पेशवेकालीन वैभवाच्या खुणांची साक्ष देत शंभरी गाठलेला प्रशस्त वाडा मोठया दिमाखात उभा होता. वाडा गावचे भूषणच होते. अंगण, माजघर, ओटी, पडवी, आजूबाजूला अघळपघळ जागा आणि दहा-बारा कुटुंबांना सामावून घेणारी चाळ. विशिष्ट नात्यांनी कुटुंबे एकमेकांशी जोडली गेली होती. आवजाव वाडा तुम्हारा. वाडयात सगळ्यांचे स्वागत असायचे. पण आता मात्र वाड्याच्या भिंती, दार, खिडक्या खिळखिळ्या व्हायल्या लागल्या होत्या.
अचानक जबरदस्त कोलाहल, ठाक-ठाक घणाघाती आवाज, कुत्र्यांचे भुंकणे, मोठमोठ्यांदा बोलण्याचे आवाज, बघ्यांचा घोळका पाहून काय चालले आहे याचा अंदाज येत नव्हता. वाडा कोसळला की काही अपघात झाला! लक्षात आले वाडा पाडवणे सुरु झालाय. चला एक पर्व संपले. जुन्याचे नवीन रूपात रूपांतर होणार. पण वाडयाची शान थोडीच येणार. वाड्याचे पूजन झाले. आणि जेसीबी, ट्रक, मालक, बिल्डर, पहारी, फावडे घेऊन मजूर सज्ज झाले. दणादण भिंती, छप्पर कोसळू लागले. नजरा पाणावल्या. दोन-तीन दिवसात वाडा भुईसपाट झाला.
बांध कामाला सुरुवात झाली. स्लॅबचे काम सुरु झाले. जोखमीचे काम, पण अतिशय योजनापूर्वक पद्धतीने चालू होते. मजुरांची लगबग, ट्रॉली वरखाली होणे, मिश्रण पसरवणे, 10-12 तास लगबग सुरु होती. सुटकेचा श्वास सोडला. आता दुसऱ्या स्लॅबची तयारी. बांधकामचे कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेतलेले मजूर, त्यांचे काम मात्र कौशल्याने करत होते. इंग्लिश मध्ये म्हणच आहे, “practice makes a man perfect”. अनुभव हाच खरा गुरु. कोणी तंबाखू मळत होते, तर कोणी विडीचा झुरका मारत होते. चेष्टामस्करी चालू होती. मधेच मुकादम येऊन दादागिरी करुन दम देऊन जायचा. पण मजुरांचा कामाचा आवाका, कष्ट करण्याची जिद्द बघुन थक्क व्हायला होते. आपण 23-24 व्या वर्षी डिग्री घेतो. सगळे कुटुंब वेठीला धरतो. इथे सगळे उलटेच, कुटुंबातले सगळेच कामाला येतात. तिथेच जेवण, झोप, अंघोळ, पण तक्रार नसते. कारण त्यांच्या पत्र्याच्या झोपडी पेक्षा त्यांना इथेच सुरक्षित वाटत असावे. स्लॅबवर स्लॅब पडतात.
काही दिवसांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले गेले. गंमत वाटली. कोपऱ्यात कबुतराची जोडी घुटर घू करत संसार थाटत होती. जणू काही शामियानाच. मान वेळावत घराची डागडुजी चालूच असते. मग चिमणीताई कशा मागे राहतील. त्यांनी पण काडीकाडी करुन आपला ब्लॉक बांधलाच. कावळे, चिमण्या, कबुतरे ह्या इमारतीच्या बांधकामचे साक्षीदारच. भर म्हणजे 2-4 कुत्री व त्यांची फटावळ दुसऱ्या मजल्यावर लपंडाव खेळत, बागडत असायची. पोत्यावर मुटकुळे करून रात्री तिथेच विश्रांती घेत. काही कामगार तिथेच पथारी पसरत.
आपण टॉवर इतक्या मजल्यांचा आहे, कायकाय सुखासोयी असतील याच्या नुसत्या फुशारक्या मारत असतो. जमले तर एखादी चक्कर टाकतो. स्लॅबवर उभे राहून आजूबाजूला बघतो. खूप आनंद वाटतो. कामगारांचे विचार सुद्धा मनात येत नाहीत. त्यांना पण आपला ब्लॉक असावा असे वाटत असेल ना?
टॉवर बांधून सज्ज होतो. लाईट, पाणी, रंगरंगोटी, लिफ्ट चे काम मार्गी लागते. पाडव्याला गणेशपूजन, वास्तुशांत होते. चला आपल्या घरात राहायला जायचे. केव्हढा गाजावाजा, तयारी, आनंद. पण खरंच आपणच त्या घरातील पहिले राहणारे असतो का? बघा विचार करा. कावळे, कुत्रे, चिमण्या, कबुतरे, मुंग्या, पाली आणि कामगार हयांचेच ते प्रथम घर असते. तेच मालक असतात. त्यांच्या आशाआकांक्षा इथे घुटमळत असाव्यात. माझं घर हा आपला भ्रम. तुम्ही फर्स्ट अहं सेकंड ओनर असता. पहिला मान कामगारांचा कारण इमारतीचा कोपरानकोपरा त्यांना माहित असतो. त्यांच्या कष्टावरच इमारत उभी राहते. वर्ष दोन वर्ष काम मिळणार, पैसा मिळणार म्हणून ते खुश असतात. वेळप्रसंगी मारामाऱ्या, भांडणे, दारू पिणे आणि भर म्हणजे मुकादमाच्या शिव्या, ओरडा खाणे. पण दुसऱ्या दिवशी नवीन उत्साहाने काम सुरु.
आपण टॉवर, घराचे बांधकाम चालू आहे असे म्हणतो. पण ते आम्ही टॉवर, घर बांधतोय असे म्हणतात. मग सुंदर घरात आपण राहतो. मनाला स्पर्श तरी होतो का की आपण बिनधास्त राहतो ते कोणामुळे. म्हणून सगळे श्रेय त्यांना द्या. ईश्वराजवळ त्यांच्या साठी दुवा मागा. सुखी ठेवायला सांगा. राहायला जायच्या आधी सर्वांचा मान करा. गोडधोड खाऊ घाला. बक्षीस द्या. त्यांचे आनंदाने उजळलेले चेहरे तुम्हाला आशीर्वादच देतील. कधी भेटले तर जरूर विचारपूस करा. हीच खरी माणुसकी. नक्कीच घरात सुखसमृद्धी, शांती नांदेल.
आपण टॉवर मध्ये राहायला जातो. नव्याची नवलाई संपते. आपल्यातच गुंततो. पण ते मात्र गुंतत नाहीत. तर लगेचच दुसऱ्या घराच्या कामाला लागतात. आपले फक्त एकच घर. तेच खरे नशीबवान. अनेक इमारतीत रहातात. सांगा खरे भाग्यवान कोण? ते मनोमन म्हणत असतील अहो आम्ही घरं बांधतो घरं!
Comments