देखा ग़म-ए-दोस्ताँ शुक्र है

हमीं दाग़ अपना दिखा कर चले


मीर म्हणतो की ईश्वराचे खरेच आभार की मला प्रियजनांचे दुःख पाहावे लागले नाही. कारण त्याआधीच आम्ही आमचे दुःख दाखवून चाललो आहोत. याचा अर्थ असा घेता येईल की माणसाला स्वतःच्या दुःखापेक्षा आपल्या माणसांचे दुःख पाहणे जास्त कठीण जाते आणि इथे कवी मान्य करतोय की ही ईश्वरी कृपा आहे की तो त्याच्या जवळच्या लोकांचे दुःख पाहण्यापूर्वीच या जगातून जात आहे.


कहें क्या जो पूछे कोई हम से 'मीर'

जहाँ में तुम आए थे क्या कर चले


यामध्ये 'मीर' म्हणतो, जर कोणी आम्हाला विचारले की, "तुम्ही जगात आलात आणि काय करून चाललात?" - तर आम्ही काय बरं उत्तर देणार? हा शेर मक्ता आहे (शेवटला शेर) आणि अगदी योग्यरीतीने गझल संपवतो. तो एका अर्थी ऐकणाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावतो.


त्याकाळी शायरीमध्ये स्वतःची प्रौढी मिरवणे नापसंत केले जायचे. (याला गालिब मात्र बऱ्यापैकी अपवाद होता - कारण अर्थात तो गालिब होता). Self-deprecation किंवा आत्म-निंदा (स्वतःची खिल्ली उडवणे) पसंत केले जायचे. मीरने या गझलेमध्ये ते सांभाळले आहे - हे शेवटच्या शेरामध्ये दिसून येते. त्याची अजून एक अप्रतिम गझल - "देख तो दिल की जान..." चा मक्ताही तेच दर्शवतो.


इश्क़ इक 'मीर' भारी पत्थर है

कब ये तुझ ना-तवाँ  से उठता है


इथे मीर म्हणतो की इश्क (प्रेम) करणे एक खूपच मोठा प्रयत्न आहे (जणू काही एक भारी पत्थर आहे) आणि मग तो स्वतःलाच विचारतो की तुझ्यासारख्या अशक्त व्यक्तीला कसा काय तो उचलता येणार? 

ना-तवाँ  म्हणजे ज्याच्यामध्ये शक्ती नाही. (ताजा-तवाना मधला तवाना हा शब्द त्यावरून आला आहे.) 


तर असा हा अत्यंत प्रतिभाशाली पण मृदू कवी मीर. मला कधी वाटते जसे आपल्या संत-वाङमयामध्ये  आपण ग्यानबा-तुकारामांना मानतो. त्यांना सगळ्यात वरचे स्थान देतो. तसेच उर्दू अदबमध्ये मीर-गालिब या दोघांना मानतात. (कृपया नोंद: इथे कोणतीही तुलना करायचा माझा हेतू नाहीये). "दिखाई दिए" ही गझल नंतर अरिजीतनेही गायली आहे. छान जमली आहे. जमल्यास नक्की ऐका. आशा आहे हा मीरबद्दलचा लेख तुम्हाला आवडला असेल. तर रसिकांनो आता इथे थांबतो. पुढल्या अंकामध्ये फैझ आणि फराझला भेटूया. 


धन्यवाद !

 



सचिन सोनटक्के
सचिन सोनटक्के


Comments


bottom of page