top of page

स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी नित्यपाठ

  • Mar 31
  • 5 min read

देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।

तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥ ३१ ॥  

मार्गीं अंधासरिसा । पुढें देखणाही चाले जैसा ।

अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥ ३२


नित्य पाठातील या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत.


कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादयः।

लोकसंग्रहमेवापि संपश्यन्कर्तुमर्हसि ॥ ३/२०॥ 


अर्थ - जनकादि राजे देखील कर्माद्वाराच परमसिद्धीला म्हणजे ज्ञानपूर्ण अवस्थेला प्राप्त झाले. म्हणून केवळ लोकसंग्रहाकडे पाहता देखील तू कर्तव्य कर्म करणे योग्य आहे.


ह्या भूतलावर राहून ज्यांनी आत्मस्थिती प्राप्त करून घेतलेली असते (Self realized), त्यांना आता स्वतःकरता काहीच करायचे शिल्लक राहिलेले नसते. मग त्यांचे (त्यांच्या देहाचे ) या जगात कर्तव्य काय? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वर महाराज पुढच्या काही ओव्यांमध्ये सांगत आहेत. ते म्हणतात, "होय, त्यांचेही कर्तव्य उरलेले आहे. परंतु ते फक्त लोकालागी ! म्हणजे लोककल्याणार्थ! त्यांना फक्त इतरांच्या भल्या करता जगायचे असते.”

मागच्या लेखात आपण भगवंतांनीच अर्जुनासमोर ठेवलेले जनक राजाचे उदाहरण पाहिले. राज्यकर्तव्य करीत असतानाच त्यांनी आत्मज्ञान मिळवलं आणि दाखवून दिलं की कोणीही आपल्या क्षेत्रात राहून ज्ञानप्राप्तीचे अंतिम शिखर गाठू शकतो. तितकीच महत्त्वाची गोष्ट ही आहे की ज्ञानप्राप्तीनंतरही ते राज्यकर्तव्य करीत राहिले आणि अर्थातच उत्तमात उत्तम राज्यकारभार कसा चालवायचा याचे उदाहरण त्यांनी जगासमोर ठेवले.

सर्वसाधारण माणसे अशा आत्मज्ञानी व्यक्तींच्या वागणुकीकडे पाहूनच शिकू शकतात. त्यांना नुसते सांगून कळण्याची शक्यता कमी असते. आणि म्हणूनच अशा महाजनांना इतरांना मार्गदर्शन करण्याकरता कर्म करणे आवश्यक असते. 

एखाद्या माणसाला जर आपण रस्ता विचारला आणि तो चालतच आपल्याला जिथे जायचे तिथपर्यंत आला, तर आपण चुकायची शक्यताच नसते. मात्र आपण त्याच्याबरोबर चालायला हवे. 

प्रत्यक्षात आपल्या हे लक्षात येते की आत्मज्ञानी व्यक्तींची संख्या जनसंख्येच्या मानाने फारच कमी असते. म्हणूनच संत निर्मित वाङ्मय ते काम करते. आपल्या मराठी लोकांच्या हाताशी तर असे कितीतरी वाङ्मय आहे. मात्र आपलीच ते वाचायची व त्याप्रमाणे आचरण करण्याची शक्ती कमी पडते.


एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । 

तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥ ३३ ॥

हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । 

विशेषें आचरावें । लागे संतीं ॥ ३४ ॥


या ओव्या गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहेत.


यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।

स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।३/२१।।


अर्थ - श्रेष्ठ व्यक्ती जे जे आचरण करते त्या त्या त्याप्रमाणेच इतर समाज वागतो. ती जे काही प्रमाणित करते, समाज त्याला अनुसरून वागतो.


वडील या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ आपण पिता किंवा वयाने मोठी माणसं असा घेतो. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी हा शब्द फार मोठ्या अर्थाने वापरला आहे. त्यांनीच "वडील" चा अर्थ सतराव्या अध्यायातील ८६ व्या ओवीत सांगितला आहे.


परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । 

अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥ ८६ ॥ 


ज्ञानमय उपनिषदे आणि त्यांना अनुसरून आचरण्याची शास्त्र, स्मृतिग्रंथ यामध्ये जी तत्त्वं, प्रमाणं सांगितली आहेत ती ज्यांच्या जीवनात आचरणाने उतरली आहेत, त्या व्यक्तींना "वडील" म्हणायचं. त्यांना ते ग्रंथ पाठ असण्याची आवश्यकता नाही तर त्यानुसार जे वागतात, जे त्यांचे सहजकर्म झाले आहे असे सदवर्तनी, सत्पुरुष, संत हेच वडील!

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चार भावंडांना आळंदीतील धर्मधुरिणांनी पैठणहून शुद्धिपत्र आणण्यास सांगितले होते. मोठे निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वर महाराज हेही त्यावेळी बालवयाचेच असले तरी आत्मज्ञानी होते. त्यामुळे निवृत्तीनाथांनी विचारले की आपल्याला शुद्धिपत्राची आवश्यकताच काय? त्यावेळी ज्ञानदेवांनी त्यांचे मन वळवण्याकरता म्हटले की आवश्यकता आपल्याला नाही परंतु समाजाला आहे. ज्या समाजात आपल्याला कार्य करायचं आहे, स्थूल धर्मधारणांपासून सूक्ष्म तत्त्वांच्या पातळीवर आपल्याला ज्या समाजाला न्यायचं आहे, त्या समाजाच्या सध्याच्या ज्या स्थूलधारणा आहेत, त्यांना धरूनच आपल्याला वागायला हवं. महत्त्वाचं म्हणजे निवृत्तीनाथांनी आपल्याला लहान भावाचं व शिष्याचं ऐकलं. त्यांच्या ठिकाणी अहंकाराचा लवलेशही नव्हता, म्हणूनच !

स्वामी रामसुखदास म्हणतात, देण्याच्या भावाने समाजात एकता, प्रेम निर्माण होते व घेण्याच्या भावाने संघर्ष उत्पन्न होतो.

आत्मज्ञानी व्यक्ती (म्हणजे या ओवीतील वडील) अंतर्यामी नेहमीच ईश्वरी अनुसंधानात असते आणि आपल्याला लाभलेल्या शरीर, मन, बुद्धीचा ( ईश्वराकडून मिळालेली साधनं समजून ) उपयोग फक्त लोकसेवेकरता करते. त्यांची प्रत्येक क्रिया ही इतरांचे हित करणारी असते. 

व्यवहारात सर्वसाधारण माणसालाही हे लागू पडतं. प्रत्येकजण कोणाच्यातरी दृष्टीने वयाने किंवा योग्यतेने वडील ( श्रेष्ठ ) असतो. आई बाबा झाल्यानंतर आधी घरात फक्त नवरा-बायकोच्या नात्यानेच वावरणाऱ्या दोघांनाही वागणं बदलावं लागतं.

इतकंच काय, चार वर्षाची मुलगी दोन वर्षाच्या भावाची ताई असते. आणि तिलाही आपण सांगतो, "अग तू ताई ना, मग त्याला ते खेळणं दे. म्हणजे तोही तुझ्याशी share करायला शिकेल."

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे असं सहजच होतं (हे ऐसे असे स्वभावे). म्हणूनच आत्मज्ञानी व्यक्तींना स्वतः करता काहीही कर्म करण्याची आवश्यकता नसली तरी समाजापुढे आदर्श ठेवण्याकरता विशेषत्वाने चांगले कर्म करावे लागते.

समाजातील श्रेष्ठांकडून, नेत्यांकडूनही निदान काही प्रमाणात तरी ही अपेक्षा असायला हवी. परंतु तसे दिसत नाही. गीता ज्ञानेश्वरीची ओळख नसण्याचा हा परिणाम असावा.

माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे. पालकांना त्यांच्या मुलांना, शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांना, कंपनीच्या मालकाला त्याच्या हाताखालच्या व्यक्तींना, राज्यकर्त्यांना प्रजेला जर काही विशिष्ट प्रकारे वागावयास सांगायचे असेल, तर त्यांनी ते आधी त्यांच्या स्वतःच्या वागणुकीतून दाखवून द्यायला हवे. नुसते सांगून त्याचा काही उपयोग होत नाही.


दीपाचेनि प्रकाशे । गृहीचे व्यापार जैसे, |

देही कर्मजात तैसें । योगयुक्ता ॥ ३५ ॥  

 तो कर्मे करी सकळे । परी कर्मबंधा नाकळे । 

जैसे, न सिंपे, जळी, जळे | पद्मपत्र  ॥ ३६ ॥


या ओव्या गीतेच्या पुढील श्लोकावर आधारित आहेत.


ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति य: |

लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा || ५/१० ||


अर्थ - जो ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून, फलाची आसक्ती टाकून, कर्मे करतो तो कमल पत्र जसे पाण्याने भिजत नाही, तसा पापापासून अलिप्त असतो.


सामान्य माणसाला व्यवहाराचे, लौकिकाचे ज्ञान असते. त्याच्या प्रकाशात जेव्हा तो आपल्या चार-पाच वर्षाच्या मुलाबरोबर समुद्रकाठी वाळूचा किल्ला बांधतो, तेव्हा किल्ला बांधताना तो आपले कौशल्य पणाला लावून आनंदाने मुलाशी खेळत, सुंदर किल्ला बांधतो. परंतु थोड्याच वेळा जेव्हा मोठी लाट येऊन किल्ला वाहून जातो, तेव्हा मुलगा रडायला लागला तरी याला वाईट वाटत नाही. कारण त्याला ते आधीच माहीत होते त्यामुळे त्याची आसक्ती त्याला कधीच नव्हती. क्षणभराची गंमत, एवढीच त्याच्या लेखी त्या किल्ल्याची किंमत होती. अगदी त्याचप्रमाणे आत्मज्ञानी व्यक्ती जेव्हा आत्मज्ञानाच्या प्रकाशात या संसारात वावरते, तेव्हा या संसारातील चांगल्यावाईटाने ती व्यक्ती विचलित होत नाही. संसार अशाश्वत, न टिकणारा आहे हे त्या व्यक्तीला आधीच माहीत असते. त्यामुळे तो संसारात राहूनही पाण्यातील कमलपत्रासारखा अलिप्त राहू शकतो. बाप जसा आपल्या छोट्या मुलाचा किल्ला वाहून गेल्यानंतर त्याला प्रेमाने समजावतो, तसाच तो इतर दुःखी जनांना प्रेमाने समजावेलही. परंतु आतून तो अलिप्त व शांतच राहील. अर्थातच तो कोणत्याही कर्माच्या बंधनात अडकत नाही. कर्म सुरू करण्याच्या आधीपासूनच तो त्या कर्मात अडकलेला नसतो. कोणत्याही कर्माचा त्याला संग नसतो. स्वामी माधवानंद म्हणतात, "कर्तृत्व अर्पण करून अहंकार सोडता येतो. पदार्थ अर्पण करून देवाशी भावनात्मक नातं जोडता येतं. परंतु संग अर्पण करता येत नाही. त्याचा त्यागच करावा लागतो." आणि त्याकरता योगाचाच जोर लावावयास हवा.


तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती । 

परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा ॥ ३७ ॥ 


ही ओवी गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहे.


आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः॥६/ ३२ ॥



अर्थ - हे अर्जुना, सर्व ठिकाणी जो योगी आपल्यासारखे पाहतो, सुख अथवा दुःख हेही जो आपल्यासारखे पाहतो म्हणजे आपल्याहून भिन्न जाणत नाही, तो योगी अत्यंत श्रेष्ठ अशा अवस्थेला पोहोचलेला आहे असे जाणावे. 


या श्लोकात/ ओवीत योग्याच्या श्रेष्ठतम स्थितीचे वर्णन आहे. हा नुसता आत्मज्ञानी नसून आत्मज्ञानाच्या अवस्थेत स्थित झालेला योगी आहे. अर्थात त्याला त्याच्या स्वतःतील आत्मतत्त्व, विश्वातील परमतत्व व आपण भक्तीभावाने ज्याला ईश्वर म्हणतो ते ईशतत्व हे सर्व एकच आहे हे स्वानुभवाने कळलेले असते. गीतेत भगवंत त्याला परब्रह्मच म्हणतात. 

अशा योग्यांबद्दल काहींना असे वाटते की हे असे योगी स्वतः परमोच्च आनंदात असले तरी समाजाला त्यांचा काय उपयोग? त्यापेक्षा समाजाच्या दृष्टीने समाजसेवक बरे! या संदर्भात स्वामी स्वरूपानंदांचा एक सुंदर अभंग आहे.


आणिकांचे सुख देखोनी जो सुखी, होय धन्य लोकी तोचि संत 

आणिकांचे दुःख देखोनिया डोळा, येई कळवळा तोचि संत 

आणिकांचे दोष आणी ना जो मनी, गुणाते वाखाणी तोचि संत 

लोककल्याणार्थ वेची जो जीवित, संत तो महंत स्वामी म्हणे 


असे योगी सर्व जगाच्या सुखदुःखाच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील असतात. विनोबांनी असे म्हटले आहे की हा ज्ञानी पुरुष शोधून शोधून सत्कर्म करीत नाही तर त्याच्याकडून होणारे प्रत्येक कर्म हे सहजच सत्कर्म होते.


देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे ।

परि बैसका न मोडे । मानसींची ॥ ३८ ॥ 


ही ओवी गीतेतील पुढील श्लोकावर आधारित आहे.


अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम्।

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः।।१३/८।। 


अर्थ - अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, सद्गुरुसेवा (आंतर व बाह्य ), शुद्धि, स्थैर्य, अन्त:करणनिग्रह --


गीतेच्या या श्लोकात आत्मज्ञानी व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत त्यावर विवेचन करताना ती खूप दृष्टांत देऊन समजावून सांगितली आहेत. त्यातील "स्थैर्य" या गुणाच्या संदर्भात ही ओवी आहे. 

या जगात वावरताना भौतिक परिस्थिती कशीही असली तरी आत्मज्ञानी व्यक्ती मनाने स्थिर असते. माऊली म्हणते, "तरी बैसका न मोडे मानसीची." खरं तर मनाचा स्वभावच चंचल आहे. मग ज्ञानी माणसाचे मन इतके स्थिर कसे राहू शकते? तर ते भगवंतरुपी खुंट्याला अगदी छोट्या दोरीने बांधलेले असते म्हणून! ते दूर जाऊ शकतच नाही. सुरुवातीला ते मन थोडी हालचाल करण्याचा प्रयत्नही करत असेल, परंतु लवकरच परमोच्च सच्चिदानंदाचा अनुभव घेतल्यावर ते तिथेच आत्मसुखात स्थिर राहते. देह मात्र त्याची कर्तव्यं करीत राहतो. परंतु मनाला बाहेरील सुखदुःखाचा लवलेशही लागत नाही. ही स्थिती समजावून सांगण्याकरता पूर्वीच्या काळच्या जात्याची उपमा दिली जाते. जात्याचा खालचा दगड नेहमी स्थिर असतो. मुळीच हलत नाही. वरचा दगड मात्र गोल गोल फिरतो व त्यामुळेच त्या दोघांमधील धान्य रगडले जाऊन त्याचे पीठ होते. तसेच खालचा दगड म्हणजे मन अगदी स्थिर ठेवून जर माणसाने त्याच्या देहाने फिरत राहून समोर आलेल्या कर्तव्याचे पालन केले, तरच मानव देह मिळाल्याचे सार्थक होते.


अनुराधा कुलकर्णी
अनुराधा कुलकर्णी

Comments


bottom of page