top of page

नेहा शेट्टीगर : बहुआयामी कलाकार

Oct 1
6 min read

Updated: Oct 2

चित्रकलेची उपजत आवड, अभिनयाची ओढ, नेपथ्याची सर्जनशीलता, मुलांना शिकवण्याचा प्रवास आणि वयाच्या
पन्नाशीत पूर्ण मॅरेथॉनचे स्वप्न—नेहा शेट्टीगर यांच्या बहुआयामी कलाप्रवासाची कहाणी.

मुलाखत-आधारित विशेष लेख


कलेशी नातं कधी एका माध्यमापुरतं मर्यादित राहत नाही. रेषा आणि रंगांपासून सुरू झालेला प्रवास अभिनय, जाहिरात, अॅनिमेशन, अध्यापन, नेपथ्य, दिग्दर्शन, लेखन, नृत्याच्या सादरीकरणासाठीची निर्मिती आणि अगदी स्वयंपाक व धावण्यापर्यंत विस्तारू शकतो. नेहा शेट्टीगार यांच्या अनुभवांतून हीच बहुआयामी सर्जनशीलता दिसून येते.


नेहा, चित्रकला आणि स्केचिंगची आवड तुला कुठून आली?

माझे आई आणि वडील दोघेही कलाकार आहेत आणि दोघांचेही शिक्षण बीएफए झालेले आहे. माझे वडील जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यामुळे चित्रकलेची आवड मला उपजतच आली असावी, असं मला वाटतं. लहानपणापासून चित्र काढायला मला आवडायचं.

मात्र माझ्या या क्षेत्रात येण्याबाबत वडिलांची सुरुवातीला अजिबात इच्छा नव्हती. त्यांना वाटायचं की कला क्षेत्रात करिअर केलं तर आर्थिक स्थैर्य मिळेलच असं नाही. म्हणून त्यांनी मला केळकर कॉलेजमध्ये मानसशास्त्र, अर्थशास्त्र यांसारखे विषय घेऊन शिक्षण घ्यायला लावलं. पण बारावीनंतर मी ठरवलं—आता पुढे हे करू शकत नाही. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत चिडून माझ्या मावशीकडे पुण्याला गेले, तिथे मला माझे बाबा भेटायला आले. त्यांना माझं म्हणणं पटलं आणि शेवटी रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तिथे माझ्या आईचंही शिक्षण झालं होतं.

माझ्या शेवटच्या वर्षापर्यंत वडील कॉलेजमध्ये आले नाहीत. पण मला सलग तीन वर्षे 'Best Drawing of the Year' मिळालं. माझे प्रिन्सिपल घरी आले होते, कारण माझ्या पालकांची उपस्थिती नसल्याने त्यांना वाईट वाटत होतं.

तुझ्या शिक्षणानंतरचा व्यावसायिक प्रवास कसा सुरू झाला?

कॉलेजमध्ये असतानाच मला कामाचा अनुभव घ्यायचा होता. दुसऱ्या वर्षापासून मी नोकरी सुरू केली. मंगलप्रसाद लोढा यांच्या 'माईंडवेअर' जाहिरात एजन्सीत लोगो, जाहिरातींचे फॉरमॅट्स, मॅगझीन ग्राफिक्स आणि इव्हेंटसाठी बॅकड्रॉप्स अशी कामं केली. 'बॉम्बेबाजार' या चॅनलचा लोगोही मी तयार केला होता.

त्यानंतर मी UTVमध्ये अॅनिमेशनसाठी काम केलं. त्या काळात अॅनिमेशन आजच्यासारखं डिजिटल नव्हतं. जपानी अॅनिमेटेड चित्रपटांच्या प्रोजेक्ट्ससाठी प्रत्येक अॅक्शन हाताने काढावी लागायची. लाईटबोर्डवर काम करताना डोळ्यांवर ताण यायचा, पण काम आवडत असल्यामुळे मी ते एन्जॉय केलं.

अभिनयाचीही तुला आवड होती. तो प्रवास कसा राहिला?

शाळा आणि कॉलेजमध्ये मी अभिनय करत होते. मला अभिनयाच्या क्षेत्रात जावं की कला क्षेत्रात, याबाबत खूप द्विधा मनस्थिती होती. 'अविष्कार'सारख्या नाटकांच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि प्रोफेशनली अभिनय करावा अशी कल्पनाही मनात होती.

लग्नानंतर मात्र अभिनयाचा व्यावसायिक प्रवास पुढे गेला नाही. माझ्या नवऱ्याला वाटत होतं की अभिनय क्षेत्रामुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मी तो निर्णय स्वीकारला. त्याचा मला आज रिग्रेट नाही; माझं फॅमिली लाईफ छान गेलं. आणि आता मला पुन्हा अभिनय करण्याची संधी मिळते आहे.

अमेरिकेत आल्यानंतर drawing classes घ्यायला कसे सुरू केलेस ?

लग्नानंतर सिंगापूरला गेले, त्यानंतर मुलाच्या जन्मामुळे ब्रेक घेतला. पुण्यात असताना वडिलांच्या प्रकृतीमुळेही मोठा गॅप गेला.

नंतर अमेरिकेत आले तेव्हा H-4 व्हिसामुळे सुरुवातीचे दोन-तीन महिने काही करता येत नव्हतं. त्यामुळे एक प्रकारची पोकळी जाणवत होती.

माझ्या एका मैत्रिणीने मला 'क्लासेस घे' असं सांगितलं. तिची मुलगी सानिका ही माझी अमेरिकेतील पहिली विद्यार्थिनी ठरली. तिच्यापासून क्लास सुरू झाला आणि सॅन होजे येथे माझ्याकडे लवकरच ३५-४० विद्यार्थी झाले.


मी संयुक्त कुटुंबात १६ माणसांमध्ये वाढले. मोठी असल्यामुळे लहान भावंडं आणि चुलत भावंडांची काळजी घेण्याची सवय होती. त्यामुळे मुलांबरोबर काम करणं मला सहज जमलं. चित्रकलेची आवड, त्याचं शिक्षण आणि मुलांमध्ये रमण्याची क्षमता—या सगळ्यांमुळे मी कधी शिक्षिका झाले हे मलाच कळलं नाही.

“तू करू शकतेस.” — नेहाच्या प्रवासात योग्य वेळी मिळालेल्या मित्रांच्या प्रोत्साहनाची ही भावना फार महत्त्वाची ठरली.

सिनसिनाटीत आल्यावर तुझ्या कलाप्रवासाला कसा आकार मिळाला?

आम्ही २००९ मध्ये सिनसिनाटीत आलो. इथे कोणालाच ओळखत नसताना माझ्या मैत्रिणीने 'त्रिवेणी'च्या कार्यक्रमांसाठी

डेकोरेशनमध्ये मदत करशील का, असं विचारलं. तिथून पुन्हा क्लासेस सुरू करण्याची संधी मिळाली. काही महिन्यांतच मी इथेही चित्रकलेचे वर्ग सुरू केले.

माझ्या आयुष्यात मला खूप चांगले मित्र मिळाले, ज्यांनी 'तू करू शकतेस' असा आत्मविश्वास दिला. अमेरिकेत H-4 वर येणाऱ्या व्यक्तींना सुरुवातीला काही करता येत नसल्याची भावना असू शकते; पण मला देवाच्या कृपेने चांगली माणसं भेटली आणि मार्ग खुलत गेले.


तू चित्रकलेबरोबर आणखी कोणकोणते प्रयोग केलेस?

मी मुलांचे कॅम्प्स घेतले, कमिशनवर पेंटिंग्स केली. स्वतःचं काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे बर्थडे पार्टीचे ऑर्डर्स, डेकोरेशन, कस्टमाइज्ड डिझाइन्स, कटआउट्स आणि केक डेकोरेटिंग अशीही कामं केली. केक डेकोरेटिंगचा कोर्स करून मी अनेक ऑर्डर्स घेतल्या. नंतर मात्र मेहनत खूप आणि पैसे मिळवताना अडचणी येत असल्यामुळे ते काम बंद केलं आणि क्लासेसवर अधिक लक्ष दिलं.

भारतात आणि अमेरिकेत मिळून मी हजाराहून अधिक मुलांना शिकवलं असेल, असं मला वाटतं. त्याचबरोबर कमर्शियल पेंटिंग, कमिशन पेंटिंग आणि भिंतीवरील म्युरल्सही करते.

“मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं.”

नेपथ्य आणि रंगमंचाशी तुझं नातं कसं जुळलं?

सिनसिनाटीत सुरुवातीला 'त्रिवेणी'च्या नाटकाच्या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला, पण लगेच संधी मिळाली नाही. २०१६ मध्ये 'शांतेचं कार्ट चालू आहे' या नाटकासाठी सेट्स बनवायला सुरुवात केली. २०१७ मध्ये 'होऊ द्या खर्च'साठी सेट केला आणि त्यात एक छोटासा संवादही मिळाला. २०१८ मध्ये 'तुझं आहे तुजपाशी'साठी बॅकस्टेजला काम केलं.

सेट डिझाईन मला खूप आवडतं. 'हिमालयाची सावली'साठी विहीर बनवायची होती; ती मी डायनिंग टेबल उलटं करून तयार केली होती. मिराजदारांच्या नाटकासाठी चूल बनवली. प्रत्येक प्रॉप आणि सेटवर मेहनत घ्यायला मला आवडतं. मला आव्हानं आवडतात.

“मला आव्हानं आवडतात.”

कला सन्मान आणि त्रिवेणीच्या कार्यक्रमांमध्ये तुझ्या नेपथ्याची मोठी भूमिका राहिली आहे. तुझी प्रक्रिया काय असते?

भारतातून नाटक आलं की त्यांच्याकडून डिझाइन पाठवलं जातं. अनेक वर्षांच्या कामामुळे दिग्दर्शक आणि डिझाइनर्ससोबत चांगला रॅपो तयार झाला आहे. संदेश बेंद्रे किंवा प्रदीप मुळ्ये यांच्याशी थेट बोलून गरज समजून घेते. त्यानुसार इथे उपलब्ध साधनं आणि बजेट लक्षात घेऊन सेट उभा करते.

आपल्याकडे बजेट मर्यादित असतं. त्यामुळे सगळं मिळवून-जुळवून करावं लागतं. मला वाटतं, कला सन्मान किंवा रंगमंचच्या नाटकांमध्ये आपली एक खास ओळख म्हणजे सेट्स. कलाकारांबद्दल आपण बाहेर बोलतोच, पण त्रिवेणीच्या कार्यक्रमांमध्ये सेट्सही विशेष जाणवतात.


अभिनय आणि नेपथ्य—यापैकी तुला काय जास्त आवडतं?

दोन्ही. लहानपणापासूनच कला आणि अभिनय यांच्यामध्ये माझी द्विधा मनस्थिती होती. मला दोन्ही तितकंच आवडतं आणि दोन्हीमध्ये सर्वोत्तम करण्याची इच्छा असते. घरातही कोणी आलं की त्यांच्या मनोरंजनासाठी काहीतरी करून दाखवायची माझी सवय होती.


लेखन, पाककला आणि इतर कलाप्रयोगही तू केलेस. त्याबद्दल सांग.

त्रिवेणीत मी प्रेसिडेंट असताना 'संवाद' हे newsletter ची सुरुवात केली कारण आपल्याकडे लेखक, कवी, चित्रकार आहेत, त्यांच्याही  कलांना वाव मिळावा. तेंव्हा ते दिवाळी अंक म्हणून प्रकाशित केलं होतं. त्या दिवाळी अंकांसाठी कव्हर पेज मी स्वतः पेंट केलं. मी आत्ताच्या संवाद वृत्तांतही कविता लिहिते. लेखनाची आणि कविता करण्याचीही मला आवड आहे—ही आवड माझ्या आईकडून आली असावी. आधी वाचनाची आवड आणि मग लेखनाची. लहानपणी खूप पुस्तके वाचली. मी माझ्या घरी गणपती बसवते त्याचं डेकोरेशन मी स्वतः करते. दर वर्षी वेगवेगळी थीम घेऊन मी डेकोरेशन करत असते. हि आवड मला लहान पणापासून आहे. घरी सगळे आर्टिस्ट पण आमच्या घरच्या गणपतीचे डेकोरेशन मी लहान असल्यापासून करतेय. ते बघायला खूप लोक येतात. 'त्रिवेणी'चा गणपती असतो, त्यात मी खूप आनंदाने काम करते. त्याचंही सजावटीचे काम करते.  

माहेरी कायम नातेवाईकांची ये-जा आणि कुटुंब परिवार मोठा असल्याने एकावेळी भरपूर जेवणावळी बघायची सवय होती. पण जेवण बनवण्याची सवय नव्हती. लग्न झाल्यावर स्वयंपाकाची मला आवड लागली. अनेक माणसांचा स्वयंपाक मी एकटीने केला आहे. नवीन पदार्थ करून लोकांना खायला घालणं मला खूप आवडतं. गणपती दर्शनासाठी माझ्याकडे ४०० हून जास्त माणसं येतात आणि सगळे जेवून जातात.  

मी नाटकाचे सेटस बनवायचे तसे त्रिवेणीच्या कार्यक्रमाचे पण बॅकड्रॉप सेट्स बनवते. डान्ससाठी कोरिओग्राफीचे सेट्सही बनवले आहेत. धनलक्ष्मीच्या 'नृत्यरंग' कार्यक्रमासाठी तिला ट्रेन हवी होती, म्हणून मी ट्रेन बनवली. तिच्याच एका मुलांच्या मावळ्यांच्या डान्ससाठी तटबंदी तयार केली आणि त्यावरून मुलं उड्या मारू शकतील, अशी तिने कोरिओग्राफी केली होती आणि तशी मी तटबंदी बनवली.

समाजासाठी आणि त्रिवेणीसाठी तुझा सहभागही सातत्याने राहिला आहे.

२००९ पासून मी त्रिवेणीच्या विविध कामांमध्ये जोडलेली आहे. दोन वर्षे प्रेसिडेंट होते, नंतर सोशल कमिटीवर काम केलं. २००९ च्या दिवाळीपासून त्रिवेणीच्या कार्यक्रमांसाठी बॅकड्रॉप्स बनवायला सुरुवात केली. नाटकांबरोबर इतर कार्यक्रमांचेही बॅकड्रॉप्स केले.

“पदापेक्षा सहभाग महत्त्वाचा आहे.”

आता नवीन लोक पुढे येत आहेत. प्रेसिडेंट असणं आवश्यक नाही; त्रिवेणीचा कार्यक्रम आहे म्हणून आपण मदत करू शकतो. पदापेक्षा सहभाग महत्त्वाचा आहे, असं मला वाटतं.

आणि आता तुझं पुढचं आव्हान—मॅरेथॉन?

माझा नवरा नरेश शेट्टीगर त्रिवेणीमध्ये प्रेसिडेंट असताना त्याने २०२२ मध्ये देवल मोटका हिला सोबत घेऊन सर्व सभासदांसाठी  5K रनिंगचा एक उपक्रम केला होता. तिथे मी पहिल्यांदीच 5K धावले आणि मग मी त्याच्या पुढच्या वर्षी flying pig competition मध्ये भाग घेऊन आधी 10K मॅरेथॉन धावले. पुढे हाफ मॅरेथॉन केल्या. आता वयाच्या ५०व्या वर्षी मला फुल मॅरेथॉन करायची इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या शरीराला ट्रेन करते आहे.

मला ट्रेडमिलवर धावायला आवडत नाही; मी बाहेर जाऊन पळते. याआधी मी स्वतःला अशा प्रकारे पुश केलं नव्हतं. पण मला वाटतं, आपण स्वतःलाच आव्हान दिलं पाहिजे.

“आपण स्वतःलाच आव्हान दिलं पाहिजे.”

तुझ्या या सगळ्या उपक्रमांकडे पाहिलं तर एक समान धागा दिसतो—सर्जनशीलता आणि लोकांमध्ये रमणं. तुला याचं कारण काय वाटतं?

मला वाटतं हे सगळं मला नैसर्गिकपणे जमतं. १६ माणसांच्या घरात वाढल्यामुळे लोकांमध्ये राहण्याची आणि अनेकांसाठी काहीतरी करण्याची सवय लागली. मला लोकांना खायला घालायला आवडतं, मुलांमध्ये रमायला आवडतं, कला करायला आवडते आणि नवीन आव्हानं स्वीकारायला आवडतात.


नेहा शेट्टीगार यांचा प्रवास एका कलाकाराचा सरळसोट करिअर-प्रवास नाही; तो संधी, अडथळे, कुटुंब, मैत्री, समुदाय आणि सतत काहीतरी नवं करण्याच्या इच्छेने घडलेला प्रवास आहे. चित्रकलेपासून अभिनयापर्यंत, नेपथ्यापासून दिग्दर्शनापर्यंत आणि रंगमंचापासून मॅरेथॉनच्या ट्रॅकपर्यंत—त्यांच्या कथेत एक गोष्ट सातत्याने दिसते: कल्पना मनात आली की ती प्रत्यक्षात आणण्याची तयारी.


मुलाखतकार


राजेश सहस्रबुद्धे
राजेश सहस्रबुद्धे
धनलक्ष्मी कुलकर्णी
धनलक्ष्मी कुलकर्णी


Comments


bottom of page