आपण भारतीय खरेच भाग्यवान आहोत कारण अनेक तऱ्हेच्या कलांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. त्यात साहित्य हा अतिशय समृद्ध कला प्रकार. ज्यात गद्य आहे, - पद्य आहे, - चित्र आहे. मला आवडणारा प्रकार पद्य म्हणजेच काव्य...आणि त्यातही गझल हा उप-प्रकार मला जास्त भावतो. तर आज त्यावर थोडेसे.गझल हा प्रकार मूलतः भारतीय नाही. आपल्याकडे ओव्या, अभंग, श्लोक, पोवाडे, दिंडी इत्यादी काव्य प्रकार होतेच. पण गझल हे परकीय पीक आहे, ते अरबस्तानात जन्मले, नंतर पर्शियन भाषेने दत्तक घेतले असे म्हणता येईल. पुढे इतर भाषांनीही त्यात भर टाकली. उदाहरणार्थ उर्दू, पश्तू , हिब्रू आणि हिंदी. आणि जे चांगले वाटते ते आपणही आपलेसे करतोच...नाही का? (बटाटेच पहा !!). तशी गझलही आपण आपलीशी केली. उर्दू भाषा ही एका अर्थाने खडी भाषा, जी उत्तर भारतात सैन्य-शिबिरात वापरली जायची (राज दरबारी भाषा फारसी होती) - ती उर्दू भाषा गझलेचा प्राण बनली.
गझलेमध्ये शेर किंवा द्वि-पदी असतात... म्हणजे २ ओळी. असा प्रत्येक शेर एक स्वतंत्र भावना मांडणारी छोटी कविता किंवा नझमच असते. सामान्य कवितेमध्येही कडवी असतात पण ती एकमेकांपासून वेगळी नसतात, गझल मध्ये मात्र ते शक्य आहे. प्रत्येक शेर वेगळी संवेदना मांडू शकतो. मूळ अरबी गझल म्हणजे शेर होते जे एका मोठ्या काव्याआधी (कसिदा) सुरवातीला गायले जायचे आणि बहुतांशी ते धार्मिकच असायचे. पण नंतर लोकप्रियतेमुळे गझल स्वतंत्र झाली आणि तिचे स्वरूपही केवळ धार्मिक राहिले नाही. उर्दू-हिंदी मध्ये कित्येक विख्यात शायर झाले. त्यांच्याबद्दल आपण पुढे वाचूच पण मराठी मध्ये स्वातंत्र्यापूर्वी माधव पटवर्धन (ज्यांना माधव जुलिअन म्हणून ओळखले जाते) नावाचे मोठे गझलकार होऊन गेले आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे कवी सुरेश भट झाले. सुरेश भटांनी आपल्या काव्यसंग्रहात गझलेची बाराखडीसुद्धा मांडली आहे. त्या बाराखडीचा आधार घेऊन पाहूया गझलचा आकृतिबंध कसा असतो. याआधी म्हंटल्याप्रमाणे गझल अनेक शेर एकत्र करून बनली असते. त्यात किमान ५ ते कमाल १७ शेर असू शकतात. पहिल्या शेराला 'मतला' म्हणतात. जरी प्रत्येक शेर २ ओळीत मांडला जातो, तरी पहिल्या शेरात यमक (काफ़िया) आणि अन्त्ययमक (रदीफ़) असतो.
सुरेश भट उदाहरण देतात :
राहिले रे अजून श्वास किती
जीवना ही तुझी मिजास किती”
या मतल्या मध्ये 'श्वास' आणि 'मिजास' हे 'काफ़िया' आहेत आणि 'किती' हे 'रदीफ़'. या तांत्रिक बाबी आहेत. त्याबद्दल आता पुरे.
हिंदी-उर्दू गझल विश्वात अनेक एकापेक्षा एक बेहेतरीन शायर होऊन गेलेत. त्यांच्या शेकडो गझला, शेर आहेत ज्या गझल आकृतिबंधाचे आदर्श नमुने म्हणून देता येतील. खुसरो, गालिब, मीर पासून कैफी, फैझ, फराज, गुलजार, निदा या आजच्या पीढी च्या शायरांची नावे पटकन समोर येतात. पण मला भावलेला कवी मीर आहे. मीर ताकी मीर हा १८ व्या शतकातील म्हणजे गालिबच्या ८० वर्षाआधीचा शायर. खुसरोच्या काळात (१३ वे शतक) गझला बहुतेक धार्मिक-सुफी मिजाशीच्या होत्या. पण नंतर मीर ने त्यात भक्ती, प्रेम, समाजिक स्थिती असे वेगळे रंगही मिसळले. मीरच्या काळात दिल्लीवर खूप आक्रमण आणि रक्तपात झाला.. अब्दाली असो किंवा नादिर शाह असो. त्या भयाणतेचे बिंब मीरच्या काव्यात पडलेले दिसून येतं. त्याला खुदा-ए-सुखन (गॉड ऑफ उर्दू पोएटरी) म्हणतात. मीरच्या सुंदर गझला म्हणजे “पत्ता पत्ता बूता बूता”, “ये धुवासा कहा से”, “इब्तिदाए इश्क है रोता है क्या” आणि अशा अनेक. माझी आवडती गझल आहे “दिखाई दिये यू के बेखुद किया” ‘बाज़ार’ या चित्रपटात खैयाम यांनी ती आपल्या समोर आणली. प्रत्येक गझल आणि तिचे रसग्रहण हा एक नवीन ब्लॉगचा स्वतंत्र विषय होऊ शकतो म्हणून तिथे नको जायला.
पण अगदी मोजक्या आणि चपखल बसतील अशा शब्दांमध्ये भावनात्मक शायरी कशी घडू शकते त्याचे आदर्श उदाहरण ही गझल आहे.
“बहोत आरजू थी गली की तेरी
सो यास-ए-लहू में नहा कर चले
दिखाई दिए यूं के बेखुद किया
हमे आप से भी जुदा कर चले”
* यास-ए-लहू - नैराशेने लहुलुहान होणे
महान कवी गालिबसुद्धा मीरबद्दल म्हणतो की
“रेख़्ते के तुम्हीं उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते हैं अगले ज़माने में कोई 'मीर' भी था”
* रेखता अथवा हिंदवी म्हणजे उर्दू भाषा
हिंदीतले गुलजार तर अगदी अवलिया आहेत. ते आपल्याला १३ व्या शतकातले खुसरोचे बोल “जिहाले मिस्किन..” परत एकदा दाखवतात. नुसते बोलच नाही तर इबने-बतूता सारख्या मुसाफिराची आपल्याला ओळख देतात. कधीतरी ते बल्लीमारनचा जिक्र करतात आणि गालिबच्या घराचा पत्ता सांगतात.
कधीतरी ते लिहितात -
“दीवारों की चिंता रहती है, दीवार में कब कोई दर होगा” किंवा “वक़्त रहता नहीं कहीं टिक कर, आदत इसकी भी आदमी सी है”…अगदी सोप्या, मोजक्या पण प्रभावी शब्दांमधून किती सुंदरपणे व्यक्त होता येते हे गुलजार दर्शवतात.
दुर्दैवाने गझल हा प्रकार मैफल, दारू (जाम), वियोग, प्रेमभंग आणि कठीण उर्दू शब्द यामुळे मराठीत कदाचित खूप स्वीकारला गेला नाही. पण उत्तम गझल लिहिण्याची शिताफी कमी होणे हे ही कारण असू शकते.
कवी किंवा शायर म्हणा त्यांची मनोभावना एका अर्थाने जागतिक असते. म्हणून जेंव्हा ग्रेस धूसर आणि व्याकूळ संध्यासमयी लिहितात तेंव्हा सलीम कौसरच्या ओळी सुद्धा आठवतात - “अजब ऐतबार बे-ऐतबार के दरमियान है जिंदगी” (ही गझल कुठली आणि तिचा बॉलिवूडमध्ये कसा बोऱ्या वाजवला हा तुम्हा सगळ्यासाठी एक छोटा trivia). नंतर शांता शेळके यांचे बोल आठवतात, “काटा रूते कुणाला.. मज फूलही रुतावे..” - जेंव्हा नुसरत गातात “लोग काँटों से बच के चलते हैं, मैं ने फूलों से ज़ख़्म खाए हैं”.
एकंदरीत गझल लिहायला जे कौशल्य लागते, तितकेच ऐकायला एक प्रकारची स्थिरता लागते, जी आजकाल कमी झाली आहे. मराठी काय किंवा हिंदी काय…गेल्या कित्येक वर्षात उत्तम गझल कोणत्याही सिनेमामध्ये आलेली दिसत नाही.
भाषेचे शब्दकोश कदाचित मोठे जाड झाले असतील पण सामान्य माणसाचा रोजचा शब्दसंचय मात्र कमी झालाय. खूप कारणे असू शकतात…कमी वाचन, मोबाईलचा प्रादुर्भाव आणि त्यातही इमोजी वापरणे ईत्यादी. आपण माहिती पोचवू शकणे यावर जास्त भर देतो, पण जी भाषा त्यासाठी वापरावी तिच्याबद्दल थोडे उदासीन असतो. हे सुद्धा भाषा आटण्यामागील कारण असावे. म्हणून मराठी गझल हा प्रकार मरणासन्न होत आहे का? अशी शंका येते. पुढील पिढी आणि त्यातही महिला वर्ग यांनी यात रस घेऊन पुढाकारही घ्यावा अशी विनंती. तसेही पाहिले तर महिला शायर कमी आहेत. कमी (पण अचूक) शब्दांमधून मनोभावना उत्कटतेने मांडणे हे महिलाना जमणे मूलतः अवघड असावे कि काय?…असो…तो विनोदाचा भाग झाला. पण जसे नवीन पोवाडे, अभंग लिहिणे जवळपास बंद झाले आहेत तसा प्रकार गझलेसोबतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या अनुषंगाने खूप वाचा, चांगले ऐका आणि नक्की लिहा. भाषा-भाषांमध्ये शत्रुत्व कशाला? त्यापेक्षा शब्दांशी मैत्री करूया.
उदाहरणार्थ खालील वाक्यामधले मराठी किती आणि बाहेरचे शब्द किती - पाहूया !
"आमच्या नोकराने पेशवे पार्काहून कसबा पेठेकडे गाडी नेली."
नोकर - मोंगोलियन/तुर्की
पेशवा- फारसी
पार्क- इंग्लिश
कसबा- अरेबिक
पेठ- मराठी
गाडी- हिंदी
शब्द हे भाषेला, ललित कलेला भूषवणारे मोती आहेत. ते साठवा आणि वाढवा.
जसे तुकाराम महाराज सांगून गेले -
आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्न करूं ॥१॥
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन | शब्द वाटू धन जनलोका ||२||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव | शब्दचि गौरव पूजा करु ॥३॥
आणि शेवटी जाता जाता माझा एक लंगडा यत्न... गुस्ताखी म्हणा :
“उन्हें गुमान था अपने शातीर होने पर
काश कभी वो हमारी मासूमियत भी आजमा लेते”
रेफरन्स: सुरेश भट “झंझावात” आणि रेखता.कॉम
Commentaires