"जुन्या हॉटेलांना स्मार्ट बनवण्याचा आमचा प्रयत्न"
- 6 days ago
- 4 min read

द्वारपालचे सहसंस्थापक सुधांशू पत्की आणि नितीन करंडे यांच्याशी संवाद (https://dwarpaal.com/)
आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाच्या मदतीने पारंपरिक उद्योगांमध्ये मोठे बदल घडत आहेत. अशाच एका नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. "द्वारपाल" या तंत्रज्ञान स्टार्टअपने हॉटेल उद्योगासाठी कमी खर्चात स्मार्ट ऍक्सेस कंट्रोल, ऊर्जा व्यवस्थापन आणि IoT आधारित उपाय विकसित केले आहेत. या उपक्रमामागील प्रवास, आव्हाने आणि यशोगाथा जाणून घेण्यासाठी आम्ही द्वारपालचे सहसंस्थापक सुधांशू पत्की आणि नितीन करंडे यांच्याशी संवाद साधला.
सर्वप्रथम, तुमच्या दोघांच्या पार्श्वभूमीबद्दल थोडं सांगा.
सुधांशू पत्की: मी मूळचा सोलापूरचा. पुण्यात VIT कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग केलं. खरं सांगायचं तर माझं स्वप्न UPSC करून प्रशासनात जाण्याचं होतं. पण परिस्थिती बदलत गेली आणि मी IT क्षेत्रात आलो. Cognizant मध्ये अनेक वर्षे काम करताना प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, डिलिव्हरी आणि मोठ्या एंटरप्राइज सिस्टीम्स कशा उभ्या करायच्या हे शिकलो. नंतर Oracle मध्ये गेलो, जिथे स्केलेबल प्रॉडक्ट्स, एंटरप्राइज ग्राहक आणि व्यवसायिक दृष्टिकोन अधिक जवळून समजला. त्यानंतर स्टार्टअप जगतात प्रवेश केला आणि तिथून उद्योजकतेचा प्रवास सुरू झाला.
नितीन करंडे: माझं गाव सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी. शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं. 2003 नंतर पुणे, हैदराबाद आणि मग अमेरिकेत असा प्रवास झाला. Cognizant मध्ये काम करताना डेटा, टेक्नॉलॉजी आणि मोठ्या प्रमाणावरील प्रणाली यांचा अनुभव मिळाला. माझी भूमिका अधिक तांत्रिक होती, तर सुधांशू व्यवसाय विकासाच्या बाजूला काम करत होता. पुढे द्वारपालमध्येही हेच संतुलन कायम राहिलं.
द्वारपालची कल्पना नेमकी कशी सुचली?
सुधांशू पत्की: कोविडच्या काळात आम्ही दोघे काहीतरी नवीन करण्याबद्दल चर्चा करत होतो. आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण काहीतरी स्वतःचं उभारण्याची इच्छा होती. त्याच सुमारास मला अमेरिकेतील एका सरकारी प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्या प्रकल्पात प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश नियंत्रण (Access Control) आणि आरक्षण प्रणाली विकसित करण्याचं काम होतं.
तिथून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली—एखाद्या जागेत लोकांना डिजिटल पद्धतीने प्रवेश देणं किंवा बंद करणं हा मोठा आणि वाढता विषय आहे. मग आम्ही विचार केला की अशी गरज केवळ सरकारी क्षेत्रातच नाही, तर व्यावसायिक क्षेत्रातही असू शकते.
मग हॉटेल उद्योगावरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय कसा घेतला?
सुधांशू पत्की:आम्ही अनेक हॉटेल मालकांशी चर्चा केली. त्या संवादातून एक गोष्ट स्पष्ट झाली की बहुतांश इकॉनॉमी हॉटेल्सना डिजिटल व्हायचं आहे, पण त्यांच्याकडे नवीन स्मार्ट लॉक बसवण्यासाठी आवश्यक भांडवल नसतं. प्रत्येक लॉक बदलणं खूप महाग होतं.
मग आम्ही विचार केला—जुने लॉक बदलण्याऐवजी त्यांनाच स्मार्ट बनवता येईल का?
याच प्रश्नातून द्वारपालच्या पहिल्या उत्पादनाची कल्पना जन्माला आली.
द्वारपालचं उत्पादन नेमकं काय करतं?
नितीन करंडे:द्वारपालचं मुख्य उत्पादन एक छोटंसं इलेक्ट्रॉनिक मॉड्यूल आहे. हे मॉड्यूल विद्यमान RFID लॉकमध्ये बसवता येतं आणि त्या लॉकला क्लाउडशी जोडतं. म्हणजे संपूर्ण लॉक बदलण्याची गरज नाही.
पुढे आम्ही याच तंत्रज्ञानाचा वापर EV चार्जर्स, थर्मोस्टॅट्स आणि इतर IoT उपकरणांसाठीही केला. त्यामुळे हॉटेलमधील अनेक सुविधा एका एकत्रित प्रणालीद्वारे नियंत्रित करता येतात.
एका हॉटेलमध्ये याचा वापर कसा होतो?

सुधांशू पत्की: समजा एखादा पाहुणा रूम 101 मध्ये राहतो. चेक-इन होताच त्याला डिजिटल प्रवेश दिला जातो. त्याच्या रूमचा दरवाजा, इमारतीचा प्रवेशद्वार, स्विमिंग पूल, EV चार्जर आणि इतर अधिकृत सुविधा एका डिजिटल प्रणालीद्वारे नियंत्रित करता येतात.
संपूर्ण अनुभव मोबाईल-केंद्रित आणि संपर्कविरहित (Contactless) बनतो.
लॉकपासून ऊर्जा व्यवस्थापनापर्यंतचा प्रवास कसा झाला?
नितीन करंडे: ग्राहकांकडून सतत अभिप्राय मिळत होता. त्यातून लक्षात आलं की हॉटेल्सना ऊर्जा खर्च कमी करणे हीदेखील मोठी गरज आहे.
मग आम्ही स्मार्ट थर्मोस्टॅट्स विकसित केले. आमची प्रणाली पाहुणा चेक-आऊट करताच खोली इको मोडमध्ये टाकते. नवीन पाहुणा येण्याच्या काही तास आधी खोली पुन्हा आरामदायी तापमानावर आणली जाते.
या प्रणालीमुळे हॉटेल्सना वार्षिक वीज खर्चात साधारण 14 ते 17 टक्क्यांपर्यंत बचत करता येते.
स्टार्टअपच्या सुरुवातीच्या काळातली एखादी संस्मरणीय घटना?
सुधांशू पत्की (हसत): अशा घटना खूप आहेत! सुरुवातीला आम्ही स्वतः गाडी चालवत हॉटेलांमध्ये जाऊन लॉक बसवायचो. बर्फात उभं राहून वायरिंग केलं आहे. पहिल्या काही इंस्टॉलेशन्समध्ये अनेक समस्या आल्या. ग्राहक नाराज झाले, परत परत जावं लागलं.
पण आम्ही हार मानली नाही. प्रत्येक वेळी जाऊन समस्या सोडवत राहिलो. आज त्या सुरुवातीच्या ग्राहकांपैकी काही आमचे सर्वात विश्वासू ग्राहक आहेत.
मराठी माणूस व्यवसायात पाऊल टाकण्यास का संकोच करतो, आणि तुमचा स्वतःचा अनुभव काय होता?
सुधांशु पत्की: मराठी माणसाचं मध्यमवर्गीय संस्कार आणि सुरक्षित नोकरीची ओढ हे मुख्य कारण आहे. आम्ही स्वतःही अगदी असेच होतो — जॉब सोडायची हिम्मत होत नव्हती. म्हणूनच आम्ही सुरुवातीला जॉब सांभाळत साईड बाय साईड व्यवसाय सुरू केला. आमच्या घरचेही म्हणायचे, "चाललंय बरं, कशाला हे नसते उद्योग हवेत?" — पण जेव्हा शून्यातून एक झालं, म्हणजे आमच्या प्रॉडक्टला बाजारात मागणी आली, तेव्हाच आम्ही पूर्णवेळ व्यवसायात उतरलो. आम्ही गुजराती माणसासारखं शून्यावरच जॉब सोडला नसता — आम्ही कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. आणि आता पुन्हा विचाराल तर नक्की करू — कारण रोज स्वतःला आवडतं ते काम करण्यात एक वेगळंच समाधान आहे.
गुजराती समाजाच्या व्यावसायिक एकजुटीतून मराठी माणसाने काय शिकावे? "गर्जे मराठी" सारख्या संस्था किती उपयुक्त आहेत?
सुधांशु पत्की: गुजराती लोकांनी हॉस्पिटलिटी क्षेत्रात जी इकोसिस्टीम उभी केली आहे ती अत्यंत प्रेरणादायी आहे. एखाद्या छोट्या गावातनं आलेला माणूस हायवेवरचं हॉटेल घेतो, पूर्ण कुटुंब राबतं, थोडे पैसे मिळतात, अजून एक हॉटेल काढतात, गावातल्या दुसऱ्या माणसाला बोलावतात — अशी साखळी ते बनवतात. त्यांच्या छोट्या गावागावांच्या फंडिंग संस्था आहेत. "अहवा" म्हणजे त्यांची राष्ट्रीय संस्था आहे ज्यात हजारो लोक सहभागी होतात.
आमच्यासाठी "गर्जे मराठी" ही तशीच संघटना आहे. आनंद गानू म्हणून जे सॅन फ्रान्सिस्कोला आहेत त्यांनी सुरू केलेली ही संस्था खूप महत्त्वाची आहे. तिथे फक्त मराठी कंपन्यांनी पिच केलं, महाराष्ट्र सरकारशीही संपर्क झाला, मुख्यमंत्र्यांबरोबर मीटिंग झाली — म्हणजे मराठी माणसांसाठी एक खरोखरच उभी राहणारी यंत्रणा तयार होतेय. मराठी माणूस एज्युकेटेड आहे, बुद्धिमान आहे — गुजराती लोकांचं हसलिंग स्किल आपल्याकडे कमी असेल, पण आपलं बौद्धिक कौशल्य हीच आपली ताकद आहे — त्यावर आपण उद्योग उभा करू शकतो.
त्रिवेणी मराठी समाजाने तुमच्या उद्योजकतेच्या प्रवासात कशा प्रकारे साथ दिली?
नितीन करंडे: त्रिवेणी म्हणजे आमच्यासाठी केवळ सामाजिक मेळावा नव्हता - ती एक खरोखरची व्यावसायिक आधारशक्ती ठरली. तिथूनच आमची ओळख झाली एका अशा व्यक्तीशी जी आमच्यासाठी मोठ्या भावासारखी, अगदी वडीलधाऱ्यांसारखी, उभी राहिली. मिलिंद इनामदार. सुरुवातीच्या काळात जेव्हा आम्हाला बँकेतून कर्ज कसं मिळवायचं हेही माहीत नव्हतं, तेव्हा त्यांनी एसबीए म्हणजे स्मॉल बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन कर्जाची संपूर्ण प्रक्रिया स्वतः हाताळली. पेपरवर्क, अंडरराईटरशी बोलणं, सगळं. आम्ही त्यांना इक्विटी देऊ केली, पण त्यांनी साफ नाकारलं आणि म्हणाले, "मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. हेच एकमेव उद्दिष्ट आहे माझ्यासाठी". त्यांनी एक महत्त्वाचा सल्लाही दिला होता, "तुम्हा दोघांमध्ये कधी भांडण झालं तर मी स्वतः येऊन कानाखाली मारेन!" म्हणजे भागीदारी टिकवणं किती महत्त्वाचं हे त्यांनी ठणकावून सांगितलं. आजही त्यांचा तेवढाच पाठिंबा आहे. त्रिवेणीने असे मार्गदर्शक दिले, नेटवर्क दिलं आणि हेच आमच्या यशाचं एक महत्त्वाचं कारण आहे.

आज द्वारपाल कुठे उभा आहे?
नितीन करंडे: सुरुवातीला सर्व काही आम्ही दोघेच करत होतो. आज आमच्याकडे टेक्नॉलॉजी, सेल्स, ऑपरेशन्स आणि रिबेट्स अशा स्वतंत्र टीम्स आहेत.
आमची उत्पादने अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये वापरली जात आहेत. विशेषतः ऊर्जा बचतीशी संबंधित प्रकल्पांमध्ये आम्ही युटिलिटी कंपन्यांच्या रिबेट कार्यक्रमांचा प्रभावी वापर करून ग्राहकांना अधिक मूल्य देत आहोत.
पुढील वाटचाल कशी दिसते?
सुधांशू पत्की:आमचा उद्देश फक्त स्मार्ट लॉक विकण्याचा नाही. आम्हाला संपूर्ण हॉटेल इकोसिस्टम अधिक स्मार्ट, किफायतशीर आणि ऊर्जा कार्यक्षम बनवायची आहे.
नितीन करंडे:आमचा विश्वास आहे की जुन्या पायाभूत सुविधांनाही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडता येतं. द्वारपाल ही त्याचीच सुरुवात आहे.

मुलाखतकार





Comments