top of page

कलासक्त उद्योजक

राहुल देशमुख
कधी कधी  आपल्या मध्ये अशी काही व्यक्तिमत्व असतात  ज्यांनी आपल्या व्यावसायिक प्रगती बरोबरच आपली कलाही तेवढीच  जपलेली असते.  आपल्या आयुष्यातले अत्युच्य शिखर गाठताना त्यांनी कलेसाठी  बऱ्याच गोष्टी सांभाळून आपल्यातला  कलाकार हा जागा ठेवलेला असतो. अशा लोकां बरोबर बोलल्या खेरीज त्यांचे कलेवरचे प्रेम हे आपल्याला कळूच शकत नाही. ​​त्रिवेणी मधल्या जवळपास सगळ्यांनाच परिचित असलेलं असं एक व्यक्तिमत्व म्हणजे राहुल देशमुख. त्यांच्यातल्या कलाकाराशी आणि व्यावसायिकाशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा.  
 


नमस्कार राहुल, तुमचं लहानपण कुठे गेलं ,शिक्षण, छंद आणि कौटुंबिक  बॅकग्राऊंड या बद्द्ल थोडी माहीती द्याल का?

माझा जन्म मुंबईत 1968 ला झाला, सुरुवातीला घाटकोपर आणि नंतर चेंबूरला आमचं घर होतं. घरात  आई-वडील, मी आणि मोठा भाऊ आशिष, असं आमचं कुटुंब होतं. लहानपणी मी चांगला स्विमर होतो आणि शाळेत असताना मुंबई आणि महाराष्ट्र या दोन्ही पातळ्यांवर मी प्रतिनिधित्व केले आहे. 1978 मध्ये मी तबला शिकायला सुरुवात केली. दिल्ली घराण्याचे श्री. कमलाकर रेडीज हे माझे पहिले गुरू, जे  नारायणराव इंदोरकरांचे शिष्य होते.  जवळपास पाच वर्षा नंतर  चेंबूरला स्थलांतर केल्यावर श्री. ग्यानशंकर घोष यांच्याकडे शिकण्यास सुरुवात केली, जे स्वतः पंडित सुदर्शन अधिकारी यांचे शिष्य. यापैकी  रेडीज गुरुजींकडे  प्रामुख्याने  गायनाला साथ देण्याची पद्धत  शिकलो  आणि  ग्यानजींकडे इन्स्ट्रुमेंटलला साथ देण्या ची पद्धत शिकण्याची संधी मिळाली. ग्यानजी अतिशय सुंदर सतारही  वाजवतात आणि  ते  भारतरत्न  पंडित  रविशंकर  यांचे  शिष्य  आहेत

श्री. ग्यानशंकर घोष

त्याच सुमारास चेंबूरला माझी ओळख पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्याशी झाली. सहज  बस स्टॉप वर झालेल्या  या ओळखीने माझ्या आयुष्यावर मोठा ठसा उमटवला. पुढची बरीच वर्ष त्यांच्या घरी  रियाझाला अणि  तालमीला  साथ  करताना खूप शिकायला मिळालं. त्यांची स्वतःची तीन मुलं आणि मी त्यांचा चौथा मुलगाच होतो, इतकं ते नातं जिव्हाळ्याचं  होतं.

त्याच वेळेस आमच्या घरामध्ये मात्र  बिझनेसचं वातावरण होतं. BHU  मधून केमिकल इंजिनिअर होऊन  माझे  वडील एग्रीकल्चरल केमिकल्स च्या क्षेत्रात कन्सल्टिंग करत असत. 1986/ 87 च्या सुमारास भारतातली कॅपिटल मार्केट्स  ओपन होत होती आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पूरक वातावरण होतं. भारत सरकारच्या काही योजनांचा लाभ घेत  माझ्या वडिलांनी  एग्रीकल्चरल केमिकल मॅन्युफॅक्चरिंग ची  एक कंपनी सुरू केली - 'वरूण पॉलीमॉल ऑरगॅनिक्स लिमिटेड', ही कंपनी मुंबई स्टॉक एक्सचेंज वर लिस्टेडही होती. घरात  दिग्गज व्यावसायिकांचा सतत राबता असे आणि चर्चेचे विषयही  व्यवसाया  संबंधित असत. आम्ही लहान असलो तरी बिझनेस मिटींग्स, प्रेस कॉन्फरन्सेस व इतर संबंधित  चर्चा ऐकत असू. व्यवसायासाठी ते अतिशय उत्साहाचे दिवस होते. त्यामुळे कलेबरोबर बिझनेसचे संस्कारही मिळत होते.

दहावी अकरावीच्या सुमारास तबल्या  वरचा  फोकस  खूपच  वाढला   आणि  स्विमिंग थोडं  मागे  पडलं . ग्यानजींची  तालीम  आणि  व्यास बाबांच्या मार्गदर्शना  खाली   तबल्याकडे  कमिटमेंट बरीच वाढली होती  आणि प्रगतीही झाली होती. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे कला आणि entrepreneurship या दोन्हीचे संस्कार  हे असे  लहानपणापासूनच भरभरून मिळाले.

पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास

तुमच्या कला प्रवासातील काही विशेष अविस्मरणीय आठवणी तुम्ही आमच्या वाचकांबरोबर share कराल का?

1984-1991 हा तबल्यासाठी माझ्या आयष्यातील सुवर्ण काळ होता. ह्यात चांगले गुरु, संधी आणि घरातले पोषक वातावरण ह्या नशिबाने मिळणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मी त्याबाबतीत स्वतःला खरोखर नशीबवान म्हणीन. व्यासबाबांच्या रियाझाला आणि  त्यांच्या शिष्य वृंदाच्या तालमींना साथ करण्या साठी  दररोज  संध्याकाळी  4 ते 5 तास  मी  त्यांच्या  कडे  असायचो. त्यांच्या कडे येणाऱ्या शिष्य वर्गामध्येही प्रथितयश कलाकार असत. त्यात प्रामुख्याने सुहास  व्यास, गणपती भट, प्रभाकर कारेकर, संजीव चिमलगी, मंगला रानडे, श्रीराम परशुराम अशी मंडळी होती. याचा  परिणाम  असा  झाला  की  मलाही रियाजाची शिस्त लागली आणि  मी या संगीताच्या  वातावरणात  रमलो.  

मला रंगमंचावर तबला वाजवण्याची पहिली मिळालेली संधी हा माझ्यासाठी एक अविस्मरणीय क्षण होता. त्यावेळी रंगमंचावर स्वतः पंडित व्यास, पंडित के. जी. गिंडे, प्रभाकर कारेकर, आरती अंकलीकर, पखावजवर अर्जुन शेजवाळ, तबल्यावर नाना मुळे

अशी दिग्गज मंडळी होती आणि त्यांच्याच  बरोबर तबल्यावर मीही  साथीला. हा कार्यक्रम मुंबई मधील सर्वात प्रतिष्ठीत ठिकाणी, National Center Of Performing Arts  (NCPA)  येथे झाला. 1000 लोकांच्या क्षमतेचं नाट्यगृह ठासून भरलेले होते. प्रेक्षकांमध्ये  पु . ल . देशपांडे बसलेले होते. अशा कार्यक्रमात पंडित सी. आर. व्यासांनी मला साथ करण्याची संधी दिली हे माझे भाग्यच. त्या वेळेस मी फक्त दहावीत होतो. कार्यक्रम संपल्यानंतर  तबल्यावरच्या बालकलाकाराची पु.लं. नी आवर्जून चौकशी केली व आशीर्वाद दिला.

त्यानंतर 1985 मध्ये पंडित रविशंकरजी मुंबईला आले होते. त्यावेळी गुरूजी ग्यानशंकर यांनी आपल्या निवडक शिष्यांसोबत त्यांना भेटण्याची वेळ मागितली होती. तेंव्हा आमच्या वादनाची  काही रिकॉर्डिंग्स आम्ही रविशंकरजींना ऐकवली होती, त्यात माझ्या आणि माझ्या भावाच्या रेकॉर्डिंग्सचा समावेश होता. पंडितजींनी ही रेकॉर्डिंग्स कौतुकानी ऐकली व त्यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. त्यांच्या बरोबर घालवलेले हे खाजगी, अमूल्य क्षण हि माझी एक आनंददायी आठवण आहे..

आठवणींमध्ये सांगण्यासारखी अजून एक आठवण म्हणजे 1988 साली पद्मभूषण अब्दुल हलीम जाफर खान ह्यांची सतार वादनाची मैफिल मुंबई मध्ये होती. मी नेहमी प्रमाणे ऐकण्यासाठी गेलो होतो. ऐनवेळी त्यांच्या तबलजींना साथ देणे शक्य नव्हते, त्यावेळी प्रयोजकांनी अचानक मला साथी साठी विचारले आणि अक्षरशः 5 मिनिटं ग्रीनरूमच्या  तयारी  वर  ते म्हणाले "चलो बेटे", आणि आम्ही स्टेज वर गेलो. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. उस्तादजी खूप खुश झाले आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या  काही मैफिलींनाही आवर्जून बोलावून घेतले.

1989 मध्ये, SPIC MACAY च्या , UDCT मधील  चॅप्टर ने  पद्मविभुषण  अली अकबर खॉंसाहेब आणि पद्मविभुषण  झाकीर हुसेन ह्यांच्या मैफिलीचे  आयोजन  केले  होते.  मैफिलीनंतर अली अकबर खॉं साहेबांच्या घरी जाण्याचा योग आला. तिथे  खॉंसाहेबांच्या  भगिनी  अन्नपूर्णा देवीजींना भेटण्याची दुर्मिळ संधी मिळाली. अन्नपूर्णा देवीजी  म्हणजे  पंडित  रविशंकरजी  यांचे  गुरु  उस्ताद  अल्लाउद्दीन  खॉंसाहेब यांची  कन्या  आणि  पंडित  रविशंकर यांच्या पहिल्या पत्नी.  या  महान  कलातपस्विनीचा  मिळालेला  आशीर्वाद  हा  माझा  मोठा  ठेवा  आहे .

आमच्या कडे घरात कायमच मोठ्या कलाकारांची उठबस आणि त्यांचे कार्यक्रम होत असत. एकूणच आमच्या घरी कुठलाही आनंदाचा प्रसंग हा शास्त्रीय संगीतानेच साजरा होतो. अशा  कौटुंबिक सेलेब्रेशन्स  साठी  अनेक  दिग्गज  कलाकारांनी  आम्हाला सांगितीक  आशीर्वाद दिले  आहेत,  जसे  पंडित  भीमसेन  जोशी, मालिनीताई  राजूरकर, एल के  पंडित, पद्माताई  तळवलकर, जगदीश  प्रसाद  व  वेंकटेश  कुमार.

उस्ताद शाहिद परवेज

दुसरी फॅमिली ज्यांचा माझ्या वर मोठा प्रभाव पडला ते म्हणजे धृपद-धमार वीणा  वादक,  उस्ताद झिया मोही उद्दीन डागर. माझा डागर बंधु आणि त्यांच्या पनवेलच्या गुरुकुलाशी जवळून संबंध आला. मी त्यांच्या  बरोबर अनेक कार्यक्रमांना साथ दिली. धृपद-धमारला पखावज ची साथ असते पण मला डागर बंधूंबरोबर पखावज अंगाच्या तबल्याची साथ कशी करायची हे शिकायला मिळाले हेही एक भाग्यच.

अजून आवर्जून सांगण्या सारखे कलाकार ज्यांना मी भारतात व अमेरिकत साथ संगत केली त्यामध्ये अश्विनी भिडे देशपांडे, आरती अंकलीकर, प्रभाकर कारेकर, अली अकबर खॉंसाहेबांचे शिष्य Ken Zuckerman, शुभेंद्र राव, सुहास  व्यास, सतीश व्यास, उस्ताद इम्रत खान, उस्ताद शाहिद परवेज, शुभदा पराडकर, गौरी पाठारे, शाश्वती मंडल ही नावे नक्कीच उल्लेख करावा अशी आहेत.

1984 मध्ये  सुरू  झालेला  हा  संगीत  प्रवास  आजही  अविरत  चालू  आहे   मला अनेक संधी मिळाल्या,पण त्या संधीचे सोने करण्यासाठी लागणाऱ्या तयारीचे श्रेय मी  माझ्या  गुरुजनांना  आणि  शिस्तबद्ध मेहेनतीला देईन.


तबला आणि प्रोफेशनल करिअर यामध्ये प्रायोरिटी ठरवताना त्रास झाला का? तुम्ही निर्णय कसा घेतलात?

मी शिकत असताना अनेक गुणी कलाकारांच्या सानिध्यात आलो. कला हाच ज्यांचा व्यवसाय आहे अशा अनेक दिग्गज लोकांचे आयुष्य मी जवळून पहिले. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयष्यावर होणारे भले आणि बुरे परिणाम हे मी जवळून पहिले. सततच्या मैफिली, सारखा करावा लागणारा प्रवास, limelight ची झिंग आणि मोठ्या कलाकारांबरोबर मिळणारे दुर्मिळ आणि अनमोल आनंद क्षण, हे सगळे विचार करायला लावणारे, मोहात पाडणारे होते. तबला हा व्यवसाय म्हणून करावा की घरच्या व्यवसायात पडावे हा निर्णय घेण्याची वेळ येऊन ठेपली, तेंव्हा आई वडिलांबरोबर सखोल चर्चा  करून आम्ही ह्या निर्णयाप्रत आलो की रोजचे आयुष्य जगण्यासाठी बिझनेसला प्राथमिकता द्यावी, व तबल्याला छंद म्हणून आयुष्यात महत्वाचे स्थान असावे. त्यातूनच 1990 मध्ये  केमिकल  इंजिनीरिंगचे  शिक्षण  पूर्ण  करून  मी  वरुण  पॉलीमॉल   जॉईन  केलं. फॅक्टरी  महाडला  होती,  तिथे  ट्रेनी इंजिनीअर म्हणून 2 वर्षे core technical काम केले. 

तिथे मला manufacturing मधला खरा सखोल अनुभव मिळाला. मग पुढे मला 2 वर्षे supply chain मध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मी कंपनीच्या सेल्स अँड मार्केटिंग मध्ये काम करायला सुरुवात केली, तेंव्हा भारतात अनेक राज्यातील सेल्स ऑफिसेस मध्ये काम केले. ह्या प्रवासातच Bayer आणि Reckitt या सारख्या international कंपन्यांचे Manufacturing  काँट्रॅक्टस मिळाले व  त्याची  पूर्ण  जबाबदारी  पार  पडण्याची  संधी  मिळाली. व्यवसायाचा सर्वांगीण अनुभव घेणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट होते. 1994 मध्ये माझे आणि आसावरीचे लग्न जुळले आणि आयुष्याचा नवीन प्रवास सुरु झाला.


अमेरीके ला स्थलांतर कधी आणि आणि कसं झालं? इथे करिअर progression कसं झालं याबद्दल जाणून घ्यायला आवडेल …

1998 मध्ये आम्ही अमेरिकेत येण्याचे ठरवले त्याला अनेक कारणे होती. एक तर वडीलांच्या  तब्येती मुळे कंपनीचा पसारा आवरता घेण्याची गरज भासू लागली होती. दुसरं म्हणजे व्यवसायाचा जरी मला भरपूर अनुभव असला तरी व्यवस्थापनाचं औपचारिक शिक्षण झालेलं नव्हतं. तेंव्हा मी आणि दादाने पुढे काय करायचे याचा सर्वांगीण विचार केला आणि  घरच्या व्यवसायाचा व्याप हळूहळू आटोपता घेतला. आणि मग मी 1998 मध्ये St. Louis येथे Washington University मध्ये MBA साठी प्रवेश घेतला व पुन्हा एकदा पूर्ण वेळ विद्यार्थी बनलो. या वेळी आसावरी दोन महिन्याचा छोटा अथर्व घेऊन इथे आली. त्यावेळी माझ्या कडे हातात फक्त $500 होते आणि भरपूर सारे फॅमिली loans, बँकेचे loans अशा  सर्व काही जबाबदाऱ्या होत्या. त्यावेळेस अमेरिकेतल्या विद्यार्थी दशेची झळही काही काळ अनुभवायला लागली. पण नशिबाने पहिल्याच वर्षी मला Monsanto नावाच्या कंपनीत चांगली internship मिळाली. आणि त्यांना माझे काम खूप आवडल्यामुळे त्यांनी मला शिक्षण चालू असतानाच consultant म्हणून offer दिली. त्यामुळे आर्थिक भार थोडा हलका झाला. 2000 मध्ये MBA पूर्ण झाल्या वर मी Emerson  च्या leadership development program द्वारा corporate planning मध्ये कामाला सुरुवात केली. 2002-2007 मी Emerson च्या Daniel Measurement and Control या ऑपरेटिंग कंपनी मध्ये मार्केटिंग डिपार्टमेंट सांभाळलं.

मी ग्रॅड्युएट झाल्यावर आसावरी ने इकॉनॉमिक्स मध्ये PhD program ला  ऍडमिशन घेतली. मात्र तिचे PhD पूर्ण होण्याच्या आतच आम्हाला  2003 च्या सुमारास Houston, Texas ला Emerson मध्येच प्रमोशनवर स्थलांतर करावे लागले. त्याच दरम्यान आमची मुलगी अवनीचा जन्म झाला. 

आधीपासूनच माझी इच्छा general management  मध्ये जाण्याची होती आणि ती  संधी मला मिळाली, Dover कडून. त्यांचं सिनसिनाटी मध्ये एक युनिट आहे OPW Fueling Components. मी 2007-2012 या काळामध्ये कंपनीचा  President and GM म्हणून काम केलं. हा माझा पहिला पूर्ण कंपनीची जबाबदारी घेण्याचा (owning complete P&L) आणि  ग्लोबल युनिट्स संभाळण्याचा अनुभव होता. OPW मध्ये बरेच वेगळे वेगळे अनुभव मिळाले पण एकूणच तो एक यशस्वी कालखंड  ठरला. आम्ही पण सिनसिनाटी मध्ये स्थिरावलो चांगलं मित्रमंडळ जमलं, त्रिवेणी कुटुंबाचा एक भाग बनलो.

त्यानंतर त्याच (Dover) कंपनीसाठी Sargent Aerospace and  Defense, Tucson AZ ला काम करण्याची विचारणा झाली. 3 वर्षा मध्ये हे आजारी युनिट पूर्ण कायापालट करून फायद्यात आणायचं  आणि विक्री योग्य करायचं हा चॅलेन्ज  होता. तेव्हा तीन वर्षासाठी आमचा मुक्काम  Tucson ला होता.  

ते काम यशस्वीरित्या पूर्ण  झाल्यावर मला माझं करिअर थोड्या वेगळ्या प्रकारे पुढे न्यायची इच्छा होती. वेळोवेळी  माझ्यातला entrepreneur डोकं वर काढत असे. आणि म्हणूनच Private equity model of Business मध्ये मला रस वाटू लागला. 2016  मध्ये डेटनच्या  Flow Dry Technology Inc.(Operating company of Argosy Private Equity) या कंपनी मध्ये President and CEO रोल साठी विचारणा झाली तेव्हा ती संधी त्या दृष्टी ने योग्य वाटली. अर्थातच सिनसिनाटीला  परत  येणं  हा  अतिशय  हवाहवासा आणि आकर्षक निर्णय होता, कारण आम्ही त्रिवेणी  परिवारात परत येत   होतो.

साधारण चार वर्ष Flow Dry Technology चा  कारभार  यशस्विरित्या सांभाळल्या नंतर  मी  May River Capital ह्या  PE Firm मध्ये   Operating Executive म्हणून रुजू  झालो. या Private Equity मध्ये आम्ही Lower middle मार्केट मधल्या Founder Owner असलेल्या कंपन्या विकत घेऊन त्यांचा योग्य तो कायापालट करतो. अशा कंपन्या या साधारणपणे  गुंतवणुकीचा अभाव आणि व्यवस्थापना मधील  त्रुटींमुळे ग्रस्त  असतात. जेव्हा आम्ही अशा कंपन्या विकत घेतो तेव्हा  त्या कंपन्यांमध्ये पुरेशी  गुंतवणूक वाढवली जाते, अतिशय अनुभवी आणि तज्ञ व्यवस्थापकीय टीम  उपलब्ध केली जाते, त्यामुळे त्यांचे प्रोसेसस, सिस्टिम्स आणि टूल्स  सुधारले जातात. गरज असेल त्या प्रमाणे पूरक युनिट्स जोडले जातात (through aquisitions). साधारण 5 ते 6 वर्ष यशस्वी रित्या व्यवसाय केल्या नंतर या कंपन्या आम्ही विकतो. 

या कामात काही जुने धागे दोरेही जुळत होते. माझ्या वडिलांची कंपनी देखिल याच वर्गात (Founder Owner) मोडणारी होती त्यामुळे मला अशी कंपनी उभी करणाऱ्या लोकांबद्दल आदर आणि थोडा soft corner ही आहे. शिवाय या साईझच्या बिझनेसला येणाऱ्या अडचणींचा, यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या तोडग्यांचा, आणि आवश्यक तडजोडींचाही, मला भरपूर अनुभव आहे. त्यामुळेच कुठेतरी एक वर्तूळ परत जोडल गेल्या सारखा वाटत आहे. 


आपल्या तरुण मराठी मंडळींसाठी तुम्ही काय सल्ला द्याल ?

तरुण मंडळीं साठी आवर्जून सांगण्यासारखं म्हणजे संधी मिळण्या साठी स्वतः भोवती वेगवेगळ्या क्षेत्रात आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर आधाराची बेटं (islands of support ) तयार करा व त्यांच्या बरोबर विश्वासाचं सखोल नातं तयार करा. मात्र हे म्हणजे फक्त  LinkedIn वा  इतर  Social media वरचे हजार कॉन्टॅक्टस नव्हे, तर असे लोक जे तुम्हाला uplift करतील, योग्य संधीच्या वेळी तुमचा विचार करतील. अर्थात अशी नाती ही एकतर्फी नक्कीच नसतात हे ही लक्षात ठेवा. 

दुसरी महत्वाची  गोष्ट म्हणजे मिळालेल्या संधी चा नुसता फायदा घेणे नव्हे तर त्यातून best outcome मिळण्या साठी, कधी कधी  रिस्क घ्यावी लागते, खूप मेहेनत आणि वेळेची गुंतवणूक करावी लागते. ते  धाडस  दाखवण्यासाठी त्या वेळी तुमच्या जोडीदाराची आणि कुटुंबाची साथ ही अतिशय महत्वाची असते, याची नेहमीच जाणीव ठेवा. माझ्याच बाबतीत बोलायचं तर आसावरी च्या सहभागाशिवाय  हे सगळं शक्यच झाला नसतं. तिनी वेळोवेळी मुलांची आणि त्यांच्या गरजांची, कुटुंबाची प्राधान्यक्रमाने काळजी घेतली, प्रसंगी तिच्या स्वतः च्या शिक्षणाला, करिअरला कमी  प्रायोरिटी वर टाकलं, हा अतिशय भक्कम आधार फार मोलाचा होता. 

आणि तिसरा सल्ला मी हा देईन कि आयुष्यात असा एखादा छंद जरूर जोपासा जो तुम्हाला समाधान आणि निखळ आनंद देईल. माझं तबला वादन, आसावरी ची नृत्यसाधना आणि एकुणच कलाक्षेत्रात घालवलेले क्षण हा आमचा एकत्रित आनंदाचा ठेवा आहे.


 
निवेदिता बक्षी
पूर्णिमा गलगली


Comentarios


bottom of page