कोई उम्मीद बर नहीं आती…
- सचिन सोनटक्के

- Dec 31, 2025
- 3 min read
गझल मालिकेतला या वर्षाचा हा शेवटचा लेख. या वर्षाची सांगता पुन्हा एका गालिबच्या गझलेने करत आहे. मीर, फराझ, फैझ, निदा इत्यादींबद्दल कदाचीत जमलं तर पुढील वर्षी लिहेन.
असे म्हणतात की गालिबच्या शायरीला अनेक पदर आहेत. त्यामधून अनेक अर्थ निघू शकतात. चांगला शायर म्हणा, कवी म्हणा किंवा लेखक म्हणा (तो अथवा ती) - केवळ एक चांगला मनुष्यच नसतो तर तो आध्यात्मिक, चांगला भाषाकार, आणि जागरूक व्यक्तीही असतो. तो एक उत्तम संवेदनशील मानसोपचारतज्ञही बनण्याची क्षमता बाळगणारा असू शकतो. गालिबचे 2 शेर इथे देतो आहे, जे त्याच्या अद्वैत वेदान्ताच्या मूळ तत्त्वज्ञानाबद्दल भाष्य करतात. यावरून त्याची आध्यात्मिक सखोलता दिसते.
उसे कौन देख सकता की यगाना है वो यकता
जो दुई की बू भी होती तो कहीं दो-चार होता
इथे तो विचारतो की - त्या विलक्षण आणि अद्वितीय ईश्वराला कोण पाहू शकतो? आणि पुढे तो म्हणतो की - जर दुई/द्वैतभावची (म्हणजे ईश्वर आणि आत्मा वेगवेगळे असणे) किंचितही शक्यता असती, तर कुठे ना कुठे तरी ईश्वराशी भेट/ मुलाखात झाली असती. म्हणजेच गालिब सांगतो की ईश्वर आणि इतर जीव एकच आहेत...हे सूत्र अद्वैताबाहेर कुठे आढळत नाही.
दुसरा शेर सुंदर तर आहेच आणि तितकाच जटीलही आहे.
न था कुछ तो ख़ुदा था कुछ न होता तो ख़ुदा होता
डुबोया मुझको होने ने न होता मैं तो क्या होता?
इथे गालिब सांगतो की - जेव्हा या जगात काहीच नव्हतं, तेव्हा ईश्वर होता. आणि जर उद्या काहीच नसेल, तरीही ईश्वर राहील.
पुढे शायर आपली शब्द-चलाखी दाखवतो. तो म्हणतो की मला या माझ्या असण्याने (या माझ्या अस्तित्वाने) बुडवलंय (संपवलंय)... कारण जर हा मी माझ्या या अस्तित्वासकट नसतो - तर मी कोण असतो? कदाचित मी त्या परमात्म्याचाच एक अंश असतो. हा शेरही अद्वैतवादातून आल्यासारखा भासतो.
असो...तर अशा या गूढवादी (mystic) आणि प्रख्यात शायराची ही तिसरी गज़ल अभ्यासून या वर्षाची सांगता करूया. ही गज़ल तशी थोडी कमी ज्ञात आहे, पण साफ (समजायला सोपी) आहे.
कोई उम्मीद बर नहीं आती
कोई सूरत नज़र नहीं आती
* बर - वर येणे (हिंदीत - उभर के आना)
इथे गालिब म्हणतो की त्याला आता कोणतीही आशा दिसत नाही. आणि तो पुढे म्हणतो की कुठला चेहराही दिसत नाहीये - असा चेहरा जो त्याला सांभाळू/ वाचवू शकतो. तो इथे त्याच्या प्रेमिकेचा किंवा देवाचा उल्लेख करत असावा.
मौत का एक दिन मुअय्यन है
नींद क्यूँ रात भर नहीं आती
* मुअय्यन - पक्का/निश्चित
हा शेर तसा सरळ सरळ आहे. यात गालिब म्हणतो - हे माहित आहे की प्रत्येकाचा मृत्यूचा दिवस तर निश्चित आहे...पण तरीही रात्रभर झोप का येत नाही? इथे 'रात्र' प्रतिकात्मक घेता येईल... ही 'रात्र' म्हणजे आयुष्य जे अस्वस्थतेमध्ये आणि अंधारामध्ये वाया गेले आहे.
आगे आती थी हाल-ए-दिल पे हँसी
अब किसी बात पर नहीं आती
हा शेर ही समजायला सरळ आहे. यात गालिब म्हणतो - पूर्वी या ह्रिदयाच्या स्थितीवर हसू यायचे. (इथे आगे म्हणजे पूर्वी - आगे म्हणजे समोर नाही). पण आजकाल कशावरही हसू येत नाही.
है कुछ ऐसी ही बात जो चुप हूँ
वर्ना क्या बात कर नहीं आती
यात गालिब म्हणतो - आहे काहीतरी अशी गोष्ट/ बाब ज्यामुळे चुप राहणेच (शांत राहणे) योग्य आहे. नाहीतर अशी कोणतीही गोष्ट नाही ज्याबद्दल त्याला बोलता येत नाही...ज्यावर त्याची मते नाहीत.
हम वहाँ हैं जहाँ से हम को भी
कुछ हमारी ख़बर नहीं आती
इथे तो म्हणतो की तो आता अशा परिस्थितीत आहे, जिथे त्याला स्वतःचीही कोणतीही बातमी मिळू शकत नाही. तो दुःखाने इतका बुडला आहे की तो सुन्न झाला आहे.
मरते हैं आरज़ू में मरने की
मौत आती है पर नहीं आती
यामध्ये शायर आपली शब्द-चलाखी परत दाखवतो. तो सांगतो की मृत्यूच्या आशेमध्ये रोज तो तळमळून मरत आहे. आणि त्याच्या ह्रिदयाला रोज मृत्यूसमान त्रास होत आहे - पण त्याचा शेवट काही होत नाहीये. इथे बहुधा तो आपल्या दुरावलेल्या प्रेमामुळे कष्टी झालेल्या जिवनाबाबत सांगत असावा.
काबा किस मुँह से जाओगे 'ग़ालिब'
शर्म तुम को मगर नहीं आती
*गझलेतील हा शेर शेवटला आहे, म्हणजेच मक्ता आहे. काबा म्हणजे मक्केमधले पवित्रस्थळ. जिथे श्रद्धाळू लोक जातात.
इथे गालिब स्वतःलाच विचारतो की तू कसा काय त्या पवित्रस्थळी जाणार? तुला लाज कशी वाटणार नाही तिथे?
इथे तो मान्य करतो की देवाबद्दल त्याची निष्ठा निस्सीम न्हवती आणि म्हणून त्याला देवाला तोंड दाखवता येणार नाही.
तर अशी ही एक खूप सुंदर गझल आहे. आशा आहे तुम्हालाही आवडली असेल.
तर आता इथे थांबतो. सगळ्यांना नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा. पुढील कविता/गझल पुढल्या लेखात. धन्यवाद!
Reference : rekhta.org



Comments