काहीतरी... तुमच्यावरती !
- सचिन सोनटक्के
- Dec 31, 2024
- 1 min read
एक तुमच्या असण्यावरती
एक तुमच्या नसण्यावरती
अजून काही लिहायचे आहे
एक तुमच्या हसण्यावरती
शब्दांचा हा खेळ सारा
शब्दांविना खेळायाचा
इतका केला खटाटोप मी केवळ
तुमच्या खुलून दिसण्यावरती
ठेवल्यात मी बांधून खुणा
तुमच्या मृदु पावलांच्या
उमटल्या आहेत त्या माझ्या
मनाच्या ओल्या मातीवरती
पाखरेही परतली आता घरी
सूर्यही विझला पलीकडे
व्याकूळ नजर भिरभिरते अजूनी
तुम्ही गेल्या त्या वाटेवरती
नादही तुटले अन सूरही सरले
उरले केवळ अश्रू मागे
सोबतीला या श्वासांच्या
जे टिकलेत तुमच्या स्मृतींवरती
प्रखर आहे जाळ मनीचा
लाभेल का मज शीतल-शांती?
जाईन कुठेही जर मिळेल मज 'ती'
इकडे का तिकडे? इथेच का 'वरती'?
एक तुमच्या असण्यावरती
एक तुमच्या नसण्यावरती
अजून काही लिहायचे आहे
एक तुमच्या हसण्यावरती

Komen