‘रचनात्मक’ सुरुवात
- राजेश सहस्रबुद्धे
- Apr 1
- 3 min read
नमस्कार मंडळी,
आपणा सगळ्यांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा !
2025 हे वर्ष त्रिवेणी साठी दर वर्षी प्रमाणेच उत्साहाने सुरु झालं. ह्या वर्षी आपण 108 सूर्य नमस्कार यज्ञ हा नवीन उपक्रम सुरु केला. अनेक उत्साही सभासदांनी 25 जानेवारीला ह्या कार्यक्रमात भाग घेतला. आपला संक्रांतीचा कार्यक्रम हा खास लहानग्यांसाठी असतो. ह्या वर्षी मानवी नातेसंबंधांवर आधारीत होता. 60 हुन अधिक मुला - मुलींनी ह्यात भाग घेतला आणि 270 हुन जास्त लोकांनी त्याचा आनंद घेतला. गेली काही वर्षं अनेक कारणांमुळे वार्षिक सहल होऊ शकली नव्हती. ह्या वर्षीच्या समितीने काही तरी वेगळा प्रयत्न म्हणून snow tubing चा कार्यक्रम आयोजिला. ह्याला भरघोस प्रतिसाद मिळाला, 70 हून अधिक विविध वयोगटातल्या सभासदानी 22 फेब्रुवारी ला snow tubing चा आनंद घेतला.
येत्या 5 एप्रिलला आपण गुढी पाडवा साजरा करणार आहोत. ह्या वर्षीचा गुढी पाडव्याचा कार्यक्रम आपल्याच सिनसिनाटीतील कलासन्मान ह्या नाट्यकलेला समर्पित असलेल्या संस्थेच्या सहयोगाने करत आहोत. कलासन्मान चे गुणी कलाकार आपल्यासाठी 'शांतेचं कार्ट चालू आहे' हे श्रीनिवास भणगे ह्यांनी लिहिलेलं आणि लक्ष्मीकांत बेर्डे, सुधीर जोशी आणि नयनतारा ह्यांच्या भन्नाट अभिनयाने अजरामर झालेलं नाटक सादर करणार आहेत. ज्यांनी तिकिटं काढली नसतील ते अजूनही खालील लिंक वर click करून ती काढू शकतात : https://www.triveni-mandal.org/event-details/gudhi-padwa-2025
2024 पासून आपण विविध क्षेत्रातल्या स्वयंसेवी संस्थांबरोबर सहकार्याने काही कामं करायला सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून आपण Red Sarees ह्या दक्षिण आशियातल्या लोकांच्या स्वास्थ्य विषयक प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थेबरोबर आपण Seminar on New Paradigm on Heart Health for South Asians हा कार्यक्रम आयोजिला आहे. हा कार्यक्रम 12 एप्रिल रोजी Mason Public Library इथे होईल. मध्यम वयातल्या प्रत्येकाने आवर्जून उपस्थिती लावावी असा हा कार्यक्रम आहे आणि ह्या साठी खालील लिंक वर क्लिक करून RSVP करू शकाल. ह्या कार्यक्रमाला शुल्क (ticket fee) नाही.
धनश्री लेले ह्या प्रथितयश अशा वक्त्या आहेत. ज्ञानेश्वरी, रामायण, मनाचे श्लोक पासून ते रवींद्रनाथ टागोर अशा अनेकविध विषयांवर त्यांची रसाळ व्याख्यानं अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या ज्ञानेश्वरी वर कार्यक्रम आपण 27 एप्रिल रोजी करत आहोत. हा कार्यक्रम BMM च्या सहकार्याने होत आहे. ह्या कार्यक्रमाची तिकिटं खालील लिंक वर जाऊन काढता येतील: https://www.triveni-mandal.org/event-details/dhanashree-lele-vyakhanamala-dhanasri-lele-vyakhyanamala
आता थोडंसं ह्या संपादकीयाच्या शीर्षकाबद्दल.
मागील वर्षी आपण एक अतिशय वेगळ्या प्रयत्नाची सुरुवात केली. ती म्हणजे 'रचना सोसायटी' ह्या पुण्याजवळील ग्रामीण आणि डोंगराळ, दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षण आणि स्वास्थ्यासाठी प्रयत्न करणाऱ्या Non-Government Organization (NGO) साठी fundraiser करण्याची. माझी 2025 ची सुरुवात काही वैयक्तिक कारणांनी जानेवारी महिन्यात पुण्याला गेलो असताना रचना सोसाटीला भेट देऊन झाली.
आधी त्यांच्या सिंहगड रोड येथील ऑफिस ला जाऊन तिथून पुढे पानशेत येथे असलेल्या मुलींच्या वसतिगृहात गेलो. बरोबर रचनांच्या co-founder स्वाती ताई चव्हाण आणि कल्पना ताई होत्या. तिथे जायला साधारण पाऊण तास लागतो. पुण्यापासून लांब, निसर्गरम्य पानशेत येथे रचनांचे hostel आहे. 1991 पासून ह्या भागात रचना सोसायटी काम करत आहे. मुलींच्या शिक्षणाची गरज ओळखून 2003 साली हॉस्टेल ची सुरुवात झाली. आज तिथे विविध वयोगटातल्या 55 मुली राहत आहेत. हे हॉस्टेल सिंचन (irrigation) विभागाने भाडे तत्वांनी दिलेल्या जुनाट बंगल्यांमध्ये चालविले जाते.
ह्या मुली पानशेत च्या पुढे 40 ते 50 किलोमीटर एवढ्या दूरच्या गावांमधून ह्या हॉस्टेल मध्ये शिकायला येतात. ह्यातली काही गावं इतकी दुर्गम आहेत की पावसाळ्यातल्या 3-4 महिन्यात तिकडे दळणवळणाची कुठलीही साधनं उपलब्ध नसतात. रचनांच्या अनेक वर्षांच्या कामामुळे ह्या गावांमध्ये रचनाबद्दल माहिती आहे आणि त्या विश्वासावर अवलंबून शिक्षणाच्या प्रति जागरूक असलेले काही पालक त्यांच्या मुलींना हॉस्टेल मध्ये पाठवायला तयार होतात. स्वाती ताई सांगत होत्या की सुरुवातीच्या काळात मुलींना पाठवण्यासाठी खूप पाठपुरावा करून समजूत काढावी लागत असे. आता मुली जास्त आणि hostel ची क्षमता खूपच कमी अशी परिस्तिथी आहे.
मुलींशी आणि hostel च्या caretaker ह्यांच्या बरोबर जवळ जवळ दोन तास गप्पा झाल्या. दहावीपर्यंत ह्या मुली जवळच्या सरकारी शाळेत जातात. 11 वी आणि 12 वी साठी त्यांना लांबच्या शाळेत जावं लागतं. हॉस्टेल मध्ये त्यांचा शाळेला पूरक असा अभ्यास घेतला जातो. अभ्यास व्यतिरिक्त personality development , computer शिक्षण, योगाभ्यास, कला अशा अनेक विषयांवर प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं.
बोलल्यावर असं जाणवलं की ह्या मुली गरीब परिस्थितीतून आलेल्या असल्या तरी स्वाभिमानी आहेत. त्यांचा उत्साह, इच्छाशक्ती आणि डोळ्यातली चमक लक्ष वेधून गेली. त्यांचा शिक्षणाचा ध्यास, मोठं होऊन आपल्या कुटुंबाची आणि त्यांच्या भोवतालच्या समाजाची परिस्थिती बदलण्याची महत्वाकांक्षा वाखाणण्यासारखी वाटली. कुणाला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला वकील तर कुणाला Collector होऊन लोकांसाठी काम आणि अन्याय निवारण करायचे आहे.
इथे अमेरिकेत राहून आपण आपल्या मायभूमीसाठी काय करू शकतो असा प्रश्न आपल्याला अनेक वेळा पडतो. ह्या 55 मुली रचना सोसायटी च्या हॉस्टेल पर्यंत पोचल्या आणि त्यांचे भवितव्य उज्वल होण्याची शक्यता निर्माण झाली. अशा हजारो मुली आहेत ज्यांचे शिक्षण चौथी, सातवी नंतर संपतं. ह्यातल्या काही मुलींचा hostel पर्यंतचा मार्ग सुकर करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. 2024 मध्ये सुरु झालेला हा उपक्रम आपण ह्याही वर्षी अधिक जोमाने पुढे नेऊ अशी अशा आहे.
रचना च्या काही मुलींनी लिहिलेली छोटी छोटा मनोगतं ह्या अंकात तुम्ही वाचू shakata:

पुन्हा एकदा, गुढी पडावा आणि मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! भेटूया 5 एप्रिल ला - 'शांतेचं कार्ट चालू आहे' !

Commenti