मागील लेखात आपण पहिले, कि आहार हा षड्रसयुक्त असावा. हे सहा रस कुठले?
तर मधुर -गोड, अम्ल - आंबट, लवण - खारट, कटु - तिखट, तिक्त - कडू (होय , संस्कृत भाषेत कटु म्हणजे मराठीतला तिखट आणि तिक्त म्हणजे - मराठीतला कडू ), आणि कषाय म्हणजे तुरट.
यात, भात, पोळी वगैरे पदार्थ (Carbohydrates) मधुर रसामध्ये मोडतात.
मधुर रसाने तृप्ती होते, पोट भरल्याचे समाधान या रसानेच प्राप्त होत असते.मात्र, या रसाच्या अत्याधिक सेवनाने जडपणा, स्थूलपणा, मधुमेह इत्यादी आजार होतात.अम्ल रस योग्य प्रमाणात सेवन केला असता भोजन रुचकर होते व पचनासही मदत होते. अम्लरसाची मात्र अधिक झाली तर त्वचाविकार, अम्लापित्त असे आजार होतात. लवण रस अधिक प्रमाणात सेवन केला तर केस गळणे, शुक्रक्षय असे विकार निर्माण होतात.
या सहांपैकी कडू आणि तुरट पदार्थ खाल्ले जात नाहीत. त्यासाठी कारले, निंब, ताक या पदार्थांचा आहारामध्ये आवर्जून समावेश करावा.
सध्या three course meal ची पद्धत सगळया मेजवान्यांमध्ये प्रचलित आहे.त्यामध्ये प्रथम appetizers. म्हणजे, भूक लागण्यासाठी खायचे. त्यानंतर main course व शेवटी desserts.ही संकल्पना मुळीच शास्त्र संमत नाही. मुळात, भूक लागल्याशिवाय जेवायचेच नाही असे आयुर्वेद सांगतो. जे काही जेवायचे ते एका बैठकीत! Appetizers ने भूक लागल्याचा अनुभव कोणाला आल्याचे ऐकिवात नाही. कडकडून भूक लागल्यावर पानावर बसले की जेवणाच्या सुरुवातीला पंगतीत वरण-भात वाढतात. हे मधुर रसाचे अन्न सेवन केल्याने प्रज्वलित झालेला अग्नी थोडा शमतो. पचायला जड असलेल्या अन्नाचे सेवन आधी केले कि ते चांगल्या अग्निबळामुळे सहज पचते. मध्ये इतर सर्व रसांचे सेवन म्हणजे, भाजी, आमटी कोशिंबीर, मसालेभात वगैरे. शेवटी कषाय रसाचे ताक, असा क्रम शास्त्रीय आहे.
इथे restaurants मध्ये आणि शाळेच्या dining halls मध्ये ‘choking hazard’ च्या पाट्या सर्रास दिसून येतात. याचे कारण, जेवताना लक्ष जेवणाऐवजी इकडे तिकडे जास्त असते, आणि तसे असण्याला प्रोत्साहन दिले जाते. आयुर्वेद सांगतो, "अजल्पन, अहसन, तन्मनाभुंजीत .." जेवताना सगळे लक्ष जेवणाकडे असावे. खूप बडबड करत जेवले कि ठसका लागण्याचा संभव असतो. शिवाय लक्ष नसले कि आवश्यकतेपेक्षा जास्त जेवले जाते व त्यामुळे अजीर्ण होण्याची शक्यता असते. मन लावून जेवले की योग्य मात्रेत जेवले जाते, व ते अंगी लागते, जेवल्याचे समाधान लाभते.
एक घास बत्तीस वेळा चावून खावा हे वाक्य प्रत्येकाने घरात एकदा तरी ऐकले असेल. मात्र, हे पाळत कुणीच नाही.अन्नाच्या पचनाची सुरुवात मुखापासूनच होते. व्यवस्थित चावून खाल्ल्याने, अन्नाचे कण बारीक होतात. शिवाय, पुरेसा वेळ ते मुखात राहिल्याने त्यात लाळ योग्य प्रमाणात मिसळली जाऊन ते पचायला सोपे होते.आयुर्वेद सांगतो, “नातिद्रुतम् नीतिविलंबितम्..” म्हणजे खूप भरभरही नाही आणि खूप सावकाशही नाही अशाप्रकारे सम्यक गतीने आहार सेवन करावे.
सर्वात शेवटी, आहारसेवनाच्या नियमांमध्ये ग्रंथकार सांगतात, “आत्मानं अभिसमीक्ष्य..” म्हणजे, हे अन्न मला अनुकूल आहे, किंवा याचं अधिक मात्रेत सेवन केल्यास त्रास होऊ शकेल इत्यादी विचार करून मग ते सेवन करावे. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार अन्न वेगवेगळ्या प्रकारे परिणामकारक होत असते, त्यामुळे प्रत्येकाचा विचार हा स्वतंत्र असावा लागतो.
एखाद्याला एखादा पदार्थ फायदेशीर ठरला म्हणजे तो सगळ्यांनाच चांगला ठरेल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपापले अनुभव तपासून त्यानुसार विवेकाने अन्न सेवन करावे.
अशाप्रकारे सेवन केलेला आहार शरीर व मनाचे पोषण करून उत्तम आरोग्य राखण्यास सहाय्यभूत होतो.
आत्तापर्यंत तीन लेखांमध्ये आहारसेवनाच्या ग्रंथोक्त नियमाचा थोडक्यात घेतलेला आढावा इथे थांबवते.

Komentar