top of page

स्वामी स्वरूपानंद संपादित ज्ञानेश्वरी नित्यपाठ


म्हणून जे जे उचित, आणि अवसरे करुनी प्राप्त 

ते कर्म हेतू रहित, आचरे तू १७. (३-७८ )


देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे 

तो मोक्ष तेणे व्यापारे, निश्चित पावे १८. ( ३-८० )


ह्या ओव्या गीतेतील पुढील श्लोकाच्या विवरणात आलेल्या आहेत. 


नियतं  कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः

शरीरयात्राSपि च ते न प्रसिदध्येदकर्मणः ।।3.8।।


ह्या दोन ओव्यांमध्ये माऊलीने आयुष्यात प्रत्येकाने कोणते कर्म करावे, कसे करावे व का करावे, ह्या प्रश्नांची उत्तरे अगदी स्पष्टपणे दिलेली आहेत. इतर काहीही न वाचता, जर कोणी ह्या दोन ओव्या अनुभवल्या म्हणजे या ओव्यांमध्ये माऊलीने सांगितल्याप्रमाणे तंतोतंत वागले, तर ती व्यक्ती मोक्षप्राप्ती साधेल. 

तो मोक्ष तेणें व्यापारे, निश्चित पावे! 

कोणते कर्म करावे?

गीतेत भगवंत म्हणतात,


नियतं कुरु कर्म त्वं 

नियत कर्म म्हणजे विहित कर्म! स्वधर्म!

म्हणजे काय ते आपण आधी पाहिले आहे, परंतु पुन्हा एकदा थोडक्यात -----

  1. 1प्रत्येकाचे स्वतःच्या सर्व नातेवाईकांप्रती, मित्रांप्रती असलेले कर्तव्य कर्म!

  2. समाज, देश, जग व संपूर्ण विश्वाप्रति असलेले कर्तव्य कर्म!

    {पर्यावरणाकडे लक्ष देणे ( environmental consciousness ) हा त्यातील एक भाग म्हणता येईल.}

  3. आपण नेहमी जे विसरतो, ते मुख्य कर्तव्य! स्वतःप्रति असलेले कर्तव्य! कोणते ?

आठवड्यातून एक दिवस थोडा वेळ काढून मजा करणे, हे ते कर्तव्य नाही. त्याने थोडा वेळ बरे वाटेल, परंतु ती मजा फार काळ टिकत नाही. आयुष्यात खूप यशस्वी दिसणारे लोक सुद्धा अंत:काळी समाधानी असलेले दिसत नाहीत. कितीही मिळवले तरी काहीतरी मिळवायचे राहिलेलेच असते. 

ते काहीतरी म्हणजे "समाधान व मनःशांती"!

त्याकरता आवश्यकता असते ती -  ध्यान, नामस्मरण वगैरे उपासना कर्मांची!

आपली इतरांप्रती असलेली कर्तव्य करणे  इतरांना सुख देण्याकरता, परंतु त्यांच्याकडून स्वतःच्या सुखाची अपेक्षा न करता करायला हवीत. समाजसेवाही तशीच ईश्वरार्पण बुद्धीने व्हायला हवी.

लक्षात घ्या! व्हायला हवी, --- करायला नको. 

एकदा एका सद्विचारी   मास्तराने त्याच्या विद्यार्थ्यांना सांगितले की रोज दोन सत्कर्में करीत जा.

एके दिवशी एका विद्यार्थ्याने सकाळी सकाळीच त्यांना सांगितले की माझी आजची दोन सत्कर्मे झालीत. 

मास्तर - अरे वा ! इतक्या लवकर ? काय केलेस ?

विद्यार्थी - शाळेत येताना एक म्हातारी रस्त्याच्या कडेला उभी दिसली. तिला हात धरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेले.

मास्तर - छान ! दुसरे सत्कर्म ?

विद्यार्थी - तिलाच परत पहिल्या बाजूला आणले. कारण तिला पलीकडे जायचेच नव्हते.

या उदाहरणात थोडी अतिशयोक्ती दिसत असली तरी असे होत नाही, असे नाही.बरेच समाजसेवक समोरच्याला नक्की काय हवे आहे, हे न विचारता , स्वतःचा मोठेपणा ज्यात जास्त दिसेल अशी मदत करताना दिसतात. निवडणुकांच्या वेळी ही गोष्ट जास्तच प्रमाणात दिसते. म्हणून कोणते कर्म करावे हे माऊली स्पष्ट सांगते.

"उचित कर्म"! म्हणजे सर्वदृष्ट्या योग्य कर्म ! तसेच,

"अवसरे करुनी प्राप्त कर्म "! म्हणजे आयुष्यात आपल्या वाटेला त्यावेळी सहज आलेले कर्म!

स्वामी माधवानंद उदाहरण देतात, ध्यान, नामस्मरण करणे महत्त्वाचे असले तरी ते ऑफिसमध्ये काम करत असताना करणे उचित नाही! तसेच "नेहमी हसतमुख राहणे " हा खूप चांगला गुण असला तरी कोणाचे अंत्यदर्शन घेताना हसतमुख राहणे अर्थातच बरोबर नाही. 

शेवटी माऊली म्हणते, "ते कर्म हेतूरहित आचरे तू ".

कुठेही कर्म करताना मला माझ्या अपेक्षेप्रमाणेच फळ मिळेल असे तू ठरवू नकोस. ध्येय ठरवून, त्याकडे जायची वाट आखून, जास्तीत जास्त प्रयत्नाने व जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे तू प्रत्येक कर्म कर. फळही तुला मिळेलच. परंतु ते फळ कोणते असावे, हे तू आधीच ठरवू नकोस. कारण तुझा अपेक्षाभंग होईल.


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन 

म्हणजे कर्मावर तुझा अधिकार आहे, परंतु त्याच्या फळावर नाही. अर्थात फळ कोणते मिळावे, ते तू ठरवू शकत नाहीस. 

ह्या पहिल्या ओवीत आपण कर्म कोणते करावे व कसे करावे, दुसरी ओवी आपल्याला ते कर्म का करावे, हे सांगते.


देखे अनुक्रमाधारे, स्वधर्म जो आचरे 

तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे |


अनुक्रमाधारे म्हणजे ओघाने प्राप्त झालेला स्वधर्म आचर! गीतेच्या संदर्भात, अर्जुनापुढे युद्ध हे त्याचा स्वधर्म म्हणून उभे आहे. "अन्यायाविरुद्ध लढणे" हा त्याचा क्षत्रिय धर्म आहे. तोही बाकी सर्व उपाय थकल्यानंतर! युद्धाच्या आधी स्वतः भगवंत पांडवांच्या बाजूने शिष्टाई करण्याकरता कौरवांकडे गेले होते. त्यांच्या diplomacy मुळे ही युद्ध टळू शकले नाही. स्वतः भगवंतांना त्यांच्या diplomacy चा परिणाम दुर्योधनावर होणार नाही, हे माहीत असणारच. तरीही त्यांनी त्यांचे काम पूर्ण कौशल्य पणाला लावून, अपमान सहन करून केले होते. अधर्मी बाजूकडे जेवायला मात्र ते थांबले नाहीत. तिथलं पंचपक्वान्नाचं जेवण नाकारून ते विदुराकडे प्रेमाने वाढलेल्या कण्या खायला गेलेत.युद्ध टाळण्याकरता सर्व प्रयत्न केल्यानंतर, पांडवांना हे युद्ध स्वधर्म म्हणून करणे भागच होते. 

दुर्योधनही क्षत्रिय राजकुमारच होता. त्याने मात्र हे युद्ध स्वतःच्या स्वार्थाकरता ओढवून आणले होते. त्याची आंतरिक प्रवृत्तीच तशी होती. त्या प्रवृत्तीशी लढणे, हे त्याचे कर्तव्य होते. त्याचा स्वधर्म होता. ते त्याला समजतही होते. कारण अर्जुनाला जे शिक्षण मिळाले, तेच त्यालाही मिळाले होते. युद्धक्षेत्रावर भगवंतांनी अर्जुनाला युद्ध का करायला हवे, हे समजावले. तसेच युद्धाआधी त्यांनी दुर्योधनाला युद्ध का करायला नको, हे समजावले होते. भगवंत स्वतः शिकवणारे होते, दुर्योधनही बुद्धिमान होता, तेव्हा त्याला ते समजले नसेल, असे नाही. परंतु त्याच्या स्वतःच्या उद्दामपणाशी, स्वार्थीपणाशी तो लढा देऊ शकला नाही. 

त्याने भगवंतांना म्हटले,


जानामि धर्मम्  न च मे प्रवृत्ती |

जानामि अधर्मम् न च मे  निवृत्ती ||


"धर्म समजला तरी त्याप्रमाणे वागण्याचा माझा स्वभावच नाही. आणि अधर्म काय, ते कळलं तरी त्यापासून माझी सुटका नाही". हे त्याने स्वतःच ठरवून टाकले होते. त्यामुळे तेच युद्ध त्याच्याकरता स्वधर्म तर नव्हताच, परंतु अधर्म होता. 

कोणते काम करायचे, ते प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. गणितात गती असणारा व गणिताचा आवडीने अभ्यास करणाराच गणितातील एखाद्या प्रश्नावर शोधनिबंध लिहू शकतो. रोज संगीताचा आवडीने रियाज करणाराच स्टेजवर जाऊन गाऊ शकतो. आपण काय करायला हवे, हे प्रत्येकाला आतूनच कळते. ओढून ताणून काहीही करू नये. 

मात्र उपासना कर्म करणे हा प्रत्येक मनुष्याचा स्वधर्म आहे. कोणती उपासना करायची व कशी करायची याचेही स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. कर्मयोग, भक्तियोग की ज्ञानयोग हेही प्रत्येकाचे त्याच्या स्वभावानुसार व क्षमतेनुसार ठरते. कर्मयोग साधल्याशिवाय ज्ञानयोगाच्या मार्गाला लागण्याची पात्रता येणे कठीण असते. माऊली म्हणते अशारीतीने  स्वधर्माचे पालन केले तर,

तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे!

स्वामी स्वरूपानंद सोप्या शब्दात सांगतात,

अधिकार तैसा सेविता स्वधर्म, होय ते चि  कर्म मोक्षप्रद!


 
अनुराधा कुलकर्णी
अनुराधा कुलकर्णी

Comments


bottom of page