स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी नित्यपाठ
- अनुराधा कुलकर्णी

- Dec 31, 2025
- 5 min read

ते क्रियाजात आघवे|जे जैसे निपजेल स्वभावे
|ते भावना करोनि करावे|माझिया मोहरा ||२५||
ही ओवी गीतेच्या नवव्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे.
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
अर्थ - हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, ते सर्व मला अर्पण कर.
आणि हे कर्म मी कर्ता|कां आचरेन या अर्था |
ऐसा अभिमान झणे चित्ता|रिघो देसी ||२६||तुवां शरीरपरां नोहावें|कामनाजात सांडावे |
मग अवसरोचित भोगावे|भोग सकाळ ||२७||
ह्या ओव्या गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे.
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा |निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वर: || 30||
अर्थ - चित्तवृत्ती माझ्या ठिकाणी ठेवून, माझ्या ठिकाणी सर्व उचित कर्मे समर्पित करून, निरिछ व निरहंकारी होऊन संशय रहित असा तू युद्ध कर.
तू मानसा नियम करीं|निश्चळु होय अंतरी |मग कर्मेंद्रिये व्यापारु|वर्ततु सुखे ||२८||
ही ओवी गीतेतील तिसऱ्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे.
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ 7॥
अर्थ - पण हे अर्जुना, मनाने इंद्रियांचे नियमन करून, जो आसक्त्त न होता, कर्मेंद्रियांनी कर्मयोगाला आरंभ करतो. (म्हणजे कर्मेंद्रिये कर्मात राबवतो), त्याची योग्यता विशेष होय.
परिस पां सव्यसाची |मूर्ति लाहोनि देहाची |
खंती करिती कर्माची|ते गावंढे ||२९||
ही ओवी गीतेतील तिसऱ्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे.
एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ १६ ॥
देख पां जनकादिक|कर्मजात अशेख |न सांडीता मोक्षसुख|पावते जाहले ||३०||
ही ओवी गीतेतील तिसऱ्या अध्यायातील पुढील श्लोकावर आधारित आहे.
कर्मणैव हि संसिद्धिमास्थिता जनकादय: |लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन्कर्तुमर्हसि || 20||
ज्ञानेश्वरी नित्यपाठातील कर्मयोगाच्या काही शेवटच्या ओव्यांचा आढावा आपण घेणार आहोत. गीतेतील तीन, चार, पाच हे अध्याय जरी कर्मयोगाचे असले तरी पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा काही कर्मप्रधान श्लोक येतात. त्यातील काही नित्यपाठाच्या ओव्यात आलेले आहेत.
ते क्रियाजात आघवे -------
आणि हे कर्म मी कर्ता ------
या ओव्यांतून भगवंत सांगत आहेत की तुमची व्यवहारिक आणि उपासनेची कर्मे ईश्वरार्पण करा. प्रत्येक कर्माचा कर्मयोग करण्याची ही एक युक्ती आहे असे म्हणता येईल. कोणतेही कर्म करतांना, ते मी करतो आहे, हा आपला अहंकार त्यात मिसळला असतो. परंतु त्या कर्माचं कर्तृत्व जर ईश्वरार्पण केलं तर तो अहंकार आपोआपच गळून पडेल. फक्त भक्तीभाव शिल्लक राहील. अगदी संकटे सुद्धा ईश्वर कृपेनेच आलेली असतात हे लक्षात ठेवून सर्व कर्म करायची. यापुढील ओवीत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे "ऐसी धुवोनि कर्मे द्यावी माझ्या हाती". आता ही कर्म धुवायची कशी? एखादे फळ आपण धुवून नैवेद्याला ठेवतो. पण कर्म? कर्मांना आपल्या कर्तृत्वाचा मद आणि भोग्तृत्वाची आसक्ती चिकटलेली असते. त्या दोन्ही गोष्टी काढून टाकल्यावर आपले कर्म धुवून पुसून स्वच्छ झालेले असते. ते भक्तीभावाने ईश्वरार्पण करणे सोपे जाते.
आता हे practically का आणि कसे करायचे? दिवसभर सतत "ईश्वरार्पण" "ईश्वरार्पण" असे म्हणत राहायचे का ?
मुळीच नाही. असा या श्लोकाचा किंवा ओव्यांचा अर्थ नाही. समजा एका बाईने फारच चविष्ट भाजी केली. थोडासा विचार करून पहा की त्या भाजीचं सर्व श्रेय फक्त तिलाच मिळायला हवं का? ती ताजी भाजी तिच्यापर्यंत आणण्याकरता किती जणांनी कष्ट घेतले असतील? शेतकरी, transport agency, grocery shop आणि कदाचित दुकानातून ती भाजी घरी आणणारा तिचा नवरा, हे सर्व! तीच गोष्ट तिने वापरलेल्या सर्व मसाल्यांची, शेगडीची, वगैरे वगैरे ! आता या सगळ्यांची आठवण प्रत्येक वेळा करणे तर कठीणच आहे. परंतु या सर्वांच्याही मागे ची अदृश्य शक्ती आहे, तिची जर आपण कोणत्याही गोष्टीचं श्रेय घेताना आठवण ठेवली तर आपल्याला समाधान मिळेल व अहंकारही स्पर्श करणार नाही. हेच ईश्वरार्पण करणे !
तसेच जर प्रत्येक कर्म ईश्वरार्पण करायचे असेल तर ते जास्तीत जास्त चांगले होईल याची आपण काळजी घेऊच. घरी आलेल्या पाहुण्यांना सुद्धा आपण चांगलेच काढून देतो. इथे तर प्रत्येक कर्म ईश्वराकरता करायचे आहे, त्यामुळे ते जास्तीत जास्त चांगलं करण्याची सवय लागू शकेल.
कर्माच्या कर्तृत्वाची जाणीव जर आपल्याला झाली तर ती नैसर्गिकच आहे. एखाद्या इंजिनीयरने जर असामान्य असा पूल बांधला तर त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव होणारच आणि व्हायला हवीच. त्यातूनच त्याचा आत्मविश्वास वाढेल व त्यापेक्षाही चांगली कामे करण्याचा उत्साहही वाढेल. फक्त हे काम करण्यात मदत करणाऱ्यांची आठवण ठेवल्यास व ईश्वरार्पण बुद्धीने कर्म केल्यास, "मीच किती मोठा" या अहंकाराला जागा राहणार नाही. त्यामुळे त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्वही उन्नत होईल.
भगवंत तुझी कर्मे मला अर्पण कर असे म्हणतात, ते त्यांच्या आवश्यकतेकरता नक्कीच नाही. ईश्वराला आपल्यापासून काय मिळवायचे आहे? त्याच्यापासून आपलाच उद्धार होणार आहे.
कोणतेही उपासनेचे कर्म करताना "श्रीकृष्णार्पणमस्तु" किंवा "हरी ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु" असे म्हणण्याची पद्धत आलेली आहे. आपल्याच कल्याणाकरता हे करणे आवश्यक आहे.
आदरणीय पांडुरंग शास्त्रीं आठवले यांनी समाजसेवेचेही खूप काम केले. ते कसे करायचे हे इतरांनाही शिकवले. त्यांचा एक नियम होता. कोणतेही काम करायला जाताना नेहमी कमीत कमी दोघांनी जायचे. एकट्याने कधी नाही. म्हणजे कोणीही कधीही "मी केले" असे म्हणायला नको.
तुवा शरीरपरा नोहावे ------
तू मानसा नियम करी ------
परिस पा सव्यसाची ----
सारखा शारीरिक विषयांच्या मागे लागू नकोस. "मला हेच हवं आणि असंच हवं", अशी इच्छाही करू नकोस कारण "हेच आणि असंच मिळण" हे तुझ्या हातात नाही. कोणतेही कर्म करण्याचे ठरवताना, ते कशाकरता करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे नक्कीच आधी ठरवायला हवे. त्यादृष्टीनेच त्या कर्माची दिशा आणि चालही ठरवायला हवी. परंतु हवे ते काही कारणाने मिळाले नाही तर जे मिळेल ते ईश्वरेच्छा म्हणून आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून आनंदाने स्वीकारायला हवे. प्रसाद आपण कसा खातो? प्रथम आजूबाजूच्या सर्वांना वाटतो आणि मग उरलेला आपण खातो. तो चवीला कसा आहे याची आपण चर्चा करत नाही. परंतु त्याने माझे कल्याणच होणार आहे यावर विश्वास ठेवतो. तसेच आपल्या कर्माचे फळ जे काही चांगले वाईट मिळेल, ते इतरांना थोडे देऊन आनंदाने घ्यावे. आपले भलेच होणार आहे हे समजून भोगावे. हीच वृत्ती आपल्याला समाधान देईल व आपले कल्याण करील.
गृहस्थाश्रमी व्यक्तींनी विषयांचा आस्वाद घेऊ नये, असे गीता सांगतच नाही. पण मालक कोण? "विषय" की "मी स्वतः" हे आपल्यालाच ठरवायला हवे नाहीतर "अमका अमका दारूच्या आहारी गेला", असे आपण ऐकतोच! हे बरोबर नाही, ते आपल्याला कळतेच. परंतु जरा पुढे जाऊन आपल्या पाचही ज्ञानेंद्रियांचे विषय कसे व किती भोगायचे हे आपल्याला ठरविता यायला हवे. विषयांच्या बाबतीत "moderation is the key" हे आपण ऐकत आलेलो आहोच.
ज्ञानेश्वर महाराज येथे स्पष्ट करून सांगत आहेत की तू एक नियम कर, "निश्चळु होय अंतरी!" अंतर्यामी शांत रहा. विषयांच्या तालावर नाचू नकोस. मग ते विषय रसिकतेने जरूर भोग. ते मिळतील तेव्हा त्यांचा मर्यादित प्रमाणात भोग घे. परंतु काही कारणाने ते न मिळाल्यास त्याचा स्वतःवर परिणाम व्हायला नको. ही अर्थातच परमार्थात फार पुढे गेलेल्या व्यक्तीची स्थिती आहे. साधारण व्यक्तीला हे सहज जमणे शक्य नाही. परंतु आपल्याला ज्या वाटेने जायचं आहे ती वाट ही ओवी दाखवते.
गीतेतील हे श्लोक ऐकून/वाचून काही लोक असे म्हणतात की जर विषय भोगायचे नसतील, तर मी कर्म तरी कशाला करू? परंतु आत्ताच आपण स्पष्ट केले की हे श्लोक असं सांगत नाहीत. फक्त "तुझी विषयांवर मालकी की विषयांची तुझ्यावर मालकी" याचा विचार करून मग ते भोग. ते आपोआपच मर्यादित स्वरूपात भोगले जातील. आणि मनुष्यजन्माला आलेल्याला कर्मापासून सुटका नाहीच. आपणास काहीतरी सतत करावेच लागते. अगदी सोफावर पहुडलेला आळशी माणूस सुद्धा काहीतरी फालतू विचार का होईना, पण करतच असतो. तेही कर्मच! मग ते चांगलेच का करू नये? भगवंत म्हणतात की असे असल्यामुळे जे कर्म न करण्याचा विचार करतात, ते अगदीच अडाणी ( गावढे गा ) !
देख पा जनकादिक --------
कर्मयोग कसा आचारायचा हे सांगून झाले. आता तसा कोणी आचरला याचे उदाहरण द्यायला हवे. गीता अर्जुनाला सांगितली असल्याकारणाने, भगवंत आता क्षत्रिय कुलातीलच उदाहरण देत आहेत. सीतेचे वडील जनकराजा राज्य करत असतानाच मोक्ष पावते झाले. अविश्रांत राज्यकर्म करीत असतानाही परमार्थी होता येते, हे आपण या उदाहरणावरून शिकायचं. श्री रामकृष्ण परमहंस यांनी म्हटले आहे की "disinterest towards worldly life is not वैराग्य!" सर्व कर्म करताना काय सोडायचं आहे यापेक्षा काय धरायचं आहे याकडे लक्ष द्यायला हवे. योग्य गोष्ट धरली की चुकीच्या गोष्टी आपोआपच सुटतात. आपल्यासारख्या गृहस्थाश्रमी लोकांना या उदाहरणावरून बरेच शिकता येईल.
देहात असताना आत्मस्थिती प्राप्त करून घेतलेले जे असतात, ते या भूतलावर कोणत्या प्रकारची कामे करतात, हे नित्य पाठातील पुढील ओव्यात सांगितले आहे. ते पुढच्या लेखात पाहू.


Comments