top of page

स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ

ree

स्वर्धमु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।

म्हणौनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥ 


हा निजधर्मु जैं सांडे । आणि कुकर्मीं रति घडे ।

तैंचि बंधु पडे । संसारिक ॥ 


म्हणौनि स्वधर्मानुष्ठान । तें अखंड यज्ञ याजन ।

जो करी तया बंधन । कहींच न घडे ॥ 


ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकाच्या विवरणात आलेल्या आहेत. 


यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः।

तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसङ्‌गः समाचर ।।3:९।।


गीतेच्या श्लोकातील "यज्ञार्थ कर्म" किंवा ज्ञानेश्वरीतील "नित्ययज्ञ" ह्यातील "यज्ञ" ह्या शब्दाचा अर्थ सहज कळत नाही.

यज्ञ म्हणजे अग्नि, होम हवन, त्यातील आहुती वगैरे आपल्या मनात येते. आणि महाभारतकाळी तर ते जास्त प्रचलित होते.

काहीही मिळवण्याकरता यज्ञकर्म करण्याची प्रथा होती. मुल व्हावे म्हणून पुत्रकामेष्टी यज्ञ, राज्याची सीमा वाढवण्यासाठी अश्वमेध यज्ञ वगैरे!

अशा यज्ञांपासून मिळणारं सुख हे व्यावहारिक व तात्कालिक असतं, म्हणजे टिकणारं नसतं. परंतु कोणतीही गोष्ट जेव्हा समाजात प्रचलित असते, तेव्हा "ती बरोबर नाही, करू नका" असं समाजाला सांगता येत नाही. भगवंतांना अर्थातच याची चांगली कल्पना होती. त्यामुळे अर्जुनाला (समाजाला) यज्ञकर्म करण्याऐवजी यज्ञार्थकर्म करायला सांगितले. मात्र त्या शब्दांचा अर्थ बदलला. 

एवढं सगळं साहित्य जमवून यज्ञ कर्म करण्यापेक्षा तुला स्वधर्म पाळण्याकरता जे नित्यकर्म करावं लागतं, तेच अशा रीतिने कर की ते यज्ञार्थ होईल. म्हणजे आयुष्यातील प्रत्येक कर्म तुला ईश्वराप्राप्तीच्या मार्गावर पुढे नेईल. गीतेचा तात्कालीक उद्देश जरी अर्जुनाला युद्ध करण्याकरता प्रवृत्त करणे हा असला, तरी मुख्य उद्देश ईश्वरप्राप्ती 

(self-realization ) हाच आहे. अर्जुनाचे प्राप्तकर्तव्य अधर्मा विरुद्ध युद्ध करणे असल्याने, त्याने तेच यज्ञार्थ भावनेने करायला हवे. त्याचप्रमाणे आपणा सर्वांना आपल्यासमोर आलेली कर्तव्यकर्मे करायचीच आहेत. सर्व संसार सोडून ज्ञान मार्गाने जाण्याला आपण अजून लायक आहोत का, ह्याचा आपणच आपला विचार करायला हवा. नसल्यास, उपासनाकर्मांसहित नेहमीचीच कर्तव्यकर्मे कशा पद्धतीने करायची, हेच भगवंत ह्या गीतेच्या श्लोकात व माऊली ज्ञानेश्वरीच्या या तीन ओव्यांमधून सांगत आहेत. ते म्हणतात की प्रत्येक कर्म यज्ञार्थ करा. 

"यज्ञ" हे भगवान विष्णूंचे एक नाव आहे. त्याशिवाय "यज्" या धातूपासून आलेल्या "यज्ञ" या  शब्दाचे तीन अर्थ आहेत.

  1. देवपूजा - ईश्वर प्राप्ति साठी केलेली उपासना! ही उपासना भावनेसहित व योग्य प्रक्रिया पद्धतीने करायला हवी.

  2. संगतिकरण - कुठलीही गोष्ट सुसंगत करणे, चांगली करण्याचा प्रयत्न करणे.

  3. दान - आपल्याला बदल्यात काहीतरी मिळेल, अशी अपेक्षा न करता, इतरांना काही देणे. दुसऱ्या व्यक्तीला अधिक चांगल्या पातळीवर जाण्यासाठी सहाय्यभूत होणे.

ही तिन्ही तत्त्वे पाडून जर आपण आपले प्रत्येक कर्म केले तर ते यज्ञार्थकर्म होईल.

आपण आपल्या प्रत्येक कर्माला दुसऱ्या एका मापदंडावरही तोलून पाहू शकतो.

व्यावहारिक मूल्य 

सामाजिक मूल्य 

नैतिक मूल्य 

आध्यात्मिक मूल्य 

प्रत्येक मूल्य सांभाळताना आपण एकेक पायरी वर चढत जाऊ. आध्यात्मिक मूल्य सांभाळता आले तर आपले साधे कर्म सुद्धा यज्ञार्थ होऊ शकेल. हे एका उदाहरणानेच समजून घ्यायला हवे. 

समजा एक तरुण मुलगा बाहेरून घरी येतो. त्याला भूक लागली आहे. तसा तो भाग्यवानही आहे. त्याची आई स्वयंपाक करून त्याची वाट पाहत आहे. चवदार जेवण तयार आहे. घरात शिरताना तो फोनवर बोलतो आहे. खुणेनेच आईला वाढायला सांगतो. आई वाढून समोर ठेवते. फोनवर मोठ्या मोठ्याने बडबडत तो सर्व खातो आणि निघून जातो. आईकडे त्याचे लक्षही नाही. 

ह्या मुलाने भूक शमविण्याचे कर्म केले. ते झाले का? त्याची भूक भागली का? हो! भागली! परंतु या कर्माला व्यावहारिक मूल्य सुद्धा नाही. असलेच तर negative आहे. आई कितीही प्रेम करीत असली तरी, त्या क्षणाला ती नक्कीच दुखावली.

याच प्रसंगात जर तो फोन बंद करून नीट जेवला, आईला त्याने "तू जेवलीस का" विचारले, जेवण छान झाल्याचे सांगितले, तर तेच कर्म व्यावहारिक दृष्ट्या योग्य होईल. त्याची भूक भागेल व कर्माला व्यावहारिक मूल्यही राहील.

आणखी पुढे जाऊन, त्याच्या हे लक्षात आले की आपल्या घरी खाण्यापिण्याच्या बाबतीत सुबत्ता आहे, प्रेमाने शिजवून वाढणारी आई आहे. हे सुख समाजात बऱ्याच जणांना मिळत नाही. म्हणून त्याने जर यथाशक्ती अन्नदान करायला सुरुवात केली तर त्याच्या कर्माला सामाजिक मूल्य येईल.

हे अन्नदानाचे कर्म त्याने नीतिनियम पाळून, बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता केले तर त्याला नैतिक मूल्य येईल.

आणि सर्वात शेवटी जर त्याने हे कर्म "देवाचेच काम आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे", ह्याच भावनेने, कशाचीही अपेक्षा न करता केले तर त्याला अध्यात्मिक मूल्य येईल. ते कर्म यज्ञार्थ कर्म होईल.

यावरून हे लक्षात येते की प्रत्येक कर्मा मागे असलेली अंतःकरणाची भूमिका त्या कर्माची उंची ठरवते.

फार मोठं सामाजिक कार्य केलं, पण त्यामागे जर "कर्तृत्वाचा मदु" ( मी होतो म्हणून झाले ) असेल किंवा "कर्मफळाचा आस्वादु" ( एवढं मोठं काम केलय, आता एकदा निवडून आलो की चार वर्षे चंगळ ) असेल तर मात्र कर्म जरी वरून चांगले दिसत असले तरी त्यामागची मनोभूमिका चुकीची असल्याने त्याला मूल्य नाही.

माऊलीने नुसते यज्ञार्थकर्म म्हटलेले नाही. नित्ययज्ञ म्हटलेले आहे. कारण यज्ञार्थकर्म नित्य (सतत) व्हायला हवे.

या यज्ञार्थकर्मात आपले शरीर व अंतकरण साहित्य म्हणून वापरायचे आहे. त्यामुळे दोन्ही स्वच्छ व शुद्ध असायला हवीत. स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग असा आहे,


निरोगी निर्मळ असावे शरीर, जाण ते मंदिर देवाजीचे 

मन बुद्धी शुद्ध असो देई नित्य, ते पूजा साहित्य देवाजीचे 

सर्वकाळ चित्त ठेवावे पवित्र, तेचि पूजापात्र देवाजीचे 

सोSहं भावे जीव पूजी नारायणा , सांडूनी मीपणा स्वामी म्हणे 


असे वागल्यास, पापाशी संबंध तरी कसा येईल? इथे पापाची व्याख्या जरा निराळीच घ्यायची. जे कर्म ईश्वरप्राप्तीच्या आड येते, ते पापच! म्हणजे सात्विक कर्म सुद्धा जर अहंभावाने किंवा अपेक्षा ठेवून केले तर ते पापच!

गीतेत भगवंतांनी जे यज्ञार्थकर्म नाही, त्याला अन्यत्र कर्म म्हटले आहे. माऊली त्याला कुकर्म म्हणते. एकूण यज्ञार्थ कर्म सोडून कोणत्याही पद्धतीने कर्म केल्यास, आपण संसारात गुंतत जातो व त्याचे बरे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतात.

जन्माला आल्यावर प्रत्येक माणसाला कर्म चुकलेले नाही. अगदी आळशी माणसाला सुद्धा शारीरिक कर्मे करावीच लागतात. नुसते बसून राहणे सुद्धा शक्य नसते. शरीर हलवावेच लागते. डोक्यात विचार येतातच. मग कर्म करायचेच असेल तर ते जास्तीत जास्त चांगले का करू नये?

इतरांच्या सुखासाठी, उन्नतीसाठी प्रसंगी आपलं सुख थोडं बाजूला ठेवले तर आपले चांगले कार्य यज्ञार्थकर्माकडे झुकते. स्वधर्म आचरल्यास त्यात नाम /ध्यान /उपासना ही कर्मे असतातच. त्यात पावित्र्याची व प्रेमाची भावना असावी. ईश्वर प्राप्तीचं ध्येय असावं. मग ते कर्म "यज्ञार्थ कर्म" होईल.

स्वामी माधवानंद म्हणतात की "कर्मातून दिव्यत्वाकडे जाण्याचा प्रवास म्हणजे यज्ञार्थकर्म". आसक्ती आणि अहंकाराच्या बंधनाने मात्र आपण बांधले जातो. ते बंधन हळूहळू सोडत जाणे, म्हणजेच कर्मयोग.


अनुराधा कुलकर्णी
अनुराधा कुलकर्णी

Comments


bottom of page