top of page

हिंद का तोता

  • Mar 31
  • 4 min read

मित्रांनो आधीच्या माझ्या लेखांमध्ये आपण काही सुंदर गझलांबद्दल जाणून घेतले. त्या सगळ्या काव्यकृती गालिबच्या होत्या. 

पूछते हैं वो कि 'ग़ालिब' कौन है

कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या?

गालिब आणि शायरी हे जणू एक समीकरण झालंय. पण हिंदुस्थानात इतरही अनेक प्रतिभावान गज़लकार होऊन गेलेत. परंतु सगळ्यात आधिचा शायर कोण होता, ज्याने हे गझल नावाचे परकीय पीक आपल्या देशात लावले? तर त्याचे नाव - अबुल हसन यमीनुद्दीन ख़ुसरो  - त्याला अमीर ख़ुसरो  किंवा अमीर ख़ुसरो  देहलवी म्हणूनही ओळखले जाते. आज या प्रतिभावान आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाची सुंदर शायरी पाहू. पण त्या आधी त्याची थोडक्यात ओळख करून घेऊ.

अमीर ख़ुसरो (१२५३–१३२५), हा तेराव्या शतकात एका उझबेकी सरदाराच्या घरी जन्मला. त्याची आई हिंदुस्थानी होती. त्याचे वडील लढाईमध्ये मेल्यावर, आजोबांनी त्याचा सांभाळ केला. दोन्ही पालकांकडून त्याने विविध भाषा अवगत केल्या - तुर्की, अरबी, फारसी, ब्रिज, हिंदवी. त्याला संस्कृतही येत होती. त्याच्या प्रतिभेमुळे त्याला मामलुक, खिलजी आणि तुगलक या साऱ्यांकडे राजाश्रय मिळाला. त्याने अनेक दिवान, कसीदे, मसनव्या लिहिल्या. हा बहुधा एकमेव राजकवी होता ज्याने कित्येक शब्दकोडी (पहेली) बनवली. 

उदाहरणार्थ: 'बिसोन का सर काट लिया, ना मारा ना खून किया' (उत्तर: नखे). 

तो फारसी आणि हिंदुस्थानी भाषा मिसळून पहेली बनवायचा. जरी त्याकाळी फारसी भाषेला सगळ्यात जास्त महत्व होते, तरी खुसरोचे भारतीय भाषांवर विशेष प्रेम होते. त्याच्या समृद्ध लेखणीमुळे त्याला 'हिंद का तोता' असा किताबही मिळाला होता. त्याने त्याच्या राजांबरोबर युद्धांमध्येही भाग घेतला होता. लिखाणाशिवाय अमीर खुसरोला कव्वालीचे जनक मानले जाते. शिवाय त्याने गझल शैली भारतात लोकप्रिय केली. तराना आणि खयाल या संगीत प्रकारचे निर्माण त्याने केले असे मानले जाते. शिवाय विणेपासून तीन-तारी बनवली (फारसी मध्ये तिला 'से-तार' म्हणतात, तीच पुढे सतार झाली). आजच्या तबल्याचे स्वरूपही खुसरोच्या योगदानामुळे घडले आहे. असा हा बहुढंगी कलाकार - तो धार्मिकदृष्टया सुफी होता आणि हजरत निजामुद्दीन औलिया यांचा सर्वात प्रिय शिष्य होता. या दोघांची समाधी दिल्लीत निजामुद्दीन येथे बाजूबाजूला आहे. खुसरोने या आपल्या गुरुकरता अनेक सुंदर गीते लिहिली. उदाहरणार्थ: "सकल बन", "छाप तिलक", "आज रंग है". खुसरो त्याच्या कविता स्त्रीच्या दृष्टीतून लिहायचा, जणू काही तो प्रेयसी आहे आणि गुरु हा त्याचा प्रियकर आहे. 

सूफी साहित्यात साधारणतः २ गोष्टी ठळकपणे दिसून येतात.

 १. रूपके (metaphors) - ज्यामुळे कोणताही शेर किंवा कडवे जसेच्या तसे घेता येत नाही, त्यामधून अनेक अर्थ निघू शकतात - जे त्या रचनेला आकर्षक करतात.

 २. प्रेमाचे प्रकार - सूफी मतानुसार इश्क दोन प्रकारांत विभागला जातो — इश्क-ए-हकीकी आणि इश्क-ए-मजाजी. इश्क-ए-मजाजी म्हणजे या भौतिक जगापुरते मर्यादित प्रेम. एखाद्या व्यक्तीशी आसक्ती निर्माण झाली तर त्याला इश्क-ए-मजाजी म्हणतात. याउलट इश्क-ए-हकीकी म्हणजे परमेश्वरावरील प्रेम — ते दैवी प्रेम मानले जाते. ('हक' चा दुसरा अर्थ आहे सत्य/ईश्वर). उत्तम शायर हे दोन्ही प्रकार अतिशय खुबीने काव्यात गुंफतात. 

अशीच एक सुंदर रचना ख़ुसरोने केली आहे - जी एक अप्रतिम कव्वाली बनली -- "ज़े-हाल-ए-मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल". या रचनेचे वैशिष्ट्य असे आहे कि एक ओळ फारसीत आणि दुसरी हिंदवीमध्ये आहे. चला तर आज ही कव्वाली बघूया. हि कविता विरहाच्या वेदनेवर आधारित आहे.

ज़े-हाल-ए-मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल, दुराये नैनाँ बनाए बतियाँ

कि ताब-ए-हिज्राँ नदारम ऐ जाँ, न लेहू काहे लगाए छतियाँ

*ज़े-हाल-ए-मिस्कीं - दुःखी/बिचारी अवस्था 

*मकुन - नको 

*तग़ाफ़ुल - दुर्लक्ष करणे 

*ताब-ए-हिज्राँ - विरह सहन करायची शक्ती 

*नदारम - नाही आहे 

माझ्या या दुःखी अवस्थेकडे दुर्लक्ष करू नको, नजर चोरून खोट्या गोष्टी करतो आहे 

माझ्याकडे विरह सहन करायची शक्ती उरली नाहीये, का नाही तू मला छातीशी कवटाळत?

शबान-ए-हिज्राँ दराज़ चूँ ज़ुल्फ़ ओ रोज़-ए-वसलत चूँ उम्र-ए-कोताह

सखी पिया को जो मैं न देखूँ, तो कैसे काटूँ अँधेरी रतियाँ

*शबान-ए-हिज्राँ - विरहाच्या राती 

*दराज़ चूँ ज़ुल्फ़ - लांब केसा सारखे 

*रोज़-ए-वसलत - मिलनाचे दिवस 

*उम्र-ए-कोताह - कमी/छोटे आयुष्य

इथे खुसरो छान शब्दखेळ करताना दिसतो. तो म्हणतो -

या विरहाच्या रात्री माझ्या केसासारख्या लांब आहेत आणि तुझ्याशी मिलनाचा दिवस कसा आयुष्यासारखा लहानसा आहे. हे सखी, मी जर पियाला पहिले नाही तर मग या काळोख्या रात्री कशा काढू?

यकायक अज़ दिल दो चश्म-ए -जादू ब-सद-फ़रेबम ब-बुर्द तस्कीन

किसे पड़ी है जो जा सुनावे, पियारे पी को हमारी बतियाँ

*यकायक - अचानक 

*अज दिल - ह्रिदय 

*चश्म-ए -जादू - जादुई डोळे/नजर 

 *ब-सद-फ़रेबम - शेकडो वेळा मोहून फसवणे 

 *ब-बुर्द तस्कीन -शांतता घेऊन जाणे 

अचानक त्या दोन जादुई डोळ्यांनी शेकडो वेळा फसवून माझ्या हृदयाची शांतता नाहीशी केली आहे.

कोणाला काळजी आहे की जो जाईल आणि माझ्या पियाला माझ्या या कष्टी गोष्टी सांगेल?

चूँ शम-ए-सोज़ाँ चूँ ज़र्रा हैराँ ज़ मेहर-ए-आँ-मह बगश्तम आख़िर

न नींद नैनाँ न अंग चैनाँ न आप आवे न भेजे पतियाँ

*शम-ए-सोज़ाँ - तेवणारी मेणबत्तीची ज्योत 

*ज़र्रा हैराँ - अस्वस्थ कण 

*मेहर-ए-आँ-मह - प्रिय शशी/चंद्र 

*बगश्तम आख़िर - शेवटी बनून जाणे 

शेवटी त्या चंद्रासारख्या माझ्या पियावरील प्रेमामुळे मी जणू जळणारी ज्योत झाले, मी जणू एक अस्वस्थ कण बनले आहे.

माझ्या नयनांना झोप नाहीये आणि माझ्या शरीराला कुठला चैनही नाहीये, आणि माझा पिया - ना तो स्वतः येतो ना पत्रे पाठवतो 

ब-हक्क-ए-रोज़-ए-विसाल-ए-दिलबर कि दाद मारा फरेब 'ख़ुसरो'

सपीत मन के वराय रखूँ जो जा के पाऊँ पिया की खतियाँ

*ब-हक्क-ए-रोज़-ए-विसाल-ए-दिलबर - प्रियकराबरोबरच्या मिलनाच्या दिवसाच्या सन्मानार्थ 

*दाद - फरियाद 

पियाबरोबरच्या मिलनाच्या दिवसाच्या सन्मानार्थ हक्काने मी फरियाद करेन की या खुसरोची फसवणूक झाली आहे.

मी माझे मन मन शांत ठेवीन, मी वाट पाहेन माझ्या पियाची मर्जी संपादन करण्यासाठी.

हि रचना जुन्या फारसी आणि जुन्या ब्रिज/अवधीत आहे ... हे भाषांतर कदाचित पूर्णपणे अचूक नसेल

ही कविता दोन भाषांमध्ये लिहिली आहे; तसेच ही कविता दोन स्तरांवर जगते : एक साधी प्रेम विरह कथा आणि एक गूढ आध्यात्मिक प्रवास. गुलझार साहेबांनी या गझलेवरून प्रेरणा घेऊन 'गुलामी' चित्रपटासाठी एक गीत लिहिले आहे जे खूप लोकप्रिय आहे. नुसरत फतेह अली खान यांनी हि कव्वाली खूप छान गायली आहे. ‘कव्वाली’ शब्द 'कौल' वरून आला आहे - ज्याचा अर्थ ईश्वराकडे मागणे सादर करणे - आपल्याइकडे ग्रामदेवतेला जो कौल मागितला जातो तो हाच शब्द. 

तर आता इथे थांबतो. नवीन गझल आणि शायर पुढल्या लेखात. धन्यवाद.


Reference : rekhta.org


सचिन सोनटक्के
सचिन सोनटक्के


Comments


bottom of page