top of page

स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ


आम्ही समस्त हि विचारिले , तव ऐसेचि हे मना आले

जे न सांडिजे तुवा आपुले , विहित कर्म 11. (20 -261 )

परि कर्मफळी आस न करावी, आणि कुकर्मी संगती न व्हावी

हे सक्रियाची आचरावी, हेतूविण 12.

ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकाच्या विवरणात आलेल्या आहेत .

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥47॥अ 2

गीतेतील काही प्रसिद्ध श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. परंतु या श्लोकाचा बरेच जण चुकीचा अर्थ लावतात.

( misinterpreted shlok ).

जर कर्म फळाची इच्छा ठेवायची नसेल तर कर्म तरी कशाला करायचं ? हा तसा वर वर logical वाटणारा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. असे मनात आले तर प्रथम हे लक्षात घ्यायचे की भगवान श्रीकृष्णाचा उपदेश जसा पारमार्थिक दृष्ट्या उच्च कोटीचा असतो तसेच तो कधीही अव्यवहारिक सुद्धा नसतो.आपला कर्म फळावर अधिकार आहे, म्हणजे काय? तर कर्म करण्याचा आपल्याला हक्क आहे. खरं पाहिलं तर कर्म न करता आपण क्षणभरही राहू शकत नाही. “न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्।" (अ 3, श्लोक 5 ). दुसरं म्हणजे कोणतेही कर्म विशिष्ट उद्देशाने, कर्म करण्याची दिशा ठरवून, जास्तीत जास्त उत्कृष्टरित्या करण्याचाही अधिकार आपल्याला आहे.मात्र शेवटी नक्की काय होईल? फळ तर मिळणारच, पण ते आपण कल्पना केलेले किंवा आपणास हवे असलेले specific फळच मिळेल का? तर त्याची खात्री नाही. खरंतर हा आपणा सर्वांचा रोजचा अनुभव आहे. आणि भगवान तेच सांगत आहेत. फळ बऱ्याचदा अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. कधी कमी तर कधी जास्त सुद्धा मिळते. या श्लोकाच्या ज्ञानेश्वरीतील विवरणात माऊली म्हणते,


आम्ही समस्त ही विचारिले, तव ऐसेचि हे मना आले

जे न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म

आपण संदर्भ लक्षात घेऊ,

अर्जुनाच्या "ह्या युद्धात आप्तांना मारण्याचे घोर कर्म मी कसे करू?" या प्रश्नाला भगवान उत्तर देत आहेत. ते म्हणतात की मी सर्व दृष्टीने विचार केला आणि ह्या निर्णयाला आलो की तुला तुझे कर्तव्य कर्म करायलाच हवे. राज्याचा राजकुमार म्हणून अन्यायाच्या/ अधर्माच्या विरुद्ध लढणे तुला आवश्यकच आहे. आणि तुझ्यात क्षमताही आहे. लढतांना तू जिंकण्याच्या उद्देशानेच लढायला हवे, परंतु तू नक्की जिंकशील की नाही, हे तुला आत्ता सांगता येणार नाही. म्हणून त्या उद्देशाच्या दिशेने वाटचाल कर. पूर्ण प्रयत्न कर. मात्र हे असे होईलच, अशी स्वप्न पहात बसू नको. कारण ते तुझ्या हातात नाही.

आपण एक उदाहरण पाहू.

समजा एखाद्याने परीक्षेची वर्षभर नीट तयारी केली. परीक्षेत उच्चश्रेणीत पास होण्याची क्षमताही त्यात आहे. परीक्षेकरता तो घरून वेळेच्या आधी निघाला. परंतु जर त्याला वाटेल अपघात झाला, तर तो परीक्षेला पोहोचू शकत नाही. अपेक्षित कर्मफळ हातात नाही, जरी त्याने सर्व प्रयत्न केले तरी!इथे त्याला काहीच मिळाले नाही का? नक्कीच मिळाले. त्या विषयाचा त्याचा अभ्यास झाला. तो विषय त्याला समजला. परीक्षा काही काळाने तो पास होईल, पण आत्ता त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला. कोणतेही कर्म जर ईश्वरार्पण बुद्धीने व फलाशक्तीशिवाय करता आलं, तर पुढे ईश्वर प्राप्तीसाठीही त्याचा उपयोग होईलच. पण रोजच्या जीवनात मनःशांती मिळवण्याकरता ह्या attitude चा फायदाच होईल.


आणि कुकर्मी संगति न व्हावी |


कुकर्म कोणते? तर काहीही सुरू करतांना प्रथम स्वतःला एक प्रश्न विचारावा. "माझ्यातील देवाला हे आवडेल का?" कारण तो सर्व पाहतो आहे. प्रश्नाचे उत्तर "नाही" असे आले तर ते कुकर्म! त्या कर्माच्या वाटेला जायचे नाही. "हो" असे उत्तर आल्यास, ते सत्कर्म! ते जास्तीत जास्त उत्कृष्टपणे, पूर्ण लक्ष देऊन, "काय होईल" ह्या विचारात वेळ न घालवता, उत्साहाने करावे. म्हणजेच, "ही सक्रियाची आचरावी हेतूविण!" असे केल्यास प्रत्येक कर्म ही ईश्वरपूजाच होईल.


तूं योगयुक्त होऊनि । फळाचा संग टाकूनि । मग अर्जुना चित्त देऊनि । करीं कर्में  ।।१३।।

परि आदरिलें कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावें । तरि विशेषें तेथ तोषावें । हें हि नको ।।१४।।

कां निमित्तें कोणें एकें ।  तें सिध्दी न वचतां ठाके । तरी तेथीचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ।।१५।।

देखें  जेतुलेनि कर्म निपजें । तेतुलें आदिपुरूषीं अर्पिजे ।  तरी परिपूर्ण सहजें ।  जाहलें जाण ।।१६।।

ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकाच्या विवरणात आल्या आहेत.

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।

सिद्ध्यसिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥48॥अ 2


आपण कर्मयोगाच्या काही श्लोकांचा अभ्यास करीत आहोत. कर्म तर आपल्याला करावेच लागते. त्याशिवाय सुटका नाही. परंतु तीच कर्तव्यकर्मे कशा रीतीने करावीत की जेणेकरून त्याच कर्मांचा कर्मयोग होईल, हेच भगवान आपल्याला समजावून सांगत आहेत.


शरीराने कर्म तर तेच करायचे, परंतु ते करतांना मनाची भूमिका कशी ठेवायची, हे आपल्याला शिकायचे आहे. मुख्य म्हणजे आचरणात आणायचे आहे. का ? तर त्यामुळे आपण ईश्वरप्राप्तीच्या मार्गाला लागू, म्हणून! हा मुख्य उद्देश! परंतु समजा सध्या प्राथमिक साधक असतांना त्याचे महत्त्व तेवढे समजत नसेल, तरी हीच तत्वे आचरणात आणल्यास आपले रोजचे जीवनही आनंदाचे होईल. सुखासमाधानाकडे वाटचाल होईल. हे लक्षात घ्यायला हवे.


गीता म्हणते, "योगस्था: कुरु कर्माणि"

ज्ञानेश्वरीत आहे, "तू योगयुक्त होऊनी करी कर्मे "


"योगी" हे विशेषण अगदी प्राथमिक साधकापासून ते आत्मज्ञानी व्यक्तीपर्यंत कोणालाही लागू होते. परंतु इथे दुसऱ्या अध्यायात हा उपदेश अर्जुनाला केला आहे. अर्जुन तेव्हा आत्मज्ञानी नव्हता. त्यामुळे भगवान नक्कीच साधकाला सांगत आहेत की प्रथम तू योगयुक्त हो! रोज व्यवहारीक काम सुरू करण्याआधी उपासना कर्म कर. ध्यान/ नामस्मरण अशी उपासना कर्मे केल्यानंतर अंतकरणाची जी शांती मिळेल, त्या शांतीच्या मानसिकतेतच तू दिवसभर रहा व पूर्ण लक्ष देऊन तुझ्या वाटेला आलेली कर्मे कुरकुर न करता, उत्साहाने कर . एकदा कर्माचा उद्देश ठरवल्यानंतर, त्या दिशेने कर्माची वाट आखल्यानंतर, कर्म फळाकडे लक्ष न देता, तसेच कर्तृत्वाचा अहंकार न ठेवता, जे करतो आहे, त्याचा आनंद घे. भगवानच माझ्याकडून हे सर्व करवून घेत आहेत, मी फक्त त्यांच्या हातातील एक instrument आहे, ही पक्की भावना ठेवल्यास, दिवसभर त्या मानसिकतेत स्थिर राहता येईल. मनाची चलबिचल होणार नाही. कर्मही उत्तम होईल.


कर्मफळाची आशा सोड, असे म्हणणे सोपे आहे, पण ते खरेच जमेल का? माऊली आपल्याला ते जरा सोपे करून सांगते. ती म्हणते, "फळाचा संग टाकूनी!" कारण सुरुवातीला तरी फळाची इच्छा होणे, त्याबद्दल मनात विचार येणे सहाजिकच आहे. परंतु त्या इच्छेला, विचारांना मनात घोळवत बसू नकोस, त्यांचा संग करू नकोस. 'Self help’ पुस्तकेही आपल्याला तेच सांगतात. "काय होईल?" "कसं होईल?", ह्याचाच विचार करीत कर्म केले तर कामाकडे पूर्ण लक्ष रहात नाही. अर्थातच ते नीट होत नाही. अगदी साधे काम सुद्धा शांतपणे न करता, चिंताग्रस्त मनाने केल्यास बिघडू शकते.


समजा हे आरंभिलेले कर्म जर व्यवस्थित पार पडले, हवे ते किंवा त्यापेक्षाही चांगले फळ मिळाले, तर थोडा वेळ आनंद होणे, बरे वाटणे, स्वाभाविक आहे. परंतु कर्तृत्वाच्या अहंकाराने भारावून जाऊ नकोस. पूर्ण प्रयत्न करूनही काही कारणाने जर ते कर्म पूर्ण होऊ शकले नाही, त्यात यश आले नाही, तर थोडे वाईट वाटणेही ठीक आहे. परंतु त्यामुळे अंतकरण क्षुब्ध होऊ देऊ नकोस. तसे होऊन जर क्रोध व दुःखाच्या भोवऱ्यातच आपण सापडलो तर पुढे जाणे कठीण जाते. हे एकच न जमलेले काम म्हणजे आपले पूर्ण जीवन नाही, हे लक्षात घेतले की अपयशातही शांत राहता येते. त्यातून खूप शिकताही येते. फक्त मी माझ्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न केला आहे, हे समाधान हवे.


न जमलेलं काम काही जणांना "ईश्वराची इच्छा" म्हणून सोडता येते. परंतु व्यवस्थित पार पडलेल्या कामाचे श्रेय मात्र आपण स्वतःकडेच घेतो. त्यामुळे अहंकाराचीच जोपासना होते. सुरुवातीला प्रत्येक कर्म ईश्वरार्पण भूमिकेतूनच केल्यास यश आणि अपयशाचा धनी तोच होतो. आपल्याला काहीच न चिकटल्याने आपण आनंदात राहू शकतो. "त्याचीच इच्छा" हीच "ईश्वरार्पण बुद्धी"! म्हणजेच


 "आदिपुरुषी अर्पिजे"!


गोंदवलेकर महाराज म्हणतात, "रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना? ते करीत असतांना मी अनीति, अधर्माने वागलो नाही ना? आता जे व्हायचे असेल, ते होऊ दे. कुठे काळजी करा! ही वृत्ती ठेवून, जो जगात वागेल, तोच मनुष्य सुखी होईल."

अभंग ज्ञानेश्वरीत पावसचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात,


घडे ते ते कर्म, होता ब्रह्मार्पण, स्वभावे संपूर्ण, झाले जाण.


 
अनुराधा कुलकर्णी

留言


bottom of page