स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
- 6 days ago
- 6 min read

अर्जुना समत्व चित्ताचे । तेंचि सार जाण योगाचे ।
जेथ मन आणि बुद्धीचें । ऐक्य आथि ॥२-२७३॥
ही ओवी गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहे .
दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय।बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः॥२-४९॥
अर्थ: हे धनंजया, बुद्धीयोगापेक्षा केवळ सकाम कर्म अत्यंत कमी प्रतीचे आहे. निष्काम बुद्धीयोगाचा आश्रय कर. कारण फलाचा हेतू ठेवून कर्म करणारे निकृष्ट मनोवृत्तीचे असतात.
योगस्थिती साधण्याकरता बुद्धीयोगाचे आचरण कर असे गीतेतील श्लोकात सांगितले आहे. परंतु बुद्धीयोग म्हणजे काय हे या ओवीत स्पष्ट केले आहे.
"जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आथी" - तो बुद्धियोग!
स्वामी स्वरूपानंद या ओवीवर भाष्य करताना आपल्या आजकालच्या मराठीत सांगतात,
मन - बुद्धी माजी, जेथ एक भाव, तया ऐसे नाव, बुद्धी योग! ( अभंग ज्ञानेश्वरी )
म्हणजे ही झाली बुद्धी-योगाची सोपी व्याख्या!
या बुद्धियोगाच्या कसावर आपण आपली सर्व कर्म घासून घ्यायला हवीत. कशी ते आपण उदाहरणाने पाहू!
आपल्या मनाचे काम आहे संकल्प-विकल्प करणे!
मन संकल्प करतं. उद्यापासून सकाळी कामाला जाण्याच्या आधी एक तास व्यायाम व्हायलाच हवा. त्याकरता किती आधी उठायचं हेही ते मन हिशोब करून ठरवते. अलार्म लावते. पहाटे अलार्म होतो. बंद केला जातो. आता उठायला हवे पण विकल्प मनात येतो. उठायलाच हवे का? व्यायाम नाही केला तर खरच काही बिघडेल का? विकल्पाला आधार देण्यासाठी बरीच कारणे मनात येतात. त्याचवेळी बुद्धी व्यायामाचे महत्त्व पुन्हा पुन्हा सांगत असते. या बुद्धीने सांगोपांग विचार करून व्यायाम करायलाच हवा व त्याकरता हीच योग्य वेळ आहे हे ठरवलेले असते. आता ती बुद्धी मनाची विनवणी करत असते की, "उठ बाबा! आपण हे विचार करून ठरवले आहे. आता मागे येणे बरोबर नाही." परंतु मन आणि बुद्धीचे जर ऐक्य नसेल तर विकल्प करणारे हे मनच जिंकते. व्यवहारात यशस्वी असलेल्या बुद्धिनिष्ठ व्यक्तींचे मन त्यांना साथ देताना दिसते. एखादी गोष्ट त्यांच्या बुद्धीला पटली की त्याप्रमाणे ते वागताना दिसतात. परंतु ही व्यावहारिक बुद्धी कोणत्याही प्रकारचे निर्णय घेऊ शकते. अगदी "लाच देणे आवश्यक आहे" इथपासून ते "एखाद्या शाळेला मदत करायला हवी" इथपर्यंत! मात्र ती जर विवेकबुद्धी असेल तर ती फक्त सात्विक आणि त्या पलीकडे जाऊन अध्यात्मिक प्रगतीला योग्य असेच निर्णय घेईल. मन बुद्धीचे ऐक्य असल्यास त्याप्रमाणे वागले जाईल. पहाटे पाच वाजता साधनेला बसायचेच हे एकदा ठरवल्यानंतर त्याप्रमाणे रोज साधना होईलच. हे ऐक्य साधल्यास व त्याप्रमाणे आध्यात्मिक प्रगती झाल्यास , पुढे काय साधेल तर "समत्व चित्ताचे!” हे साधले म्हणजे योग साधला.
"अर्जुना समत्व चित्ताचे । हेच सार जाण योगाचे ॥"
योग म्हणजे परमेश्वराशी ऐक्य /मोक्ष / मुक्ती / Self Realization!
पण हे समत्व म्हणजे काय? समत्व (समता) म्हणजे equality नव्हे. सर्व सारखे आहोत असे समजणे नव्हे. पंत महाराज बाळेकुंद्रीकर म्हणत, "समता म्हणजे यथायोग्यता (appropriateness)". “उन्हाळ्यात झाडाला हळद-कुंकू वाहून, झाड जे खात नाही तो नैवेद्य दाखवण्याऐवजी, त्याला हवं ते खत पाणी नित्य देणे हा योग्य व्यवहार आहे.”
गोंदवलेकर महाराजही म्हणतात की समत्व म्हणजे सर्वांशी सारखा व्यवहार नाही तर सर्वांशी योग्य व्यवहार! घोड्यावरून जावई आल्यावर जावयाला घरात नेऊन जेवायला वाढणे व घोड्याला तबेल्यात नेऊन गवत घालणे , हेच योग्य!
कामावर गेल्यावर सुद्धा वरिष्ठांशी व कनिष्ठाशी सारखेच वागणे बरोबर नव्हे. वागताना योग्य प्रकारेच वागायला हवे. मात्र दोघांबद्दल मनात सारखाच आदर व सारखेच प्रेम असणे ही समत्व बुद्धी!
स्वामी माधवानंद म्हणतात, "समत्वम योग उच्चते" ही गीतेतील योगाची सुंदर व परिपूर्ण व्याख्या आहे.
"युज" म्हणजे जोडले जाणे! एकरूप होणे! ह्या "युज" धातूवरून (क्रियापदावरून ) योग हा शब्द आलेला आहे. चित्त चैतन्याशी जोडले जाणे हा योग. "समत्व" हे पद इथे सामाजिक पातळीवरचे नसून "सर्वाभूती परमेश्वर" या अनुभूतीतून आलेले आहे. जाती, वर्ण, उच्च, नीच, स्त्री-पुरुष हे भेद अध्यात्म व त्यांचे प्रतिपादन करणाऱ्या व्यक्ती मुळातच मानत नाहीत व तसेच भेद ठेवून त्या वागतही नाहीत. ही समता त्यांना साधकावस्थेतच प्राप्त झालेली असते. शेवटी स्वामी माधवानंद असे म्हणतात की समत्व हा शब्द सामाजिक व राजकीय क्षेत्रात खूप वापरला जात असला तरी ती समत्वाची केवळ छाया असते तर अध्यात्मात समत्वाचा प्रकाश असतो.
देखैं अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथ रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृषेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ? ।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।
तसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥
ह्या चार ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेतील पुढील श्लोकाचे विवरण करताना लिहिलेल्या आहेत. मुख्य म्हणजे त्या चारही ओव्या सलग नित्यपाठाच्या ओव्यात स्वामी स्वरूपानंदांनी घेतलेल्या आहेत.
प्रसादे सर्वदु:खानां हानिरस्योपजायते ।प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धि: पर्यवतिष्ठते ॥२-६५॥
अर्थ: चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. चित्त प्रसन्न असणाऱ्याची बुद्धी परमात्मस्वरूपी लवकर स्थिर होते.
दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात भगवंतांनी स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यातील काही श्लोक साधकावस्थेतील व्यक्तींबद्दलचेही आहेत. त्या श्लोकसमूहातील हा एक श्लोक आहे. आधीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे ज्या व्यक्तीचे मन स्वाधीन (स्व-अधीन) आहे, ती व्यक्ती या लौकिकात वावरताना आणि आवश्यकतेनुसार विषय उपभोगत असतानाही प्रीति-द्वेष रहित राहत असल्याने आणि आत्मस्वरूपाशी चित्ताची एकरुपता ढळू न दिल्याने समाधानी राहते. नंतर त्या व्यक्तीला प्रसाद म्हणून प्रसन्नता प्राप्त होते. स्वामी माधवानंद म्हणतात की प्रसन्नतेत शांती, आनंद आणि पावित्र्य असा त्रिवेणी संगम असतो. अशी प्रसन्नता सर्वसाधारण माणसाला क्वचितच लाभते. ज्याला ती अखंडित लाभते त्याच्या अंतःकरणात दुःखाला शिरकाव तरी कसा मिळेल? साहजिकच अशा व्यक्ती लौकिकार्थाने कोणत्याही परिस्थितीत असल्या तरी त्या आतून प्रसन्नच राहतात. ह्या लौकिकातील सुखदुःखे त्यांना लहान मुलांच्या बाहुला बाहुलीच्या खेळातील सुखदुःखांप्रमाणे वाटतात. आपण त्या खेळातील जेवण जेऊन खोटा खोटा ढेकर देऊसुद्धा! परंतु आपल्याकरता तो फक्त खेळ असतो. वास्तवता नाही. तसेच स्थितप्रज्ञाचे अंतकरण परमात्ममय असल्याने, अखंडित प्रसन्न असल्याने. त्याला या लौकिकातील सुखदुःख स्पर्शही करत नाहीत. त्याला आता कशाचीच भूक नसते, हे माऊली फार सुंदर उपमा देऊन सांगते.
जैसा अमृताचा निर्झरू। प्रसवे जायाचा जठरू।
तया क्षुधे-तृषेचा अडदरू।कहींचि नाही ॥२-२३९॥
समजा आपल्यासमोर एखादा तहानेला, भुकेलेला माणूस आला आणि त्याला काहीही देण्याची आपल्या क्षमता असेल तर आपण त्याच्यापुढे अमृताची वाटी ठेऊ. हेच फार झाले. यापुढे काही आपली अक्कल चालणार नाही. परंतु माऊली त्याच्याकडे अमृताचा झराच पाठवते. Continuous supply ! खरंतर अमृताचा एक थेंब सुद्धा अनंतकाळ पुरेल, परंतु उदाहरणच जर द्यायचं झालं तर त्यात त्रुटी कशाला? माऊली पुढे असाही विचार करते की दारात अमृताचा झरा पाठवला, परंतु ह्यानी जर अमृतप्राशन केले नाही तर? कुठेही शंका ठेवायला नको. तेव्हा तो अमृताचा निर्झर अंगणात पाठवण्याच्या ऐवजी त्याच्या पोटातच (जठरू) का पाठवू नये? हाताने उचलून प्यायचीही जरुरी नाही. म्हणून "अमृताचा निर्झरू, प्रसवे जयाच्या जठरू!" आता त्याला कधी तहान भूक लागण्याची जरुरीच नाही . माऊली म्हणते की अगदी असेच त्या स्थितप्रज्ञाचे होते. त्याची बुद्धी परमात्मरूपी स्थिर असल्याने त्याचे हृदय प्रसन्नतेने ओथंबलेले असते. मग त्याला दुःख कसे होणार?
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ?।
तेथ आपैसी बुद्धि राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥
अशा योगयुक्ताचे वर्णन गीतेतील या श्लोकावरील शेवटच्या ओवीत निर्वातीच्या दिव्याची उपमा देऊन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहे. जिथे वारा मुळीच येत नाही, अशा आडोश्याला ठेवलेल्या दिव्याची ज्योत मुळीच फडफडत नाही. ती शांत तेवते व फक्त उर्ध्वगामी असते. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीच्या मनात वासनांचा गोंधळ मुळीच नसतो, ती व्यक्ती अगदी शांत असते तसेच उर्ध्वगामी म्हणजे परमेश्वराशी अनुसंधान ठेवून असते. असा हा योगयुक्त/ स्थितप्रज्ञ अखंडित प्रसन्न असतो. म्हणजे सतत आनंदात, पवित्र भावनेत, शांत असतो हे आपल्याला कळते.
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणें कंपु ।
तसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥
ही फारच उच्च स्थिती झाली परंतु ते आपलेही ध्येय असायला हरकत नाही आजपर्यंत आपण लौकिकातील कितीतरी ध्येय पार करीत आलो आहोत. आता अलौकिकातील ध्येय समोर ठेवून मार्ग आक्रमला तर मनुष्य जन्म सार्थकी लागेल. लौकिकातही आपण समाधानी राहू.
स्वामी स्वरूपानंदांनी म्हटले आहे की,
ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे ।जीवेभावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे ॥
प्रकाशात चालता चालता चालणेचि विसरावे ।भावातीत स्वभावसहज ध्येयी तन्मय व्हावे ॥
आपल्या मनात विचार येईल की "संसारात वासनेशिवाय मी कर्म तरी कसे करणार?" बरोबरच आहे! प्रत्येक कर्मामागे आपली काहीतरी वासना असतेच. तेव्हा आपण हे लक्षात ठेवायचे की कोणत्याही कर्मापेक्षा ते कर्म करण्यामागील भाव महत्त्वाचा असतो. कर्मामागील भाव जर शुद्ध असेल, तर ते कर्म कल्याणकारी होते.
कोणतेही कर्म स्वार्थबुद्धीने न करता जर इतरांचे हित मनात ठेवून केले, सेवा बुद्धीने केले, तर त्याने आपली अंतकरणशुद्धी होते.
संत कबीर म्हणतात,
तन पवित्र सेवा किए, धन पवित्र कर दान,
मन पवित्र हरी भजन कर, होत त्रिविध कल्याण!
या सर्व गोष्टी निदान काही प्रमाणात करणे तरी आपणा सर्वांना शक्य आहे. करता करता जेव्हा त्यामुळे मिळणाऱ्या आनंदाची अनुभूती येईल तेंव्हा अशा प्रकारची कर्मे सहजच जास्त जास्त होत जातील.
कोणतीही गोष्ट सोडायची असेल तर त्यापेक्षा चांगले, काहीतरी दुसरे पकडावे लागते. नुसते सोडायचे म्हणून काहीच सुटत नाही. अगदी सकाळपासून डोक्यात बसलेले न आवडणारे गाणे सुद्धा! तेव्हा जे सोडायचे त्याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करून त्यापेक्षा चांगले काहीतरी धरावे. तामसिक विचार डोक्यात येत असतील तर आवडीचे राजसिक विचार मनात आणावेत. राजसिक विचार मनात असल्यास सात्विक विचारात मन गुंतवावे. शेवटी ईश्वर भावना मनात आणून, नामसाधना/ ध्यानसाधना करण्याचा प्रयत्न करावा.
सर्वांचीच अशी चिंतनप्रवृत्ती नसते. परंतु ते भाविक असतात. त्यांनी दिवसभरात करण्याकरता काही rituals ठरवावी. सकाळी उठल्यानंतर स्वस्थपणे "समुद्रवसने देवी --" हा श्लोक म्हणूनच जमिनीवर पाय ठेवावेत. "कराग्रे वसते लक्ष्मी --" हा श्लोक म्हणूनच ईश्वर स्मरणात दिवसभराच्या कामांना सुरुवात करावी. प्रत्येक वेळी तोंडात घास घालताना भगवंताचे नाम घ्यावे. आपण दिवसभर केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांचा आढावा घेऊन ईश्वराचे नाम घेऊन मगच झोपावे. या छोट्या छोट्या गोष्टी सोप्या वाटल्या तरी नियमितपणे करणे मुळीच सोपे नाही. परंतु हळूहळू या गोष्टींमुळेही प्रगती होते. संसारातील सुखदुःखांच्या लाटा कमी त्रास देतात. आनंद, पावित्र्य, आणि शांती (म्हणजे प्रसन्नता) अंगी मुरू लागते.
करून पाहूया का आपण सर्व प्रयत्न???


Comments