top of page

स्वामी स्वरूपानंद लिखित ज्ञानेश्वरी नित्यपाठ

ree

अगा जया जें विहित | तें ईश्वराचे मनोगत |

म्हणौनि केलिया निभ्रांत | सापडे चि तो ||२२||


तें विहित कर्म पांडवा | आपुला अनन्य वोलावा |

आणि हे चि परम सेवा | मज सर्वात्मकाची ||२३||


तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्मकुसुमांची वीरा |

पूजा केली होय अपारा | तोषालागी ||२४||


या ओव्या अठराव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर आधारित आहेत.


स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः।

स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु।।18.45।।


अर्थ -- आपापल्या कर्मामध्ये पूर्णपणे रत असलेल्या मनुष्याला वैराग्य प्राप्त होते. स्वकर्मरत कोणत्या प्रकारे मोक्ष पावतो, ते ऐक.


यतः प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम्।

स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानवः।।18.46।।


अर्थ -- ज्याच्यापासून भूतमात्रांची उत्पत्ती होते व ज्याने हे विश्व व्यापिले आहे, त्या ईश्वराची आपापल्या कर्माने आराधना करून मनुष्य वैराग्य मिळवतो. आपली साधारणपणे अशी समजूत असते की लहानपणी प्रपंच कसा करावा याचे धडे घ्यावे, तरुणपणी व मध्यम वयात प्रपंच करावा. त्यानंतर वृद्धापकाळी शरीर, मन आणि बुद्धी क्षीण झाल्यावर, इतरांच्या कामात लुडबुड करणे बरे नव्हे म्हणून बाजूला राहून राम राम म्हणावे. हाच परमार्थ!

भगवंतांच्या म्हणण्याप्रमाणे मात्र जन्मापासून मरेपर्यंत परमार्थच करायला हवा. पण त्याकरता प्रपंच टाकण्याची जरुरी नाही. गोंदवलेकर महाराज म्हणतात, “परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला आणि प्रपंचातील अहंकार काढला की तो परमार्थच!”

अर्थात जन्मभर प्रपंच करायला हरकत नाही. फक्त स्वतःचा अहंकार टाकून करण्याची आवश्यकता आहे.

आपला अहंकार कसा असतो पहा. आपल्या हातून जर काही चांगली गोष्ट झाली तर ती "मी केली"असे आपण म्हणतो. परंतु आपल्या हातून काही वाईट घडल्यास मात्र "ईश्वराची इच्छा" असे म्हणून आपण सोडतो. बऱ्याच वेळेला मलाच का असे होते म्हणून ईश्वराला जाब विचारायलाही आपण कमी करत नाही. यावर जरा विचार करून आपण कसे वागावे, हे प्रत्येकाने ठरवायला हवे. संत मात्र प्रत्येक गोष्ट ईश्वर इच्छेनेच होते, हे ओळखून असतात.

कसे वागायला हवे हे समजून घेण्याकरता आपण एक उदाहरण पाहू!

Tennis player Arthur Ashe बऱ्याच जणांना आठवत असेल. 1983 मध्ये त्याची heart surgery झाली तेव्हा त्याला blood transfusion दिले गेले. त्यामुळे पुढे त्याला AIDS झाला. एका रिपोर्टरने त्याला विचारले की “मलाच असे कसे झाले”, असे वाटून तुम्हाला राग येत नाही का?

त्यावरचे त्याचे उत्तर ऐकले की तो नुसता tennis player म्हणूनच नाही तर तसाही किती मोठा माणूस होता, ते कळते. त्याने म्हटले की जगात किती मुलं टेनिस खेळायला सुरुवात करतात? त्यातील किती जणांना Major League मध्ये टेनिस खेळता येते? आणि त्यातील किती जण Wimbledon championship मिळवतात? मला हे सर्व मिळाले, तेव्हा मी "मलाच का?" हा प्रश्न विचारला नाही. मग आता "मलाच blood transfusion मुळे AIDS का झाला?" असे कसे विचारू? पुन्हा मूळ विषयावर येऊन असे म्हणायला हवे की प्रपंच संपवून परमार्थ करेन असे म्हणण्यात मुळीच अर्थ नाही. कारण प्रपंच कधी संपत नाही. फक्त प्रपंचातील अहंकारापासून आणि आसक्ती पासून दूर व्हायचे.

हे श्लोक व या ओव्या गीतेतील व ज्ञानेश्वरीतील अठराव्या (शेवटच्या) अध्यायातील आहेत. कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग सर्व सांगून झालेले आहे. आता या अध्यायात भगवंत सगळ्याचे सार (summary) सांगत आहेत.

मनुष्य जन्माला आलेले आपण सर्व कुतूहल (curiosity) घेऊन आलेलो आहोत. प्रत्येक बाबतीत “हे असं का?" हा प्रश्न आपल्याला पडत असतो. तो सोडवण्याकरताच शरीर, मन, बुद्धी ही साधनं आपल्याला मिळालेली आहेत. आणि ती वापरायला हे विश्वाचे अंगण!

आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपण "पुढे काय करायचे", हे ठरवतो. कोणत्या विषयात आपल्याला गती आहे, आपला अधिकार (योग्यता) काय आहे, याचा विचार त्यावेळी केला जातो. स्वतः जवळचे रत्न ओळखण्याकरता ते एखाद्या रत्नपारख्याकडे न्यावे लागते. त्यावर आवश्यक ते पैलू पडल्यावरच त्याची खरी किंमत कळते व त्याचा योग्य उपयोग होतो. तसेच लहानपणीच आपल्यात कोणते गुण आहेत ते ओळखून, ते गुण आई-वडिलांकडून व त्या त्या विषयातील गुरु शोधून त्यांच्याकडून उजळून घ्यायचे असतात. नंतरच्या काळात त्या गुणांनुसार प्रपंचात आपल्या वाटेला आलेली कर्मे करणे हेच आपले कर्तव्य असते. तीच आपली विहित कर्मे! त्यात आपली नित्यकर्मे ही येतात.


म्हणून जे जे उचित | आणि अवसरे करुनी प्राप्त |

ते कर्म हेतू रहित | आचरें तू ||


हे आपल्याला माऊलीने आधीच सांगितलेले आहे. आता माऊली म्हणते,


अगा जया जें विहित | तें ईश्वराचे मनोगत |

म्हणौनि केलिया निभ्रांत | सापडे चि तो ||२२||


कधीकधी इतर कोणी करत असलेले काम जास्त फलदायक आहे, असे वाटू शकते. परंतु त्या कामाच्या मागे न जाता स्वतःच्या वाटेला आलेले कर्तव्यकर्मच मनोभावे करायचे आहे. तेच ईश्वराचे मनोगत आहे. तीच त्याची इच्छा आहे. म्हणून सर्वस्व अर्पून तेच केले तर मी त्याच्या जवळ जाऊ शकेन. ह्या संपूर्ण विश्वाचा नियंता, जो परमेश्वर, तो मी समजू शकेन. जंगलात फिरताना जर आपल्याला एखादी पडकी झोपडी दिसली तर तिथे कोणीतरी, केव्हातरी नक्की आले असेल व त्याने ती झोपडी बांधली असेल, असे आपण समजतो. तसेच ह्या विश्वाचा सुद्धा कोणीतरी निर्माता असायलाच हवा. त्यालाच आपण सगुण ईश्वर समजतो. त्या सगुण ईश्वराचेही "कारण" निर्गुण अव्यक्त परमतत्त्व आहे असे अध्यात्मशास्त्र सांगते. शेवटी आपणास तिथपर्यंत जायचे आहे. त्याशिवाय आपले कुतूहल शांत होणार नाही. सध्या आपण आपल्या वाटेला आलेले कर्तव्यकर्म आसक्ती व अहंकार टाकून करायचे आहे. तेच ईश्वराचे मनोगत आहे.

तें विहित कर्म पांडवा | आपुला अनन्य वोलावा |

आणि हे चि परम सेवा | मज सर्वात्मकाची ||२३||

अर्जुनाला भगवंत सांगत आहेत की हे युद्ध तुझे कर्तव्य कर्म म्हणून तुझ्यासमोर आलेले आहे. हे अधर्माविरुद्ध असलेले युद्ध क्षत्रिय म्हणून करणे, हे तुझे विहित कर्म आहे. तेच करणे ही माझी सर्वश्रेष्ठ सेवा आहे.

अर्जुनाला "युद्ध करणे" हे काही नवीन नव्हते. परंतु आजपर्यंत केलेली युद्धे परक्यांशी होती. आपल्या माणसांशी युद्ध करण्याची ही पहिलीच वेळ होती. म्हणूनच तो भांबावला होता. आपल्या आयुष्यात रणांगणावरील युद्धे नसली तरी आपल्या मनातील युद्ध आपल्याला नवीन नाही. या युद्धातील प्रश्न जर इतरांचे असतील तर आपण ते सहज सोडवू शकतो. परंतु ते जेव्हा आपल्या माणसांच्या संदर्भात असतात, तेव्हा मात्र आपण पळ काढू पाहतो. अर्थातच पळून जाणे शक्य नसते. अशावेळी शास्त्राच्या आधाराने पारखले असता जे आपले विहित कर्म आहे, ते ओळखून, ईश्वर इच्छा म्हणून तन, मन, धन पणाला लावून करायचे असते. व्यवहारातील कामही आपण आपल्या वरिष्ठाच्या (Boss) इच्छेप्रमाणे करतोच ना? तेच सर्वश्रेष्ठ अशा ईश्वराच्या इच्छेप्रमाणे करणे म्हणजे त्याची परमसेवा! दुसरे काही केले तर तो फक्त व्यापार!


तया सर्वात्मका ईश्वरा | स्वकर्मकुसुमांची वीरा |

पूजा केली होय अपारा | तोषालागी ||२४||


हे अर्जुना, त्या सर्वात्मका ईश्वराची स्वकर्मरूपी फुलांनी पूजा केली असता, ती पूजा त्याच्या अपार संतोषालाला कारणीभूत होते. मग तो संतुष्ट आत्मराज वैराग्यसिद्धीचा प्रसाद देतो. म्हणजेच अंतकरण शुद्धी होते. हेच कर्मयोगाचे सर्वश्रेष्ठ फळ !

जेव्हा कोणतीही महत्त्वाची गोष्ट शिकायची असते, तेव्हा प्रथम आधी शिकलेल्या चुकीच्या गोष्टी विसरायच्या असतात. पाटी कोरी करायची असते. त्याशिवाय तिच्यावर दुसरं काही नीटपणे लिहिता येत नाही. अर्थातच जेव्हा आत्मज्ञानासारखी मोठी गोष्ट मिळवायची असते, तेव्हा प्रथम अंतकरण शुद्धीची आवश्यकता असते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मात्सर्य ह्या षड्रिपूंना पूर्णपणे घालवायचे असते. कर्मयोगाचे अंतिम फळ हेच आहे. त्याकरता स्वकर्मरुपी फुलांनी त्या सर्वात्मका ईश्वराची पूजा करायची आहे, म्हणजे स्वकर्म करीत असताना भक्तीच्या ओलाव्याची आवश्यकता आहे. तरच ती पूजा होईल.

देवघरातील देवाची पूजा करतांना देवाला फुल,पान,पाणी, नैवेद्य या माध्यमातून स्वतःला अर्पित करायचे असते. तसेच इतर कामे करीत असताना सुद्धा त्यांना प्रेमाचा सुगंध हवा. त्यात कोणाचेही अहित चिंतन नको. बाह्य कर्म ही आंतरिक स्थितीची अभिव्यक्ती असते. आपल्या अंतरात प्रेम, शांती हे भाव असतील, तरच ते आपल्या कर्तव्यकर्मात प्रकट होतील. तेव्हा कोणतेही कर्म करताना ते शुद्ध हेतूने, प्रेमपूर्वक व निस्वार्थी बुद्धीने करायला हवे.

स्वकर्माच्या फुलांची माळच भगवंताच्या गळ्यात घालायची आहे. "तेरा तुझको अर्पण" या भावाने!


अनुराधा कुलकर्णी
अनुराधा कुलकर्णी

Comments


bottom of page