top of page

सफर-ए-गज़ल

आधीच्या माझ्या लेखात म्हटल्याप्रमाणे आपल्या देशामध्ये खूप प्रतिभावान गज़लकार होऊन गेलेत. आपण थोडी गजलेबाबत आणि त्या प्रख्यात शायरांबद्दल त्या लेखामधून माहिती मिळवली. त्यावरून मला एक कल्पना सुचली की त्यांच्या काही मोजक्या पण सुंदर लोकप्रिय गज़ला घेऊन त्यांचं रसग्रहण आपल्या त्रिवेणीच्या मराठी वाचकांसाठी करावं.

तर आज सुरुवात मिर्झा असदउल्ला खान गालिब यांच्या एका सुंदर गजलेने करूया. खरंतर गालीबची कुठली गज़ल घ्यावी आणि कुठली नाही हा एक मोठा प्रश्नच आहे. तरीही मी धाडस करून त्याची प्रसिद्ध गजल "आह को चाहिए ईक उम्र" ही या पहिल्या लेखासाठी निवडली आहे. ही गालिबची सर्वोत्तम गज़ल आहे, त्याच्या या काव्याचे खरंतर अनेक अर्थ निघू शकतात. पण माझे अर्थबोधन (interpretation) मी इथे मांडतो.

आह को चाहिए ईक उम्र असर होने तक

कौन जीता है तेरी ज़ुल्फ़ के सर होने तक

*आह - उसासा (sigh)

*उम्र - आयुष्य/मोठा काळ

*असर - परिणाम

या शेरामध्ये गालिब एका व्याकूळ प्रियकराची कैफियत मांडताना दिसतो. असा प्रियकर जो खूप काळ उसासे टाकत प्रेयसीची वाट पाहतोय आणि तरीही त्याला हवा तो परिणाम होत नाहीये. गालिब पुढे म्हणतो की त्या प्रियकराची अवस्था बिकट झाली आहे आणि तो कदाचित अजून एवढा वेळही जगणार नाही जितका त्याची प्रेयसी तिचे विस्कटलेले केस सावरण्यासाठी घेते.

आशिक़ी सब्र-तलब और तमन्ना बेताब

दिल का क्या रंग करूँ ख़ून-ए-जिगर होने तक

*सब्र-तलब - संयम-शोध (quest)

*बेताब - अधीर

या शेरामध्ये गालिब म्हणतो प्रेमासाठी संयम हवा पण त्याचवेळी इच्छा व्यक्तीला अधीर करतात. तो तोल सांभाळावा लागतो, नाही तर या संयम आणि उत्कट अधीरतेच्या तीव्र खेचाखेचीत प्रियकराचे हृदय रक्तबंबाळ होते.

हम ने माना कि तग़ाफ़ुल न करोगे लेकिन

ख़ाक हो जाएँगे हम तुम को ख़बर होने तक

*तग़ाफ़ुल - बेपर्वाईने दुर्लक्ष (तग़ाफ़ुल वरून 'गाफिल' हा शब्द आला आहे. याचा वापर झिहाले-मिस्किन मध्ये खुसरोनेही केलाय) 

पुढे शायर म्हणतो - की त्याला मान्य आहे त्याची प्रेयसी मुद्दाम त्याची उपेक्षा करणार नाही किंवा दुर्लक्ष करणार नाही. पण त्याला ही भीती आहे की जोपर्यंत प्रेयसीला समजेल, तोपर्यंत तो ख़ाक (राख) होऊन गेला असेल.

ग़म-ए-हस्ती का 'असद' किस से हो जुज़-मर्ग इलाज

शम्मा हर रंग में जलती है सहर होने तक

*ग़म-ए-हस्ती - दुःखव्यापी आयुष्य

*असद - मिर्झा गालिबचे नाव

*जुज़-मर्ग - मृत्यू शिवाय (मर्ग म्हणजे मृत्यू/शेवट)

*शम्मा - ज्योत

*सहर - प्रातःकाळ

हा शेर एका अर्थी जीवनाचा फलसफा (philosophy) देतो. हा शेवटचा शेर म्हणजे मक्ता आहे. यात गालिब आपला 'असद' असा तखल्लुस देतो आणि स्वतःलाच विचारतो की हे आयुष्य दुःखानं भरलेले आहे आणि त्यावर मृत्यू शिवाय दुसरा काही इलाज आहे का? पण जे काही असो ही जीवन-ज्योत सर्वप्रकारच्या कष्टातून जाऊनही जळत राहते, सकाळ होईपर्यंत (इथे सकाळ याचा अर्थ मोक्ष असा होऊ शकतो).

मित्रांनो जगजीत सिंग यांनी गायलेली ही नितांत सुंदर गझल आहे. जर वाटलं तर नक्की ऐका. हा माझा प्रयत्न कसा वाटला ते कळवा आणि नवीन गझला घेऊन मी हा उपक्रम चालू ठेवावा असे वाटले तर तेही नक्की सांगा.

धन्यवाद 

Note : मूळ गझल खूप मोठी आहे. मी केवळ चार शेर निवडले आहेत.

Reference : rekhta.org


सचिन सोनटक्के
सचिन सोनटक्के


Comments


bottom of page