top of page

स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ

Oct 1
6 min read

जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।

परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥


आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन ।

येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥


ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें ।

तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥


ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत,


यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।

ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ ४. १९ ॥


अर्थ - ज्याची सर्व कर्मे कामसंकल्प  विरहित असतात आणि ज्ञानरूप अग्नीत ज्याची कर्मे, म्हणजे त्यांचे संस्कार दग्ध म्हणजे नष्ट झालेली असतात त्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात.

कर्मयोग सांगुन झालेला आहे. त्याच्या सांगतेचा हा एक श्लोक आहे. या श्लोकात/ ओव्यांमध्ये भगवंत कर्मयोगी सिद्धाचे वर्णन करीत आहेत. अशा सिद्धांकडे पाहून साधारण माणसाला कसे वागावे हे कळते. कारण अशा व्यक्तींनी देहात असतानाच, जीवन मुक्ती मिळवलेली असली तरी ते कर्म करीत असतातच. परंतु त्यांना हे पूर्णपणे समजलेले असते की, मी कर्म करीत आहे, असे दिसत असले, तरी प्रत्यक्षात तो भगवंतच प्रकृतीद्वारे सर्व कर्मे करून घेत आहे.

खरंतर आपण हे प्रत्यक्षात अनुभवत असतो. परंतु त्या अनुभवाकडे लक्ष दिलं, तर आपला अहंकार दुखावतो. म्हणून कदाचित आपण त्यावर विचार करीत नसू. जेव्हा आपल्याला झाड हालतांना दिसतं, तेव्हा आपण पटकन म्हणतो की "वाऱ्याने झाड हलते आहे." स्वेच्छेने ते झाड हलत असेल, असा विचारही आपल्या मनात येत नाही. झाड प्रकृतीचा एक भाग आहे आणि प्रकृतीच्या इच्छेने त्याची हालचाल होते आहे हे आपण सहज समजू शकतो. परंतु मीही प्रकृतीचा एक भागच आहे आणि तिनेच निर्माण केलेल्या परिस्थितीच्या तालावरच मी सतत नाचतो आहे, हे सत्य खरं तर अगदी उघड आहे. परंतु तरीही तसे आपल्या मनातही येत नाही. 

एक बाई जेव्हा म्हणते की माझा मुलगा कॉलेजमधून घरी येणार आहे, म्हणून मी त्याच्या आवडीचे बटाटेवडे करते आहे. तेव्हा त्या वाक्यात मी व माझा हे शब्द अगदी अधोरेखित असतात व ठसक्यात म्हटले जातात.

ही आसक्ती व अहंकाराची वस्त्रेच आपल्याला अगदी गुंडाळून ठेवतात. त्यांच्या मागे दडलेल्या खऱ्या "मी" ची, शुद्ध "मी" ची आपल्याला ओळखही नसते. संतांचे मात्र तसे नसते. ही आसक्ती -अहंकाराची वस्त्रे त्यांनी केव्हाच उतरवून ठेवलेली असतात. म्हणून त्यांचे वर्णन करताना माऊली म्हणते,


आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन ।

येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥


गोंदवलेकर महाराज कोणाशीही बोलताना किंवा आशीर्वाद देतानाही नेहमी "राम करेल" किंवा "रामाच्या इच्छेने होईल" असे म्हणायचे. एकदा कोणीतरी त्यांना म्हणाले की, "महाराज, कधीतरी मी करेन" असे म्हणा ना! तेव्हा ते म्हणाले की "अरे बाबा जन्मापासून कधीही 'मी' ने ही जीभ विटाळली गेली नाही, मग आत्ताच कशाला विटाळू ?"

"विटाळणे " हा शब्द फक्त मराठी माणसाला समजू शकतो. शुद्ध "मी" ला अशुद्ध व अपवित्र करण्याची शक्ती या "मी" मध्ये असते. या "मी" पासून दूर राहण्याचा अभ्यास म्हणजेच अध्यात्म!

उपासना करताना किंवा सत्संगात राहताना या "मी"ला दूर ठेवणे बऱ्याच जणांना जमू शकते. परंतु व्यावहारिक कर्मे करताना मात्र या "मी" शिवाय जमणारच नाही, असे वाटू शकते.

परंतु संत चरित्र वाचल्यास कळेल की बऱ्याच गृहस्थाश्रमी संतांनी निर्लिप्त राहून आपल्याला उत्तम संसार करून दाखवला आहे. उदाहरणार्थ - एकनाथ महाराज. 

अध्यात्मात ज्ञान आणि अज्ञान कशाला म्हणायचे? 

मी कोण? या प्रश्नाचे उत्तर जर मी म्हणजे माझे शरीर, मन, बुद्धी असे असेल तर ते अज्ञान! 

मी म्हणजे चैतन्य, आत्मा, परमात्मा हे उत्तर जर अनुभूतीने देता आले, तर ते ज्ञान!

असे ज्ञान झाल्यास प्रारब्ध कर्मे (आधीच फळलेली कर्मे ) सोडून बाकी सर्व कर्मे जळून जातात. त्याच प्रमाणे ज्ञानाग्नीत जळालेली कर्मे फलित होत नाहीत. ज्याप्रमाणे  भाजलेल्या बीजांना अंकुर फुटत नाही, त्याप्रमाणे ! 

अशी स्थिती ज्या व्यक्तीची आहे, ती व्यक्ती "परब्रह्मचि मनुष्य वेखे ओळख तू" असे माऊली म्हणते. 

तो ज्ञानी म्हणजे मनुष्य वेषातील परब्रम्हच यात शंका नाही.

तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें ।

तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥ १६५ ॥


जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।

तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६६ ॥


तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें ।

आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६७ ॥


मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।

जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न येत ॥ १६८ ॥


या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत .


तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।

उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥४.३४ ॥


हे जे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे, ते प्राप्त करून घेण्याची इच्छा जर मनात आली तर माणसाने संतांना भजावे. म्हणजे त्यांना भक्ती भावाने शरण जावे. हे आत्मज्ञान प्राप्त करून घेणे म्हणजे ते शब्दाने समजून घेणे मुळीच नाही. एखाद्या पदार्थाची चव जर आपल्याला कोणी खूप वर्णन करून सांगितली तर आपल्याला ती समजते का? नाही! जोपर्यंत आपण तो पदार्थ स्वतः खाऊन पहात नाही तोपर्यंत कोणी कितीही वर्णन केले तरी त्याला अर्थ नसतो. तसेच “आत्मज्ञान” अनुभव घेतल्याशिवाय शब्दाने समजून घेता येत नाही. शब्दज्ञानाने कदाचित ते समजून घेण्याची इच्छा होईल, परंतु अनुभूती येणे शक्य नाही. म्हणूनच त्या ओवीत "जरी मनी आथी जाणावे” असे म्हटले आहे. आपल्याला काहीही आत्मसात करायचे असेल, शिकायचे असेल तर आपण ते ज्याच्याकडे आहे व जो ते देऊ शकतो त्या व्यक्तीकडे जातो. म्हणजे जिच्याकडे जायचे ती व्यक्ती आत्मज्ञानी असायलाच हवी. गीतेतील श्लोकात या व्यक्तीला तत्त्वदर्शीन:, ज्ञानिन: म्हटले आहे. परमतत्त्वाच्या अनुभूतीने ज्या व्यक्ती ज्ञानी झालेल्या आहेत, अशा व्यक्ती म्हणजे संत!

एकनाथ महाराजांनी त्यांचे वर्णन असे केलेले आहे,

शब्दज्ञाने पारंगतु - जे श्रुती ( वेद, उपनिषद ) मधून आलेला ज्ञान विचार जाणतात.

ब्रह्मज्ञाने डुल्लतु - जे ब्रह्मज्ञानी आहेत.

शिष्य प्रबोधिनी समर्थु - जे त्या ज्ञानाचे प्रबोधन करण्यास समर्थ आहेत.

प्रबोधन करण्याकरता हे “ज्ञानी” लोकाभिमुख असायला हवेत. सर्व “आत्मज्ञानी” लोकाभिमानी नसतात. लोकाभिमुख संतच इतरांच्या अध्यात्मिक उन्नतीला सहाय्यभूत होऊ शकतात. त्यांनाच सद्गुरु म्हणतात. 

त्यांच्या कृपेला प्राप्त होण्यासाठी शिष्य नाही तर सत्शिष्य व्हावे लागते आणि त्याकरता सद्गुरूंना सर्वस्वाने शरण जायला हवे .

सर्वस्व हा शब्द फार महत्त्वाचा आहे . गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातील एका गोष्टीने हे स्पष्ट करता येईल. एकदा गोंदवल्यातील एक प्रतिष्ठित गृहस्थ त्यांच्या मालमत्तेचे कागद घेऊन महाराजांकडे आले. त्यांना सर्व मालमत्ता महाराजांच्या नावी करण्याची इच्छा होती. त्यांच्या मुलाचीही त्याला हरकत नव्हती असे त्यांनी सांगितले. महाराजांनी त्यांना सांगितले की हे सध्या राहू दे. पण नामस्मरण करायला विसरू नकोस. सतशिष्य  होण्यासाठी गुरूंनी सांगितलेली साधना करणे हे सर्वात महत्त्वाचे! बाकी सर्व दुय्यम! पुढे काही दिवसांनी ते खूप आजारी पडले. महाराज त्यांना भेटायला गेले, तेव्हा ते म्हणाले, "आता माझे काही खरे नाही. आणि मी जे तुम्हाला देऊ इच्छितो, तेही तुम्ही घ्यायला तयार नाही." त्यावर महाराज म्हणाले, "अरे तू सर्व द्यायला निघाला आहेस, परंतु तुझी 'स्व' ला देण्याची तयारी नाही. " त्यानंतर महाराजांच्या कृपेनेच ते आजारपणातून उठले, त्यांनी नामस्मरण जोराने सुरू केले व महाराजांना 'स्व' समर्पित करून ते 'स्वाधीन' झाले. 

दान देताना "मी देतो" हा भाव आला की पारमार्थिक दृष्ट्या ते योग्य नसते. आरतीत "तेरा तुझको अर्पण" म्हणताना आपल्या मनात तसा भाव येतो की नाही, हे तपासून पाह्यला हवे.


जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।

तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६६ ॥


सद्गुरु हे ज्ञानाचे भांडार आहेत. त्यांच्याजवळ ज्ञानप्राप्तीकरता जाण्यासाठी आधी सेवेचा उंबरठा ( दारवंटा ) ओलांडायला हवा. म्हणजे त्यांची सेवा करायला हवी. इथे हे स्पष्टपणे कळायला हवे की सद्गुरूंची सेवा, त्याचे पाय दाबून किंवा त्यांच्या घरी कामे करून होत नाही तर त्यांनी दिलेले साधन न चुकता केल्याने व सदाचरणानेच होते. बाकी सर्व गोष्टी दुय्यम असतात. सद्गुरुवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी शिष्याला त्या कराव्याशा वाटतात. सुभटा म्हणजे चांगला योद्धा. गीतेत हे नाव अर्थातच अर्जुनाला उद्देशून आहे. परंतु गीता तुम्हा आम्हासाठीही आहे. आपल्यालाही आपल्या जीवनात लढावे लागते. कोणाशी? तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ह्या षडरिपुंशी! निरनिराळ्या वृत्तींशी! या सर्वांचा नाश केल्याशिवाय आपण परमार्थाच्या मार्गावरचे वाटेकरी होऊ शकत नाही. हे सुरू केल्यावरच आपण सद्गुरूंच्या पायाशी बसण्याची योग्यता प्राप्त करून घेऊ शकू. 


तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें ।

आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६७ ॥


स्वामी माधवानंद याचा अर्थ अगदी स्पष्टपणे सांगतात. "गुरु चरण सेवेचा आचरणाशी संबंध आहे. गुरूंचे पाय पक्के धरण्यापेक्षा त्यांनी सांगितलेले सदाचरण आणि साधना हे पक्के धरणे हीच गुरु चरण सेवा! संताचे चरण ज्या मार्गाने चालत गेले त्या मार्गाने आपण जाणे म्हणजेच चरणसेवा." 

व्यवहारातील कर्मे चांगली केल्यास जसा अहंकार होऊ शकतो तसाच सत्कर्माचा, गुरुसेवेचा व साधनेचा सुद्धा होऊ शकतो. ही दास्यभक्ती, गुरुचरण सेवा, साधना करतानाही प्रश्न उद्भवतातच. तेव्हा ते गुरूंना जरूर विचारावे. ऐहिक प्रश्न विचारायचं मात्र टाळावं. बऱ्याच जणांना अनुभव असेल की एखाद्या गुरूंच्या प्रवचनाला गेल्यावर आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात. मात्र ते गुरु स्वरूपस्थितीत पोहोचलेले हवेत.

समर्थ रामदास स्वामी दासबोधात सांगतात,

मुख्य सद्गुरूचे लक्षण । आधी पाहिजे विमळ ज्ञान ।

 निश्चयाचे समाधान । स्वरूपस्थिती । । ५ -२ -४५ ।


आपल्या सर्व साधक विषयक प्रश्नांची उत्तरे आपल्याला न विचारताच मिळतात असेही नाही.तेव्हा आपण गुरूंना प्रश्न जरूर विचारावेत. गीतेतील श्लोकात भगवंत 'परिप्रश्नेन' हा शब्द वापरतात .

"परिप्रश्न" म्हणजे सरळपणे प्रश्न विचारणे. सरळपणे म्हणण्याचे कारण असे की प्रश्न विचारण्याची अनेक कारणे असू शकतात उदाहरणार्थ समोरच्या माणसाची परीक्षा घेण्याकरता!

स्वामी चिन्मयानंद म्हणतात, हिंदू धर्मात गुरु व शिष्य यांच्यामध्ये मोकळी चर्चा करण्याची पूर्वापार पद्धत आहे. असा चर्चेचा अधिकार सर्व धर्मात नाही.

शेवटी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. प्रत्यक्ष भगवंतही कोणालाच, अगदी आपल्याला लाडक्या अर्जुनालाही आत्मज्ञान देऊ शकत नाही. ते प्रत्येकाने स्वतःच्या प्रयत्नाने, साधनेने स्वतःच जाणायचे आणि अनुभवायचे असते.


अनुराधा कुलकर्णी
अनुराधा कुलकर्णी

Comments


bottom of page