top of page

USA 60 आणि मी

  • Mar 31
  • 8 min read
मिलिंद इनामदार
मिलिंद इनामदार
क्रिकेट हा भारतीयांसाठी नुसता खेळ नसून एक वेड आहे. भारतात मॅचेस सुरु झाल्या कि रस्ता ओसाड पडतो. घरातील लहान मोठे सर्व सदस्य T V कडे डोळे लावून बसतात. भारताची टीम कशी खेळते आहे त्याकडे सर्वांचे बारीक लक्ष असते. अनेक वर्ष झाली तरी  खूप रंगलेल्या मॅचेस लोकांच्या अजूनही आठवणीत असतात. आणि क्रिकेटीयर्स तर जणू अगदी जवळचे मित्रच. कोणी सेन्चुरी मारली आणि कोणी कोणाला कसा धुतला, त्याच्या गप्पा नंतर बरेच दिवस चालतात. 

अशाच एका क्रिकेट प्रेमी खेळाडूची मुलाखत आज आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत. मिलिंद इनामदार हे सिनसिनाटी भागातील मेसनचे रहिवासी असून ते गेली अनेक वर्षे त्रिवेणी मित्र मंडळाचे सदस्य आहेत. भारतात असल्यापासुन त्यांनी  क्रिकेट खेळायला सुरवात केली आणि अजूनही ते तितक्याच जोशात क्रिकेट खेळतात. ते आता ६० प्लस च्या यू एस ए च्या क्रिकेट टीम मध्ये आहेत आणि सर्व जगभर ते मॅचेस खेळायला जातात. त्यांनी राजेश सहस्रबुद्धे आणि नितीन बापट यांच्याशी केलेली बातचीत खूप इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला सुद्धा वाचायला खूप मजा येईल. हेल्थ आणि फिटनेस वाढवण्यासाठी तुम्हालाही स्फुरण येईल. 


USA 60  ची सुरुवात कशी झाली? 


आपल्याकडे Mathew Verghese हा cricket cincinnati ohio हा क्लब चालवतो.  तो इकडचं सगळे क्रिकेटचे काम बघतो.  त्यांच्याबरोबर मी खेळायचो.  त्याने मास्टर्स क्रिकेट जॉईन केलं.  सिक्सटी प्लस कमिटी मेंबर म्हणून तो तिकडे सेक्रेटरी म्हणून जॉईन झाला.  सगळे व्यवहार बघणं, सगळे रुल्स सांभाळणं,  हे सगळं सुरुवातीपासून त्याने केलं.

मी सिक्सटी झाल्यावर त्याने मला जॉईन करायला सांगितलं. अशा प्रकारे मी मास्टर्स जॉईन झालो. 


तिथे ४०, ५० आणि ६० असे ३ ग्रुप्स आहेत. आता ७० च्या ग्रुप ची वर्ल्ड कप चॅम्पियनशिप सुद्धा आहे. ही  सत्तरीची लोकं माझ्यापेक्षा तुफान जोरात पळतात. त्यांच्यापुढे मला लाज वाटते. 80 टक्के लोकं पळत नाहीत पण २० टक्के लोकं जोरात पळतात.  आमच्या साठीच्या ग्रुप मध्ये सुद्धा लोक हरणासारखी पळतात.  मला माहित नाही ते कसं करतात, पण मला नाही त्याच्यासारखं पळता येत. माझ्या गुडघ्याच्या सर्जरी नंतर मी मंदावलो होतो पण आता ठीक आहे.  


आम्ही बार्बेडोसच्या ट्रिपला गेलो. आधी मी ट्रायल्स ला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की मी चांगला बॉलर आहे. मी बॅटिंग सुद्धा चांगली करतो, पण मला फिल्डिंग चांगली करता येत नाही त्यामुळे मला घेऊ नका. आपल्याला आपली काय क्षमता आहे ते माहिती असायला पाहिजे.  इकडे मी जेव्हा निनाद बरोबर (माझा मुलगा) खेळतो, त्यावेळी सगळी तीस वर्षाची मुलं असतात.  ते माझ्यामागे प्लेयर्स लावतात म्हणजे माझ्या हातातून बॉल सुटला तर पकडण्यासाठी.  Mathew ने ही त्यांना सांगितलं होतं की मिलिंद विकेट्स घेईल. मला इंडियाला सुद्धा जायचं होत. पण त्यांचा मला फोन आला की तू जरी फिल्डिंग केली नाहीस तरी चालेल, पण तू आमच्या टीम मध्ये ये. मग  सीमाला विचारून मी इंडियाची ट्रिप कॅन्सल केली. भयंकर फटका पडला. पण ते  worth होतं. कारण त्यानंतर मी वेस्ट इंडिजच्या ट्रिपवर गेलो आणि अनेक मोठ्या प्लेयर्सना भेटलो. 



बार्बेडोसला गेलो. तिथे आमच्या मॅचेस झाल्या. त्याच्यानंतर दुसरा एक ग्रुप आहे तो जमेकाला  चालला होता. तिथे मी त्यांच्याबरोबर गेलो. तिथे मला गॉर्डन ग्रीनिज आणि वेस  हॉल असे मोठे मोठे क्रिकेटर्स भेटले.  वेस हॉल तिथे त्याचे पुस्तक विकत होता. तो ८० च्या पुढे आहे, पण एकदम फिट  आहे. 


ग्रीनिच ने मला सांगितलं कि वर्ल्ड कप  हरल्यावर आम्हाला इंडिया ला जायचं होतं, इंडियाला हरवण्यासाठी.  आणि लोकांना दाखवायचं होतं की इंडिया जिंकली हा फक्त एक फ्लूक  होता. एक दिवसीय मॅचेस ते जिंकले. त्यानंतर टेस्ट मॅच सुरू झाल्या. कानपूरच्या मॅच नंतर गावस्करला एका psychiatrist ला  भेटायला सांगितलं. त्याने त्याच्या मनात भरवलं की तू जगातला सर्वोत्तम बॅट्समन आहेस,  त्यामुळे तू त्यांच्यावर अटॅक कर. त्यानंतर त्याने दिल्लीला लंच च्या आधी सेंचुरी मारली. ग्रीनिच म्हणाला की त्यानंतर इंडियन क्रिकेट पूर्णपणे बदलली. मला ग्रिनीज म्हणाला होता की आम्ही गावस्करला घाबरतो. 


त्यानंतर लोक भारतीय संघाला घाबरायला लागले आणि मग जोरदार अटॅक करायला लागलो. गावस्कर त्या सिरीज नंतर पूर्ण बदलला हे माल्कम मार्शलनी त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. गावस्कर आणि ग्रीनिज चांगले मित्र आहेत. त्याने सांगितलं की आम्ही जे वेस्टइंडीज मध्ये करू शकलो नाही ते गावस्कर ने इंडियात केलं. त्यानंतर क्रिकेटर्सना पैसे मिळायला लागले. गावस्कर त्यावेळी कॅप्टन होता. त्याने सांगितलं की आम्हाला ठराविक पैसे मिळाले नाहीत तर आम्ही खेळणार नाही. वेस्टइंडीज मध्ये खूप गोंधळ चालू होते त्यामुळे क्रिकेटची नासाडी झाली. 


Desmond Haynes बरोबर सुद्धा बोललो. तो फक्त इतकाच म्हणाला की ग्रीनिज आणि मी जोडीदार होतो. आम्हाला

त्यांनी कधीही सांगितलं नाही कसं खेळायचं ते. आमच्या मागून रिचर्ड्स यायचा. त्यामुळे आम्हाला कसलंच  टेन्शन नव्हतं.  मी जरी शून्य, दहा किंवा शंभर वर आऊट झालो तरी मागून रिचर्ड्स यायचा  आणि तो ९९% मस्त खेळायचा.  त्यांची मैत्री अजूनही टिकून आहे.  


आमच्याबरोबर Colin Croft खेळला. तो इतका छान अनुभव होता. त्याचे पाय दुखायचे, पण तो साठीच्या ग्रुपमध्ये वेस्ट इंडीज कडून खेळला. नंतर कॉमेंट्रीवर होता. त्यावेळी तो त्याचे सगळे अनुभव सांगायचा.  त्यावेळी ते चार बॉलर्स होते. क्राफ्ट, रॉबर्ट्स, होल्डिंग आणि गार्नर. त्यावेळचे सगळे उमदे  बॅट्समन आम्हाला घाबरायचे. क्रॉफ्ट म्हणाला की फक्त सनी गावस्करने आम्हाला तोडीचा सामना केला. त्यानं आम्हाला क्रश केलं.


निकोलस पूरन च्या वडिलांबरोबर मॅच खेळलो. ते आम्हाला सांगत होते की निकोलस माझं काही ऐकत नाही.  वेस्टइंडीज मध्ये वडिलांना खूप आदर देतात. वडीलच सगळं ठरवतात. पण मला वाटतं की निकोलस पूरन  हा राजकारणात गुंतला. आहे. सध्या वेस्टइंडीज मध्ये पोलार्ड आणि पूरन  हे दोनच असे बॅट्समन आहेत जे उत्तम खेळतात. 


वेस्ट इंडिज चे अजून काय अनुभव सांगशील?


तिथे रोज ब्रेकफास्ट ला आम्ही छोट्याशा गाडीवरती जायचो. डबल्स  खायला. डबल्स  म्हणजे छोले आणि मैद्याची पोळी.  खूप मजा यायची.  खूप चांगले लोक भेटले.  बार्बाडोस पेक्षा जमेका खूप चांगलं होतं


तिथे ग्राउंड्स सुंदर आहेत. बार्बाडोस महाग आहे, लोकं  arrogant  आहेत. जमेका चांगले आहे. लोक सुद्धा चांगली आहेत. चांगला पाहुणचार करतात. नैसर्गिक देखावा खूप छान आहे. बार्बाडोसला म्हणजे अप्रतिम, विशाल समुद्र आणि निळं पाणी. पण लोक चांगली नाहीत. 


आम्ही आता १४-१५ जणांची  टीम घेऊन जमेकाला जाणार आहोत. आता गार्नर किंवा बिशप यांना भेटायचं आहे. 


मास्टर्स क्रिकेट बद्दल काय सांगाल?


आमच्यामध्ये नॅशनल मॅचेस होतात. आत्ता डॅलस ला गेलो होतो. त्यावेळी खूप चांगला अनुभव आला. संध्याकाळी दिवे लागतात, त्यावेळी ते फ्लड लाईट्स बघून मंत्रमुग्ध वाटलं. आपण नेहमी क्रिकेटर्सना त्या लाइट्स मध्ये खेळताना बघतो. इथे आम्हाला स्वतःला खेळायला मिळाले. खूप छान मजा आली.


वेगवेगळ्या टीम्स बरोबर खेळतो. एप्रिलमध्ये लॉस  एंजलिस  टूर्नामेंट आहे.  तिथे कॅनडा आणि साऊथ आफ्रिका अशा दोन टीम्स येणार आहेत.  तिथे  त्यांची एक टीम असते आणि आमच्या दोन टीम्स असतात. इंडियाची सुद्धा टीम आहे. पण त्यांना ते खूप महाग पडतं. आपल्याला स्वतःला सगळा खर्च करावा लागतो. क्रिकेटची बॅट, किट आमचेच आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, इंडिया इथून कमी लोक येतात.


मास्टर्सची एक कमिटी आहे. ते सगळं ऑर्गनाइज करतात.


४५ ओवर्स असतात. सहा बॉलर्स वापरायचे असतात. एक बॉलर जास्तीत जास्त आठ ओवर्स टाकू शकतो. टीम मध्ये १४ जण असतात आणि आम्ही अल्टरनेट खेळतो. ११ जण  बॅटिंग करतात. सकाळी बारावा खेळाडू जाहीर करतात. तो फक्त बॉलिंग करतो. एक वाईड बॉल फ्री असतो. अशा थोड्या फॅसिलिटीज वेगळ्या दिल्या असतात.  पण तिथे खूप मजा येते. 


नवीन मित्र खूप मिळतात. खूप लोकांना भेटायला मिळते. कालीचरण आणि शिवनारायण चंद्रपाल ला भेटायचा योग आता येणार आहे.  शिवनारायण चंद्रपाल इकडे येणार आहे . पाकिस्तानचा बॉलर अली खान,  तो सिनसिनाटी क्रिकेट क्लब चा प्लेयर आहे. मी त्याच्याबरोबर खेळलो आहे. Mathew नी मला मास्टर्स मध्ये खूप मदत केली. 



सिनसिनाटी क्रिकेट बद्दल काय सांगाल?


सिनसिनाटी क्रिकेट क्लबच्या तीन टीम्स आहेत. माझा मुलगा निनाद ह्याबरोबर  मला खेळता येतं. आता त्याला बाळ झाल्यावर त्याचं खेळणं खूप कमी झालं आहे. बाळ होण्याआधी तो टीमचा कॅप्टन होता. त्याला Tournament MVP घोषित केलं आहे.  त्याने highest wickets, highest runs, highest catches असे मान मिळवले होते. सुदैवाने, सीमाचे वडील म्हणजे त्याचे आजोबा हे बघायला तेंव्हा उपस्थित होते.


निनादचं इतकं प्रभावी खेळणं हे मला माझ्या खेळासाठी इन्सेंटिव्ह आहे. मी खेळतो आणि विकेट्स घेतो. मला ज्या दिवशी जाणवेल की मी टीम वरती बोजा आहे त्यावेळी मी बाहेर पडेन. पण तेच लोक मला बोलावतात खेळायला.


आता ह्या क्लबमध्ये पाच-सहा जण मराठी लोक आले आहेत खेळायला. इतके दिवस मी एकटाच मराठी होतो. आता सिद्धांत पालेकर, कुलकर्णी, तायडे, निनाद आणि मी असे पाच जण आहोत.आमच्या लोकल टुर्नामेंट्स  असतात. मिड-वेस्ट मध्ये दीडशे टीम्स आहेत. तीन ग्रुप्स आहेत. लुईविलला सुनील गावस्कर स्टेडियम आहे. तिथे टूर्नामेंट होते. तिथे पाच हजार डॉलर्स बक्षीस असते. आमची टॉप टीम दोनदा जिंकली आहे. ते सगळ्या टीमचे चांगले प्लेयर्स एकत्र करून खेळतात. 


क्लीव्हलंड,  लंडन, केंटकी आणि इंडियानात पर्ड्यू युनिव्हर्सिटी पर्यंत खेळायला जातो. आदल्या दिवशी जातो. तिथेच राहतो.  दुसऱ्या दिवशी मॅच खेळून परत येतो. आधी मी खूप ड्राईव्ह  करायचो. पण आता खेळून झाल्यावर दमायला होते. इथे ४० ओवर्स असतात.  ते पण खूप होतं.  आधी ३०-३५ होत्या, आता ४० झाल्या आहेत. पण मला खूप मजा येते. 


क्रिकेटचं साहित्य (outfits, gears, etc.) इथे मिळतं आणि कधी कधी भारतातूनही आणतो. आत्ता सीमा भारतात गेली होती, तिच्याबरोबर मी मागवून घेतलं होतं. 


चाळीस ओवर्सचा व्हाईट युनिफॉर्म असतो. २० ओवरची एप्रिल मध्ये आणि सप्टेंबर मध्ये टूर्नामेंट असते. त्यावेळी क्लबचा कलर असतो. त्यावर आमचं नाव आणि नंबर सुद्धा लिहिलेला असतो. 


डेटन अँड सिनसिनाटी मिळून १२ टीम्स आहेत. सिनसिनाटी क्रिकेट क्लब च्या ३ टीम्स आहेत. 


एप्रिल आणि सप्टेंबर मधे थंडी असते म्हणून २० ओव्हर्स च्या मॅचेस होतात. मे-जुने मध्ये ४० ओव्हर्स च्या सुरु होतात.  ती सप्टेंबर पर्यंत असते. मास्टर्स च्या New York ला ५ दिवसाच्या नॅशनल मॅचेस आहेत. मे मध्ये. न्यूयॉर्क ला इंडियाची मॅच झाली होती. तिथे स्टेडियम आहे. सिनसिनाटी ला स्टेडियम नाही. लुईव्हिल ला आहे. Actual स्टेडियम डॅलस, फ्लोरिडा, कॅलिफोर्नियाला आहेत. तिथे फ्लड लाईट मध्ये खेळायचा अनुभव वेगळाच आहे. दव पडते त्याचा खूप प्रॉब्लेम होतो. बॉलिंग करताना त्रास होतो.  त्याचं वेगळं ट्रेनिंग असतं. ओले बॉल्स कसे हँडल करायचे त्याचे. 


अमेरिकन्स फारसे क्रिकेट खेळात नाहीत, फक्त कॉमन वेल्थचे लोकं असतात. श्रीलंका, वेस्ट इंडीज, भारत, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका चे आहेत. 


तू क्रिकेट कुठे शिकलास?


मुंबईत, भारतात असताना सर्वसाधारणपणे सगळे शिकतात तसंच. मी कॉलेजसाठी खेळलो.  खूप मजा यायची. मुंबईत दादर, शिवाजी पार्कलाआमची मॅच असायची . मी सातवा बॅटिंगला जायचो.  सहज आठवण म्हणून सांगतो - त्यावेळी एका बॉलरचा हात माझ्यामुळे फ्रॅक्चर झाला. तो मला म्हणाला की तुझ्यामुळे मी सहा महिने ते एक वर्ष खेळलो नाही. तो सहा महिन्यात बरा झाला होता पण त्यानंतर सहा महिने त्याच्या घरच्यांनी त्याला खेळू दिलं नाही.  या सगळ्या आठवणी आहेत. माझा सर्वात जास्त स्कोर ७० होता. 


वसंत अमलाडी हे गावस्कर आणि  शास्त्री चे कोच होते. मी त्यांच्याकडे जायचं खूप एन्जॉय करायचो. 


मी कांगा लीग मध्ये खेळायचो. आम्ही पावसात खेळायचो, चिखलात खेळायचो!  तिथे बॉल पण जायचा नाही.  पाऊस पडत असताना खेळायचं.  ग्राउंड खराब झालं असेल, तर फक्त मॅच कॅन्सल व्हायची.  खूप मजा केली.  त्यावेळी फक्त क्रिकेट डोक्यात होतं. तेव्हा जोश वेगळा होता. 


२००० पर्यंत पुण्यात खेळायचो. ARI टीम मध्ये . रविवारी मॅच असायची. आमचे शेजारी स्कूटर वरून घेऊन जायचे. पुढे मी 2002 मध्ये अमेरिकेत आलो आणि लगेच 2003 मध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अशोक दास, जो डेंटिस्ट आहे, तो आमचा कॅप्टन होता.  



Knee surgery झाल्यावर कसे जमते?


काही प्रॉब्लेम नाही. सर्व व्यवस्थित आहे, सत्तरीपर्यंत खेळायचे आहे. गेली दोन वर्ष मी हायस्ट विकेट टेकर आहे. जोवर विकेट घेतो आहे, तोवर खेळायचे. फिल्डर्स कॅच सोडतात. पण आम्ही खेळतो. LBW आणि बोल्ड जास्त असतो. माझी उंची जास्त असल्याचा फायदा होतो. मी कधी चिडत नाही, स्पोर्टमन स्पिरिट पाहिजे. 


सिनसिनाटीत क्रिकेटसाठी काय अजून करणं जरुरी आहे? 


Mathew  ने खूप प्रयत्न केले ग्राउंड मिळवण्यासाठी. तो खूप काम करतो. दिनेश लाड माझा चांगला मित्र आहे. तो रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर चा कोच होता. त्याला व्हिसा मिळाला तर तो इथे कॅम्प करायला येणार आहे. त्याचा मुलगा सिद्धेश लाड आहे त्याने रेकॉर्ड केला. त्याने एका सिझन मध्ये ५ सेंचुरीज मारल्या आणि सचिन तेंडुलकर चा रेकॉर्ड equal केला. त्याला द्रोणाचार्य अवॉर्ड मिळाले आहे. दिनेश लाड पैसे घेत नाही. तो आपल्या घरी मुलांना ठेवतो. जेवणाचा खर्च करतो. त्यांना शिकवतो. मी त्याला चांगला ग्राऊंड मिळवून द्यायचा प्रयत्न करतो आहे. 


अजून किती वर्ष खेळण्याचा प्लॅन  आहे? 


मी दोन-तीन वर्ष म्हणतो आहे.  मला सत्तरी मध्ये सुद्धा खेळायचं  आहे. ते माझं एक गोल आहे. आताच मला कॅप्टन चा फोन आला होता की एप्रिलमध्ये एक टूर्नामेंट आहे त्याला तू येणार आहेस का. पुढच्या वर्षी कॅनडामध्ये वर्ल्ड कप आहे, त्याचा तो कॅप्टन आहे. तो श्रीलंकेचा आहे. तो रणतुंगा बरोबर खेळलेला आहे. तो खूप चांगला बॅट्समन आहे. गेल्या वर्ल्डकप ला त्याने तीन सेंचुरीज मारल्या होत्या. जगातली सर्वोत्तम टीम ऑस्ट्रेलियाची आहे ६० प्लस मध्ये. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड च्या टीमची फिटनेस लेवल immaculate आहे. बघून आश्चर्यचकित व्हायला होतं. कॅनडा वर्ल्डकप ला मी टोरांटोला ड्राईव्ह करून जाणार आहे. जून मध्ये. आमच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी.


तू गॉल्फसुद्धा खेळतोस, क्रिकेट खेळण्यामुळे तुझ्या गोल्फ मध्ये काही फरक पडला? 


गोल्फ मध्ये स्विंगचा फरक पडतो.  मी गोल्फ  शिकलो नाही पण क्रिकेट मधील आय-हॅन्ड कॉर्डिनेशनचा उपयोग होतो. अनिरुद्ध (पंडित) ने मला सांगितले की जर मी गोल्फचे खास प्रशिक्षण घेतलं तर माझं गोल्फचा खेळ  बिघडेल.  तू खेळतोस ते चांगलंच आहे. मी बऱ्याच जणांना हेल्प केली आहे गोल्फ साठी. मी म्हणतो की प्रत्येकाने गोल्फ खेळलं पाहिजे.  लोकांना वाटतं की गोल्फ  खेळणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. पण तसं नाहीये.  तुम्ही तुमच्या गेम साठी जबाबदार असता.  तुम्ही टीममधील दुसऱ्या कोणाला दोष देऊ शकत नाही. डोकं शांत ठेवून करून खेळायचं. 



मुलाखतकार


नितीन बापट
नितीन बापट
राजेश सहस्रबुद्धे
राजेश सहस्रबुद्धे








शब्दांकन


अंजली गद्रे
अंजली गद्रे
धनलक्ष्मी कुलकर्णी
धनलक्ष्मी कुलकर्णी

Comments


bottom of page