top of page

Super Bowl हा सण मोठा ...

  • Mar 31
  • 5 min read

अमेरिकेत जानेवारी चा पहिला आठवडा संपत आला की एक अस्वस्थता आणि निराशा जाणवू लागते. जवळपास thanks-giving पासून चालू झालेला सुट्ट्यांचा जल्लोष संपलेला असतो. ऑफिसच्या रजा आणि बॅंकेतला बॅलन्स दोघांनीही तळ गाठला असतो. नियमितपणे ऑफिस चे काम करायची सवय जवळ जवळ मोडलेली असते. आणि  आता पुनःश्च हरी ओम करण्यापलीकडे काही पर्याय नसतो. बाहेर हवेत जबरदस्त गारठा, सततचा हिमवर्षाव अशा कमालीच्या भकास आणि निरुत्साही वातावरणात, मग एक आशेचा किरण दिसतो आणि  तो म्हणजे जानेवारी मधे सुरु होणारा अमेरिकन फुटबॉल चा प्ले-ऑफ! आणि त्याचा कळस म्हणजे फेब्रुवारी च्या दुसऱ्या रविवारी होणारा Superbowl! पण मला वाटतं की दरवर्षी होणाऱ्या या सोहळ्याची इतकी आतुरतेने वाट पहायचे आणखी एक कारण आहे. आणि  ते म्हणजे ………………बायकांचे हळदी-कुंकू!! सांगतो कसे ते.

इथं अमेरिकेत, भारतीय सौभाग्यवतींचे हळदी-कुंकू हा भलताच रॉयल मामला आहे. संक्रांतीच्या मुहुर्तावर सुरु होणारा हा सोहळा रथ सप्तमी पर्यंत चालतो. आणि या २-३ आठवड्यात बायका नुसता धुमाकूळ घालतात. "आज जेवायला काय करूयात?" या प्रश्नावर "आज मला हळदी-कुंकू आहे. तेंव्हा तुमचं तुम्ही बघा !!" असे प्रेमळ उत्तर मिळाले कि खरी संक्रांत नवरे लोकांवर येते. अहो, वरण-भात, खिचडी भात, मॅगी अशा लिमिटेड कूकिंग स्किल्स वर किती दिवस भागवणार? शेवटी मुलं पण बाबाच्या पाककलेला कंटाळतात आणि मग Dominos , McDonalds, Chick-Fil-A च्या वाऱ्या सुरु होतात. इकडे सौ मात्र भलत्याच उत्साहात असतात. रोज नवनवीन साड्या नेसून, नट्टापट्टा करून, हळदी-कुंकूवाला जातात. minestrone soup ते मिसळ, pasta ते वडापाव आणि fruit salad ते ice-cream अशा multi-course, multi-cuisine मेनू वर ताव मारतात. आणि परत घरी येऊन मी आज काय जेवले, आज कुणी काय लुटले, सगळ्यांना माझी साडी कशी आवडली असल्या अत्यंत निरुपयोगी गोष्टी ऐकवतात. आमच्या लहानपणी आम्ही काय हळदी-कुंकू पाहिले नाही की काय ? (जरी कधी गेलो नसलो तरी!). हातावर साखर, तिळगुळ, फार तर एक कप गरम दूध दिले कि विषय संपला. पोहे - उपमा - चिवडा-लाडू म्हणजे डोक्यावरून पाणी! पण इथे सगळंच वेगळं. असो, पण या सगळ्या प्रकारात सर्वात दुर्लक्षिलेला घटक म्हणजे नवरा! किंबहुना ज्या कारणासाठी हळदी-कुंकू साजरे करायचे त्याचा पत्ता एकदम कट! मी काय म्हणतो, प्लास्टिक चे डबे, बरण्यांची झाकणं, अत्तराच्या बाटल्या, पिशव्या अशा फुटकळ वस्तू लुटण्या ऐवजी, द्या ना एक to -go बॉक्स भरून जेवण नवरे मंडळींसाठी. तुम्हाला किती तरी पटीने शुभेच्छा मिळतील. मी माझे हे विचार बऱ्याच वेळा मित्र परिवारात मांडले आहेत. पण अजून तरी कुणी मनावर घेतले नाही!

तर अशा प्रकारे चहू बाजूंनी कोंडले गेलेल्या नवरे मंडळींसाठी 'SuperBowl' हा खरा सणाचं ठरतो. आणि हो, मुख्य म्हणजे कुठलाही भेदभाव न करता, हा सण सर्वाना मिळून साजरा करता येतो. ज्यांना अमेरिकन फुटबॉल आवडतो (आणि कळतो!), अशा लोकांसाठी तर ही पर्वणीच असते. ज्यांना आवडत नाही त्यांचा साठी नाना-विविध जाहिराती, मध्यंतरातले performances असतातच. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ! आणि त्यातून जर तुमची टीम SuperBowl मधे खेळत (आणि जिंकत) असेल, तर काय विचारता महाराजा! असा योग फार फार दुर्मिळ असतो.

एक तर अमेरिकन फुटबॉल हा अमेरिकेतला सर्वाधिक लोकप्रिय खेळ. खरं तर, हा खेळ फक्त ह्याच देशात खेळला जातो. बाकी साऱ्या जगासाठी फुटबॉल हा जरी पायाने खेळायचा असला, तरी 'हम करे सो कायदा' ह्या अतिशय अमेरिकन तत्वावर हा खेळ तयार झाला. मागच्या १५० वर्षात ह्यात बऱ्याच सुधारणा झाल्या. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात सुरु होणाऱ्या या स्पर्धेत ३२ संघ भाग घेतात. Regular season, Play-offs अशा टप्प्यांमधे ही स्पर्धा उत्तरोत्तर रंगत जाते. आणि शेवटी २ सर्वोत्तम संघ वर्षातील शेवटचा सामना खेळतात, तोच हा SuperBowl! जरी स्पर्धा ६-७ महिने असली तरी ह्याची तयारी जवळ जवळ वर्ष भर सुरु असते. देशभरातल्या विविध कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीस मधून खेळाडू निवडले जातात. आज NFL (National Football League) दर वर्षी २५ अब्ज (२५ बिलियन ) डॉलर्स कमावते. अमेरिकन अर्थकारण, विपणन (मार्केटिंग), जाहिरात याचा उत्तम परिपाक आणि लोकप्रिय खेळ हा तितकाच नफा कसा मिळवून देऊ शकतो याचे अमेरिकन फुटबॉल हे उत्तम उदाहरण आहे. 

बहुतांशी इतर खेळांप्रमाणे, अमेरिकन फुटबॉल 'खेळणे अथवा खेळता येणे ' आणि 'बघणे' ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आणि बहुतांशी लोकांप्रमाणे आम्ही देखील घरी सोफ्यावर बसून, TV वर त्याचा आस्वाद घेतो. फ्लॅग-फुटबॉल हा या खेळाचा अति-सौम्य अवतार सर्व सामान्यांसाठी तयार केला गेला आहे. आम्ही देखील कधी कधी बच्चे-कंपनी आणि मित्र मंडळी सोबत त्याची मजा घेतो. असो, हे सगळं असलं तरी, मला या खेळात आणि आपल्या दैनंदिन जीवनात खूप साधर्म्य वाटते. या खेळातून शिकण्यासारखे खूप आहे, त्याची एक छोटीशी यादी खालील प्रमाणे - 

१. प्रत्येक खेळ नव्याने सुरू होतो — भूतकाळ मागे सोडा

फुटबॉलमध्ये प्रत्येक प्ले (play) हा नव्याने सुरू होतो. मागचा प्ले यशस्वी असो किंवा अपयशी, पुढील संधी नवीन असते. कालच्या चुका किंवा यशावर अडकून न राहता प्रत्येक दिवस नव्याने सुरु करावा.

२. संघाशिवाय विजय नाही — टीमवर्कचे महत्त्व

एकही खेळाडू एकट्याने सामना जिंकू शकत नाही. प्रत्येकाची भूमिका वेगळी पण तितकीच महत्त्वाची असते. या खेळात काही ३०० पाउंड वजनाचे, तर काही अतिशय चपळ, वेगाने धावणारे, काही फुटबॉल छान फेकू (पास) शकणारे तर काही तो छान पकडू (catch) शकणारे. प्रत्येकाचं काम आणि स्थान वेगवेगळं, पण तितकंच महत्वाचं. आयुष्यातही आपण एकट्याने फारसे काही करून शकत नाही. कुटुंब, मित्र-मंडळी, कार्यालय,  समाज - यश हे नेहमी सहकार्याने मिळते.

३. छोट्या प्रगतीचे महत्त्व

कधी कधी संघ फक्त काही यार्ड्स पुढे जातो, पण शेवटी त्यातूनच स्कोअर तयार होतो. लहान प्रगतीही मोठ्या यशाचा पाया असते. कुठलीही नवीन कला, तंत्र आत्मसात करून त्यात सर्वोच्च होण्यासाठी १०,००० तास सराव लागतो असे म्हणतात. सराव, सातत्य, चिकाटी आणि संयम हे आजच्या instant gratification च्या जमान्यात फार महत्वाचे गुण आहेत.

४. पडणे खेळाचा भाग आहे — अपयश स्वीकारा. 

खेळाडू वारंवार पाडले जातात, प्रत्येक प्रयत्न (play) यशस्वी होतोच असे नाही. अपयश म्हणजे शेवट नाही; त्यातून धडा घेऊन, पुढच्या प्रयत्नाची तयारी करा.

५. रणनीती ताकदीपेक्षा मोठी असते

अमेरिकन फुटबॉल मैदानापेक्षा मैदानाबाहेर जास्त खेळाला जातो असे म्हणतात. विविध प्रशिक्षक, तंत्रज्ञ आणि असंख्य मदतनीस (सपोर्ट स्टाफ) ह्यांचे योगदान अतिशय मोलाचे असते. नेहमीच फक्त शक्ती पुरेशी नसते; योग्य योजना आणि वेळेवर घेतलेला निर्णय खेळ जिंकतो.आयुष्यात मेहनत महत्त्वाची आहेच, पण नियोजन, विचारपूर्वक दिशा अधिक महत्त्वाची असते.

६. योग्य वेळेची वाट पाहणे

सर्व वेळ आक्रमणच केले जात नाही; कधी संयमाने योग्य संधीची वाट पाहावी लागते. आयुष्यातही प्रत्येक गोष्ट लगेच मिळत नाही. संयम ही यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या चांगल्या दिवसात येऊ शकण्याऱ्या वाईट  दिवसांसाठी तयारी करणे हे महत्वाचे.

७. नेतृत्व म्हणजे फक्त आदेश नव्हे, तर आपल्या वर्तणुकीतून, खेळातून संघाला मार्गदर्शन करणे. क्वार्टरबॅक किंवा कॅप्टन फक्त आदेश देत नाही — तो संघाचा विश्वास जिंकतो. खरे नेतृत्व म्हणजे लोकांना प्रेरणा देणे.

८. सामना कधीही फिरू शकतो - Momentum is a cruel mistress! एखादा उत्तम डावपेच तसेच एखादी चूक, सामन्याचा रुख बदलायला पुरेशी असते. आज जरी तुम्ही जिंकत असाल, तरी त्या यशात मशगुल न राहता, सतत सावध राहून तयारी, पुढील नियोजन करत रहा.

९. भूमिका लहान असली तरी महत्त्वाची असते

काही खेळाडू फारसे दिसत नाहीत, पण त्यांच्याशिवाय प्ले यशस्वी होत नाही. क्वार्टरबॅक ला पूर्ण संरक्षण देऊन निर्णय घेण्यासाठी अधिकाधिक वेळ मिळवून देणारे किंवा त्या मागे उभे राहून बॉल मिळायची वाट बघणारा running back, हे सगळे तितकेच महत्वाचे आहेत. आयुष्यातही एका यशामागे अनेक जणांचे हातभार असतात. ते प्रकाशझोतात नसले तरी.

१०. शेवटच्या क्षणापर्यंत आशा सोडू नका

अमेरिकन फुटबॉलमध्ये अनेक सामने शेवटच्या काही सेकंदांत बदलतात. परिस्थिती कितीही कठीण असली तरी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे.

तर असा हा अमेरिकन फुटबॉल आणि Super Bowl म्हणजे प्रत्येक वर्षीचा अंतिम सामना. दरवर्षी कोट्यवधी लोक तो पाहतात. खाद्यपदार्थ हा या उत्सवाचा मोठा भाग असतो — विशेषतः चिकन विंग्स, पिझ्झा, नाचोज, बर्गर आणि विविध स्नॅक्स भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. भारतीय पार्ट्यांमध्ये बिर्याणी, वडे, समोसे असे अस्सल देसी पदार्थ हमखास असतात. Super Bowl मधे जाहिराती जगप्रसिद्ध असतात; अनेक कंपन्या नवीन, मजेदार जाहिराती दाखवण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च करतात. कधी कधी या जाहिराती इतक्या मनोरंजक असतात की लोक त्या खास पाहण्यासाठीही सामना बघतात. हाफटाइम शो हा कार्यक्रमाचा आणखी एक मोठा आकर्षणबिंदू असतो, ज्यात प्रसिद्ध गायक आणि कलाकार भव्य संगीत-नृत्य सादरीकरण करतात. भव्य प्रकाशयोजना, स्टेज इफेक्ट्स आणि हजारो प्रेक्षकांच्या जल्लोषामुळे हा शो एका मोठ्या कॉन्सर्टसारखा वाटतो.

खेळ, खाणे, जाहिराती आणि संगीत यांचा संगम Super Bowl ला  क्रीडा स्पर्धेपेक्षा एक राष्ट्रीय उत्सव बनवतो. हा केवळ फुटबॉलचा सामना नसून अमेरिकन संस्कृती, मनोरंजन आणि उत्साहाचा एक भव्य सोहळा आहे. मित्र-परिवार, खाणे-पिणे आणि फुटबॉल. आणखी काय हवे? आणि म्हणूनच, “Super Bowl हा सण मोठा, नाही आनंदाला तोटा”! 🎉🏈


Superbowl 2025
Superbowl 2025
अमित शास्त्री
अमित शास्त्री

Comments


bottom of page