top of page

ऐतिहासिक वॉशिंग्टन DC

वॉशिंग्टन DC हे सिनसिनाटी पासून साधारण साडेसात तासाच्या अंतरावर आहे. प्रवास जास्त वेळेचा असल्याने सकाळीच सगळी तयारी करून लवकर निघावे लागलं. वॉशिंग्टन DC ला जाताना ओहायो, पेनसिल्व्हेनिया, वेस्ट व्हर्जिनिया आणि मेरीलँड या चार राज्यांतून जावे लागते. 

US कॅपिटल बिल्डिंग

पहिला दिवस पूर्ण प्रवासात गेला. प्रवासातले महामार्ग आणि घाटातले रस्ते एकदम प्रेक्षणीय आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असणारी झाडी आणि सभोवताली स्वागत करण्यासाठी उभ्या असलेल्या डोंगररांगा डोळ्याला एकदम सुखावह वाटतात.


वॉशिंग्टन DC चे मुख्य आकर्षण येथे  म्हणजे असलेली भव्य दिव्य स्मारके आणि US कॅपिटल बिल्डिंग. US कॅपिटल ही अमेरिकेची गोल घुमटाकार बिल्डिंग. ह्या बिल्डिंग मधूनच US काँग्रेस आणि अमेरिकन फेडरल सरकारचे कामकाज चालते. 


ह्या बिल्डिंगचे बांधकाम १८ सप्टेंबर १७९३ रोजी चालू झाले आणि अनुक्रमे १८०० आणि नंतर १९६२ साली पूर्ण झाले. पूर्ण इमारत हि एकूण १६.५ एकरात बांधलेली असून येथे पाच मजले आहेत.


इमारतीचा मध्य भाग जरी १८०० मध्ये पूर्ण करण्यात आला तरी सन १८१४ मध्ये लागलेल्या आगीत ह्या भागाचे नुकसान झाले व पुढे पाच वर्षानी पुन्हा ह्या भागाची डागडुजी करण्यात आली. १८५० मध्ये मधला भाग पुन्हा विस्तारित करून Wings of chamber for bicameral legislature house of representative in south wing and senate in north wing असे वाढवण्यात आले आहे. 


आतमधल्या मोठ्या घुमटाचे बांधकाम मात्र १८६६ मध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर नंतर पूर्ण करण्यात आले. इमारतीचा पूर्व भाग हा पर्यटकांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. अमेरिकेच्या सर्वात सुंदर वास्तूंपैकी ही इमारत ६ व्या क्रमांकावर येते. 


इमारतीत पर्यटकांच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर तिथे आमची तपासणी झाली. तपासणी नंतर सेक्युरिटी गार्डस नी आम्हाला आत सोडले. आतमध्ये ही इमारत खूप सुंदर दिसते उंच उंच सीलिंग, प्रकाशाची उत्तम योजना केली आहे. एक छोटेखानी म्युझियम पण आहे, जिथे पर्यटकांना इमारतीची माहिती आणि इतिहास समजावला जातो.


आतमध्ये US कॅपिटलच्या गाईडेड टूरला सुरवात झाली, ही टूर आपण US कॅपिटल च्या वेबसाईट वर आधीच बुक करू शकतो, जी सर्वांसाठी मोफत आहे.


टूर च्या पहिल्या टप्प्यात १५-२० मिनिटांचा एक विडिओ दाखवला जातो जिथे USA ची थोडक्यात माहिती, अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, लोकतंत्र आणि US कॅपिटल चा थोडक्यात इतिहास दाखवला जातो.


टूरच्या दुसऱ्या टप्प्यात पर्यटकांना ५-६ गटात विभागले जाते आणि प्रत्येक गटाला एक टूर गाईड नेमला जातो. सर्वप्रथम आम्हाला US कॅपिटल crypt मध्ये नेण्यात आले जे पहिल्या मजल्यावर आहे. इथे USA मधल्या प्रत्येक राज्यातल्या महत्वाच्या व्यक्तींचे  पुतळे आहेत. हे पुतळे कधी राज्य सरकारकडून भेट तर कधी फेडरल स्वखर्चाने तयार करतात. प्रत्येक पुतळ्याचा स्वतःचे एक महत्त्व आणि इतिहास आहे. ह्या मजल्याच्या बरोबर मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन ह्यांच्या समाधीसाठी जागा ठेवली आहे, पण इथे त्यांना कधी आणले नाही, त्याची एक वेगळीच कहाणी आहे.


US कॅपिटल dome

टूरच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात आपल्याला दुसऱ्या मजल्यावर US कॅपिटल dome मध्ये नेण्यात येते. वर घुमटाकडे नजर टाकल्यास अतिशय सुबक कलाकृती दिसते. ह्या मजल्याच्या भिंतीवर नाजूक नक्षीकाम केले आहे आणि अमेरिकेच्या इतिहासाचे वेगळे वेगळे प्रसंग चितारले आहेत ज्यात  यूरोपातील आणि मुखत्वे इटलीमधील शिल्पकार आणि चित्रकारांचा सहभाग आहे. इथल्या चित्रांमध्ये मुख्य म्हणजे कोलंबसचे आगमन, जॉर्ज वॉशिंग्टन यांचे स्वातंत्र्य युद्धातील योगदान आणि अजून बऱ्याच ठळक ऐतिहासिक घटनांचे चित्रण दिसते.


त्याच बरोबर वेगवेगळ्या राज्यातल्या महत्वाच्या व्यक्तींचे पुतळेसुद्धा येथे ठेवलेले आहेत. हे पुतळे वेळोवेळी बदलले जातात आणि आधीचे पुतळे सन्माननीय पद्धतीने राज्य सरकारांकडे सुपूर्द केले जातात जे नंतर सरकारी कार्यालयात किंवा सार्वजनिक ठिकाणी स्थापित केले जातात.


थोडक्यात सांगायचे झाले तर ऐतिहासिक वास्तुरचना, स्थापत्य आणि चित्रकलेचा सुंदर मिलाफ इथे बघायला मिळतो.


US कॅपिटल नंतर आम्ही समोरच असलेल्या लायब्ररी ऑफ काँग्रेस च्या वास्तूत भुयारी मार्गाने गेलो. आतमधून रंगीत लोभनीय व बाहेरून तशीच भव्य दिव्य अशी ही इमारत. ही जगातील सर्वात मोठी लायब्ररी म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दररोज सुमारे १०००० पुस्तकांचे व्यवहार होत असतात. या इमारतीच्या शिल्पकलेत अमेरीकेच्या राज्यक्रांतीचा प्रभाव जाणवतो.


वॉशिंग्टन DC मध्ये व्हाईट हाउस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचे निवासस्थान पण पाहण्यात येते. तब्बल ३५ खोल्या आणि ३५ बाथरूम असलेले व्हाईट हाऊस आतमधून पाहण्यासाठी अमेरिकन काँग्रेस सदस्याची परवानगी घ्यावी लागते.

लिंकन मेमोरियल

इथून पुढे आम्ही गेलो लिंकन मेमोरियल कडे. हे स्मारक अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आणि थोर राजकीय नेते अब्राहम लिंकन यांना समर्पित केले आहे. ह्या स्मारकाची उंची ७० फूट असून अमेरिकेतले ७व्या क्रमांकाचे ऐतिहासिक शिल्प म्हणून गणले गेले आहे. अब्राहाम लिंकन ह्यांच्या मरणोत्तर ३ वर्षांनी हे स्मारक डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सिटी हॉल च्या समोर उभारले आहे. ह्या पुतळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अब्राहाम लिंकन ह्यांची संपूर्ण देहबोली, विचार ह्या स्मारकात व्यक्त होताना दिसतात . दररोज सुमारे ७ लाख पर्यटक ह्या स्मारकाला भेट देताना दिसतात. 


ह्या स्मारकाच्या विरुद्ध दिशेला वॉशिंग्टन मॉन्युमेंट नावाचे भव्य दिव्य दीपस्तंभ उभारला आहे. ह्याची उंची ५५५ फूट आहे हा दीपस्तंभ अनुक्रमे १८४८ ते १८५४ आणि १८७९ ते १८८९ दरम्यान पूर्ण केला आहे. लिंकन मेमोरियल ची इमारत आपल्याला ५ डॉलर च्या नोटेमागे दिसते


खरोखरच Washington DC मधल्या ऐतिहासिक इमारती, स्तंभ आणि स्मारके अमेरिकन इतिहासाची सतत जाणीव करून देतात. 


||इती राजधानी यात्रा संपन्न||


 
रुचा पाटील


Comments


bottom of page